जसवीन सांघा : कोट्यधीश कुटुंबातील मुलगी ड्रग्ज माफिया कशी बनली?

फोटो स्रोत, Courtesy of Zanc
वरवर पाहिलं तर तिच्याकडे सगळं काही आहे असं वाटायचं. ती एका श्रीमंत कुटुंबात वाढली होती. तिनं शिक्षणही चांगलं होतं. मित्रपरिवारही मोठा होता. पण जसवीन सांघाचं एक रहस्य होतं, आणि संघानं हे रहस्य आपल्या खुप जवळच्या मित्रांपासूनही लपवल्याचं त्यांचे मित्र सांगतात.
जस्वीन सांघा ही एक ब्रिटिश-अमेरिकन नागरिक आहे, ती हॉलिवूडमधील श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांना ड्रग्जचा पुरवठा करत होती. ती कोकेन, झॅनॅक्स, बनावट अॅडेलरॉल गोळ्या आणि केटामाईन सारख्या ड्रग्जचं 'स्टॅश हाऊस' चालवत होती.
पण जेव्हा तिनं केटामाईनच्या 50 बाटल्यांचा पुरवठा केल्यानुळे मॅथ्यू पेरीचा मृत्यू झाला तेव्हा मात्र तिच्या या व्यवसायाबद्दलचा आणि त्याबरोबर मिळणाऱ्या आकर्षक आयुष्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. मॅथ्यू पेरी हा सिटकॉम फ्रेंडसचा प्रसिद्ध अभिनेता होता.
2023 मध्ये मॅथ्यू पेरीच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला होता, त्यात या डोसचादेखील समावेश होता.
पेरीच्या मृत्यूशी संबंधित गुन्ह्यांसाठी दोन डॉक्टरांसह दोषी ठरलेल्या पाच लोकांपैकी सांघासुद्धा एक आहे.
फेब्रुवारीमध्ये सांघाला या प्रकरणातील शेवटची आरोपी म्हणून शिक्षा सुनावली जाईल, तिच्यामुळे लॉस एंजेलिसमधील भूमिगत केटामाईन ड्रग्ज नेटवर्कचा शोध लागला होता. तिला फेडरल तुरुंगात जास्तीत जास्त 65 वर्षांची शिक्षा भोगावी लागेल.
'सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची प्रतिमा कायम ठेवली'
पेरीच्या मृत्यूच्या वेळी ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनच्या लॉस एंजेलिस कार्यालयाचे स्पेशल एजंट इनचार्ज बिल बोडनर यांनी बीबीसीला सांगितलं की, "सांघा ही एक सुशिक्षित महिला होती. तिनं ड्रग्जची तस्करी करून कमावण्याचा निर्णय घेतला आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून आपली प्रतिमा कायम ठेवण्यासाठी या पैशाचा वापर केला."
बिल बोडनर सांगतात की, "सांघा हॉलिवूडच्या श्रीमंत लोकांच्या गरजा भागवणारं एक मोठं ड्रग्ज तस्करीचं जाळं चालवत होती."
त्यांनी सांगितलं की पेरी नैराश्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी कायदेशीररित्या लिहून दिलेल्या प्रमाणात केटामाईन घेत होता, परंतु नंतर तो डॉक्टरांनी दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात केटामाईन मागू लागला.

फेडरल तपासणीतील कोर्टाच्या कागदपत्रांवरून असं दिसून आलं आहे की या इच्छेमुळे त्यांना अनेक डॉक्टरांकडं जावं लागलं आणि नंतर एका विक्रेत्याकडं गेले. हा विक्रेता मध्यस्थाचा वापर करून सांघाकडून औषधं घेत होता.
तिचे वकील मार्क गेरागोस म्हणतात की सांघा याची जबाबदारी घेत आहे, परंतु तिला पेरीबद्दल कोणतीही माहिती नव्हती, असं तिचं म्हणणं आहे.
