धुरंधरमधलं अक्षय खन्नाच्या एन्ट्रीचं अरेबिक गाणं व्हायरल; या गाण्याची आणि गायकाची गोष्ट

फोटो स्रोत, FB/JIOSTUDIO
'यखी दूस दू इंदी फसला... यखी तफ्फवूज़ तफ्फवूज़ वल्लाह ख़ोश रक़्सा' या अरेबिक गाण्यानं सध्या सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
'धुरंधर' या चित्रपटातील हे गाणं आणि ज्याच्यावर हे गाणं चित्रित केलं आहे तो अक्षय खन्ना सध्या ट्रेडिंग आहेत.
'धुरंधर' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. पण सर्वात जास्त लोक अक्षय खन्नाच्या 'रहमान डकैत' या पात्राबद्दल बोलताना दिसत आहेत.
अक्षय खन्नाने यापूर्वी अनेक चित्रपट केले आहेत. त्याच्या अभिनय कौशल्याचं खूप कौतुक केलं जातं. 'छावा'मधील औरंगजेबाचं पात्र असो किंवा 'दृश्यम-2'मध्ये आयजी तरुण अहलावत असो, प्रत्येक भूमिकेत त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
'रहमान डकैत'च्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नासोबतच, चित्रपटाच्या एका सीनमध्ये बलोच नेत्याला भेटीच्या वेळीचं गाणं (एंट्री साँग) सध्या खूप खूप चर्चेत आहे.
या गाण्याने सोशल मीडियावर कमाल केली आहे. हे गाणं सर्वांनाच आवडलं आहे आणि लोक त्याच्या स्टेप्स करून रील्स बनवत आहेत.
महत्त्वाचं म्हणजे यात फक्त सामान्य लोकच नव्हे तर सायना नेहवाल असो किंवा भारतातील इतर सेलिब्रेटी, सर्वचजण या स्टेप्स करताना दिसत आहेत.
हे गाणं आहे- FA9LA किंवा फसला. याचा गायक आहे बहरीनचा रॅपर फ्लिपराची.
आज आम्ही तुम्हाला या गाण्याबद्दलच सांगणार आहोत.
गाण्याचा अर्थ काय आहे?
खलनायक रहमान डकैतची भूमिका करणारा अक्षय खन्ना एका सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जातो तेव्हा ते गाणं चित्रपटात आलं आहे.
गाण्याची धून (ट्यून) आणि शब्दांसह अक्षय खन्ना यात नाचताना दिसत आहे. या सीनचे अनेक रील्स लोक सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि धूनसोबत स्वतःच्या रील्स बनवत आहेत.
हे गाणं सध्या 'धुरंधर' चित्रपटामुळे चर्चेत आलं असलं, तरी हे एक वर्ष जुनं गाणं आहे. फ्लिपराचीच्या यूट्यूब चॅनेलवर हे गाणं जून 2024 मध्ये अपलोड करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, JIO/YT/TRAILER GRAB
हे गाणं फ्लिपराचीने स्वतः लिहिलं आणि 'डीजे आउटलॉ' ने मिक्स केलं होतं. मंगळवारी (9 डिसेंबर) सायंकाळपर्यंत या गाण्याला तब्बल 81 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
सर्वप्रथम या गाण्याच्या शब्दांशी साधर्म्य असलेलं भाषांतर किंवा अर्थ जाणून घ्या. लक्षात घ्या, हा शब्दशः अनुवाद नाही. गाण्याचा मूड पार्टीत मजा करण्याचा आहे.
हे गाणं अरेबिक भाषेतील आहे आणि त्याचा लहेजा किंवा उच्चार हे बहरीनी आहे.
गाण्याचे बोल असे आहेत:
यखी दूस दू इंदी फसला... यखी तफ्फवूज़ तफ्फवूज़ वल्लाह ख़ोश रक़्सा
म्हणजेच
भाई, आनंदाने नाच... माझ्याकडे भारी मूव्ह्ज आहेत.
भाई, तू नक्की जिंकणार! खरंच… चल मजा घेत नाचूया.
माझ्याकडे तुझ्यासाठी एक धमाकेदार डान्स आहे, हबीबी…
माझ्याकडे खूप पैसा आहे, मजाच मजा आहे
माझ्याकडे पैसाच पैसा आहे, पण वल्लाह डान्स कमाल आहे
माझ्याकडे प्रेमाने भरलेला एक जबरदस्त डान्स आहे
त्याचं नाव सुब्हा आहे, त्याचं सौंदर्य नशीबाने दिलेली देणगी आहे
हात पुढे कर, मी तुझा हात हातात घेतो
जेव्हा मी तुला फिरवतो तेव्हा संपूर्ण शरीर थरथरतं
मला फ्रेंच डान्स दाखव
आणखी थोडा जोश दाखव, माझ्याकडे पूर्ण स्टाइल आहे
हे आमचं काम आहे, आम्हाला ते चांगलं जमतं
ती प्रत्येक गोष्टीत गुंतलेली असते, ती मला आवडते
मधुर हृदय, धमाल डान्स
मला आणखी एक राऊंड दे
चल, कारला बेसवर नाचवूया
चल, मला दुसरा डान्स करायला सांग
स्ट्रीट डान्स - ना सात, ना आठ
माझ्याकडे खूप पैसा आहे, मजाच मजा आहे
माझ्याकडे पैसाच पैसा आहे, पण वल्लाह डान्स कमाल आहे
गायक फ्लिपराची कोण आहे?
या गाण्याचा गायक फ्लिपराची कोण आहे?
फ्लिपराचीचं खरं नाव ��ुसैम असीम आहे. अरब जगतातील हिप हॉप संगीतातील हे एक मोठं नाव आहे.
फ्लिपराचीने मंगळवारी (9 डिसेंबर) इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. त्यात त्यानं, "हे गाणं भारतात नंबर-1 ट्रॅक बनवल्याबद्दल धन्यवाद. लव यू इंडिया," असं म्हटलं आहे.
लास्ट एफएम वेबसाइटनुसार, फ्लिपराचीने वयाच्या 12 व्या वर्षी गायला सुरूवात केली.
या वेबसाइटवर फ्लिपराचीनं सांगितलं की, "मला खरा हिप हॉपचा अनुभव 1988 मध्ये मिळाला. मी 2003 पासून माझं संगीत तयार करायला सुरुवात केली. जे काही शब्द माझ्या डोक्यात आले आणि ज्यांचा अर्थ चांगला होता, मी त्यांचा वापर करू लागलो."
लास्ट एफएम वेबसाइटनुसार, 2008 मध्ये फ्लिपराचीची भेट डीजे आउटलॉशी झाली आणि दोघांनी एकत्र काम करायला सुरूवात केली.

