धुरंधर : स्वत:च्या आईचीही हत्या करणारा 'खरा' रहमान डकैत किती खतरनाक होता? त्याचा शेवट नेमका कसा झाला होता?

फोटो स्रोत, Screen Grab
- Author, जाफर रिझवी
- Role, पत्रकार, लंडन
"मारू नका... कोणतंही चुकीचं काम करू नका... जे खटले असतील, ती न्यायालयात सादर करा. एन्काउंटर करू नका."
हे आसिफ झरदारींच्या तोंडचे शब्द आहेत. रहमानला (डकैत) ताब्यात घेणाऱ्या चौधरी असलम या पोलीस अधिकाऱ्याला झरदारींनी हे आदेश दिले होते.
इस्लामाबाद, किंबहुना 'रावळपिंडी'पर्यंत पोहोच असणारा एक राजकारणी पाकिस्तानाबाहेर झालेल्या एका भेटीत मला रहमान डकैतची कहाणी सांगत होता.
तुम्ही 'पीपल्स अमन कमिटी'चा संस्थापक सरदार अब्दुल रहमान बलोच म्हणा किंवा कराचीच्या अंडरवर्ल्डचा डॉन रहमान डकैत म्हणा... ही एका अशा माणसाची कहाणी आहे, ज्याचा जन्म शहरातील एका गरीब वस्तीत झाला होता.
मात्र, कराचीतल्या ल्यारी भागातील एका गँगच्या या 'क्राइम लॉर्ड'ची पोहोच पोलीस आणि सैन्याच्या गुप्तचर संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतच नव्हे, तर देशाच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत देखील होती.
ज्या राजकारण्यानं मला ही कहाणी सांगितली, ते स्वत:देखील अनेक सरकारांमध्ये होते. मात्र, त्यांना कराचीतील 'अंडरवर्ल्ड'बद्दल देखील बरंच काही माहीत आहे.
'धुरंधर' या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्नानं याच रहमान डकैतची भूमिका केली आहे. या भूमिकेची आणि रहमात डकैतची सध्या सर्वत्र चर्चा होते आहे.
18 जून 2006 ला रहमान डकैतला क्वेटामध्ये शेवटची अटक करण्यात आली. अर्थात, या अटकेबद्दल अधिकृतपणे कधीही जाहीर करण्यात आलं नाही.
यादरम्यान स्वत: रहमान बलोचनं (रहमान डकैत) त्याची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर कबूल केलं की, त्याच्या आईच्या हत्येसह 79 गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता.
तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर
फॉलो करा
End of podcast promotion
बीबीसीला मिळालेला रहमान बलोचबाबतचा तपास अहवाल अतिशय गोपनीय सरकारी दस्तावेज होता. या अहवालातून फक्त त्याचे गुन्हेच समोर येत नाहीत तर राजकारण आणि गुन्हेगारीमधील संबंधदेखील उघड होतो.
वयाच्या 13 व्या वर्षापासून गुन्हेगारी विश्वात पाय ठेवणारा रहमान बलोच 'अंडरवर्ल्ड डॉन' कसा झाला, याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. यादरम्यान रहमान बलोचनं बड्या राजकारण्यांशी, वांशिक संघटनांशी आणि बिझनेसमनबरोबर कसे संबंध तयार केले तेदेखील त्यात दिलं आहे.
कराची बंदराच्या दोन्ही बाजूला दोन वेगवेगळ्या दुनिया वसलेल्या आहेत. एका बाजूला मौलवी तमीजुद्दीन खान रोड आहे तर दुसऱ्या बाजूला एम. ए. जिना रोड आहे.
मौलवी तमीजुद्दीन खान रोडच्या पलीकडे शहरातील सर्वात श्रीमंत लोकवस्ती आणि सर्वात महागडे मनोरंजन ठिकाणं आहेत.
या बंदराच्या दुसऱ्या बाजूला एम. ए. जिना रोडच्या मागच्या बाजूला ल्यारी हा भाग आहे. हा गरिबीबरोबरच बेरोजगारीच्या वातावरणात तयार झालेला गुन्हेगारीचा बालेकिल्ला आहे.
शहराच्या दक्षिणेकडून पश्चिमेपर्यंत कराचीतील सर्वात जुन्या, मात्र अत्यंत गरीब अशा डझनभर वस्त्या पसरलेल्या आहेत. तिथे गुन्हेगारीचं मोठं साम्राज्य फोफावलेलं आहे.
गंमतीचा भाग म्हणजे याच ल्यारीमधून झुल्फिकार अली भुट्टो आणि त्यांची मुलगी बेनझीर भुट्टो यांचा पंतप्रधानपदापर्यंत प्रवास झाला. तर याच वस्तीतून बाबू डकैत आणि रहमान बलोच ही दोघं गुन्हेगारी जगताच्या शिखरावर पोहोचली.
रहमान डकैतची कौटुंबिक पार्श्वभूमी
पाकिस्तान सरकारच्या दस्तावेजानुसार, अब्दुल रहमान (रहमान डकैत) याचा जन्म 1976 साली दाद मोहम्मद उर्फ दादल यांच्या घरी झाला. रहमानची आई, दादल यांची दुसरी पत्नी होती.
रहमानच्या चुलत भावानं मला सांगितलं की रहमानचे वडील पकडून ती चार भावंडं होती. दाद मोहम्मद (दादल), शेर मोहम्मद (शेरू), बेक मोहम्मद (बेकल) आणि ताज मोहम्मद.
त्यांचं म्हणणं होतं की, दादलनं ल्यारीमध्ये अनेक समाजपयोगी कामंदेखील केली.
