मालदीव: कधीकाळी स्वप्नात असणारा मात्र आता बजेटच्या आवाक्यात आलेला 'स्वर्ग'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, कार्मेन रॉबर्ट्स
- Role, बीबीसी ट्रॅव्हल
मालदीव हे कधीकाळी 'धनाढ्य आणि श्रीमंत' लोकांच्या पर्यटनाचं ठिकाण होतं. मात्र, आता तिथे पर्यटनाचं असं मॉडेल अंमलात आणलं जातं आहे, जे स्थानिक आहे आणि किफायतशीरदेखील आहे. त्यामुळे या अतिशय सुंदर, स्वर्गासमान ठिकाणाला भेट देणाऱ्यांमध्येही बदल होतो आहे.
आमची फेरी बोट थोड्डू नावाच्या बेटावर थांबली, तेव्हा वातावरणात मीठ आणि कलिंगडाचा वास भरलेला होता.
12 वर्षांपूर्वी मी बीबीसीच्या 'द ट्रॅव्हल शो'च्या एका भागाचं चित्रीकरण करण्यासाठी इथे आले होते. त्यावेळेस मालदीव हे एक कल्पनेतील जग होतं, जिथे खासगी बेट आणि प्रचंड महागड्या गोष्टींमुळे बहुतांश पर्यटक या सुंदर पर्यटनस्थळापासून नाईलाजानं दूर राहत असत.
मात्र इथलं चित्र बदललं आहे. इथे आता फक्त श्रीमंत लोक आणि त्यांचं सामान उचलण्यासाठी 'बेलबॉय' उभे दिसत नाहीत, तर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेले कुटुंब बॅकपॅक लावून बोटीतून उतरताना दिसतात. माझ्या आठवणींमध्ये जे मालदीव होतं, ते आता तसं राहिलं नव्हतं.
गेल्या दशकभरात इथे शांतपणे एक क्रांतीच झाली आहे. सरकारी सुधारणांनंतर स्थानिक लोकांसाठी आधीपासून वसवण्यात आलेल्या बेटांवर गेस्ट हाऊस सुरू करणं सोपं झालं आहे. त्याआधी फक्त कमी लोकवस्ती असलेल्या बेटांवरील महागड्या रिसॉर्ट्सपर्यंतच पर्यटन मर्यादित होतं.
मालदीवमध्ये झालेल्या सुधारणांचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. देशाच्या पर्यटन मंत्रालयानुसार, आता 90 बेटांवर असे जवळपास 1200 गेस्ट हाऊस आहेत.
याचाच अर्थ, पर्यटक आता खरोखरंच मालदीवच्या संस्कृतीचा अनुभव घेऊ शकतात. मालदीवच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पर्यटनाच्या क्षेत्रातून स्थानिक लोक थेट आर्थिक लाभ मिळवू शकतात.
माझ्यासोबत माझी तीन मुलंदेखील होती. मला पाहायचं होतं की या बदलाचा काय परिणाम झाला आहे. आम्ही थोड्डू बेटावर एका घरात तयार झालेलं अन्न खाल्लं.
आम्ही एका मध्यम दर्जाच्या रिसॉर्टमध्ये मुक्काम केला. ज��यामधून आलिशानपणाचं नवीन आणि परवडणारं चित्र समोर येतं. शांतपणे स्वर्गाचं नवं रूप सादर करणाऱ्या देशाची कहाणी त्यातून व्यक्त होते.
मालदीवच्या बेटावरील शांत आयुष्य
थोड्डू बेटावर पाय ठेवताच असं वाटतं की एखाद्या आलिशान रिसॉर्टमध्ये जे जग दिसतं, त्यापासून तुम्ही खूप दूर आला आहात. मालदीवची राजधानी असलेल्या मालेपासून स्पीड बोटनं तुम्ही इथं 90 मिनिटांत पोहोचता. एखाद्या रिसॉर्टच्या 'सीप्लेन'पेक्षा ते खूपच स्वस्तदेखील पडतं.
