अचानक दारू सोडल्यावर काय होतं? दररोज किती दारू पिणं सुरक्षित असतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सुभाष चंद्र बोस
- Role, बीबीसी न्यूज
दारूचं व्यसन ही एक गंभीर समस्या आहे. दारू पिण्याचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम, दारू सोडण्यानंतर होणारे परिणाम आणि व्यसनमुक्ती केंद्र याबाबत सखोलपणे या लेखात जाणून घेऊया.
सदृढ आरोग्यासाठी व्यसनांपासून मुक्त असणे महत्त्वाचे मानले जाते.
दारूच्या वाढलेल्या किमतीची चर्चा करताना अनेकजण दिसतात पण दारूचे शरीरावर होणारे दुष्परिणाम अधिक धक्कादायक आहेत. याची चर्चा होणे तितकेच महत्त्वाचे आहे. लॉकडाऊनच्या काळात अल्पकाळाच्या बंदीनंतर जेव्हा दारूची दुकानं पुन्हा उघडली तेव्हा ग्राहकांची उडालेली झुंबड तुमच्या लक्षात असेलच.
दारूबद्दल नवीन संशोधन समोर आलं आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
डॉक्टरांच्या मते कधीतरी दारू पिणं असो की दररोज दारू पिणं असो, त्याचा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर विपरित परिणाम होऊ शकतो.
या लेखात दारूचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम आणि दारू पिणं अचानक थांबवल्यामुळे होणारे परिणाम यांची चर्चा करण्यात आली आहे.
आपण पितो ती दारू जाते कुठे?
अनेकांना वाटतं की ते जी दारू पितात ती थेट त्यांच्या पोटात जाते आणि नंतर लघवीवाटे शरीराबाहेर पडते. मात्र दारूचा शरीरातील विविध अवयवांवर काय परिणाम होतो याची बहुतांश लोकांना कल्पना नसते.
आम्ही एमजीएम हेल्थकेअरचे किडनी प्रत्यार्पण तज्ज्ञ डॉ. थिआगराजन यांच्याशी याबाबत बोललो, "तुम्ही किती प्रमाणात, किती वेळा, किती दिवस दारू पितात हे फारसं महत्त्वाचं नसतं तर दारू शरीरासाठी वाईट असते हे तेवढंच खरं. त्यातही दारूच्या बाबतीत पुरुषांपेक्षा महिला अधिक असुरक्षित असतात, त्यांच्यावर अधिक विपरित परिणाम होतो," असं ते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
शरीरात होणाऱ्या दारूच्या प्रवासाबद्दल डॉ. थिआगराजन सांगतात, "पोटातून दारू थेट छोट्या आतड्यात जाते. तिथं दारूचं विघटन अल्डीहाईड या रसायनात होतं."
"पोटातील आणि आतड्यातील सर्व रक्त यकृताद्वारे उर्वरित शरीरात जातं. अन्नातून पोषक घटक वेगळे करणं आणि त्यांना शरीराच्या इतर भागात रक्ताद्वारे पाठवणं आणि लघवी, मलाद्वारे शरीरातील घाण, कचरा बाहेर टाकणं हे यकृताचं काम असतं."
"अल्डीहाईड हे एक घातक द्रव्य असतं, ते रक्ताद्वारे यकृतात पोचतं आणि त्यामुळे यकृताचं नुकसान होतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही थोड्या कालावधीत जास्त प्रमाणात दारू पिता शरीरातील अल्डीहाईडचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे यकृताची क्रिया बंद पडते," असं डॉ. थिआगराजन सांगतात.
महिलांना सर्वाधिक धोका
दारूमुळे स्त्री असो की पुरुष कोणावरही विपरित परिणाम होऊ शकतो. मात्र जेव्हा महिलांचा मुद्दा येतो तेव्हा डॉ. थिआगराजन सांगतात की त्यांच्या जनुकीय रचनेमुळं दारूच्या बाबतीत महिला अधिक असुरक्षित असतात.
