पेरिमेनोपॉज म्हणजे काय? या काळात महिलांच्या शरीरात काय बदल होतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ॲनाबेल रॅकहॅम
- Role, कल्चर रिपोर्टर
रजोनिवृत्ती ही महिलांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची घटना असते. त्यानंतर त्यांच्या आयुष्याचा एक वेगळा टप्पा सुरू होतो. हा बदल तितका सोपा नसतो.
रजोनिवृत्तीपूर्व स्थिती म्हणजेच पेरीमेनोपॉजपासून या बदलाची सुरूवात होते. ही स्थिती म्हणजे रजोनिवृत्ती येण्याची चाहूल असते. यात महिलांना शारीरिक आणि मानसिक पातळीवर मोठ्या मानसिक आव्हानाला जावं लागतं. अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.
बीबीसीच्या निवेदिका एम्मा बार्नेट यांनी एका पॉडकास्टमध्ये याबाबतीतील त्यांचा अनुभव सांगितला. तसंच पेरिमेनोपॉजशी निगडीत महत्त्वाचे मुद्दे, महिलांनी ही स्थिती कशी हाताळावी यासंदर्भात त्यांनी चर्चा केली.
एम्मा बार्नेट म्हणाल्या की त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की वयाच्या 38 व्या वर्षीच त्यांची रजोनिवृत्तीपूर्व स्थिती (पेरीमेनोपॉज) सुरू झाली आहे, तेव्हा त्या अतिशय व्यथित झाल्या. त्यांना त्यांच्याकडून बरंच काही 'हिरावून घेतल्यासारखं' वाटलं. त्यांना असं वाटलं की जणूकाही कोणीतरी त्यांच्याकडील एखाद्या मौल्यवान गोष्टीची चोरीच केली आहे.
बार्नेट आता 40 वर्षांच्या आहेत. त्या म्हणाल्या, "माझ्या आयुष्यात तेव्हा मला पहिल्यांदाच एक स्त्री असणं आवडत नव्हतं. आपण एक पुरुष व्हायला हवं होतं, असं मला पहिल्यांदाच वाटलं होतं."
बार्नेट त्यांच्या बीबीसीवरील नवीन पॉडकास्टमध्ये बोलत होत्या. 'रेडी टू टॉक विथ एम्मा बार्नेट' असं या पॉडकास्टचं नाव असून तो शुक्रवारी (14 नोव्हेंबर) प्रदर्शित झाला.
पेरीमेनोपॉजच्या काळातील भावनिक, मानसिक समस्या
पेरीमेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीपूर्व स्थिती, सामान्यपणे महिलांमध्ये वयाच्या 46 वर्षांच्या आसपास येते. या स्थितीत महिलांमध्ये मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीची लक्षणं दिसत असतात, मात्र त्यांची मासिक पाळी येणं अद्याप थांबलेलं नसतं.
या लक्षणांमध्ये चिंता, मूड बदलणं, स्मरणशक्ती आणि एकाग्रतेमध्ये समस्या निर्माण होणं, चेहरा आणि गळ्याभोवती अचानक घाम येणं आणि अनियमित मासिक पाळी येणं या गोष्टींचा समावेश असतो.

पॉडकास्टच्या या भागात, बार्नेट म्हणतात की पेरीमेनोपॉजमुळे त्यांना असं वाटलं की त्यांनी स्वत:ची ओळख गमावली आहे आणि त्या अजूनही पूर्वीची स्थिती 'परत येण्याची' वाट पाहत आहेत.
या पॉडकास्टमधील पाहण्या आणि मैत्रीण असलेल्या केट थॉर्नटन यांच्याशी बोलताना बार्नेट म्हणाल्या, "मला असं वाटत होतं की ��ी काहीतरी गमावलं आहे आणि या स्थितीबद्दल कॉल करण्यासाठी कोणताही आपत्कालीन नंबर नाही. 'कोणीतरी माझ्याकडून एखादी गोष्ट चोरून नेली आहे, मात्र मला तो गुन्हा नोंदवता येत नाही, अशी अवस्था झाली होती."
थॉर्नटन यादेखील पत्रकार आहेत. त्यांनी देखील पेरीमेनोपॉजबद्दलचे त्यांचे अनुभव सांगितले. त्या म्हणाल्या, त्यांनी अनुभवलेली 'सर्वात वाईट' गोष्ट म्हणजे, "एकावेळी अनेक गोष्टी करू शकणाऱ्या...अत्यंत सक्षम असणाऱ्या" व्यक्तीऐवजी आपण 'पूर्णपणे अक्षम झालो आहोत' असं वाटणं.
पुस्तक आणि पॉडकास्टमधून महिलांना बोलतं करण्याचा प्रयत्न
बार्नेट यापूर्वी त्यांच्या आरोग्याबद्दल बोलल्या होत्या. 2019 मध्ये, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, ज्यात त्यांनी त्यांच्या एंडोमेट्रीओसिसच्या (गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूस वाढणाऱ्या ऊतींची समस्या) अनुभवाबद्दल लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव आहे, 'पीरियड: इट्स अबाऊट ब्लडी टाइम'.