"मुलांसाठी ग्रंथालय, मोठ्यांसाठी ईदगाह, महिलांसाठी शिवणकाम आणि भरतकाम केंद्र आणि तरुणांसाठी बॉक्सिंग क्लब बनवला."
मात्र, तपास अहवाल आणि पोलीस, सैन्य आणि गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून काही वेगळीच कहाणी समोर येते.

फोटो स्रोत, Facebook
कराची पोलीस दलाच्या एका माजी प्रमुखानं मला सांगितलं की दादल आणि त्यांचा भाऊ शेरू या दोघांचाही अंमली पदार्थांच्या व्यापाराशी संबंध होता. पोलिसांच्या रेकॉर्ड्सनुसार शेरूची मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी (हिस्ट्रीशीटर) होती.
मात्र, शेरू दादल गँग ल्यारीमध्ये अंमली पदार्थांचा व्यापार करणारी किंवा इतर गुन्हे करणारी एकमेव टोळी नव्हती. इकबाल उर्फ बाबू डकैतची गँगदेखील जवळच्याच मोहल्ल्यात अंमली पदार्थांचं मोठं नेटवर्क चालवत होती.
तर यात आणखी एक गँग होती ती म्हणजे हाजी लालूची गँग. ही गँग जहांबाद, शेरशाह कब्रस्तान आणि पुराना गोलीमार सारख्या भागात खंडणी, अंमली पदार्थ आणि हफ्ता वसूली करणं यासारखे गुन्हे करायचे.
ल्यारीचे माजी एसपी फैयाज खान म्हणाले, "एकाच धंद्याशी निगडीत अनेक गँग असल्यामुळे त्यांच्यात आपसात स्पर्धादेखील होती. कोणत्या भागात कोणाचं वर्चस्व यावरून त्यांच्यात वाददेखील असायचे."
"या गँगमधील वादांचं रुपांतर अनेकदा हिंसाचारातदेखील व्हायचं. अशाच एक चकमकीत रहमान बलोचचा काका ताज मोहम्मद त्याच्या विरोधी गँगमधील बाबू डकैतच्या हातून मारला गेला होता."
रहमानची कहाणी सांगणाऱ्या नेत्यानं सांगितलं, "तेव्हा रहमानची मैत्री रऊफ नाजिम आणि आरिफ या दोन भावांशी झाली. त्यांचे वडील हसन उर्फ हसनूक देखील अंमली पदार्थांच्या धंद्यात होते."
"अंमली पदार्थांचा धंदा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या या सर्व तरुणांची मैत्री हळूहळू एका गुन्हेगारी टोळीमध्ये रुपांतरित झाली. त्याचा म्होरक्या होता आरिफ नाजिम. रहमान हा नंतर या टोळीचा प्रमुख झाला, मात्र मूळात ही गँग आरिफची होती."
अंमली पदार्थांच्या धंद्यानं झाली होती सुरुवात
कराची पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, रहमाननं वयाच्या 13 व्या वर्षी 6 नोव्हेंबर 1989 ला कलाकोटच्या हाजी पिक्चर रोडवर असलेल्या गुलाम हुसैनच्या दुकानाजवळ फटाके फोडण्यास मनाई केल्यामुळे मोहम्मद बक्श नावाच्या व्यक्तीला चाकू मारून जखमी केलं होतं.
एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, गुन्हेगारी विश्वाच्या दिशेनं पडलेलं रहमानं हे पहिलं पाऊल होतं.
पोलिसांनुसार, 1992 मध्ये अंमली पदार्थांच्या धंद्यात रहमानचं भांडण नदीम अमीन आणि त्याचा साथीदार नन्नू यांच्याशी झालं. हे दोघेही अंमली पदार्थांचा पुरवठा करायचे.
पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, नदीम अमीनची देखील मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्याच्यावर जवळपास तीस गुन्हे दाखल होते. रहमान आणि आरिफ यांनी नदीम आणि नन्नू या दोघांची गोळ्या झाडून हत्या केली. रहमाननं केलेली ही पहिली हत्या होती.

फोटो स्रोत, Getty Images
रहमानच्या चुलत भावानं मला सांगितलं की, 1988 मध्ये राशिद मिन्हास रोडला लागून असलेल्या डालमिया या भागात जमिनीवरून झालेल्या वादामध्ये रहमानचा चुलत भाऊ फतेह मोहम्मद बलोच याची हत्या झाली. या हत्येचा आरोप ल्यारीमधील संगौ लेनच्या सुलेमान बिरोहीचा मुलगा गफूरवर होता.
काही पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, सुलेमान बिरोहीचे सिंधचे माजी मुख्यमंत्री जाम सादिक यांच्याशी व्यावसायिक संबंध होते. मात्र, 1998 मध्ये रहमाननं सुलेमान बिरोहीची नॉर्थ नाजिमाबादमध्ये डीसी सेंट्रल ऑफिसजवळ हत्या केली.
या हत्येमुळे ल्यारीमधील गुन्हेगारी जगतावर वर्चस्व मिळवण्याच्या मार्गावर रहमानचा प्रवास सुरू झाला.
हाजी लालू डॉनकडून मिळालं संरक्षण
रहमानच्या चुलत भावानं सांगितलं की, हा बदला घेण्यासाठी लालूच्या कुटुंबानं रहमानच्या कुटुंबाला मोठी मदत केली. माझ्या माहितीनुसार, जेव्हा बाबू डकैतकडून रहमानचा काका ताज मोहम्मदची हत्या झाली, तेव्हा लालूनं रहमानला संरक्षण पुरवलं.