ते सांगतात, "दारू सतत प्यायल्यामुळे यकृतातील धोकादायक घटकांचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं यकृतावर डाग पडतात, यकुताचं नुकसान होतं. यातून फायब्रोसिस होऊ शकतो. म्हणजे यकृतावर डाग पडतात, तेथील पेशी जाड होतात आणि त्यांची लवचिकता कमी होते. याबरोबरच इतर घटकांमुळे यकृताला सिऱ्हॉसिस होतो. म्हणजेच यकृतातील चांगल्या पेशींची जागा डाग पडलेल्या, जाड पेशी घेतात."

फोटो स्रोत, Getty Images
मात्र या आजाराचं गांभीर्य झपाट्यानं वाटत जातं की हळूहळू होतं हे प्रत्येक व्यक्तीच्या जनुकीय रचनेवर आणि ती व्यक्ती किती प्रमाणात दारू पिते यावर अवलंबून असतं. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर सांगतात की दारू प्यायल्य��मुळं महिलांना यकृताचे आजार होण्याची शक्यता अधिक असते.
दारूमुळे होणारे यकृताचे आजार
दारूमुळे यकृताशी संबंधित विविध आजार होऊ शकतात. समोर आलेल्या माहितीनुसार मागील दशकभरात भारतात यकृताशी निगडित आजारांच्या संख्येत वाढ झाली आहे. असं नोंदवण्यात आलं आहे की दर 5 पैकी 1 भारतीय व्यक्तीला यकृताचा आजार आहे. यकृताच्या आजारामुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणदेखील वाढलं आहे.
डॉ. थिआगराजन यांच्या मते, दारूचे यकृतावर होणारे मुख्य परिणाम म्हणजे, यकृताचा गंभीर सिऱ्हॉसिस.

फोटो स्रोत, Getty Images
अनेक वर्ष यकृताची सतत हानी होत गेल्यामुळं इन्फ्लमेशनची (यात रक्तपेशींना आतून सूज येते, यातून सांधेदुखी आणि इतर समस्या निर्माण होतात) समस्या होते आणि त्यातून हळूहळू यकृताची कार्यक्षमता कमी होत जाते.
ऊर्जेचा अभाव, स्नायूंमध्ये कमकुवतपणा असणं, शरीरात पाण्याचं प्रमाण कमी असणं, तीव्र कावीळ आणि रक्ताच्या उलट्या होणं ही याची लक्षणं असतात.
गंभीर हेपॅटिटिस किंवा यकृत निकामी होणं (अॅक्युट अल्कोहोलिक हेपॅटिटिस)
दिवस आणि रात्र सतत दारू प्यायल्यामुळं, व्यवस्थित आहार न घेतल्यामुळं आणि इतर कारणांमुळं या प्रकारची समस्या निर्माण होते. यातून अतिशय गंभीर स्वरुपाची कावीळ होते, रक्ताच्या गुठळ्या होतात आणि मेंदूच्या चेतापेशींवरदेखील परिणाम होत इन्सिपिएन्ट कोमा होण्याची शक्यता असते.

फोटो स्रोत, Getty Images
दारूच्या सेवनामुळं दीर्घकाळात यकृतावर विपरित परिणाम होत जातो. डॉ. थिआगराजन सांगतात की या आजारात तुम्ही कितीही कमी प्रमाणात दारू पित असला तरी अचानक यकृत निकामी होतं.
ते सांगतात तीन स्थितींमध्ये वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे. रुग्णांच्या स्थितीनुसार यात वैद्यकीय उपचार केले जातात.
फॅटी लिव्हर आणि दारू यांचा एकमेकांशी संबंध
AIIMSने मागील वर्षी प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार 38 टक्के भारतीयांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या आहे. यकृताच्या पेशींमध्ये चरबीची साठवणूक होणं ही सर्वसामान्य बाब आहे. मात्र हे प्रमाण एरवी 5 टक्क्यांपेक्षा कमी असतं.