मॅथ्यू पेरी दीर्घकाळ चालणाऱ्या सिटकॉम फ्रेंड्समध्ये चँडलर बिंगची भूमिका केल्यामुळे प्रसिद्ध होते.
सांघाच्या विनवणीनंतर, तिचे वकील गेरागोस पत्रकारांना म्हणाले, "सांघाला खूप वाईट वाटतंय, तिला पहिल्या दिवसापासून खूप वाईट वाटतंय."
गेरागोस पुढे म्हणाले की, "तिच्यासाठी हा एक भयानक अनुभव आहे."
पण सांघा दुहेरी जीवन कशी जगत होती?
पेरीच्या मृत्यूच्या काही आठवड्यांपूर्वी, सांघानं तिचा जुना मित्र टोनी मार्केझला फोनवरून संपर्क केला होता.
टोनी मार्केझ आणि सांघाशी संबंधित इतर काही जणांनी बीबीसी आणि सा��रकर्ते अंबर हक यांच्याशी चर्चा केली, जे आयप्लेअरवर येणाऱ्या माहितीपटाचा भाग आहेत.
या माहितीपटात पेरीच्या मृत्यूच्या परिस्थितीसंदर्भात तपासणी केली आहे. जगभरात 'केटामाईन क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसवीन सांघाबद्दल तिचे मित्र पहिल्यांदाच उघडपणे बोलले आहेत.

'खासगी जेटनं जगात फिरायची'
सांघा आणि मार्केझ 2010 पासून एकमेकांना ओळखत होते. मार्केझ म्हणाले की, ते तिच्या कुटुंबालाही भेटले होते. सांघाप्रमाणेच मार्केझही बऱ्याचदा लॉस एंजेलिसच्या पार्ट्यांमध्ये जायचे.
टोनी मार्केझला ड्रग्जशी संबंधित खटल्यांना सामोरं जावं लागलं आहे. यापूर्वी त्याला अमली पदार्थांच्या तस्करीसाठी दोषी ठरविण्यात आलं आहे. परंतु त्यांची दीर्घकालीन मैत्री असूनही, मार्केझ म्हणतात की सांघानं त्याला कधीही सांगितलं नाही की ती मोठ्या संकटात आहे.
काही महिन्यांपूर्वी, पोलिसांनी तिच्या नॉर्थ हॉलिवूडमधील घरावर छापा टाकला होता, त्याला फिर्यादी वकिलांनी "स्टॅश हाऊस" म्हटलं होतं.

जश नेगांधी यांनी 2001 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, इर्विन इथं सांघाबरोबर शिक्षण घेतलंय आणि सांघाशी त्यांची मैत्री 20 वर्षांहून अधिक जुनी आहे.
नेगांधा सांघाबद्दलच्या आठवणींबद्दल बोलताना म्हणाले, "ती नृत्य संगीतात खूप सक्रिय होती. तिला नाचायला आणि मजा करायला आवडायचं."
नेगांधी सांगतात, आपली मैत्रीण ड्रग्ज डीलर आहे हे कळल्यावर त्यांना धक्का बसला होता. ते म्हणतात. "मला काहीही माहित नव्हतं, अजिबात नाही. ती याबद्दल कधीही बोलली नाही."
बऱ्याच मित्रांना तर असंच वाटायचं की तिला पैशांची गरज नाही.
"तिच्याकडं नेहमीच पैसे असायचे," असं मार्केझ म्हणतात. ती एका खासगी जेटनं जगात फिरायची आणि हे सगळं उघडकीस येण्यापूर्वीपासून ती हे क��त होती."
श्रीमंत घराण्यातील मुलगी
टाईम्सच्या मते, सांघाचे आजी आजोबा पूर्व लंडनमधील फॅशन रिटेल व्यवसायात होते. ते कोट्यधीश होते आणि सांघा उद्योजक नीलम सिंग आणि डॉक्टर बलजितसिंग छोकर यांची मुलगी आहे.