हाजी लालू अंडरवर्ल्ड डॉन होता. ल्यारी आणि ट्रान्स ल्यारी परिसरातील कोणत्याही प्रकारचा गुन्हा लालूशिवाय होऊ शकत नव्हता. रहमानदेखील जे काही झाला होता, त्यात लालूकडून त्याला मिळालेल्या संरक्षणाचा मोठा भाग होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्याच्या मते, "लालूनं रहमानला संरक्षण दिलं होतं, कारण बाबू डकैत धंद्यात लालूचा शत्रू होता. त्यामुळे बाबूला टक्कर देण्यासाठी लालूला तरुण आणि धाडसी सहकाऱ्यांची गरज होती."
जेव्हा रहमानच्या तरुण गँगचे गुन्हे वाढू लागले, तेव्हा दबाव वाढल्यामुळे पोलिसांनी या गँगला वेसण घालण्याची योजना बनवली.
पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, 18 फेब्रुवारी 1995 ला आरिफ आणि रहमान त्याच्या साथीदारांबरोबर उस्मानाबाद मिल्स परिसरातील पाक पाईप मिल्सच्या रिकाम्या इमारतीत असताना पोलिसांनी त्यांना घेरलं.
पोलिसांच्या गोळीबारात आरिफ तर मारला गेला, मात्र रहमान भिंतीवरून उडी मारून पळून गेला. सरकारी अहवालात रहमाननं देखील ही घटना घडल्याचं कबूल केलं आहे.
आईचीसुद्धा केली हत्या
या घटनेनंतर काही महिन्यांनी 18 मे 1995 ला रहमाननं कलाकोट पोलीस ठाण्याच्या कक्षेत येणाऱ्या भागात त्याची आई खदीजा बीबी यांचीदेखील हत्या केली.
रहमाननं अधिकाऱ्यांना सांगितलं की, 'त्यानं त्याच्या आईची घरातच गोळी घालून हत्या केली.'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहमान संशय आला होता की त्याच��� आई पोलिसांची खबरी बनली आहे.
या अहवालातील माहितीच्या उलट माहिती माझ्या सूत्रांनी दिली. त्याचं म्हणणं होतं की, ही हत्या करण्यामागचं खरं कारण म्हणजे रहमानला 'त्याच्या आईच्या चारित्र्याविषयी संशय' होता. त्याच्या आईचे शत्रू टोळीतील एका सदस्याबरोबर 'संबंध असल्यामुळे त्यानं ही हत्या केली होती'.
सरकारी रेकॉर्डनुसार, 1995 मध्ये निमलष्करी दल रेंजर्सनी रहमानला बेकायदेशीर शस्त्रं आणि अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली गोलीमार भागातून अटक केली होती. या प्रकरणात रहमान अडीच वर्षे तुरुंगात होता.

फोटो स्रोत, SMVP
सरकारी अहवालानुसार, 10 जून 1997 ला रहमान बलोचला कराचीच्या सेंट्रल जेलमधून ल्यारीजवळच असलेल्या सिटी कोर्टात आणण्यात आलं. तिथून तो फरार झाला आणि बलुचिस्तानातील हुब या भागात गेला.
पाकिस्तानच्या सरकारी कागदपत्रांनुसार, रहमाननं फरजाना, शहनाज आणि सायरा बानो नावाच्या तीन महिलांशी वेगवेगळ्या वेळेस लग्नदेखील केलं.
या तीन पत्नींपासून त्याला 13 अपत्यं झाली.
2006 पर्यंत रहमाननं मोठी संपत्ती उभी केली होती. कराची आणि बलुचिस्तानातील अनेक भागात त्याच्या मालकीची 34 दुकानं, 33 घरं, 12 प्लॉट्स आणि दीडशे एकर शेतजमीन होती.
त्यानं इराणमध्ये देखील काही मालमत्ता खरेदी केली होती. अर्थात अनेक अधिकाऱ्यांचा दावा आहे की 2006 नंतर त्यानं गोळा केलेली मालमत्ता यापेक्षा कितीतरी अधिक आहे.
रहमानचे राजकारणी, बलुचिस्तानमधील राजकीय आणि वांशिक संघटनांशी देखील संबंध वाढले.
ल्यारी गँगवॉरची कहाणी
रहमाननं चौकशीत सांगितलं होतं की त्यानं हुबमध्ये पोलिसांच्या 'परवानगी'नं एक जुगाराचा अड्डादेखील सुरू केला होता. तसंच तो अफीम (याला ल्यारीच्या परिसरातील लोक 'विषहर' म्हणतात) आणि चरससारख्या अंमली पदार्थांचा धंदादेखील 'वरच्या लोकां'च्या मोठ्या मदतीनं आणि परवानगीनं चालवत होता.
ल्यारीचे माजी एसपी फैयाज खान म्हणाले की त्याच काळात रहमान, हाजी लालू आणि त्याच्या मुलांनी अंमली पदार्थांचा धंदा आणि गुन्हेगारी नेटवर्कचा मोठा विस्तार केला.
अनेक मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांनुसार, याचदरम्यान रहमानला अंदाज येऊ लागला होता की लालूच्या प्रभावाखाली राहून तो गुन्हेगारी जगतात त्याचं वेगळं स्थान निर्माण करू शकत नाही. मग एकेदिवशी त्याचं लालू आणि लालूच्या मुलांशी भांडण झालं.

फोटो स्रोत, Getty Images
लवकरच हा वाद 'रक्तरंजित संघर्षा'त रुपांतरित झाला. याची सुरूवात रहमान बलोचचा जवळचा साथीदार मामा मैज मोहम्मद उर्फ फैजूचं अपहण आणि हत्येनं झाली.
फैज मोहम्मद रहमानचा नातेवाईकदेखील होता. तसंच तो अजीज बलोचचा वडील देखील होता. हाच अजीज बलोच, रहमाननंतर ल्यारीच्या अंडरवर्ल्डचा डॉन झाला.