इथे पोहोचल्यावर आम्ही पाहिलं की इथलं आयुष्य एका वेगळ्याचं गतीनं सुरू आहे. तिथे कोणतीही कार नव्हती. फक्त सायकल किंवा विजेवर चालवणारी एखाद-दुसरी बग्गी दिसली. तिथे पपईच्या झाडाच्या रांगा होत्या. कलिंगडाची शेतं होती. हे ठिकाण मालदीवच्या निळ्या समुद्रानं वेढलेलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
आम्ही ज्या गेस्ट हाऊसवर उतरलो होतो, त्याचं नाव 'सेरेना स्काय' होतं. ते या बेटावरचं पहिलं गेस्ट हाऊस आहे. अहमद कराम त्याचे मालक आहेत. ते मालदीवमधील गेस्ट हाऊस असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. मालदीवमध्ये वेगानं वाढत असलेल्या पर्यटन चळवळीचे ते नेतेदेखील आहेत.
ही जागा साधी मात्र अतिशय स्वच्छ होती. तिथल्या उशा एखाद्या महागड्या डिझायनरच्या नव्हत्या. बाथरूमदेखील तसं चांगलं होतं. तिथे आमचं अतिशय उत्साहानं स्वागत करण्यात आलं.
तिथे घरीच तयार करण्यात आलेलं जेवण तर खूपच उत्तम होतं. यात तळलेल्या माशाचा समावेश होता. तो काही तासांपूर्वीच पकडण्यात आलेला होता. याव्यतिरिक्त जवळच्याच शेतातील भोपळ्याची चविष्ट भाजी आणि कलिंगडाचा रसदेखील होता.
स्थानिक सर्वसामान्यांना मिळतोय पर्यटनाचा आर्थिक लाभ
अहमद म्हणाले, "कम्युनिटी टुरिझममुळे इथे सर्वकाही बदललं आहे. आता स्थानिक लोकांना पर्यटनातून मिळणाऱ्या डॉलरचा थेट फायदा होता. मात्र त्याचबरोबर आम्हाला याचीही जाणीव झाली आहे की आम्हाला या बेटांचं आणि वन्यजीवांचं रक्षण करावं लागेल. पर्यटक हेच तर पाहण्यासाठी येतात."
या बेटावर जे स्वातंत्र्य अनुभवायला मिळत होतं ते माझ्या मुलांना अतिशय आवडलं. आम्ही स्थानिक लोकांबरोबर स्नॉर्कलिंग(श्वास घेण्यासाठी पाईप लावून पोहणं) केलं आणि समुद्री कासवांना पाहण्याचा अद्भूत, अतिशय भन्नाट अनुभव आम्हाला मिळाला.

फोटो स्रोत, Getty Images
नंतर आम्ही 'बिकिनी बीच'वर विश्रांती घेतली. अनेक ठिकाणी असे बीच परदेशी लोकांसाठी खासकरून बनवण्यात आले आहेत. पर्यटकांना पाश्चात्य पद्धतीनं तिथे आंघोळ करता यावी आणि सनबाथचा आनंद घेता यावा यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मालदीवमधील बहुसंख्य लोक मुस्लीम आहेत. इथे तुम्ही काय परिधान करता, तुमचा पोशाख याची काळजी घ्यावी लागते.
आमची भेट अँडी अनीस यांच्याशी झाली. ते स्थानिक शेतकरी होते. त्यांनी आम्हाला त्यांच्या बागेत यायचं आमंत्रण दिलं. तिथे त्यांनी आम्हाला ताजं कलिंगड खायला दिलं.
उष्णतेत कलिंगड खाताना त्याचा रस आमच्या हातावरून ओघळत होता. नंतर आम्ही अनीस यांच्या छोट्या ज्यूस बारमध्ये नारळाचं आईसक्रीम खाल्लं आणि मावळत्या सूर्याकडे पाहत बसलो.
मालदीवमधील किफायतशीर आलिशानपणा
आमच्या प्रवासातील दुसरा टप्पा आम्हाला पूर्णपणे वेगळ्याच विश्वात घेऊन गेला. 'सन सियाम' रिसॉर्टमध्येदेखील आमचं अतिशय उत्साहानं स्वागत झालं. मात्र काही प्रमाणात त्यात नाटकीपणादेखील होता.
कारण तिथे ढोल आणि थंड टॉवेल घेतलेले हसतमुख कर्मचारी उभे होते. मात्र तरीदेखील तिथला साधेपणा आम्हाला सर्वात वेगळा वाटला. तिथे राइल हे आमचे यजमान होते. ते स्नॉर्केल गिअरपासून मुलांच्या औषधांपर्यंत, सर्वकाही व्हॉट्सॲपनं हाताळत होते.