फोटो स्रोत, INSTAGRAM/flipperachay
शाश्वत सचदेव हे 'धुरंधर' चित्रपटाचे संगीतकार आहेत. चित्रपटातील अनेक गाणी, ट्रेलर आणि सीन्स चर्चेत आहेत.
संगीतकार रोशन यांचा 1960 मध्ये आलेला 'बरसात की रात' या चित्रपटातील एक कव्वाली 'धुरंधर' चित्रपटात वापरण्यात आली आहे.
साहिर लुधियानिवी लिखित 'ना तो कारवां की तलाश है...' ही कव्वाली 'धुरंधर'मध्ये रीमिक्स करून वापरली गेली आहे.
एंट्री साँगची चर्चा
एखाद्या एंट्री साँगमुळे एखादा अभिनेता चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही.
याआधी 'अॅनिमल' चित्रपटातील 'जमाल कुदु' या एंट्री साँगमुळे बॉबी देओल देखील व्हायरल झाला होता.
हे एक पर्शियन गाणं होतं. याचा या चित्रपटात वापर करण्यात आला होता.

फोटो स्रोत, TSERIES/SCREEN GRAB
बॉबी देओलची या गाण्यातील एंट्री आणि त्याच्या डान्स स्टेप्समुळे चर्चेत आला होता.
आदित्य धरचा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या मते, सुरुवातीच्या चार दिवसांत 'धुरंधर'ने 130 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
या चित्रपटात रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, माधवन आणि संजय दत्त सारख्या दिग्गज कलाकारांनी काम केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











