'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग

शिल्पा कांबळे लिखित 'माझ्या बायकोचा रोबोट' नाटकाचे पोस्टर

फोटो स्रोत, Satish Manwar

फोटो कॅप्शन, शिल्पा कांबळे लिखित 'माझ्या बायकोचा रोबोट' नाटकाचे पोस्टर
    • Author, शिल्पा कांबळे
    • Role, लेखिका

'माझ्या बायकोचा रोबोट' हे माझं रंगमचांवर नुकतंच आलेलं नाटक बोल्ड विषयावरचं आहे, असे काहींना वाटते. नाटकात 'सेक्स टॉय' हा सनसनाटी विषय निवडून मी मोठे धाडस केलंय, असेही अनेकांना वाटू शकते.

कुणी असे समजेल की, प्रसिद्धीसाठी मी या झोनमध्ये शिरलेय. काही मातब्बर ग्रामीण साहित्यिकांना स्त्रीलेखिकांना हिणविण्यासाठी एक तोडांत चघळायचे च्युंगमही यानिमित्ताने मिळून जाईन. त्यांचा तर शहरी लेखिकांवर आक्षेप असतो की, यांना सेक्सशिवाय लिहायला दुसरा विषयच मिळत नाही.

पण माझ्यासाठी दुष्काळ, आत्महत्या, प्रेमभंग, धर्मिक दंगली,गरीबी, जात-वर्णव्यवस्था या विषयांइतकाच सेक्स हा विषयही महत्वाचा आहे.

सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पहावी असा प्रयत्न मी या नाटकाच्या निमित्ताने केला आहे.

नेहमीच हेटाळणीचा आणि टवाळकीचा विषय राहिलेले बायकांचे शरीर आणि त्या शरीराच्या सुखावर अवंलबून असणाऱ्या शाररीक मानसिक स्वास्थ्यावर त्यानिमित्ताने मला बोलायचे आहे.

माझ्या नाटकात अनेकदा एक वाक्य येते '....माझी आजी नेहमी सांगायची. नेहमी सांगायची.' उन्हाळे पावसाळे पाहिलेली आजी तिच्या नातीला काय सांगायची त्याचे उत्तर नाटकाच्या शेवटी येते.

पण ऐंशी किवां नव्वदीला पोहचलेल्या आजीबायांना मला कळकळून विचारायचे आहे, आज्जे तुझ्या या मोडक्या कण्याने उभ्या असणाऱ्या शरीराच्या झाडाला कधी पालवी फुटली होती का? कधी फुलं लागली होती कष्ट करून आखडलेल्या तुझ्या सांध्याना… तुझ्या फांद्यावरची फळं वेचायला राखणदार येतं असेल…

पण तुझ्या मुक्या वेलींना त्याच्या रखरखीत हातांनी कधी आंजारगोंजारल का? या बायकांनी त्यांच्या आयुष्यात मनासारखं लैंगिक सुख कधी अनुभवले असेल का? बायकोला तृप्त करायचे आहे हा विचार त्या काळच्या पुरूषांच्या मनाला शिवला असेल का?

काळाच्या प्रघातानुसार या बायकांची लग्न लहान वयातच झालेली असली तरी ही लग्न काही स्त्रियांना सुख मिळावे म्हणून व्हायची नाही.

महिला

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जुन्या काळातील लग्न म्हणजे घरकामाला चार हात असणारी दुर्गादेवी, शेतात बैलासारखी राबणारे दोन पायाचे जनावर, वशंसातत्य टिकविण्यासाठीची गर्भाशयाची पिशवी, देवधर्माचे पालन करणारी परंपरेला पुढे नेणारी सवाष्ण स्त्री.

त्यामुळे रस्त्यावर काठी टेकत चालणाऱ्या, पांढऱ्या भुरभुरणाऱ्या केसांच्या आजींबाईना मला विचारायचे आहे, 'रूक्मिणी रूक्मिणी शादी बाद क्या क्या हुँआ...कौन जीता कौन हारा, खिडकीमेंसे देखो जरा' हा 'रोजा' या सिनेमातील खट्याळ म्हाताऱ्यांना पडलेला प्रश्न नेमका या बायांना विचारला तर काय उत्तर मिळेल?