सांघाला कौटुंबिक मालमत्ता वारश्यानं मिळणार होती.
तिच्या आईनं दोनदा लग्न केलं आहे, त्यानंतर ती कॅलिफोर्नियाच्या कॅलाबासास इथं गेली, तिथंच सांघा मोठी झाली. मार्केझच्या मते, लॉस एंजेलिसमधील तिचं कुटुंबाचं घर 'खूप सुंदर' आणि 'मोठं' आहे.
"आम्ही तिच्या पालकांच्या घरी बार्बेक्यू किंवा पूल पार्टी करायचो. ते खूप काळजी घेणारे आणि प्रेमळ आहेत आणि आम्हाला असं वाटायचं की आम्ही त्यांची स्वतःची मुलं आहोत."
हायस्कूलनंतर सांघानं लंडनमध्ये काही काळ घालवला आणि 2010 मध्ये लंडनमधील हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली.
2010 मध्ये फायनान्शियल टाइम्सच्या भेटीदरम्यान तिला सरळ केसांसह काळ्या सूटमध्ये आणि कॅमेऱ्याकडं पाहून गोड स्मित करताना पाहू शकता.
"ती फसवणूक करणारी वाटत नव्हती," सांघाचे वर्गमित्र म्हणतात.
"सांघा मनमिळावू होती, मात्र तरी ती थोडी अलिप्त रहायची. ती वर्गात डिझायनर कपडे घालायची आणि तिला प्रवास करायला आवडायचं. ड्रग्जमध्ये सहभागी असल्याची कोणतीही अफवा पसरली नव्हती."
"जर ती हल्टमध्ये ड्रग्ज घेत असती तर कदाचित आम्हाला माहिती झालं असतं," ते पुढं सांगतात.
एमबीए पूर्ण केल्यानंतर ती लवकरच लॉस एंजेलिसला परतली. सांघाची आई आणि सावत्र वडील कॅलिफोर्नियामध्ये केएफसीची फ्रँचायझी चालवत होते.
कोर्टाच्या कागदपत्रांवरून असं आढळून आलं आहे की 2013 मध्ये, कंपनीनं ब्रँडिंगच्या वापरासंदर्भातील रॉयल्टी न भरल्याबद्दल त्यांच्यावर 50,000 डॉलरपेक्षा जास्तीचा दावा दाखल केला होता.
हा खटला संपण्यापूर्वी सांघाच्या सावत्र वडिलांनी दिवाळखोरी जाहीर केली. जर सांघाचं कुटुंब त्या काळात आर्थिक संकटात होतं तर तिनं त्याबद्दल जास्तं लोकांना सांगितलं नव्हतं.
"मला याबद्दल काहीही माहित नव्हतं," नेगांधी म्हणतात.
असं वाटतं जणू सांघाला तिच्या पालकांच्या उद्योजकीय यशापर्यंत पोहोचायचं होतं. तिनं स्टिलेटो नेल बार नावाचं नेल सलून उघडलं होतं जे फार काळ टिकलं नाही.
रेस्टॉरंट फ्रँचायझी उघडण्यासारख्या तिच्या महत्त्वाकांक्षेबद्दल सांघा तिच्या मित्रांशी बोलत असे.
अनेक दिवस चालणाऱ्या ड्रग्जच्या पार्ट्या
मार्केझच्या मते, सांघाला खरी आवड क्लबिंगची होती. लॉस एंजेलिसमध्ये तिच्या जवळच्या मित्रमंडळींचा एक ग्रुप होता. त्याला 'किटीज' म्हणायचे. हा प्रामुख्याने मुलींचा ग्रुप होता, त्यांना पार्ट्या आयोजित करायला आवडायचं, आणि त्या पार्ट्यांना सेलिब्रिटीही यायचे.
ते नेहमी हॉलीवूडच्या मध्यभागी असलेल्या एव्हलॉनमध्ये भेटायचे. हे एक जुने थिएटर आहे तिथे मैफिली आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिक इव्हेंट होतात, तिथए सकाळपर्यंत पार्टी चालायची.
