थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय? वाहन असेल तर हा इन्शुरन्स काढणं का आवश्यक आहे?

कार

फोटो स्रोत, Getty Images

तुम्हाला ड्रायव्हिंग आवडत असेल किंवा गाडी चालवणं तुमच्या रोजच्या आय़ुष्याचा भाग असेल, तर हल्ली रस्त्यावर काय-काय होऊ शकतं, याचा तुम्हाला नक्की अंदाज असेल.

कोण - कधी - कुठून - कसं मध्ये येईल सांगता येत नाही आणि यातून धडक झाली, गाडीचं नुकसान झालं तर काय करायचं?

अशावेळी तुमच्याकडे असायला हवा थर्ड पार्टी इन्शुरन्स.

पण हा इन्शुरन्स म्हणजे काय, तो तुमच्यासाठी का महत्त्वाचा आहे, या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात.

थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय?

मोटर व्हेकल्स अॅक्ट म्हणजे मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार भारतातल्या सगळ्या कार्स आणि दुचाकींसाठी टीपीआय म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. पण असं असलं तरी अनेक वाहनधारक हा इन्शुरन्स घेत नाहीत.

भारतातल्या रस्त्यांवर असणाऱ्या एकूण वाहनांपैकी सुमारे 50 टक्के वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स नसतो, असं स्वतः भारत सरकारने 2023 साली म्हटलं होतं.

असा इन्शुरन्स न काढणं म्हणजे नियम मोडणं तर आहेच, पण यामुळे वाहनधारक आणि पीडित या दोघांसाठी अडचणी उभ्या राहतात.

थर्ड पार्टी इन्शुरन्स

फोटो स्रोत, Getty Images

हा थर्ड पार्टी इन्शुरन्स काय असतो?

यामध्ये फर्स्ट पार्टी असते पॉलिसीधारक किंवा इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणारी व्यक्ती.

सेकंड पार्टी - इन्शुरर म्हणजे इन्शुरन्स कंपनी.

थर्ड पार्टी - क्लेमंट म्हणजे ती व्यक्ती जी फर्स्ट पार्टीमुळे नुकसान झाल्याचा दावा दाखल करते.

म्हणजे थोडक्यात ती व्यक्ती जिचं तुमच्या कार किंवा टू व्हीलरमुळे नुकसान झालंय.

हा थर्ड पार्टी इन्शुरन्स - याच तिसऱ्या व्यक्तीचंं नुकसान भरून काढण्यासाठी काढला जातो.

म्हणजे तुमच्या वाहनामुळे दुसऱ्या व्यक्तीला दुखापत झाली, अपघाती मृत्यू झाला, तर त्यासोबतच समोरच्याच्या कारचं वा मोटरसायकलचं नुकसान, रस्त्यालगतच्या बांधकामांचं झालेलं नुकसानही या इन्शुरन्सद्वारे भरून काढलं जातं.

विम्याचा दावा कोण करू शकतं?

थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये विम्याचा दावा हा थर्ड पार्टी - म्हणजे ज्या व्यक्तीसोबत अपघात झालाय ती व्यक्ती दाखल करत असते.

ती म्हणते की, फर्स्ट पार्टीमुळे - विमाधारकामुळे झालेलं नुकसान - सेकंड पार्टी म्हणजे विमा कंपनीनने भरून द्यावं.

कार अपघात

फोटो स्रोत, Getty Images

आपण उदाहरणाने समजून घेऊ.

'अ' व्यक्तीने - 'क्ष' कंपनीकडून थर्ड पार्टी विमा काढला. या व्यक्तीच्या कारने 'ब' व्यक्तीच्या कारला धडक दिली. त्यामुळे गाडीचं नुकसान झालं. आता खरंतर 'अ' व्यक्तीची चूक असेल, तर हे नुकसान त्या व्यक्तीने भरून द्यायला हवं. पण 'अ' व्यक्तीने थर्ड पार्टी इन्शुरन्स काढलेला असल्याने 'ब' व्यक्तीला 'क्ष' कंपनीकडून नुकसान भरपाई मिळू शकेल.

पण एक लक्षात ठेवा - तुमच्या गाडीचं नुकसान किंवा तुम्हाला झालेली दुखापत या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये कव्हर होत नाही. यासाठी कॉम्प्रेहेंसिव्ह इन्शुरन्स कव्हर असतं.

एकूणच वाहन चालकांसाठी हा इन्शुरन्स महत्त्वाचा असतो.