फैजूच्या या हत्येमुळे एक असा संघर्ष सुरू झाला, ज्याला 'ल्यारी गँगवॉर' म्हणून ओळखलं जातं.
प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार, रहमान आणि पप्पू यांच्यात ल्यारी गँगवॉरमध्ये इतक्या हत्या झाल्या आणि इतका हिंसाचार झाला की या भागाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली.
संशोधक आणि पत्रकार अजीज संगहूर यांचा संबंधदेखील ल्यारी परिसराशी आहे. त्यांचा दावा आहे की अनेक वर्षे सुरू राहिलेल्या ल्यारी गँगवॉरमध्ये सर्व टोळ्यांशी संबंधित एकूण जवळपास साडेतीन हजार लोक मारले गेले.
रहमानच्या दहशतीला वेसण घालण्याचे प्रयत्न
ल्यारी गँगवॉरमुळे हजारो लोकांचे जीव गेले. त्यामुळे या परिसरातील प्रमुख लोकांनी या हत्या आणि हिंसाचाराला आवर घालण्याचे प्रयत्न केले.
अनेक स्थानिक नेत्यांनी ल्यारी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पीपल्स पार्टीचे प्रमुख आसिफ झरदारी यांची भेट घेतली.
झरदारी यांच्या एका परिचितानं सांगितलं की लालूशी चर्चा केली जाऊ शकते की त्याच्याकडून रहमानच्या विरोधात हल्ला केला जाणार नाही, मात्र रहमानची गॅरंटी कोण घेणार?
या परिस्थितीत सर्वांनी बलोच एकता आंदोलनाचे नेते अनवर भाईजान यांना विनंती केली की त्यांनी मध्यस्थी करावी आणि दोन्ही टोळ्यांमध्ये तडजोड घडवून आणावी.
अनवर भाईजान, लालूचा मुलगा पप्पूच्या पत्नीचे मामा होते. ल्यारीमध्ये त्यांना विशेष सन्मान दिला जायचा. मात्र ही सर्व चर्चा, वाटाघाटी होतंच होत्या की त्याचवेळेस रहमाननं अनवर भाईजान यांचीच हत्या केली.
रहमानवर संशोधन करणाऱ्यांनी सांगितलं की 8 जानेवारी 2005 ला त्यानं अनवर भाईजानची हत्या अशा वेळी केली जेव्हा अनवर भाईजान एका अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी मेवा शाह रोडवरून जात होते. चौकशीच्या वेळेस रहमाननं सांगितलं होतं की पप्पूशी नातं असल्यामुळे 'अनवर भाईजानचा कल लालू गँगकडे होता आणि त्यांची मध्यस्थी तटस्थ नव्हती.'
या हत्येमुळे मध्यस्थी घडवून आणण्याचे प्रयत्न तात्काळ थांबले. मग आसिफ झरदारीदेखील, रहमाननं तर मध्यस्थाचीच हत्या केली, असं म्हणून बाजूला झाले.
पोलीस अधिकाऱ्यांनुसार, रहमाननं शहराच्या अनेक महत्त्वाच्या व्यापारी भागांना आणि रस्त्यांना देखील 'भत्त्या'च्या (खंडणी) कमाईचं साधन बनवलं.
उदाहरणार्थ, कराची बंदरातून निघणाऱ्या आणि केमाडीतून जाणाऱ्या प्रत्येक कंटेनरला रहमानच्या नेटवर्कला 'भत्ता' (खंडणी) दिल्याशिवाय जाता येत नसे.
या टोळीच्या कमाईचं आणखी एक साधन होतं, गुटखा. रहमान गँगनं ल्यारीमध्ये बेकायदेशीर पद्धतीनं गुटखा बनवणारे कारखाने सुरू केले. यानंतर अंमली पदार्थांपेक्षाही गुटख्यातून अधिक कमाई होऊ लागली.
रहमानची रॉबिनहूडची प्रतिमा
अनेक राजकीय आणि सरकारी लोकांशी बोलल्यावर माहित झालं की शहराच्या इतर भागातदेखील रहमानचा प्रभाव वाढत असताना तो ल्यारीचा अनिभिषिक्त सम्राट झाला होता.
2002 पर्यंत तर ल्यारी आणि जवळपासच्या भागांमध्ये रहमानचा प्रभाव इतका वाढला होता की त्या भागातून कोण राज्य स्तरावरील किंवा राष्ट्रीय असेंब्लीमध्ये सदस्य होईल आणि कोण टाउन मॅनेजर होईल, याचा निर्णयदेखील रहमानच घ्यायचा.
आता तो पीपल्स अमन कमिटीचा प्रमुख 'सरदार अब्दुल रहमान बलोच' म्हणून ओळखला जाऊ लागला होता. त्यावेळेपर्यंत ल्यारीच्या काही भागात रहमानची रॉबिनहूडसारखी प्रतिमा तयार होत होती. आता तो राजकीयदृष्ट्या नाव कमावणारं काम करू लागला होता. उदाहरणार्थ, शाळा आणि दवाखाने सुरू करणं.
राज्य मंत्रिमंडळाशी संबंधित एका नोकरशहानुसार रहमाननं जेव्हा मलेर, बर्न्स रोड, गुलिस्तान-ए-जौहर आणि इतर भागांमध्ये अमन कमिट्या बनवल्या, तेव्हा एमक्यूएमनं त्याकडे एक राजकीय आव्हान म्हणून पाहिलं.
अशाप्रकारे एमक्यूएमचं सरकार रहमानला संपवण्यासाठी सक्रिय झालं आणि पक्षात असं वाटू लागलं की रहमानला अडवलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यापासून जो राजकीय धोका आहे, तो दूर करता येईल.