मार्केझ सांगतात की ते गोळ्या आणि केटामाईन घेत असत. कॅलिफोर्नियात सर्वत्र होणाऱ्या त्यांच्या पार्ट्या कधी कधी अनेक दिवस चालायच्या.
मार्केझ कॅलिफोर्निया आणि अॅरिझोनाच्या सीमेवरील तलावाची आठवण काढून म्हणतात, "आम्ही लेक हवासूला ट्रिपला जायचो, तिथे एक मोठं जुनं मॅन्शन भाड्याने घ्यायचो, आमचे डीजे, साउंड सिस्टम सगळं घेऊन जायचो. प्रत्येक रात्री एक थीम असायची आणि फक्त आम्हीच असायचो."
मार्केझ सांगतात, " तिथं आम्ही सगळे तयार होऊन यायचो. तिथं व्हाईट पार्टी, ग्लिटर पार्टी. एक श्रूम-श्रूम पार्टीही झाली होती."

मार्केझ म्हणतात, "या पार्ट्यांमध्ये नेहमी केटामाईन असायचं. पण या मित्रांच्या ग्रुपमध्ये सांघाची अनेक टोपणनावं होती, तरी कुणी तिला कधी 'केटामाईन क्वीन' म्हटलं नाही."
मार्केझ 'केटामाईन क्वीन' या नावाबद्दल म्हणतात, "कुणी तिला कधीही अशा नावानं संबोधलं नाही."
या ग्रुपला अवैध ड्रग्जच्या पुरवठ्यात घातक ओपिओइड फेंटेनिल मिसळलं जाईल अशी काळजी वाटायची, म्हणून त्यांनी उ��्च दर्जाच्या केटामाईनचा मोठा साठा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते.
मार्केझ म्हणतात, "जर आम्ही केटामाईन घेणार असू, तर आम्हाला ते थेट सोर्समधून हवं असायचं."
मित्र कथितरित्या कुरिअर पाठवायचे. ते मेक्सिकोत जाऊन आणलं जायचं. ही औषधं शस्त्रक्रियेत भूल देण्यासाठी- सुन्न करण्यासाठी वापरली जातात आणि ती सीमेपलीकडे व्हेटरनरी डॉक्टर आणि फार्मसीकडून घेतली जात होती.
मार्केझ सांगतात, "मला जसवीन असं करत होती याची माहिती नव्हती."
ते म्हणतात, "पण हे करण्यासाठी आमची तेवढी पोहोच होती का? आमचे लोक असं करत होते का? तर हो."
'सेलिब्रिटींना ड्रग्ज देण्याचं व्यसन'
सांघा ड्रग्ज व्यवसायात होती याचा कधीच संशय आला नाही असं मार्केझ सांगतात.
ते म्हणतात, "हे धक्कादायक आहे, मी तुम्हाला सांगतो... वर्षानुवर्षं मी या व्यक्तीला ओळखतो. मी तिच्या कुटुंबाला ओळखतो. मला माहितीय ती कशी वागते, ती काय करू शकते.... ती कुठून आलीय हेही मला माहितीय. अजूनही माझा विश्वास बसत नाहीये"
भूतकाळाकडे पाहिल्यावर मार्केझला वाटतं की सांघाला श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांना ड्रग्ज पुरवून मिळणाऱ्या सोशल स्टेटसची 'चटक' लागली होती.
मार्केझ सांघाबद्दल म्हणतात, "तिला त्या सोशल सर्कलमध्ये राहण्याची आणि टीव्हीवर दिसणाऱ्या सेलिब्रिटींना ती हवीहवीशी वाटणं याची तिला चटक लागलेली."
ती काही 'किंगपिन' किंवा मोठी डीलर नव्हती हे ते मान्य करतात. त्यांच्यामते ती फक्त या धंद्यात अडकली कारण "तिला केटामाईन आवडायचं, अगदी आमच्यासारखंच."