थर्ड पार्टी इन्शुरन्स का काढला जात नाही?

लोक थर्ड पार्टी इन्शुरन्स का काढत नाहीत? वेगवेगळी कारणं आहेत.

बहुतांश लोकांचं म्हणणं असतं की, हा इन्शुरन्स महाग आहे. काहींना स्वतःच्या ड्रायव्हिंग कौशल्यावर फार विश्वास असतो. आपल्याकडून कधी अशी चूक - असा अपघात होणार नाही, असं त्यांना वाटतं. काहींचं म्हणणं असतं - टीपीआयसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात ड्रायव्हर ठेवता येऊ शकतो.

यात अजून एक प्रकार असतो. लोक सुरुवातीला असा थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतात. पण या काळात कधी गरज पडली नाही - पैसे फुकट गेले - म्हणून तो रिन्यू केला जात नाही - नवी पॉलिसी घेतली जात नाही.

आणि टीपीआय बंधनकारक आहे - हेच अनेकांना माहीत नसतं.

मोटार वाहन कायद्याच्या कलम 146 मध्ये हे म्हटलेलं आहे. या कलमाचं उल्लंघन करून - म्हणजे इन्शुरन्सशिवाय जर तुम्ही वाहन चालवताना आढळलात तर त्यासाठी 3 महिन्यांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं.

आणि त्यातून तुमच्यामुळे समजा अपघात झाला - तर आणखी गंभीर परिणाम होतो.

थर्ड पार्टी विम्याखाली काय काय कव्हर होतं?

मग या थर्ड पार्टी विम्याखाली काय काय कव्हर होतं?

  • शारीरिक दुखापत
  • हॉस्पिटलचा खर्च
  • मिळकतीचं झालेलं नुकसान
  • संपत्तीचं झालेलं नुकसान

याची भरपाई या विम्याखाली होते. पण यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत?

  • अपघात झाल्यास लवकरात लवकर विमा कंपनीला कळवणं ही पॉलिसीधारकाची जबाबदारी असते. या अपघाताबद्दलची सगळी आवश्यक माहिती - नेमकं काय घडलं त्याचं वर्णन, तिथे कोण होतं, वेळ, तारीख, जागा याची योग्य नोंद असणं महत्त्वाचं आहे.
  • ड्रायव्हर, प्रवासी आणि प्रॉपर्टी किंवा वाहनाचं किती नुकसान झालंय याचा तपशील
  • त्यावेळी तिथे उपस्थित लोकांबद्दलची माहिती
  • अपघात घडला तेव्हाचं वातावरण वा परिस्थिती
  • अपघाताबद्दलचे फोटो - व्हीडिओ
  • तक्रार दाखल झाली असल्यास एफआयआर

या सगळ्या गोष्टी इन्शुरन्स क्लेम दाखल करताना गरजेच्या असतात.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये देशभरात 4 लाख 80 हजार 583 रस्ते अपघात झाले.

यामध्ये 1 लाख 72 हजार 890 लोकांचा जीव गेला. तर 4 लाख 62 हजार 825 लोक जखमी झाले.

टीपीआयचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भरपाईच्या रकमेवर मर्यादा नाही. म्हणजे समजा तुम्हाला काही लाखांचं वा कोटीचं देणं असेल, तर इन्शुरन्स कंपनीला हे पैसे भरपाई म्हणून द्यावे लागतील. तर संपत्तीच्या बाबतीत याची कमाल मर्यादा 7.5 लाख आहे.

टीपीआय कव्हर कधी रिजेक्ट होऊ शकतं?

पण प्रत्येक वेळी थर्ड पार्टी इन्शुरन्सची रक्कम मिळते का, तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे.

मग तुमचं टीपीआय कव्हर कधी रिजेक्ट होऊ शकतं?

  • तुम्ही नशेमध्ये, दारुच्या अमलाखाली गाडी चालवत होता हे सिद्ध झालं.
  • तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपलेली असेल.
  • तर अशावेळी विमा कंपन्या तुम्हाला कव्हरेज देण्यास नकार देऊ शकतात. यामध्ये शेवटचा निर्णय कोर्टाचा असतो.
  • पण बहुतेक प्रकरणांमध्ये तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्स असल्याचा फायदा म्हणून स्वतःच्या खिशातून लाखोंचा खर्च करावा लागत नाही. हा एक आर्थिक आधार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)