सरकारी अधिकाऱ्यांनुसार, "यावेळेस पीपल्स पार्टीचे एक नेते आणि त्यावेळेस आसिफ झरदारी यांच्या जवळच्या सहकाऱ्याला वाटलं की रहमान त्यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. मग त्यांनी पडद्यामागून त्याला पाठिंबा देण्यास सुरूवात केली."

फोटो स्रोत, Getty Images
या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की रहमान एमक्यूएमच्या राजकीय निशाण्यावर आल्यावर एमक्यूएमनं रहमानचा प्रदीर्घ काळापासून कट्टर शत्रू असलेल्या अरशद पप्पूला पाठिंबा देण्यास सुरूवात केली.
एमक्यूएमच्या लंडनच्या कोऑर्डिनेशन समितीचे संयोजक राहिलेले मुस्तफा अजीजाबादी, ल्यारी गँगवॉर किंवा रहमान बलोचशी एमक्यूएमचा कोणत्याही प्रकारचा संबंध असल्याचा इन्कार करत राहिले.
त्यांचं म्हणणं होतं, "पाकिस्तानची निर्मिती होण्याआधीपासूनच अंमली पदार्थांचा धंदा करणाऱ्यांच्या पिढीजात शत्रुत्वामुळे हे घडत होतं. या सर्व गोष्टींशी आमचा काहीही संबंध नव्हता."
पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेचा एका अधिकारी म्हणाला, "अरशद पप्पूला राजकीय पाठिंब्यातून ताकद मिळू लागली. तसंच राजकीय शक्ती नाराज झाल्यामुळे रहमानसाठी ल्यारीमधली परिस्थिती पुन्हा एकदा कठीण झाली."
"त्यावेळेस तिथून बलुचिस्तानात निघून जाण्यातच आपलं हित आहे असं रहमानला वाटलं. मात्र यावेळेस त्यानं हुब इथं न जाता क्वेटा शहरातील सॅटेलाईट टाऊनमध्ये एका गुप्त ठिकाणी आश्रय घेतला."
झरदारींच्या फोनमुळे वाचला रहमान
बीबीसीच्या हाती आलेल्या अतिशय गोपनीय अहवालातून समोर आलं आहे की गोपनीय माहिती मिळाल्यावर 18 जून 2006 ला चौधरी असलम यांच्या नेतृत्वाखाली ल्यारी टास्क फोर्सनं क्वेटाच्या सॅटेलाईट टाऊनमध्ये असलेल्या रहमानच्या त्या गुप्त अड्ड्यावर अचानक छापा मारला.
'धुरंधर' चित्रपटात चौधरी असलम यांची भूमिका संजय दत्तनं साकारली आहे.
या धाडीच्या वेळेस तिथून निसटून पळ काढताना गच्चीवरून उडी मारण्याच्या प्रयत्नात रहमानचा पाय मोडला.
एका सूत्रानं सांगितलं की, जखमी रहमानला ताब्यात घेण्यात आलं. मात्र ही अटक कधीही सरकारी रेकॉर्डवर दाखवण्यात आली नाही.
रहमानची कहाणी सांगणाऱ्या नेत्यानं सांगितलं की, त्या धाडीच्या वेळेस तिथं 'चकमकी'ची वेळ आली असती, मात्र तेव्हाच एक नाट्यमय गोष्ट घडली. चौधरी असलम यांचा फोन वाजू लागला.
या प्रकरणाची संपूर्ण माहिती असलेल्या राजकारण्यानं दावा केला की चौधरी असलमनं त्यांना स्वत: सांगितलं होतं की रहमानसारख्या खतरनाक गुन्हेगारांच्या विरोधात अशा प्रकारची कारवाई करताना ते कधीही त्यांचा स्वत:चा खासगी फोन घेऊन जात नसत.
कारण चकमक घडल्यास कॉलर डेटा रेकॉर्डिंग (सीडीआर) किंवा जिओ फेंसिंगमुळे न्यायालयात त्यावेळेस चौधरी असलम तिथे उपस्थित होते हे सिद्ध होऊ शकलं असतं.
या राजकारण्यानं सांगितलं की त्यामुळेच चौधरी असलम अशा प्रसंगी एक असा फोन वापरायचे, ज्याचा नंबर फक्त तीन-चार सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच माहित असायचा.
त्यांच्या मते रहमानच्या या(कधीही जाहीर न करण्यात येणाऱ्या) अटकेच्या वेळेसदेखील चौधरी असलम याच गुप्त फोनचा वापर करत होते. त्यावेळेस ते फक्त 'सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या'च संपर्कात होते.
त्या राजकारण्यानुसार, "चौधरी असलम यांनी मला सांगितलं की त्यांनी रहमानला ताब्यात घेताच, अचानक त्यांच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला."
"चौधरी असलम यांनी फोन घेताच, दुसऱ्या बाजूला बोलत होते आसिफ झरदारी. हा नंबर झरदारी साहेबांना कसा माहित झाला याचं त्यांना आश्चर्य वाटलं."
चौधरी असलम आणि आसिफ झरदारी यांच्या या संवादाची माहिती असणाऱ्या नेत्यानं दावा केला की झरदारी साहेबांनी चौधरी असलम यांना सांगितलं की, "मारू नका. कोणतंही चुकीचं काम करू नका. त्याच्यावरील गुन्ह्यासंदर्भात त्याला (न्यायालयात) सादर करा...एनकाउंटर करू नका."