मात्र जेव्हा यकृताच्या पेशींमध्ये चरबी साठण्याचं प्रमाण 20-25 टक्क्यांच्या वर जातं तेव्हा त्याचा यकृताच्या कामकाजावर विपरीत परिणाम होतो. यालाच आपण फॅटी लिव्हर किंवा यकृतावर चरबी साठणं असं म्हणतो.
डॉ. थिगागराजन सांगतात की दोन प्रकारचं फॅटी लिव्हर असतात. ते सांगतात, "हे दोन प्रकार म्हणजे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर."
ते लक्षात आणून देतात की जीवनशैलीतील बदल आणि आहाराच्या चुकीच्या सवयी ही फॅटी लिव्हरच्या आजारा मागील मुख्य कारणं आहेत. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा आजार खूपच आढळतो.
दररोज किती दारू पिणं सुरक्षित आहे?
काही जण कोणताही दारू पित असले तरी त्यांचं स्वत:वर नियंत्रण असतं. मात्र प्रत्यक्षात ज्याप्रमाणं एक बूचभर कफासाठीचं औषध आपण घेतो, तितक्याच प्रमाणात दारू सुरक्षित असते.

फोटो स्रोत, Getty Images
"दररोज 30 मिली दारू पिणं सुरक्षित असतं. दररोज इतकी दारू प्यायल्यानं नुकसान होत नाही. मात्र असं करण्यासाठी तुमचं यकृत जनुकियदृष्टया निरोगी असलं पाहिजे आणि यकृताला इतर कोणत्याही समस्या असता कामा नयेत," असं डॉक्टर सांगतात.
त्याचवेळी दारूच्या व्यवसाधिनतेच्या गुणधर्मामुळे स्वत:वर नियंत्रण ठेवत दररोज इतक्या सुरक्षित प्रमाणात दारू पिणं शक्य नसतं. हळूहळू दररोज दारूचं प्रमाण वाढत जातं आणि कमी होत नाही. त्यामुळं दारू पिणं पूर्णपणे टाळणं ही योग्य गोष्ट असल्याचं डॉक्टर सांगतात.
दारू पिणं थांबवल्यामुळं यकृत पुन्हा पूर्ववत होतं का?
काहीवेळा खूप वर्षांपासून दारू पिणारे देखील दारू सोडण्याचं ठरवतात. त्यांना वाटतं की असं केल्यानं त्यांच्या शरीराची झालेली झीज भरून निघेल.
मात्र डॉक्टर सांगतात की अनेक वर्षे दारू पिणाऱ्यांनी दारू प्यायचं थांबवलं तरी त्या लोकांनादेखील यकृताचे आजार होऊ शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात, "जर दारूमुळं होणारं फॅटी लिव्हर किंवा फायब्रोसिस सुरूवातीच्या टप्प्यात असताना तुम्ही दारू पिणं थांबवलं तर तुम्ही यकृताचं पुढे होणारं नुकसान टाळू शकता. वैद्यकीय उपचारांनी काही दिवसांमध्ये तुम्ही बरे होऊ शकत��."
"मात्र जर तुमचं यकृत सिऱ्हाॉसिसच्या स्थितीत पोचलं असेल तर मात्र दारू पिणं पूर्णपणे सोडलं तरी यकृत पूर्ववत होऊ शकत नाही. त्याला पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते.
मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यकृताला झालेली हानी कोणत्याही टप्प्यावर असो, तुम्ही जर दारू पिणं सोडलं तर यकृताची आणखी हानी होणार नाही," असं डॉ. थिआगराजन सांगतात.
