'दारूगुत्त्याला विरोध केला तर लोक काठ्या घेऊन मारायला आले, पण...'; हेमलता पाडवींच्या संघर्षाची गोष्ट

फोटो स्रोत, BBC/Pravin Thakare
- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
बीबीसी मराठीनं 'कणखर बायांची गोष्ट' ही खास मालिका केली होती. आदर्श समाजासाठी काय करायला हवं याचा वस्तुपाठ या महिलांनी आपल्या कार्यातूनच दिला आहे. अशा महिलांची ओळख या मालिकेतून आम्ही करुन देणार आहोत.
"गावात दारूविरोधी पथक आलं, मी पुढे गेले... ग्रामपंचायतीतल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पथकाला बेकायदेशीर दारूगुत्ता दाखवला, ते पथक कारवाई करून गेल्यावर दारू विक्रेते आणि काही लोक लाठ्या- काठ्या घेऊन ग्रामपंचायतीत आम्हाला मारायला आले. पण सासरे आडवे आले आणि प्रसंग टळला."
"मी जेव्हा सरपंच म्हणून निवडून आले, त्या दिवशी गावात मिरवणूक काढायची होती, पण कळलं की ज्या रस्त्याने आम्ही जाणार होतो त्या रस्त्यात विरोधक लाठ्या-काठ्या घेऊन उभे होते. आम्ही दुसर्या रस्त्याने गावात गेलो. कारण वाद टाळायचा होता.
"नऊ महिन्याची गरोदर बाई दूरवरून दोन हंडे पाणी आणत होती. त्याच वेळेस ठरवलं की गावातली पाण्याची समस्या दूर करायची."
हे काही सिनेमातले प्रसंग नाहीत, स्वतः अनुभवलेले प्रसंग हेमलता पाडवी सांगत होत्या.
नंदुरबारच्या उमर्दे बुद्रुक गावच्या त्या सरपंच आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीच्या विरोधात दोन हात करत त्या गावातील समस्या आणि दारूचे वाईट परिणाम यावर काम करतात. लोकांनी त्यांना सप्टेंबर 2022मध्ये निवडून दिलं.

फोटो स्रोत, Pravin Thakre/BBC
हेमलता पाडवी यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही की राजकारणाशी कणभरही संबंध नव्हता. नंदुरबारमधील वडजाखण गावात आदिवासी भिल्ल कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
पाचवी पर्यंतचं शिक्षण कोठली गावातल्या आश्रमशाळेत झालं. पण तिथल्या शाळेत मन लागलं नाही म्हणून पळून त्या घरी आल्या. घरात आई सोबत लाकूडफाट्यासाठी काम करू लागल्या. पण पुढे शिक्षणाचं महत्त्व कळल्यावर बारावी पर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.
कॉलेजचं शिक्षण करण्यासाठी मामाकडे राहू लागल्या. त्यानंतर त्यांनी मामेभावाशी प्रेमविवाह केला. तेव्हा त्यांचं वय 22 वर्षं होतं. हेमलता संसारात रमल्या. हेमलता शेती, घर आणि कुटुंब यात आनंदी होत्या.
पण यानंतर त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण देणारी घटना घडली. कोरो संस्थेची गावात बैठक होती. कोरो ही संस्था भारतातील काही संस्था-संघटनांसोबत काम करुन महिलांच्या नेतृत्वासाठी प्रशिक्षण घेते.
‘बाय्या जाती हेंगात्या’
गावातल्या अंगणवाडी सेविकेने या बैठकीला हेमलता यांना पुण्याला पाठवलं. तिकडे हेमलता यांना स्वतःची नव्याने ओळख झाली.
पुण्याचं नेतृत्व प्रशिक्षण शिबिर त्यांच्यासाठी वेगळा अनुभव होता. नवीन दरवाजे त्यांच्यासाठी उघडले गेले होते.

