ना कोहली, ना आझम; पाकिस्तानात गूगलवर सर्वाधिक सर्च केला जातोय 'हा' भारतीय क्रिकेटर

पाकिस्तानी क्रिकेट चाहते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अभिषेक शर्माबद्दल फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे.

29 टी-20 सामने, 37.48 च्या सरासरीनं 1012 धावा आणि 189.51 चा जोरदार स्ट्राईक रेट.

ही आकडेवारी ज्या धडाकेबाज फलंदाजाची आहे, त्याला 2025 मध्ये पाकिस्तानात गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं.

तडाखेबंद फलंदाजीनं फक्त दीड वर्षातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारा हा खेळाडू म्हणजे अभिषेक शर्मा.

त्याच्याबद्दल फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे.

बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रऊफ यांच्यासारख्या दमदार पाकिस्तानी क्रिकेटपटूंनादेखील टॉप 10 मध्ये स्थान मिळालं नाही.

पाकिस्तानात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अभिषेक शर्मानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे क्रिकेटपटू हसन नवाज. त्यानंतर इरफान खान नियाजी, मग साहिबजादा फरहान आणि मोहम्मद अब्बास यांचा नंबर आहे.

अभिषेक शर्मानं 2025 मध्ये अनेक वादळी खेळी केल्या. यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत त्यानं 40.75 च्या सरासरीनं 163 धावा केल्या होत्या. त्यानं 161 च्या स्ट्राईक रेटनं धावा फटकावल्या होत्या. भारतानं ही मालिका 2-1 नं जिंकली होती.

याच वर्षी आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या विरोधात फक्त 39 चेंडूंमध्ये त्यानं 74 धावा फटकावत भारताला विजय मिळवून दिला होता. त्यावेळेस टी-20 क्रिकेटमधील उदयोन्मुख तारा म्हणून त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.

भारतानं फलंदाजीला सुरूवात करताच, पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रऊफची भारताच्या सलामीवीरांबरोबर जोरदार वादावादी झाली होती.

रऊफ आणि अभिषेक शर्मा यांच्या बाचाबाची झाली होती. त्यानंतर पंचाला हस्तक्षेप करावा लागला होता.

सलामीला येत अभिषेक शर्मानं भारतीय डावाची सुरूवात षटकारानं केली होती. त्यानंतर त्यानं तडाखेबंद फलंदाजी करत 39 चेंडूंमध्ये 74 धावा केल्या होत्या.

या खेळीत त्यानं 6 चौकार आणि 5 षटकार लगावले होते.

सामन्यानंतर अभिषेक शर्मा म्हणाला होता, "ज्याप्रकारे विनाकारण ते (पाकिस्तानी खेळाडू) आमच्याकडे येत होते, ते मला अजिबात आवडलं नाही. त्याच कारणामुळे मी अशी तुफानी फलंदाजी केली."

वडील झाले होते भावनिक

आशिया कपमध्ये जोरदार कामगिरी केल्यानंतर अभिषेक शर्मा याचे वडील राज कुमार शर्मा यांच्याशी बीबीसीचे प्रतिनिधी भरत शर्मा यांनी संवाद साधला होता.

त्यावेळेस राज कुमार शर्मा म्हणाले होते, "मी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलो आहे. मी माझ्या आईला सांगायचो की माझे सर्व सहकारी भारतासाठी खेळले, मात्र मी खेळू शकलो नाही. का खेळू शकलो, हे माहित नाही. कदाचित देवाची तशीच इच्छा होती."

"तेव्हा माझी आई म्हणायची की काही हरकत नाही. तू खेळू शकला नाहीस, तरी तुझा मुलगा भारतासाठी नक्की खेळेल."

अभिषेक शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अभिषेक शर्मानं 2025 मध्ये अनेक वादळी खेळी केल्या.

त्या दिवसांची आठवण काढताना राज कुमार शर्मा भावनिक होतात.

ते पुढे म्हणाले, "हा माझ्यासाठी खूप चांगला काळ आहे. माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की मुलगा असो की मुलगी, त्यांनी स्वत:च्या पायावर उभं राहावं. ज्या क्षेत्रात ते जातीत तिथे त्यांनी चांगली कामगिरी करावी."