2019 मध्ये सांघाने कोडी मॅक्लॉरी नावाच्या व्यक्तीला केटामाईन विकलं होतं, असं वकील सांगतात.
त्याचा मॅक्लॉरीला ओव्हरडोस झाला आणि त्याचा मृत्यू झाला. मॅक्लॉरीच्या मृत्यूनंतर त्याच्या बहिणीने सांघाला मेसेज करून सांगितलं की, तिने दिलेल्या ड्रग्ज मुळेच तिच्या भावाचा मृत्यू झाला आहे.
कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टचे माजी मुख्य अधिवक्ता मार्टिन एस्ट्राडा म्हणतात, "त्या वेळी कुठलाही समजूतदार माणूस पोलिसांकडे गेला असता, तिच्या मनात थोडीही संवेदना असती, तर तिने आपली कामं थांबवली असती आणि इतरांना केटामाईन देणं बंद केलं असतं."
मार्टिन एस्ट्राडाने ऑगस्ट 2024 मध्ये सांघाविरुद्ध फेडरल चार्जची घोषणा केली होती.
ते म्हणतात, "तिने हे सगळं सुरूच ठेवलं, आणि अनेक वर्षांनंतर तिच्या याच वागणुकीमुळे आणखी एक व्यक्ती मिस्टर पेरीचा मृत्यू झाला."
'ती 17 महिन्यांपासून व्यसनमुक्त होती'
2010 च्या दशकात क्लब्जमध्ये सोबत जाणाऱ्या दुसऱ्या ग्रुपच्या मित्रालाही ही बातमी ऐकून तितकाच धक्का बसला.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की ते हायस्कूलपासून सांघाला ओळखतात आणि मार्केझबरोबर ते तिच्यासोबतही खूप फिरायचे.
नाव न सांगण्याच्याअटीवर तो मित्र सांगतो, "आम्ही नेहमी पार्ट्यांमध्ये असायचो, म्हणजे अगदी दररोज. अनेक वर्षं. तिने मला कधी काही ऑफर केलं नाही."
तो सांगतो सांघा आपला काका पॉल सिंगला जवळजवळ सगळीकडे सोबत नेत असे.
"हे ड्रग लॉर्डसारखं वागणं नाही आणि असं नव्हतं की ती त्याला फक्त ओढून नेत असे. ते नेहमी फॅशनेबल कपड्यांमध्ये असत.."
पॉल सिंग सांघासोबत इव्हेंट फोटोंमध्ये दिसतो आणि 3 सप्टेंबरला सांघाने आपला गुन्हा कबुल केला तेव्हा तो कोर्टातही उपस्थित होता.
मार्केझच्या मते, 2020 च्या दशकात कधीतरी सांघा व्यसनमुक्ती केंद्रात गेली होती.
गेल्या महिन्यात तिच्या वकिलाने, मार्क गेरागोसने दावा केला की ती 17 महिन्यांपासून व्यसनमुक्त आहे. नेगांधीसोबतच्या तिच्या शेवटच्या संभाषणात तिने भविष्याबद्दल मत व्यक्त केलेलं.
तिचा मित्र सांगतो, "आम्ही दोघं 40 वर्षांचे झालो होतो... या वयात लोक स्वतःचं मूल्यांकन करायला लागतात. आता या वयात आपण काय करायचं? याचा विचार करू लागतात. ती खूप काळापासून नशामुक्त राहण्याबद्दल उत्साही होती आणि आयुष्यातल्या इतर अनेक गोष्टींकडे पाहत होती."
तिला अलिकडेच अटक झालेली हे तिनं सांगितलं नव्हतं.
तिचा मित्र म्हणतो, "जेव्हा आम्ही बोलत होतो, तेव्हा मला काहीच अंदाज नव्हता की ती या सगळ्यातून जात आहे. तिने याचा किंचितसाही उल्लेख केला नाही."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