म्हणजे शरीरसुखाचा आनंद घेतांना नवरा हरला की बायको जिंकली हा जयपराजयाचा प्रश्नात मला इंटरेस्ट नाहीये तर संसाराच्या रहाटगाड्यात शृंगाराचा आनंद घेण्याइतका एकांत त्या नवरा-बायकोंच्या नशिबी होता का? हा प्रश्न मला विचारायचा आहे.

शाररीक संबधातून मिळणारा उत्कट आनंद अनुभवायची संधी समाजव्यवस्थेने कालच्या स्त्रियांना दिली होती का? या प्रश्नाच्या उत्तरातच आजच्या उद्याच्या स्त्रियांना हे सुख मिळणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे.

खूप वर्षापूर्वी एक बाई मला म्हणाली होती, काय गं या आताच्या लग्न झालेल्या पोरींच्या छात्या. आमच्या वेळेला हे असे सगळे चालायचे नाही. म्हणजे पुरूषाच्या स्पर्शसुखाला आम्हीं प्रतिसाद द्यायचो नाही असे तिला सुचवायचे असायचे.

मजाक मस्ती, फोरप्ले, आलिंगन वगैरे सगळे छूट. अंधारात, घुशी झुरळ असलेल्या घरातील एखाद्या कोपऱ्यात शाररीक सबंध झटपट उरकून टाकायचे. ते पण मालकाला वाटेल तेव्हां त्यांच्या मर्जीने. सुख असते ते फक्त मालकाचे. त्यांच्या इच्छेसाठी आपले शरीर वापरू द्यायचे. मालक म्हणजे कुंकवाचा धनी आणि त्या कुंकवाच्या धन्याचे आपण चाकर.

जुन्या मराठी सिनेमात नायिकेचे मरणशय्येवर असतांनाही नवऱ्याला मला कुंकू लावा असे म्हणायचे ते म्हणूनच. तर आता ब्लँक अँन्ड व्हाँईटचा जमाना गेला.

काळ बदलला पण माणसे बदलली का? कालच्या स्त्रीला स्वतःच्या शरीरसुखाची जाणीव नव्हती आजच्या स्त्रीला तरी ते जाणीव आहे का? आणि जाणीव झाली तरी ते मिळवू शकण्याचे ती सामर्थ्य ठेवते का? कारण कोणत्याच काळात स्त्रियांचा त्यांच्या शरीरावर हक्क नसतो. बाईच्या शरीराविरूद्ध सतत एक राजकारण चाललेले असते.

बाईने जातीत आपल्या धर्मात लग्न करावे. त्या लग्नात उदारतेने तडजोडी करत सुखी रहावे. त्या सुखाच्या व्हॉट्सअप, फेसबुकवर पोस्टी टाकाव्यात. नवीन नवीन महागडे कपडे घ्यावे. दागिने घालून या शरीराला सजवावे,नटवावे. या खरेदी-विक्रीमधून मार्केट इकोनॉमीमध्ये पैसा खेळता रहावा.

पण बाईच्या या शरीरात चंद्राच्या कलांनुसार येणाऱ्या भरती आहोटी येत असतात त्याचे काय करावे? कसे शांत करावे शरीराच्या आगीला? याचे उत्तर कोणत्याही धार्मिक ग्रंथात नाही.

लेखिका शिल्पा कांबळे

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

फोटो कॅप्शन, लेखिका शिल्पा कांबळे

शारीरिक उर्मींच्या दमनासाठी व्यवस्थेकडे नियम, प्रार्थना, खतना बुरखे आहेत. जुन्या काळात विधवा बायका रात्री उठूनही थंड पाण��याने आंघोळ करत. ते नेमक्या या शरीराच्या आगीला थंड करण्यासाठीच ना.

माझ्या नात्यातल्या एका विधवा बाईला पुन्हा लग्न करायची इच्छा होती. तरूण वयात आलेला मुलगा आईला दुसऱ्या लग्नासाठी विरोध करत होता. तेव्हा आईने त्याला सांगितले, चामडी जळते ना तेव्हा काय होते ते तुला आताच कळणार नाही.

तिचे जळजळीत शब्द खरेच होते. हो....चामडीच जळते. दुर्गंधच सुटतो. शरीरसुखाला मुकलेल्या स्त्रीच्या शरीराचा ऱ्हास होतो.

आपल्याला काय हवंय, हे हेच बायकांना नीटसं माहीत नसतं. माहीत असलं तर ते सांगण्याची हिमंत ते त्यांच्या नवऱ्याकडे करू शकत नाहीत.