"माझ्या मुलानं अनेक वर्षांपूर्वी बॅट हाती घेतली होती. त्यानं संघर्ष केला, खूप मेहनत केली. आज तो फक्त भारतासाठीच खेळत नाहिये, तर सामनादेखील जिंकून देतो आहे. हे पाहून मला अतिशय आनंद होतो आहे."

युवराज आणि सेहवाग यांच्या शैलीचा प्रभाव

क्रिकेटच्या जाणकारांना अभिषेकमध्ये वीरेंद्र सेहवागचा आक्रमकपणा आ���ि युवराज सिंहची आकर्षक शैली दिसते आहे.

अभिषेक शर्मावर देखील युवराज सिंहचा मोठा प्रभाव आहे. रणजी ट्रॉफीमुळे दोघांची भेट झाली.

पंजाब क्रिकेट असोसिएशनला वाटत होतं की अभिषेक आणि शुभमन यांना रणजीमध्ये संधी देण्यात यावी. त्यावेळेस युवराज सिंह त्याच्या आजारपणातून सावरून पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत होता आणि बीसीसीआयच्या सूचनेनुसार रणजी खेळू लागला होता.

युवराज सिंहला सांगण्यात आलं की अंडर 19 मधून दोन खेळाडू येत आहेत. त्याला सांगण्यात आलं की एक सलामीवीर फलंदाज आहे आणि दुसरा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे.

अभिषेक शर्मा

फोटो स्रोत, Matt Roberts - CA/Cricket Australia via Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अभिषेक शर्मानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे क्रिकेटपटू हसन नवाज.

राज कुमार शर्मा म्हणाले, "युवराज म्हणाला, मला फलंदाज हवा आहे, कारण माझ्याकडे गोलंदाज आहे. निवड समितीचे सदस्य म्हणाले की नाही, दोघांना संधी दिली पाहिजे. एका सामन्यात तीन-चार खेळाडू लवकर बाद झाले."

"युवराज फलंदाजी करत होता. तो म्हणाला की अभिषेकला फलंदाजीला पाठवा. मग तो आला आणि युवराज पाहतच राहिला. युवराज 40 धावांवर खेळत होता. अभिषेक आला आणि त्यांना तडाखेबंद 100 धावा केल्या."

शर्मा म्हणाले की युवराज सिंह मैदानावरच म्हणाला होता की अभिषेक शर्मा त्याच्याकडे प्रशिक्षण घेईल का, यावर अभिषेकनं उत्तर दिलं होतं की तो युवराजला त्याचा आदर्श, त्याचा देव मानतो. युवराजला पाहूनच तो खेळण्यास शिकला आहे. तेव्हापासून आजपर्यंत तोच अभिषेकला प्रशिक्षण देतो आहे.

अभिषेक शर्मा

फोटो स्रोत, CA/Cricket Australia via Getty Images

फोटो कॅप्शन, क्रिकेटच्या जाणकारांना अभिषेकमध्ये वीरेंद्र सेहवागचा आक्रमकपणा आणि युवराज सिंहची आकर्षक शैली दिसते आहे.

दोघांचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. अशाच एका व्हीडिओमध्ये युवराज सिंह अभिषेक शर्माला म्हणतो, 'तू ना सुधरी, बस छक्के मारी जाईं, थल्ले ना खेलीं.' म्हणजेच तू फक्त षटकारच ठोकत रहा. जमिनीवरचे शॉटदेखील खेळत जा.

अभिषेकचे वडील म्हणतात, "युवराज सिंहच त्याला प्रशिक्षण देतो आहे. तो माझ्या मुलाची पूर्ण काळजी घेतो. त्यानं माझ्या मुलाला मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या कणखर बनवलं आहे. त्यानं त्याची पूर्ण टीम अभिषेकसाठी नियुक्त केली आहे, जेणेकरून एक दिवसदेखील वाया जाता कामा नये."

"जर जागतिक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू प्रशिक्षण देत असेल, तर विचार करा की तो खेळाडू कुठपर्यंत मजल मारू शकतो. ही तर फक्त सुरूवात आहे!"

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)