'11 वर्षांचं प्रेम, पण लोकांना फक्त आमचा रंग दिसला'; सोशल मीडियावरील व्हायरल व्हीडिओची खरी गोष्ट काय आहे?

11 वर्षांच्या प्रेमावर ट्रोलिंगची सावली, ट्रोल करणारे या जोडप्याच्या 'रंगावरच' का अडकले?

फोटो स्रोत, Rishabh and Sonali's family

    • Author, विष्णूकांत तिवारी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

जबलपूरच्या एका आळसावलेल्या आणि शांत दुपारी, आपल्या घराच्या सोफ्यावर बसलेले ऋषभ राजपूत आणि सोनाली चौकसे वारंवार एकच व्हीडिओ पाहत बसले होते. त्यांच्या लग्नानंतर काहीच दिवसांत ते देशभरात ऑनलाइन चर्चेचा विषय झाले होते. यासाठी तोच व्हीडिओ कारणीभूत ठरला होता.

23 नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाचा 30 सेकंदांचा व्हीडिओ ऋषभच्या बहिणीने रेकॉर्ड केला होता.

दोन दिवसांनी हा व्हीडिओ इतका व्हायरल झाला की तो असंख्य व्हॉट्सॲप ग्रुपपासून मीम पेजपर्यंत सर्वत्र पसरला होता.

व्हायरल होत असलेल्या व्हीडिओच्या मेसेजेसमध्ये लग्नाच्या शुभेच्छा नव्हत्या, तर ऋषभ आणि सोनालीच्या त्वचेच्या रंगावर टिप्पण्या केलेल्या होत्या, दोघांना ट्रोल केले जात होते.

इकडे ऋषभ आणि त्यांचे कुटुंब या सगळ्यापासून अनभिज्ञ, लग्नानंतरच्या विधींमध्ये व्यग्र होते. ऋषभ सांगतात की एका विधीच्यावेळेस शेजारच्या एका काकूंनी येऊन त्यांच्या आईला सांगितले, "तुमच्या मुलाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे आणि मीम्सही केले जात आहेत."

ऋषभ म्हणाले, "आम्हाला तर आधी ही गोष्ट विनोदी वाटली. ठीक आहे, काही लोकांनी शेअर केला असेल. पण जेव्हा मोबाईल उघडून पाहिले तेव्हा क्षणभर धक्काच बसला."

घरच्यांनीही सांगितले की, स्क्रीनवर दिसणाऱ्या कमेंट्सनी वातावरण अचानक बदलले.

सोनाली म्हणते, "त्या व्हीडिओत दोघांच्याही (म्हणजे आमच्या) चेहऱ्यावरचा आनंद ठळकपणे दिसत होता. मात्र, आमचा आनंद ऑनलाइन असलेल्या लोकांना दिसला नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या आभासी जगात आम्ही 11 वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न, आमचे प्रेम कुठेतरी गायब झाले. लक्ष फक्त आमच्या त्वचेच्या रंगावरच केंद्रित झाले."

कमेंट्समध्ये सोनाली आणि ऋषभला 'विजोड' म्हणवलं गेलं. कुणीतरी लिहिले होते की वर काळा आहे आणि वधू गोरी, म्हणून लग्न 'विचित्र' दिसत आहे.

ऋषभ सांगतात, "आमच्या त्वचेचा रंग हा चर्चेचा मुद्दा होईल असं आजूबाजूला कोणालाही बोलताना आम्ही ऐकलं नव्हतं.

"सोशल मीडियावर लोकांची विचारसरणी पाहून आम्हाला पहिल्यांदाच समजले की इंटरनेटचे जग किती वरवरचे असू शकते. आम्ही ज्या क्षणासाठी 11 वर्षं वाट पाहिली होती, त्याचा लोकांनी विनोद करुन टाकला."

सोशल मीडियावर सुरू झाले कयास

पण रंगावर आलेल्या कमेंट्सची सुरुवात ही फक्त पहिली पायरी होती.

यानंतर सोशल मीडियावर लोक ऋषभबद्दल वेगवेगळे कयास लावू लागले आणि टोमणे मारू लागले. कुणीतरी लिहिले की 'तो खूप श्रीमंत असेल', काहींनी दावा केला की 'त्याच्याकडे 5 पेट्रोल पंप आहेत' किंवा 'तो एखाद्या मंत्र्याचा मुलगा आहे.'

काही लोकांनी तर इतकेही म्हटले की सोनालीने 'सरकारी नोकरी पाहून'च ऋषभशी लग्न केले आहे.

सोनाली आणि ऋषभ ग्रॅज्युएट आहेत आणि दोघेही खाजगी क्षेत्रात नोकरी करतात.

11 वर्षांच्या प्रेमावर ट्रोलिंगची सावली, ट्रोल करणारे या जोडप्याच्या 'रंगावरच' का अडकले?

फोटो स्रोत, Rishabh and Sonali's family

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सोनाली म्हणते, "आम्ही दोघे खूप पॉझिटिव्ह आहोत पण मला 'गोल्ड डिगर' म्हटले गेले आणि लोक लिहित होते की कदाचित मी नाईलाजामुळे लग्न केले आहे. हे सगळे ऐकून आमचे कुटुंबीय खूप त्रस्त झाले होते."

ऋषभ म्हणतात, "देशभरात पसरलेल्या अनोळखी लोकांनी आमचे खास क्षण उघडपणे विनोदाचा विषय बनवले. आणि या दरम्यान देशाची रंगभेदाची मानसिकता सहजपणे उघड झाली."