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC
त्या सांगतात- “आधी नीट संविधानही माहीत नव्हतं. आपले हक्क, स्त्री-पुरुष समानता, स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण या याविषयी काही माहित नव्हतं. आपण घरापुरतंच का राहतोय, स्वतंत्रपणे निर्णय का घेत नाही याविषयी तिथे कळलं.
"मी किती मागे आहे याची जाणीव मला झाली. माझ्यासारख्या असंख्य महिला घरीच आहेत, शिकलेल्या असूनही त्या काही करत नाहीत. हे ऐकून खूप वाईट वाटलं. गावा-गावातल्या महिलांना प्रश्नांची सांगितलेली यादीही मोठी होती," हेमलता सांगतात.
हेमलता यांना हक्कांसोबतच, ग्रामपंचायत, ग्रामसभा, महिला ग्रामसभा याबद्दलची माहिती मिळाली. आणि अनुभवांना नवीन अर्थ मिळाला. पण त्या अनुभवानं परतीच्या प्रवासात स्त्रियांच्या हक्कांविषयीच्या विचारांचं वादळ त्यांच्या मनात घोंघावू लागलं.
त्यानंतर त्यांनी गावात येऊन महिलांसोबतच नाही तर पुरुषांसोबतही काम करायला सुरुवात केली. प्रशिक्षण मिळत होतं, नंतर आदिवासी महिलांची एक संस्था असावी, म्हणून त्यांनी ‘हेंगात्या’ संस्था सुरू केली. स्थानिक आदिवासीत ‘बाय्या जाती हेंगात्या’ म्हणजेच स्त्रिया जातात सोबती असं म्हटलं जातं. त्यावरुन हे नाव त्यांनी ठेवलं.
बायकोच्या कमाईवर दारुचं व्यसन
कोव्हिडच्या काळात खूप बिकट अवस्था होती, तेव्हा गावकऱ्यांसोबत थेट काम करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. गरजू कुटुंबाना जगवण्यासाठी धान्य वाटप केले, तेव्हा गावातील सत्ताधारी लोकांना आवडले नाही.
नेतृत्वासाठीच्या प्रशिक्षणातून हेमलता शिकत होत्या आणि प्रत्यक्षात त्याचा वापर गावात करत होत्या. हेंगात्याच्या महिलांनी याच काळात एक टीम उभी केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
गावात 60 कुटुंबाना रोजगार हमी योजनेतून काम मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. हे काम बघून गावातले लोक म्हणू लागले- गावाची सरपंच तुम्हीच झाले पाहिजे, पण हेमलतांनी हे फारसं गांभीर्याने घेतलं नाही. पण गावातल्याच एका मोठ्या प्रश्नाने त्यांना सरपंच बनवण्यासाठी उद्युक्त केलं.

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC
गावात अवैधपणे दारुची विक्री होत होती, “महिला अनेकदा त्यांच्या व्यथा बचतगटाच्या मीटिंगमध्ये किंवा खासगीपणे येऊन सांगत. नवरा घरीच बसून असतो, बाई दिवसभर कामावर जाणार, दिवसाची मजुरी 100 ते 150 रुपये मजुरी मिळणार, त्यातील 50 रुपये नवरा दारुसाठी बळजबरी काढून घेणार. आणि मग दारू पिऊन भांडण, हाणामारी आहेच. त्या��ुळे महिलांचं आर्थिक नुकसान तर होत होतंच पण मुला-बाळांच्या शिक्षणासाठी काही हाताला शिल्लक राहात नव्हतं. इतकंच काय कोवळी मुलं दारूच्या आहारी गेल्याने शिक्षण अर्धवट राहात होतं. महिलांशी बोलताना भविष्यातील अंधार दिसत होता”
या चर्चांनी हेमलता यांना आपण वेगळ्या धाटणीचं राजकारण करू शकतो याची स्पष्टता येऊ लागली.
गरोदर महिला आणि पाण्याचा हंडा
तेव्हा ग्रामपंचायतीचं मळकट ऑफिस सतत बंद असायचं, गावकरी सांगतात, "कोणी तिथे फिरकायचंही नाही. गावात सुविधा नाहीत आणि ग्रामपंचायतीनं त्या द्यायला हव्यात याचं लोकांना ज्ञानही नव्हतं. त्यामुळे ना तक्रार ना चौकशी. ही ग्रामपंचायत कागदोपत्री सुरू होती. ग्रामसभा, महिला ग्रामसभा होताना कोणीच पाहिल्या नव्हत्या. पण प्रोसेडिंगचे अहवाल सादर केलेले होते."
गावातल्या सोयी-सुविधांचा विचार करताना सर्वात पहिली पाण्याची सोय आवश्यक असते. महिलांचा जास्त वेळ पाणी आणण्यात आणि पाण्याशी संबंधित धुणी करण्यात जातो. गरोदर महिलेला दूरवरुन पाण्याचा हंडा आणताना पाहून हेमलता अस्वस्थ झाल्या.
महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने त्यांच्यासह 50-60 महिला एकत्र आल्या आणि एकत्र जाऊन त्यांनी त्या वेळच्या सरपंचांना जाब विचारण्याचं धाडस केले. “त्या सरपंचांकडून ‘बघू’ एवढंच उत्तर मिळालं, पण गावातल्या महिलांना धाडसाने बोलण्याची आणि एकीची किंमत कळली."

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC
हेमलता यांचा सरपंचाची निवडणूक लढण्याचा निर्णय एव्हाना पक्का झाला होता. त्याआधी प्रश्नांना भिडण्याचा आणि राजकीय जाणिवेचा सहा वर्षांचा पल्ला त्यांनी ओलांडला होता. त्या सांगतात या निर्णयात पती आणि सासरकडच्या मंडळींची खूप मदत झाली.
सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांनी मैत्रिणींच्या मदतीने प्रचार केला. सर्व जाती-धर्मातील महिलांपर्यंत त्या पोहचल्या. गावातल्या महिलांसाठी ‘पाणी हवं आणि दारू नको’ ही मागणी स्पष्ट होती. प्रचारादरम्यान महिलांना त्यांनी ही मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं.
मी आणि माझी ग्रामपंचायतही नवीन
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाती-पातीचं राजकारण मागे सारुन उमर्दे गावाने 750 मतं देऊन त्यांना सरपंचपदी निवडून दिलं.
निवडून आल्यावर त्यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. हेमलता म्हणतात- “निवडणुकीत विरोधकांनी मला खूप त्रास दिला, माझ्यावर आरोप झाले, लढू नका असा दबावही होता, दारुविक्री करणारेच विरोधकांमध्ये होते. पण महिला आणि इतर लोक सोबत असल्याने मी जिंकून आले.”
सरपंच झाल्यावर 9 दिवसांच्या आत त्यांनी ग्रामसभा घेतली. ग्रामसभेची सवय गावाला नव्हती. चक्क तेव्हा 60 महिला उपस्थित होत्या. तर महिलासभेला 200 जणी आल्या. बंद असलेलं ग्रामपंचायतीचं ऑफिस डागडुजी, रंगरंगोटी करून लोकांसाठी खुलं केलं आणि नियमित सुरुही केलं.
ज्या महिला पूर्वी ग्रामपंचायतीत येण्यासाठी घाबरत होत्या त्या आता बिनधास्त कार्यालयात येतात, गप्पा मारतात आणि स्वतःचे प्रश्न पण सोडवतात.

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC
आज गावात बोर खणून पाणी नळांद्वारे गावात पुरवलं जातंय. महिलांची दूरवरची पायपीट आणि उन्हाळ्यात शेता-शेतात पाण्यासाठीची वणवणही थांबली आहे.
हेमलता पाडवी आपल्याच अनुभवांना शिक्षण असं मानतात. त्यामुळे रोजचा दिवस काहीना काही शिकवतो असं त्यांना वाटतं.
“पदावर असताना कोणाशी कसं बोलायचं, हे हळूहळू शिकते आहे. मी नवीन आहे, तशी माझी ग्रामपंचायतही नवीन आहे. सरपंच गावाचे पंतप्रधानच असल्यासारखे असतात.
"जलजीवन मिशनच्या माध्यमातून शुद्ध फिल्टर पाण्याचा प्रश्नही या सरपंचानी सोडवलाय. इथे आधी 20 रुपये दराने पिण्याच्या पाण्याचा हंडा मिळत होता," हेमलता सांगतात.
दारूगुत्ते बंद केले, पण...
पक्षीय आणि जाती-पातीच्या राजकारणापलीकडे लोकांच्या प्रश्नांना घेऊन लढणाऱ्या हेमलता पाडवी या प्रेरणादायी उदाहरण आहेत.
यावर्षी येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्या सरकारला आणि राजकीय पक्षांना आपल्या प्रश्नांकडे लक्ष द्यायची मागणी करतायत.
दारुचं व्यसन अनेक गावांमधील घरं पोखरतंय. व्यसनी पतीच्या मृत्यूनंतर महिला एकल होतात. या दारुच्या व्यसनापासून लोकांना मुक्त करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. मुलांचं आणि महिलांचं शिक्षण ही ग्रामविकासाची गरज आहे असं त्या मानतात. लोकांचं स्थलांतर थांबलं तर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटेल.

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC
ग्रामपंचायतीत गेलं की सगळ्या सुविधा दिसतात. आज लोकांना रेशनकार्ड, आधारकार्ड, आयुष्यमान विमा योजना कार्डचं काम करण्यासाठी नंदुरबारला तालुका कार्यालयात जायची गरज भासत नाही.
हेमलता सांगतात, "हे एकटीने शक्य झालं नसतं, सोबतीच्या महिला आणि गावकरी असल्यानेच अवघ्या दीड वर्षांत हे यश मिळालं. इतर महिलांनाही नेतृत्व करण्यासाठी पुढे यायला हवं."
सरकारकडे या मागण्या....
पक्षीय आणि जाती-पातीच्या राजकारणापलीकडे लोकांच्या प्रश्नांना घेऊन लढणाऱ्या हेमलता पाडवी या प्रेरणादायी उदाहरण आहेत. यावर्षी येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्या सरकारला आणि राजकीय पक्षांना आपल्या प्रश्नांकडे लक्ष द्यायची मागणी करतायत.
दारुचं व्यसन अनेक गावांमधील घरं पोखरतंय. व्यसनी पतीच्या मृत्यूनंतर महिला एकल होतात. या दारुच्या व्यसनापासून लोकांना मुक्त करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. मुलांचं आणि महिलांचं शिक्षण ही ग्रामविकासाची गरज आहे असं त्या मानतात. लोकांचं स्थलांतर थांबलं तर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटेल.

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC
आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात सर्व पायाभूत सुविधा हव्यात. रोजगारनिर्मितीवर भर हवा.
सरपंच म्हणून काम करताना ग्रामपंचायतीचं काम अधिक पारदर्शी आणि कार्यक्षम असावं याविषयी त्या बोलतात.
योजनांसाठी वा मंजूर झालेल्या कामासाठीचा निधी खरंच तळा-गाळापर्यंत पोहोचतोय का? यासाठी देखरेख करणारी स्वतंत्र यंत्रणा हवी. त्यासाठी तपासणी पथक असेल तर गावांचा सर्वांगिण विकास होईल असं त्यांना वाटतं.
(या लेखासाठी अत्त दीप या ग्रासरुट लिडरशीप अकॅडमीच्या रिसर्चची मदत झाली)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन












