राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट; भाजपला नेमकं काय हवंय?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटी दरम्यान हस्तांदोलन करताना.
फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दोन्ही पक्षात युती होणार का? अशी चर्चा रंगली आहे.

अर्थात राजकारणात अचानक काहीच घडत नसतं आणि वेळेलाही महत्त्व असतं यामुळे ही भेट पूर्वनियोजित असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महानगर पालिका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या 25 हून अधिक वर्षं शिवसेनेची सत्ता मुंबई महानगर पालिकेवर आहे.

यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. आता राज ठाकरे यांच्या मदतीने भाजप नेमकं काय साध्य करू पाहत आहे? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

मनसे-भाजप युती होणार?

मुंबईसह राज्यातल्या 29 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा, 257 नगरपालिका आणि 289 नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या आहेत.

यातील मुंबई महानगरपालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली आहे.

विधानसभेच्या निकालानंतर आता आगामी काही महिन्यात या निवडणुका होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे सध्या राजकीय पक्षाचीही त्यानुसार मोर्चेबांधणी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दादर येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली.

खरं तर काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल तसंच भाजपवर टीका केली होती. यामुळे लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जात होतं.

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि भाजपवर टीका केली होती.

परंतु देवेंद्र फडणवीस यांन��� स्वतः राज ठाकरे यांची भेट घेतल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असल्याचं सांगितलं जात आहे.

विशेष म्हणजे आताच्या राजकीय वातावरणात जिथे महायुतीत एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त वारंवार समोर येत असताना आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद असल्याचंही म्हटलं जात असताना आगामी स्थानिक निवडणुकांसाठी भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं महत्त्व कमी करत किंवा मुंबई महापालिकेवर एकहाती विजय मिळवण्यासाठी मनसेला जवळ करू पाहत आहे का? यामागे मुंबई महापालिकेची काही मोठी समीकरणं दडली आहेत का?

याचीही शक्यता नाकारता येत नाही. अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय चर्चा फेटाळत ही भेट राजकीय नसल्याचं म्हटलं आहे.

'मुंबई महानगरपालिका भाजपला एक हाती हवीय'

महाराष्ट्रात विधानसभेला क्रमांक एकचा पक्ष ठरल्यानंतर भाजपने आता आपलं लक्ष्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे केंद्रीत केल्याचं दिसतं.

यात भाजपसाठी सर्वांत महत्त्वाची लढाई ठरणार आहे ती मुंबई महानगरपालिकेची जिथे 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे.

यामुळे मनसे भेटीमागे मुंबई महानगरपालिकेची रणनिती आणि त्यासाठी विधानपरिषदेची जागा किंवा इतर वाटाघाटी हेच कारण असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान म्हणाले, "मुंबईत तुलनेने एकनाथ शिंदे यांचा प्रभाव नाही. मुंबई महानगरपालिकेतून उद्धव ठाकरे यांची सत्ता घालवणं हे भाजपचं स्वप्न आहे."

"जसं दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना धडा शिकवला तसं मुंबईत उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा असेल तर त्यांच्याकडून मुंबई महानगरपालिका घालवायची हा त्यांचा हेतू आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांची मदत त्यांना होणं कठीण वाटतंय."

मुंबई महानगरपालकेवर 9 फेब्रुवारी 2022 पासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिका

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मुंबई महानगरपालकेवर 9 फेब्रुवारी 2022 पासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मुंबई महानगरपालिकेची शेवटची निवडणूक 2017 मध्ये झाली होती. त्यावेळच्या निकालानुसार मुंबई महानगरपालिकेत शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता.

आता तर शिवसेनेत फूट पडली आहे. यामुळे शिवसेनेचे दोन गट पालिका निवडणुकीत आमने-सामने असतील. यामुळे शिवसेनेच्या पारंपरिक मतांचंही विभाजन होईल.

शिवाय, ही निवडणूक भाजपने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अधिक फटका बसू शकतो असाही अंदाज वर्तवला जात आहे.

ते पुढे सांगतात,"भाजपला मुंबई महानगरपालिकेत असा विजय मिळवायचा आहे की कोणत्याही शिवसेनेची गरज त्यांना भासली नाही पाहिजे. मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असे उभे करायचे की भाजपला त्यांना हवा असलेला आकडा गाठता येईल."

"तर भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांच्या जागा 20-25 जागांवर शिंदेंचे उमेदवार डॅमेज करू शकतात तर 40 जागांवर मनसेचे उमेदवार डॅमेज करू शकतात. मराठी बहुल भागात जिथे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा ठिकाणी मतांचं विभाजन करण्यासाठी मनसेचा उपयोग भाजपला होऊ शकतो,"

"महापौर बसवताना कोणाशीही अटी-शर्थीची गरज भासू नये. उद्धव ठाकरे यांची सत्ता स्वबळावर उलथवली असं कुठेतरी त्यांना सिद्ध करून दाखवायचं आहे,"असंही प्रधान सांगतात.

लाल रेष
लाल रेष

'ही भेट राजकीय नाही'

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "चर्चा केवळ तुम्ही करता. ही कुठलीही राजकीय भेट नाही. या भेटीचा कोणताही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीसाठी मी गेलो होतो."

तर मनसेनेही युतीची चर्चा फेटाळून लावली. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली भेट ही वैयक्तिक आहे. कोणतीही राजकीय चर्चा यात झालेली नाही."

"भाजप-मनसे युतीचा कोणताही प्रस्ताव अद्याप नाही. विधानपरिषदेसाठीही काही बोलणी नाहीत," असं देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे
फोटो कॅप्शन, सुषमा अंधारे यांनी या भेटीवरून मनसेवर निशाणा साधला आहे.

दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या भेटीवरून मनसेवर निशाणा साधला आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, "राज ठाकरे यांचा पाॅलिटिकल रिलिव्हन्स संपत चाललेला आहे. यामुळे राज ठाकरे यांना कोण भेटतं यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात फार उलथापालथ होईल असं वाटत नाही."

"मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाही सवय झाली आहे की एरव्ही भाजपवर टीका करणारे राज ठाकरे निवडणुका जवळ आल्या की त्यांच्या भूमिका भाजपच्या बाजूने दिसतात. या भेटीगाठी पुन्हा एकदा महापालिका संबंधाने असू शकतात."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)