'द ग्रेट इंडियन किचन' या मल्याळी चित्रपटात एक सीन आहे. तरूण बायको आपल्याला नवऱ्याला बिचकत सांगतेय, मला थोडं फोरप्ले कराल का, डायरेक्ट सेक्स करतांना त्रास होतो. नवरा तिच्याकडे काय चवचाल बायको आहे अशा नजरेने पाहतो. बहुतेक मुलींचा सेक्समधील इंटरेस्ट जातो तो असा.

शिल्पा कांबळे लिखित 'माझ्या बायकोचा रोबोट' नाटकाचे पोस्टर

फोटो स्रोत, Satish Manwar

फोटो कॅप्शन, शिल्पा कांबळे लिखित 'माझ्या बायकोचा रोबोट' नाटकाचे पोस्टर

आपल्याला काय हवंय हे सांगायला धाडस लागतं, तर काय नकोय हे सांगायला त्यापेक्षा प्रचंड धाडस लागतं.

मागे पेपरमध्ये वाचलेला प्रसंग सांगते. नवीन लग्न झालेल्या मुली नांदायला घरीच जात नव्हत्या. पालकांनी खूप विचारणा केली, तरी त्या खरं कारण सांगत नव्हत्या. खूप दबावानंतर त्यांनी घरातल्यापाशी मन मोकळं केलं. नवरा त्यांना पोनोग्राफी बघून त्याप्रकारचा सेक्स करायला भाग पाडत होता. इंटरनेटने जग खुलं झालय ते अस्स.

आदिम कामप्रेरणेचे रोखठोक चित्रण करणारी पोनोग्राफी पुरूषांना उत्तेजीत करण्यासाठी बनवलेली असते. यात स्त्रिला फुलवणारा रोमान्स येवूच शकत नाही. बायकांना शृंगार करायला आवडतो. त्यांच्या सौदर्यांची पार्टनरने स्तुती करावी असे वाटते.

नजरानजर, स्पर्शसुख, शब्दातील उत्तेजना, काळजीने पाठीवरून फिरवलेला हात, घट्ट मारलेली मिठी, चुंबनाचे अत्तर... या सगळ्या सोपांनाना पार करून उत्तेजीत झालेल्या शरीराला उत्कट आवेग हवा असतो. त्याला म्हणतात 'पी फॉर प्लेझर'. आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात.

माझी एक मैत्रीण आहे. नोकरी करणारी, पण गृहदक्ष संसारीही. तिच्या लग्नाला पंचवीस वर्ष झालीत. नवरा लग्नांनतर लगेच म्हणाला, घरच्यांच्या आग्रहामुळे तुझ्याबरोबर लग्न केले. मला दुसरीच मुलगी आवडत होती. आता तुझ्याबरोबर शरीरसंबध नाही करणार.

त्यांना मूल झाले ते तिने नवऱ्याला जबरदस्तीने कधीतरी संबध ठेवायाला भाग पाडले म्हणून. त्या दोघांचे लग्न चालू आहे, पण त्या लग्नात प्लेझर नाही. या स्त्रीच्या नैसर्गिक उर्मीवर त्या नवऱ्याने, त्या नवऱ्याला जबरदस्तीने लग्न लावणाऱ्या कुटुंबाने, म्हणजे समाजानेच किती अन्याय केलाय ना.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

वर्षानुवर्षै हा शरीरसुखाला वंचित राहणाऱ्या या मैत्रीणीसारख्या अनेक स्त्रियांची उपासमार होत असते. त्या डिप्रॉयवेशनमधून मग रक्तदाब, जॉईन्टपेन, डिप्रेशन यांसारखे आजार बायकांना उद्भवतात.

पण नाजूक जागेचे हे दुखणे डॉक्टरांना सांगणार तरी कोण? (नाटक मला तेव्हांच सुचले होते जेव्हा 'नाजूक जागेचे दुखणे' हा शब्द सूचला होता.)

तर स्वतःच्या मालकीचा हा 'पी फॉर प्लेझर' मिळविण्यासाठी बायकांना पॉवरफुल होणे गरजेचे आहे. हे पॉवरफुल होणे म्हणजे कोणतीही गिल्ट न बाळगता स्वतःचा विनाअट स्वीकार करणे.