सिंधमध्ये तैनात असणारा एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला, "या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी असं ठरवण्यात आलं की पोलीस गोळीबार करणार नाहीत आणि रहमानची ही अटकसुद्धा रेकॉर्डवर दाखवली जाणार नाही. त्याला कराचीला पाठवण्यात येईल. मात्र त्याला अटक केल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं जाणार नाही."
आणखी एका गोपनीय सरकारी कागदपत्रानुसार, 'या तपासानंतर अशी समस्या निर्माण झाली की रहमानला आता कुठे ठेवायचं. कारण त्याची अटक जाहीर तर करण्यात आली नव्हती.'
'उच्च अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की सुरूवातीचे काही दिवस रहमानला ल्यारी टास्क फोर्सचे अधिकारी इन्स्पेक्टर नासिर उल हसन यांच्या गार्डन पोलीस लाईन्समधील घरात ठेवण्यात यावं. नंतर त्याला त्यावेळेचं कलरीचे एसएचओ बहाउद्दीन बाबर यांच्या मेट्रोविलमधील खासगी निवास्थानी पाठवण्यात यावं.'
इन्स्पेक्टर बाबर यांच्या घरातून 'नाट्यमयरित्या' फरार झाला. गोपनीय अहवालात रहमान 20 ऑगस्ट 2006 ला फरार झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे.
या अहवालानुसार 20 ऑगस्ट 2006 च्या रात्री पाच सशस्त्र लोकांनी हल्ला करून रहमानची सुटका केली.
रहमान फरार झाल्यामुळे पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. तर तिकडे फरार होताच रहमाननं अशी माहिती पसरवली की त्यानं "पैसे देऊन सुटका करून घेतली आहे."
रहमानची कहाणी माहित असणाऱ्या राजकारणी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांनुसार लष्करी अधिकाऱ्यांना संशय होता की रहमान फरार होण्यामध्ये बाबरचा सहभाग होता.
31 डिसेंबर 2013 ला झालेल्या एका हल्ल्यात इन्स्पेक्टर बाबर मारले गेले. त्यामुळे त्यांची बाजू जाणून घेता आली नाही.
फरार झाल्यानंतर रहमान पुन्हा ल्यारीमध्ये आला आणि त्यानं हत्या आणि हिंसाचाराचं चक्र सुरू केलं.
आता रहमाननं पीपल्स पार्टीसमोर अडचणी निर्माण करण्यास सुरूवात केली.
प्रसारमाध्यमांच्या तपासातून हे स्पष्ट आहे की एक वेळ अशी आली की ल्यारीमध्ये टाउन मॅनेजरसाठी पीपल्स पार्टीचे उमेदवार मलिक मोहम्मद खान यांचा पराभव झाला आणि रहमानचा पाठिंबा असलेला अपक्ष उमेदवार विजयी झाला.
2008 मध्ये पीपल्स पार्टीचं सरकार आलं. त्यावेळेस आसिफ झरदारी पहिल्यांदा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यानंतर रहमाना प्रभाव असणाऱ्या स्थानिक नेत्यांमध्ये आणि पीपल्स पार्टीमध्ये वाद होऊ लागला.
यामुळे पीपल्स पार्टी आणि रहमानमध्ये वाद झाला.
पीपल्स पार्टी आणि रहमान यांच्यातील या वादाची नोंद संपूर्ण 'व्यवस्थे'नं नक्कीच घेतली असेल. त्यामुळे एक दिवस सिंधचे तत्कालीन गृहमंत्री आणि आसिफ झरदारी यांचे जवळचे सहकारी झुल्फिकार मिर्झा, सिंधचे गव्हर्नर डॉक्टर इशरतुल इबाद यांच्याकडे गेले.
डॉ. इशरतुल इबाद म्हणाले की झुल्फिकार मिर्झा यांनी सांगितलं की ल्यारीमधील प्रकरणं गंभीर झाली आहेत. "हत्या आणि हिंसाचार वाढतो आहे. सरकारकडून पोलिसांना आदेश देण्यात यावे की ल्यारीमधील टोळ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी."
माजी गव्हर्नर म्हणाले, "मी डॉक्टरसाहेबांनी सांगितलं की राज्याचे गृहमंत्री तर तुम्हीच आहात. तुम्ही आदेश द्या. तेच पोलिसांना आदेश देऊ शकतात. त्यानंतर झुल्फिकार मिर्झा यांनी पोलिसांना आदेश दिला की ल्यारीच नाही तर संपूर्ण राज्यात कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था राखण्यात यावी आणि कारवाई करण्यात यावी."
पोलिसांनी रहमानला कसं पकडलं?
आतापर्यंत रहमान तीन बाजूंनी घेरला गेला होता. एका बाजूला एमक्यूएम 'खंडणी' आणि राजकीय प्रभावामुळे नाराज होती.
दुसऱ्या बाजूला पीपल्स पार्टीदेखील नाराज होती.
तर तिसऱ्या बाजूला पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून फरार झाल्यामुळे आणि तो पोलिसांना पैसे देऊन पळाला आहे, ही गोष्ट पसरवल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि विशेषकरून चौधरी असलमदेखील रहमानवर नाराज होते.
सर्व बाजूंनी असलेली ही नाराजी रहमानला महागात, किंबहुना प्रचंड महागात पडली.
नेत्यानं सांगितलं की धोक्यात सापडल्याची जाणीव रहमानला इतक्या तीव्रतेनं झाली की अचानक 8 ऑगस्ट 2009 ला रहमाननं त्याच्या जवळच्या आणि विश्वासू साथीदारांना बोलावलं आणि सांगितलं की सध्या जाणंयेणं कमी करा. 'जर खूपच आवश्यकता असेल, तर जाण्यायेण्यासाठी गाडीऐवजी मोटरसायकलचा वापर करा.'