फोटो स्रोत, Getty Images
आम्ही समुद्र किनाऱ्यावर असलेला दोन खोल्यांचा व्हिला घेतला. आम्ही जो प्लॅन घेतला होता, त्यात तीन बेटांवर असलेल्या दहा रेस्टॉरंट आणि बारच्या सेवेचाही समावेश होता. त्याचबरोबर इतरही गोष्टींचा समावेश होता. त्यामुळे आमच्याकडे वेळही होता आणि स्वातंत्र्यदेखील.
ज्या कुटुंबांना अल्ट्रा लक्झरी म्हणजे अतिशय आलिशान असलेल्या खर्चिक गोष्टी टाळायच्या असतील त्यांच्यासाठी 'सन सियाम' हा चांगला पर्याय आहे. तिथे खूपच चांगल्या सुविधा मिळतात. मी बीचवर मुलांबरोबर खूप धमाल केली. तिथे शार्क आणि कासवं पाहिली.
शार्क पॉईंट आणि बनाना रीफ पाहण्यासाठी मी बोट डायव्हिंग करत राहिली. इथे मालदीवमधील 210 मीटरच्या सर्वात लांब पूलसह सहा स्विमिंग पूलदेखील होते. तिथे मनोरंजन आणि विश्रांतीसाठी भरपूर जागा होती.
एकाचवेळी, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनाला चालना
असे रिसॉर्ट्स हे मालदीवच्या नव्या धोरणाचा चेहरा आहेत. 'सन सियाम केअर्स प्रोग्रॅम' अंतर्गत पर्यटक समुद्र किनाऱ्याच्या साफसफाईमध्ये देखील सहभागी होऊ शकतात. या रिसॉर्टच्या 'रिसायकल-रीयूज' उपक्रमाअंतर्गत इथे जुन्या कपड्यांचा वापर होतो.
तिथे सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. मी जेव्हा भिजलेल्या 'स्विमवेअर'साठी प्लास्टिकची पिशवी मागितली, तेव्हा मला हसत उत्तर देण्यात आलं, 'आता आम्ही याचा वापर करत नाहीत."
इथे पर्यटनाला स्वस्त आणि टिकाऊ बनवण्याचं जे धोरण अंमलात आणण्यात आलं आहे, त्याचाच तो एक भाग आहे. पर्यटनाचं आणि पर्यावरणाचं धोरण आता एकत्रितपणे अंमलात आणलं जात आहे. इथले नियम या गोष्टीची खातरजमा करतात की प्लास्टिकचा कमीत कमी वापर व्हावा आणि समुद्री जीवांचं रक्षण व्हावं.
राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या सरकारनं 2028 पर्यंत 33 टक्के विजेचं उत्पादन रिन्यूएबल साधनांपासून करण्याचं म्हणजे अपारंपरिक विजेद्वारे करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
मालदीव नक्कीच बदलतं आहे. मात्र हे सर्वकाही शांतपणे घडतं आहे असं नाही. गेस्ट हाऊस आणि तिथल्या कुटुंबांद्वारे चालवण्यात येणाऱ्या 'होम स्टे'मधून स्थानिक जगण्याचा थेट आणि सार्थक अनुभव पर्यटकांना मिळतो आहे. यातून हे सिद्ध होतं की विश्रांती आणि अंतरात्मा एकत्र असणं शक्य आहे.
एकेकाळी अत्यंत खर्चिक असल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर असलेलं मालदीव, आता पर्यटकांसाठी श्रीमंतांना मिळणाऱ्या आलिशान सुविधांपलीकडे बरंच काही आहे. तो म्हणजे तिथला खराखुरा आणि शुद्ध अनुभव.
कधीकाळी जे ठिकाण हनीमून साजरा करणाऱ्यांसाठी एक स्वप्नवत ठिकाण होतं. तिथे कुटुंबासह जाऊन पर्यटनाचा आनंद घेणं ही आता फक्त कल्पना किंवा इच्छाच राहिलेली नाही तर, ते वास्तव झालं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