दारूमुळे होणारा मानसिक आजार
दारू प्यायल्यामुळं नुकसान होणारा आणखी एक अवयव म्हणजे मेंदू. यामुळेच दारू पिणाऱ्या लोकांना मानसिक आजार होण्याची शक्यता असते. याबाबत आम्ही किल्पक्कम सरकारी मानसोपचार हॉस्पिटलच्या संचालिका, डॉ. पूर्णा चंद्रिका यांच्याशी बोललो.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. पूर्णा चंद्रिका यांनी दिलेल्या माहितीनुसार एखादी व्यक्ती किती प्रमाणात आणि किती काळासाठी दारूच्या व्यसनाच्या आहारी गेली आहे ही गोष्ट किती प्रमाणात दारूचं सेवन होतं आहे आणि त्या व्यक्तीची दारू सहन करण्याची क्षमता किती आहे यावर अवलंबून असतं.
अती प्रमाणात दारू प्यायल्यामुळे निर्माण होणारी गुंतागुंत
काही लोक अगदी थोड्या प्रमाणात दारू पितात आणि तरीही ते वेडसर किंवा दारूच्या अधीन होतात. ते वस्तू तोडतात आणि भांडतात. ही पहिली पायरी असते, असं डॉक्टर सांगतात
डॉक्टर सांगतात की "पुढील पायरी म्हणजे डीलिरियम ट्रेमेन्स. यात दारू पिणारे अनेकदा सांगतात की पोलिस त्यांना पकडण्यासाठी येत आहेत. या लोकांना भास होतात. या मानसिक आजाराची लक्षणं म्हणजे झोप न लागणं, गोंधळलेलं असणं, गोष्टींचा विसर पडं, थकवा येणं आणि कानात आवाज ऐकू येणं."
दारू सोडल्यानंतर काय होतं?
ज्याप्रमाणे दारू प्यायल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतात, त्याचप्रमाणे काही लोकासंमोर दारू सोडल्यानंतर मोठी आव्हानं निर्माण होतात. याला विड्रॉवल सिंड्रोम असं म्हणतात. यामध्ये काही लोकांना गोंधळलेलं असणं, तणाव असणं, हातपाय थरथरणं आणि थकवा येणं या समस्या उद्भवतात.
मात्र त्याचबरोबर जेव्हा तुम्ही अनेक वर्षे दारू पित असताना अचानक दारू पिणं थांबवता तेव्हा या लक्षणांपलीकडे काही मानसिक समस्यादेखील उद्भवतात. डॉक्टर पूर्णा चंद्रिका याबद्दल सांगतात.
दारूमुळे होणारे भ्रम (हॉलुसिनेशन्स)
"जर काही लोकांनी दारू पिणं थांबवलं तर त्यांना कानात आवाज येतात, जणूकाही कोणी त्यांना हाका मारतं आहे आणि याला दारूमुळे होणारे भ्रम म्हणतात," असं डॉक्टर सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रकारात अनेक वर्षे दारू पिणारे लोक काही कारणामुळे एखाद्या दिवशी अचानक दारू पिणं सोडतात. डॉक्टर सांगतात की त्यानंतर एक ते तीन दिवसातच त्यांना गोंधळलेलं असणं, राग येणं आणि त्यांच्यासमोर कोण उभं आहे हे न कळणं यासारख्या समस्या उद्भवतात.
वेर्निक एन्सेफॅलोपथी कोरशॉफ
जेव्हा मानसिक समस्या अतिशय गंभीर होतात तेव्हा त्यातून पुढील टप्प्यात चेतासंस्थेशी निगडीत समस्या निर्माण होतात. यालाच वेर्निक एन्सेफॅलोपथी कोरशॉफ म्हणतात.
यात गोष्टींचं विस्मरण होतं. मात्र त्या व्यक्तीच्या ते लक्षात येत नाही. जर अचानक त्यांना एखादा प्रश्न विचारला आणि जरी त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर माहित नसलं तरी ते आपल्याला माहित नाही असं सांगण्याऐवजी काहीतरी अंदाजे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर पूर्णा चंद्रिका सांगतात की या न्युरोलॉजिकल मेंटल समस्या असतात.