"तिकडे रहमानच्या शोधात अतिशय सक्रिय असलेले चौधर असलम एका खबऱ्यापर्यंत पोहोचले. दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्ट 2009 ला रहमाननं बलुचिस्तानला पळून जाण्याचा प्रयत्न केला. तर चौधरी असलम यांना त्यांच्या खबऱ्याकडून रहमान कराचीतून पळणार असल्याचं माहित झालं."
या नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, रहमान आणि त्याचे जवळचे तीन साथीदार, अकील बलोच, नजीर बलोच आणि औरंगजेब बलोच मोटरसायकलवरून पुराना गोलीमार भागात पोहोचले. तिथून ते सर्वजण एका गाडीतून बलुचिस्तानातील मंद या भागाकडे गेले.
या नेत्यानं दावा केला की चौधरी असलम यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली तोपर्यंत रहमान कराचीच्या सीमेतून बाहेर पडला होता. मग असलम आणि त्यांची टीम रहमानच्या शोधात निघाली.
रहमान आणि त्याचे साथीदार बरेच दूर गेलेले असल्यामुळे मदत करणाऱ्या गुप्तहेर संस्थांनी असलम यांना माघारी परतण्याचा सल्ला दिला.
चौधरी असलम आणि त्यांची टीम परतीच्या मार्गावर गडानी आणि वंदर यांच्यामध्ये पोहोचली तेव्हा रहमान आणि त्याचे साथीदार पुन्हा एकदा कव्हरेज एरियामध्ये आले. फोन मॉनिटर करणाऱ्यांना रहमानचा सुगावा लागला.
झालं असं की रहमानचा साथीदार नजीर बलोच यानं त्याच्या पत्नीला फोन करून घरी पोहचण्याची माहित देत आवडीचं जेवण करण्यास सांगितलं. हीच गोष्ट त्यांच्यासाठी संकट आणणारी ठरली.
नजीर बलोचच्या पत्नीनं त्यावेळेस रहमानसोबत असलेल्या एका साथीदाराच्या पत्नीलादेखील फोन केला. तिनं सांगितलं की पाहुणे (रहमान आणि त्याचे साथीदार) येत आहेत आणि आवडीचं जेवण तयार करण्यासही सांगत आहेत.
नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, रहमान आणि त्याचे साथीदार येत आहेत, त्यामुळे त्यांचा पाठलाग करावा ही माहिती चौधरी असलम यांना देण्यात आली.
चौधरी असलम आणि त्यांची टीम त्या ठिकाणी पोहोचली, ज्याला झिरो ��ॉईंट म्हणतात. तिथून एक रस्ता ग्वादर कोस्टल हायवे आणि दुसरा रस्ता क्वेट्याकडे जातो.
पोलिसांची टीम अशा ठिकाणी थांबली जिथे तो रस्ता इंग्रजीतील वाय या अक्षराचा आकार घेतो. जेणेकरून रहमान आणि त्याचे साथीदार कोणत्याही दिशेनं आलं तरीदेखील त्यांची गाठ पोलिसांशी पडावी. अखेर झालंही तसंच.
एका काळ्या टोयोटा कारमध्ये रहमान आणि त्याचे साथीदार येताना दिसले.
नेत्यानं मला सांगितलं की, "तोपर्यंत असलम यांच्या टीममधील काही सदस्यांनी पोलिसांच्या युनिफॉर्मऐवजी तिथे तैनात असलेल्या कोस्ट गार्डचा युनिफॉर्म घातला होता. जेणेकरून रहमान आणि त्याच्या साथीदारांनी कराची पोलिसांचा युनिफॉर्म पाहून, विशेषकरून चौधरी असलम यांना पाहून आणखी काही करू नये आणि त्यांना बेसावधपणेच ताब्यात घेण्यात यावं."
दरम्यान, चौधरी असलम यांना दिसत होतं की रहमान आला आहे. मात्र रहमानला मात्र याची अजिबात कल्पना नव्हती की असलम यांनी त्याला वेढलं आहे. जेव्हा रहमानची गाडी थांबवण्यात आली, तेव्हा रेहमानच्या साथीदारांनी विरोधदेखील केला नाही.
ओळखपत्र मागितल्यावर रहमाननं खोटं ओळखपत्र दाखवलं. त्याच्यावर त्याचं नाव शोएब असं होतं. मात्र प्लॅननुसार, कोस्ट गार्डच्या युनिफॉर्ममध्ये तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी रहमानला सांगितलं की तुम्ही जाऊन गाडीत बसलेल्या कर्नल साहेबांना तुमचं ओळखपत्र दाखवा.
हे साहेब म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, तर चौधरी असलम होते. रहमानं काळ्या काचा असलेल्या वीवोचा दरवाजा उघडताच त्याच्यासमोर चौधरी असलम होते.
तिथून पळण्याचा कोणताही विचार रहमानच्या डोक्यात येण्याआधीच त्याच्या मागे उभ्या असलेल्या मलिक आदिल या पोलीस अधिकाऱ्यानं त्याला गाडीत ढकललं आणि तेदेखील गाडीत बसले.
नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, संभाव्य पोलीस एनकाउंटरमध्ये मृत्यू दिसू लागताच रहमाननं चौधरी असलम यांना प्रस्ताव दिला की पैसे घेऊन त्याची सुटका करावी. मात्र चौधरी असलम म्हणाले की, "जेव्हा आम्ही पैसे घेतले नव्हते, तेव्हा इतकं बदमान केलं की गुप्तहेर संस्थांनी केलेल्या तपासाला सामोरं जावं लागलं. आता घेतले तर तू काय काय करशील."