पॉडकास्टमधील या भागादरम्यान, बार्नेट म्हणाल्या की त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी मांडणं हे 'खूपच अस्वस्थ, चिंताग्रस्त करणारं' होतं. मात्र "इतर लोकांना या गोष्टींबद्दल बोलता यावं यासाठी त्यांना एक जागा निर्माण करायची होती."

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या वर्षापर्यंत बार्नेट रेडिओ 4 च्या वुमन्स अवर या कार्यक्रमाचं निवेदन करत होत्या. बार्नेट पुढे म्हणाल्या की त्यांना हा पॉडकास्ट तयार करायचा होता. जेणेकरून त्यांना इतरांच्या कहाण्या तर सांगता येतीलच, शिवाय श्रोत्यांसमोर त्यांचा दृष्टीकोन आणि अनुभव देखील मांडता येतील.
"मी सहसा मुलाखत घेते आणि सूत्रसंचालन करते," असं बार्नेट, थॉर्नटन यांना म्हणाल्या.
बार्नेट पुढे म्हणाल्या, "हे सांगणं सोपं नाही. मला वाटतं की त्यामुळेच हे महत्त्वाचं आहे की जी व्यक्ती इतरांच्या मुलाखती घेते, तिनं नेहमीच नाही - मात्र योग्य वेळी, हे बोलावं. कारण ते माझं काम नाही आणि ते माझ्याबद्दल नसतं."
"मात्र जेव्हा योग्य असेल आणि विशेषकरून जेव्हा तुम्ही इतरांनादेखील तसंच करण्यास सांगत असाल, तेव्हा स्वत:बद्दल बोलावं."
पॉडकास्टचा हा भाग संपवताना बार्नेट म्हणाल्या की त्यांना आशा आहे की "आम्ही दोघींनी सांगितलं तसं पेरीमेनोपॉजच्या आसपास स्थिती सामान्य झाली पाहिजे आणि महिलांमधील वयाच्या तिशीपासून सुरू होणारा हार्मोन्सचा हा ऱ्हास, सामान्य भाषेत मांडला जाऊ शकतो."
"आणि याचा अर्थ असा नाही की जे घडतं, ते कमी असाधारण किंवा अत्यंत संतापजनक वाटतं. मात्र आपण त्याला कसं सामोरं जातो ते बदललं जाऊ शकतं," असं त्या पुढे म्हणाल्या.
रजोनिवृत्तीच्या लक्षणांवर काय उपचार करावेत?
मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीच्या लक्षणांची वेदना किंवा त्रास कमी व्हावा यासाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी (एचआरटी) घेणाऱ्या महिलांची संख्या वाढते आहे.
एचआरटी इस्ट्रोजेनची पातळी वाढवते आणि स्थिर करते. काहीवेळा यात प्रोजेस्टेरॉनच्या कृत्रिम किंवा बायोआयडेंटिकल आवृत्तीचा समावेश असतो.
मात्र ज्या लोकांना कर्करोग, रक्तातील गाठी आणि उच्च रक्तदाबाची समस्येची पार्श्वभूमी आहे, अशांसाठी ही थेरेपी योग्य नसू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
या काळात महिलांना काय वाटतं, यामध्ये सुधारणा होऊ शकते. त्यासाठी पुढील पर्याय आहेत,
- हाडं मजबूत करण्यासाठी आणि ह्रदयाचं रक्षण करण्यासाठी कमी चरबीयुक्त आणि कॅल्शियमचं अधिक प्रमाण असलेला संतुलित आहार घ्यावा
- चिंता, तणाव कमी व्हावा आणि ह्रदयविकारापासून बचाव व्हावा यासाठी नियमितपणे व्यायाम करावा
- हृदयविकार टाळण्यासाठी आणि चेहरा, गळ्यावर अचानक उष्णता जाणवणं, घाम येणं टाळण्यासाठी धूम्रपान बंद करावं
- चेहरा, गळ्यावर अचानक उष्णता जाणवणं, घाम येणं टाळण्यासाठी मद्यपान टाळावं
वनस्पतीवर आधारित इस्ट्रोजेन, उदाहरणार्थ, सोया आणि रेड क्लोव्हर (गुलाबी फूल आणि तीन पानं असलेली वनस्पती) खाल्ल्यामुळे मेनोपॉजची लक्षणं कमी होण्यास मदत होऊ शकते, असंही संशोधनातून समोर आलं आहे.
40 वर्षांहून अधिक वयाच्या महिलांना एचआरटीसोबतच, कॉग्निटिव्ह बिहेव्हिरल थेरेपी (सीबीटी) म्हणून ओळखली जाणारी टॉकिंग थेरपी दिली जाऊ शकते. किंवा रुग्णांच्या स्थितीनुसार आवश्यकता असल्यास एचआरटीऐवजी सीबीटी दिली जाऊ शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