ऋषभ म्हणतात, "माझ्यापुरतं ठीक होतं, पण लोकांनी माझ्या कुटुंबालाही लक्ष्य करायला सुरुवात केली. ही सर्वात जास्त टोचणारी गोष्ट होती. व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हीडिओमध्ये माझी आई, बहिणी आणि नातेवाईकही दिसत होते आणि त्यांच्यावरही भडक कमेंट्स केल्या जात होत्या."

सोनाली म्हणते, "जे लोक ट्रोल करत होते त्यांच्यासाठी हे फक्त काही व्ह्यूज मिळवण्याचे साधन होते. पण यामुळे अनेक लोकांचे जीवन आणि आमच्या खासगी आयुष्यावर त्याचा परिणाम झाला."

ती सांगते की व्हायरल व्हीडिओमागे असलेल्या '11 वर्षांच्या प्रेमाकडे दुर्लक्ष केले गेले.'

व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर जी कहाणी लोकांपर्यंत पोहोचली, तो खऱ्या कहाणीचा अत्यंत छोटा आणि वरवरचा भाग होता.

कशी झाली भेट?

ऋषभ सांगतात की, सोनाली आणि त्यांची भेट 2014 मध्ये कॉलेजमध्ये झाली होती.

"2015 मध्ये मी सोनालीला प्रपोज केले आणि दहा दिवसांनी तिने होकार दिला. लग्न करायचं आम्ही तेव्हाच ठरवलं होतं. हा व्हायरल झालेला व्हीडिओ फक्त तीस सेकंदांचा नाही, तर 11 वर्षांच्या आमच्या प्रवासाचा परिपाक आहे. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आम्ही 11 वर्षे मेहनत केलीय."

या नात्याची पायाभरणी रंगावर नाही, तर एकमेकांच्या गुणांवर आणि आदरावर झाली आहे.

ऋषभ सांगतात की सोनालीची विनम्रता, तिची मेहनत आणि जीवनाबद्दलची गंभीरता यांसारख्या गुणांमुळे ते तिच्याकडे आकर्षित झाले.

तर सोनाली सांगते, "समोरचा त्यांना कसा वागवतो, किती आदर देतो आणि त्यांच्या आयुष्यात किती जागा देतो यावर नातं ठरत असतं."

सोनाली म्हणते, "या नात्यात माझा कोणताही नाईलाज नव्हता किंवा कोणता दिखाऊपणाही नव्हता. हा माझा स्वतःचा निर्णय होता. आणि मी या निर्णयाने खूप आनंदी आहे."

'रंगावरुन भेदभाव करणारा समाज'

इंटरनेटवर सर्वाधिक चर्चा रंगभेदाचीच झाली. भारताच्या सामाजिक रचनेत दीर्घकाळापासून असलेला हा पक्षपात यावेळी डिजिटल जगातही तितक्याच ताकदीने दिसून आला.

ऋषभ म्हणतात, "भारतासारख्या विविध देशात, जिथे 70 ते 80 टक्के लोक काळे आहेत, तिथे आजही गोऱ्या रंगाला चांगले मानले जाणे दुःखद आहे. फक्त रंग पाहून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, चांगुलपणा किंवा वर्तन ठरवता येईल?"

सोनाली म्हणते, "अनेकदा लोक हे गृहीत धरतात की गोरा माणूस चांगला असेल, आणि काळा माणूस कमी दर्जाचा. पण नात्यामध्ये त्या व्यक्तीचं मन, वागणं आणि त्यांच्या वागण्यामागे असलेला हेतू जास्त महत्त्वाचा असतो ."

'रंगावरुन भेदभाव करणारा समाज'

फोटो स्रोत, Rishabh and Sonali's family

सोनाली म्हणते, "मी हे समजूच शकत नव्हते की, लोक आमच्या रंगावर इतके का अडकून पडले आहेत. भारतात वेगवेगळे हवामान आहे, वेगवेगळे रंग आहेत, तर हे स्वीकारणे इतके कठीण का आहे? जर एखादा गोरा मुलगा उद्धटपणा करतो, गुन्हा करतो, तर आपण त्याला फक्त त्वचेचा रंग पाहून चांगला मानणार का? खरंच फक्त रंग एखाद्या माणसाचा चांगुलपणा-वाईटपणा ठरवू शकतो का?"

ऋषभ आणि सोनाली दोघेही एकमेकांकडे पाहत म्हणतात, या घटनांनी थोडं अस्वस्थ वाटतंच पण आम्ही नेहमीच एकमेकांना आधार दिला आहे. आम्ही एकमेकांची सपोर्ट सिस्टिम आहोत.

सोनाली मध्येच शांत होते. काही वेळाने म्हणते, "आमच्या कुटुंबात कधी काही अडचण आली नाही. थोडंफार समजावल्यावर सर्वांनी त्याला होकार दिला होता. आम्ही पहिल्या दिवसापासून आमच्या लग्नाबद्दल विचार केला होता. आणि आम्ही अगदी लहानलहान बचती करून, एकमेकांच्या सुख-दुःखात उभे राहून या दिवसाचे आणि पुढच्या आयुष्याचे स्वप्न रंगवले होते आणि आम्ही तेच स्वप्न जगत आहोत."

ऋषभ सोनालीकडे पाहत राहतात, मग ते म्हणतात, "कदाचित ट्रोलिंगवाल्यांकडे आमच्याकडे असलेली गोष्ट नसावी. माझ्याकडे सोनाली आहे, आणि सोनालीकडे मी आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)