नेत्यानं असाही दावा केला की तिथून (झिरो पॉईंट) त्या सर्वांना नॅशनल हायवे स्टील टाऊनला नेण्यात आलं. नॉर्दर्न बायपायनं हा ताफा लिंक रोडला पोहोचला. तिथे रहमान त्याच्या तीन साथीदारांसह पोलीस एनकाउंटरमध्ये मारला गेला.
अनेक अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना त्यांच्या या दाव्याची पुष्टी केली. मात्र ऑन रेकॉर्ड 'रहमान डकैत'च्या मृत्यूबद्दलचं कराची पोलिसांचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक 10 ऑगस्ट 2009 ला सर्व वृत्तपत्रात प्रकाशित झालं.

फोटो स्रोत, Getty Images
'डॉन' आणि 'द नेशन' या इंग्रजी वृत्तपत्रांनी या अधिकृत प्रसिद्धीपत्रकाचा संदर्भ देत म्हटलं की रहमान डकैत आणि त्याचे तीन साथीदार पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारले गेले.
अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं की पोलिसांनी रहमान डकैतची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हेगारांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांना नाईलाजानं गोळीबार करावा लागला.
या पोलीस एनकाउंटरवर प्रश्न उपस्थित झाले.
प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं, "हत्या आणि खंडणीसाठी अपहरणाच्या 80 हून अधिक प्रकरणांमध्ये रहमान वाँटेड होता."
कराची पोलीस दलाचे प्रमुख वसीम अहमद यांनीदेखील पत्रकारांना सांगितलं की रहमानचा मृत्यू हे कराची पोलिसांचं खूप मोठं यश आहे.
सिंधचे माजी गव्हर्नर डॉक्टर इशरतुल इबाद यांचंही म्हणणं आहे की हा एक 'खरा' पोलीस एनकाउंटर होता.
"हे ऑपरेशन चौधरी असलम करत होते. त्यामुळे काहीजणांना शंका वाटत असावी. मात्र या प्रकरणात खोटा एनकाउंटर करण्यात आला, असं म्हटलं जाऊ शकत नाही. या प्रकरणात असं होणं शक्यच नाही की त्याला घरातून काढण्यात बाहेर नेण्यात आलं असेल आणि मारण्यात आलं असेल."
या पोलीस चकमकीला न्यायालयातदेखील आव्हान देण्यात आलं. 'डॉन' या वृत्तपत्रानं 14 ऑक्टोबर 2009 च्या बातमीत म्हटलं आहे की रहमानची विधना फरजानानं, अब्दुल मुजीब पीरजादा आणि सैयद खालिद शाह या तिच्या वकिलांद्वारे सिंधच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरमद जलाल उस्मानी यांच्या न्यायालयात याचिका केली की त्यांच्या पतीला खोट्या चकमकीत मारण्यात आलं आहे.
न्यायालयानं याबाबत राज्याच्या गृह सचिवांसह कराची पोलीस आणि सिंध पोलिस दलाच्या प्रमुखांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे समन्स बजावले. मात्र रहमानच्या कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांचं म्हणणं आहे की या प्रकरणात निकाल लागण्याची वाट ते अजून पाहत आहेत.
असं दिसतं की रहमान डकैत, राजकीय विरोध आणि व्यवस्थेच्या नाराजीमुळे मारला गेला. मग व्यवस्था त्याच्यावर का नाराज होती?
ल्यारीतील उर्दू आर्ट्स युनिव्हर्सिटीतील पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख प्राध्यापक (निवृत्त) तौसीफ अहमद म्हणतात की ल्यारी गँगवॉरचं पडद्यामागचं वास्तव काही वेगळंच होतं. "जो हिंसाचार तुम्ही ल्यारीमध्ये पाहिला, त्याचं दुसरं टोक तुम्हाला इथे सापडणार नाही. ते शोधण्यासाठी तुम्हाला बलुचिस्तानला जावं लागेल."
प्राध्यापक तौसीफ अहमद यांचं मत आहे की बलुचिस्तानच्या वांशिक आंदोलनाला ल्यारीतून वेगळं करण्यासाठी सरकार आणि त्यांच्या संस्थांनी राजकारणातून गुन्हेगारी संपवण्याऐवजी नेहमीच राजकारणावर गुन्हेगारीला वर्चस्व गाजवू दिलं.
"1973 मध्ये बलुचिस्तानमध्ये जेव्हा लष्करी कारवाई सुरू झाली, तेव्हा अशी भीती होती की ल्यारी हे बलोच आंदोलनाचं केंद्र तर होणार नाही ना. म्हणून या आंदोलनापासून ल्यारीला वेगळं ठेवण्यासाठी सरकार आणि यंत्रणांनी त्याला गुन्हेगारी विश्वाच्या आगीत ढकललं."
प्राध्यापक तौसीफ म्हणाले, "लष्करानं ल्यारीमध्ये गँगवॉर होऊ दिलं आणि पीपल्स पार्टी यात सहभागी झाली. पीपल्स पार्टी ही ल्यारीची राजकीय वारसदार होती. त्यांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारला नाही. त्याऐवजी सोपा मार्ग अवलंबला. त्यांनी वेगवेगळ्या कालखंडात त्या गँगस्टर्सना संरक्षण दिलं."
सरदार अब्दुल रहमान बलोच म्हणा किंवा रहमान डकैत म्हणा, एक गोष्ट नक्की आहे. ती म्हणजे त्याची अंत्ययात्रा ल्यारीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अंत्ययांत्रांपैकी एक होती.
त्यानंतर पाच वर्षांनी जानेवारी 2014 मध्ये चौधरी असलम यांचा तालिबानच्या एका आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