याव्यतिरिक्त चेतासंस्थेशी निगडीत इतर समस्यादेखील होऊ शकतात. यात मायोपथी आणि न्युरोपथीशी निगडीत समस्या असू शकतात. या समस्यांमुळे उभं राहणं आणि काही काम करणं अशक्य होऊन बसतं. डॉक्टर सांगतात की यात शरीराला सुया टोचल्यासारखं वाटणं यासारख्या समस्यादेखील उद्भवतात.
व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र उपयोगाची असतात का?
अलीकडच्या काळात दारू किंवा इतर व्यसनांमधून सुटका करण्यासाठी असणाऱ्या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रांच्या संख्येत वाढ झाली आहे.
मात्र अनेक ठिकाणी असे सातत्याने आरोप झाले आहेत की तिथं मारहाण केली जाते, बंद करून ठेवलं जातं आणि छळ केला जातो. अशा प्रकरणांबाबत आम्ही डॉक्टरांना प्रश्न विचारला की खरोखरच ही व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र फायद्याची असतात का.
यावर डॉ. थिआराजन यांनी उत्तर दिलं की, "जरी काही चांगली व्यसनमुक्ती केंद्र असली तरी अनेक व्यसनमुक्ती केंद्रांचं नियमन होत नाही. मला माहीत नाही तिथं नेमकं काय होतं. त्यामुळे अशावेळी वैद्यकीय उपचार घेणं हाच उपाय आहे. त्यापलीकडे त्या व्यक्तीचा निश्चय, जिद्द देखील महत्त्वाची असते. कोणाचंही व्यसन जबरदस्तीनं सोडवता येत नाही."

डॉ. पूर्णा चंद्रिका सांगतात की अनेक व्यसनमुक्ती केंद्र राज्य सरकारच्या मानसिक आरोग्य आयोगाकडून परवानगी मिळाल्यानंतरच काम सुरू करतात आणि लोकांनी विनापरवाना चालणाऱ्या केंद्रावर विश्वास ठेव��� नये.
याविषयी बोलतात डॉक्टर पुढे सांगतात, "अशा व्यसनमुक्ती केंद्रांवर विश्वास ठेवू नका जिथं सांगितलं जातं की दाखल केलेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी किंवा पाहण्यासाठी कुटुंबीयांनी येऊ नये. त्याला एकटंच ठेवण्यात यावं. किंबहुना त्या व्यक्तीला नियमितपणं पाहिल्यानं किंवा भेटल्यानं त्याला प्रेरणा मिळते, आधार वाटतो की आपलं कुटुंब आपल्याबरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला थोडीशी जरी शंका असले तर तुम्ही राज्याच्या मानसिक आरोग्य आयोगाकडे तक्रार करू शकतात."
व्यसनमुक्ती केंद्राचा आधार
तामिळनाडू सरकारने दारू किंवा अंमली पदार्थांपासून सुटका करण्यासाठी विविध विशेष योजना राबविल्या आहेत. याबाबत डॉ. पूर्णा चंद्रिका सांगतात, "दारू सोडवण्यासाठी औषधोपचार हा उपाय आहे. सरकारनं यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत."
"हे उपचार राज्यातील सर्व जिल्हा सरकारी हॉस्पिटल, मेडिकल कॉलेजचे मानसिक आरोग्य विभाग आणि जिल्हा स्तरावरील व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत," असं डॉक्टर सांगतात.
या सर्व ठिकाणी 21 दिवस ते 1 महिना किंवा 10 ते 15 दिवसांचे औषधोपचार दिले जातात. तिथं औषधांशिवाय उपचार करताना मानसिक आरोग्यासाठीचं समुपदेशनदेखील दिलं जातं. या उपचारांच्या माध्यमातून लोकांना दारूच्या व्यसनातून मुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं डॉक्टर पूर्णा चंद्रिका सांगतात.