मी घटस्फोटिता आहे तर आहे, माझे लग्नाआधी प्रियकर होते तर होते. मी विवाहबाह्य संबध ठेवते तर ठेवते. मी ट्रान्सवुमन आहे तर आहे. मी लेस्बियन आहे तर आहे. आणि मला सेक्स आवडत नाही तर नाही. स्वतःवर कसलेच कंपलशन ठेवायचे नाही.

आपल्या शरीराचा रिमोट कंट्रोल कुणाच्याच हातात द्यायचा नाही. आणि ही पॉवर मिळविण्याच्या प्रयत्नात विवाहव्यवस्थेला हादरे बसण्याची शक्यता आहे.

नुकतीच नांदेडमध्ये एकोणीस वर्षाच्या विवाहीत मुलीला तिच्या बापानेच प्रियकरासकट मारून टाकलं. मारण्याआधी त्या मुलीला नको त्या अवस्थेत पाहिल्याने सासरच्यांनी तिची संपूर्ण गावात धिंड काढली होती.

तर ही आहे भारतीय समाजाची माँरेलिटी आणि लिचींग मानसिकता.बायकांना समाजाच्या या मानसिकतेविरूद्ध पंगा घ्यायचा आहे.

समाजाला स्त्रीपुरूषांना लग्नाच्या पिंजऱ्यात कोबांयचे असते. या पिंजऱ्यात जितके आनंदी राहता येईन तितके दोघांनी रहावे. पोरबाळ पैदा करावी. धनसंपत्ती गोळा करावी.

त्यातच यात्रा, पिकनीक, फाँरेन टूर, सणसमारंभाचे सेलिब्रेशन आले. पण सेक्सबद्दल बोलायचं नाही. अळीमिळी गुपचूप. जमेल तितकं या विषयाला कोपऱ्यात ढकलायचं.

आपल्या समाजात केवळ स्त्रिच्या नाही तर पुरूषाच्याही सेक्शुलिटीला लग्नाच्या पिंजऱ्यात बंद केलं जातं. शरीरभान असणारी सहचरणी आजूबाजूला नसेन तर पुरूष अधिकाधिक हिंसक होवू शकतो. शारीरप्रेम हे आपण समजतो त्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे.

माझ्या नाटकातील पुरूष कामसुखाला नाकारणारा आणि जगात चालणाऱ्या युद्धांमध्ये रममाण होणारा आहे. त्यातच त्याला सँडेस्टिक प्लेझर मिळत असते. युद्धग्रस्त मानसिकतेमुळे तो निकोप कामजीवन अनुभवूच शकत नसतो.

बायकोसारखाच तो ही आजारी असतो, पण त्याला त्याची जाणीव नसते. स्त्रिच्या 'पी फाँर प्लेझर'मध्ये सगळ्या समाजाचे 'पी फॉर पीस' साठलेले आहे हे आता आपल्याला कळायला हवे.

हे वाचून डोक्यात जरा गोंधळ झालाय असे वाटतेय ना! ओके, मग कल्पना करा. भारतात 'फ्लिबँग 3' तयार होते. फ्लिबँग अमेझॉनवरची एक सिरीज आहे. सिरीजची नायिका एक चुका करणारी मुलगी आहे. ती मुलगी, तिची सावत्र आई, अपघातात दगावलेली बेस्ट फ्रेंड,लग्नात अडकलेली तिची बहिण, नायिकेचे रिकामे आयुष्य, त्यातील भकासपणा दूर करण्यासाठी तिने सेक्सचा घेतलेला आधार, त्यामुळे आय़ुष्यात आलेले पुरूष, चर्चमधील फादरच्या प्रेमात पडलेली ती अशी सगळी गोळाबेरीज तिच्या गोष्टीत आहेत.

कल्पना करा की, 'फ्लिबँग 3' ही सिरीज भारतातील बाईला प्रोटोगोनिस्ट करून लिहीली गेलीय. 'पी फॉर प्रोटॉगोनिस्ट'. आयुष्यात चुका करण्याचे स्वातंत्र्य असणारी प्रोटोगोनिस्ट. आपल्या आयुष्य आपल्या हातात. हीच खरी पॉवर आहे. हेच खरं प्लेझर आहे. हेच खरं स्वांतत्र्य आहे.

(शिल्पा कांबळे या मराठीतील प्रसिद्ध लेखिका आहेत. तसंच, 'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाचं लेखनही त्यांनी केलंय. या लेखातील मतं त्यांची वैयक्तिक आहेत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन