प्रेम चोप्रा यांना झालेल्या हृदयाच्या 'अक्यूट एओर्टिक स्टेनोसिस' या आजारावर उपचार काय आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते प्रेम चोप्रा यांच्यावर हृदयाशी संबंधित एका आजारानंतर व्हॉल्व्ह इम्प्लांटेशनची शस्त्रक्रिया करण्यात आली. याबद्दल त्यांचे जावई, अभिनेता शर्मन जोशी यांनी माहिती दिली.
अलीकडेच 90 वर्षीय प्रेम चोप्रा यांना 'अक्यूट एओर्टिक स्टेनोसिस' हा आजार झाल्याचं निदान करण्यात आलं होतं. हा हृदयाशी संबंधित एक आजार आहे, यात हृदयाच्या झडपा खराब होतात. त्यामुळे एओर्टामधील रक्तप्रवाहावर परिणाम होतो. एओर्टा ही हृदय आणि शरीरातील विविध भागांमध्ये रक्त वाहून नेणारी मुख्य धमनी असते.
शर्मन जोशी यांनी इंस्टाग्रामवर सांगितले; "डॅडींना अक्यूट एओर्टिक स्टेनोसिस असल्याचे निदान झाले होते, त्यानंतर ओपन-हार्ट सर्जरी न करता व्हॉल्व्ह बदलून TAVI प्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. आता डॅड घरी आहेत आणि बरं वाटत आहे."
TAVI म्हणजे 'ट्रांसकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन'; या प्रक्रियेमध्ये ओपन हार्ट सर्जरी न करता व्हॉल्व्हचे रोपण केले जाते.
एओर्टिक स्टेनोसिस म्हणजे काय?
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) च्या मते, एओर्टिक स्टेनोसिस अशी स्थिती आहे ज्यात एओर्टिक व्हॉल्व्ह जाड किंवा कडक होतो आणि तो व्यवस्थित उघडत नाही.

फोटो स्रोत, ANI
त्यामुळे त्याच्या माध्यमातून रक्तप्रवाह कमी होतो आणि स्टेथोस्कोपने हृदयातील "मर्मर" ऐकू येते. (मर्मर म्हणजे हृदयाच्या ठोक्यांबरोबर हृदयातील रक्तप्रवाहाचा प्रवाहासारखा येणारा आवाज. हा आवाज येणं झडपांमधील बिघाड किंवा हृदयासंबंधी आजारांचं लक्षण असू शकतं.)
या आजाराची कारणे काय असतात?
वाढतं वय : ही स्थिती सामान्यतः 60 वर्षावर जास्त वयाच्या लोकांमध्ये दिसून येते.
जन्मजात बायकस्पिड व्हॉल्व्ह : काहींमध्ये जन्मापासूनच बायकस्पिड् व्हॉल्व्ह असतो आणि तो कमी वयातच जाड होऊ शकतो.
NHS नुसार, कधीकधी या आकुंचनाबरोबर एओर्टिक व्हॉल्व्हमधून रक्त स्रवू शकते, ज्याला एओर्टिक रेग्रेजिटेशन म्हणतात. दोन्ही समस्या एकत्र आल्यास त्याला मिक्स्ड एओर्टिक व्हॉल्व्ह डिसिझ म्हणतात.
उपचार कसे केले जातात?
एओर्टिक स्टेनोसिस एक दीर्घकालीन स्थिती असू शकते आणि ती तीन स्तरांमध्ये विभागली जाते. प्राथमिक मध्यम आणि तीव्र.

फोटो स्रोत, Getty Images
प्राथमिक/मध्यम अवस्थेत : लक्षणे कमी असतात, हृदयावर प्रभावही कमी पडतो. NHS च्या मते, या अवस्थेत बरेच रुग्ण अनेक वर्षे लक्षणांशिवाय राहतात आणि डॉक्टर फॉलो‑अपच्या वेळा त्यांच्या स्थितीनुसार ठरवतात.
तीव्र अवस्थेत आणि लक्षणे असल्यास : हृदयाच्या व्हॉल्व्हचे प्रत्यारोपण (व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट) आवश्यक ठरते, ते ओपन हार्ट सर्जरीद्वारे अथवा TAVI द्वारे करण्यात येऊ शकते.
तपासणी कशी होते?
सीटी स्कॅन टेस्ट : या चाचणीदरम्यान रुग्णाला सरळ झोपवतात आणि एका मोठ्या रिंगसारख्या स्कॅनरमधून पाठवतात, त्यात हृदयाच्या तपशीलवार एक्स-रे प्रतिमा घेतात. या प्रक्रियेत इंजेक्शन दिले जाते आणि चाचणी काही मिनिटांत पूर्ण होते.
इकोकार्डियोग्राम (इको किंवा कार्डियक अल्ट्रासाऊंड) : या चाचणीत अल्ट्रासाऊंड प्रोब छातीवर ठेवला जातो आणि हृदयाच्या हालचालींच्या प्रतिमा घेतल्या जातात. ही चाचणी साधारणतः 30 मिनिटांची असते.
अँजियोग्राम: हृदयाच्या धमन्यांचे एक्स‑रे काढले जातात.
कार्डियोपल्मनरी एक्सरसाईझ टेस्ट : ट्रेडमिल किंवा सायकलवर करण्यात येते, ज्यातून हृदय व फुफ्फुसांची क्षमतेची पडताळणी होते.
जीवनशैली आणि इतर काळजी
- डॉक्टर सामान्यतः आरोग्यदायी लाइफस्टाइल अवलंबण्याचा सल्ला देतात.
- वजन नियंत्रणात ठेवा.
- धूम्रपान ताबडतोब थांबवा.
- बहुतेक रुग्णांसाठी व्यायामावर बंदी नाही, परंतु डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











