'यात असं काय लिहिलंय ज्याची त्यांना एवढी भीती वाटतेय?', राहुल गांधींना लोकसभेत नेमकं काय वाचायचं होतं?

फोटो स्रोत, ANI
सोमवारी (2 फेब्रुवारी) लोकसभेत मोठा गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक मजकूर वाचून दाखवायला सुरुवात केल्यानंतर हा गोंधळ झाला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी कॅरव्हान या मासिकातील एक लेख वाचायला सुरवात केली.
या लेखात माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या प्रकाशित न झालेल्या पुस्तकातील काही उतारे होते आणि यामुळेच वाद निर्माण झाला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्या या कृतीवर आक्षेप घेतला. हे घडले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संसदेत उपस्थित होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "राहुल गांधींनी आधी हे पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही हे सांगावं. जर ते प्रकाशित झालं असेल तर त्यांनी बोलायला हरकत नाही. पण हे पुस्तक प्रकाशित झालेलं नसेल तर त्याचा उल्लेख करण्यात काही अर्थ नाही."
तर, गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, राहुल गांधी यांनी फक्त असं म्हणावं की ते मासिक वाचत आहेत, कारण हे जनरल नरवणे यांचं पुस्तक नाही आणि मासिक काहीही लिहू शकतं.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी असंही म्हटलं की, "सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी सभागृहात जे काही बोललं जातं ते सत्य असलं पाहिजे."
यावर राहुल गांधींनी उत्तर दिलं आणि म्हणाले की, "हे 100 टक्के खरं आहे."
दुपारी 1.30 वाजता सुरू झालेला गोंधळ सुमारे 45 मिनिटे चालला, त्यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर ते दुपारी 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आलं.
राहुल गांधींना काय म्हणायचं होतं?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा ते म्हणाले, "या मासिकात नरवणेजींनी म्हटले आहे की हे सरकार त्यांना त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित करू देत नाही."
ते म्हणाले, "मला यामधील (मासिक) फक्त पाच ओळी वाचायच्या आहेत."

फोटो स्रोत, ANI
राहुल गांधी पुन्हा बोलू लागले तेव्हा ते म्हणाले, "राष्ट्रपतींचे भाषण देशाच्या स्थितीशी, त्याच्या धोरणांशी, परराष्ट्र धोरणाशी आणि जागतिक परिस्थितीशी संबंधित आहे. एका सदस्याने आम्ही देशभक्त नाही असं म्हटलं. मी फक्त त्यावर उत्तर देऊ इच्छितो कारण नरवणेजींनी इथं काहीतरी म्हटलं आहे."
यानंतर, सत्ताधारी पक्षाकडं बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "हे (सरकार) म्हणतं की ते दहशतवादाविरुद्ध लढत आहेत, पण यातल्या एका मजकुराची त्यांना भीती वाटते.
यामध्ये असं नेमकं काय लिहिलं आहे जे मी बोलू शकत नाही आणि ज्याची त्यांना भीती वाटत आहे. जर त्यांना याची भीती वाटत नसेल तर त्यांनी मला वाचू द्यावं."
राजनाथ सिंह आणि अमित शहा यांचा युक्तिवाद
राजनाथ सिंह यांनी सभागृहात बोलताना म्हटलं की, राहुल गांधी ज्या पुस्तकाचा उल्लेख करत आहेत ते पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही.
"सभागृहाची (राहुल गांधी) दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. राहुलजी, इथं अनावश्यक गोष्टींचा उल्लेख करू नये," असं ते म्हणाले.
"विरोधी पक्षनेत्यांनीच हा वाद संपवला आहे. त्यांनी स्वतः हे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही, हे सांगितलं आहे. आता जे पुस्तक प्रकाशितच झालेलं नाही त्याचा उल्लेख सभागृहात कसा होऊ शकतो?"
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, "पुस्तक प्रकाशित झालं असलं तरी त्याचा उल्लेख करता येत नाही. सभागृहात कोणत्याही पुस्तकावर किंवा ईमेलवर चर्चा कशी होऊ शकते?"
"मी नियमावली वाचली आहे. नियम आणि परंपरांनुसार वर्तमानपत्रातील कात्रण, पुस्तकं आणि अशा विषयांवर सभागृहात चर्चा करण्याची परंपरा नाही."
यानंतर अमित शहा म्हणाले की, खासदार निशिकांत दुबे एका पॉइंट ऑफ ऑर्डरचा उल्लेख करत आहेत.

फोटो स्रोत, ANI
निशिकांत दुबे म्हणाले की, "कलम 349 (1)अंतर्गत, सभागृहाच्या कामकाजाशी कोणताही संबंध नसलेले कोणतेही पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचलं जाणार नाही. याच काँग्रेस सरकारने सॅटॅनिक व्हर्सेसवर बंदी घातली होती. अडवाणीजी त्यावर चर्चा करू इच्छित होते पण त्यांना तसे करण्याची परवानगी दिली नव्हती."
यानंतर, संसदेबाहेर बोलताना दुबे म्हणाले, "राज्यघटनेच्या कलम 19 मधील मुद्दा क्रमांक 2,3 आणि 4 मध्ये असं म्हटलं आहे की, शेजारी देश आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोष्टींवर चर्चा करू नये. भारतातील 140 कोटी लोकांना आणि संसदेत बसलेल्या सर्वांना हे लागू होते."
"राहुल गांधींना संविधान आणि सभापतींवर विश्वास नाही. जेव्हा कोणत्याच गोष्टींवर विश्वास नाही तर, काँग्रेसच्या बुद्धिमत्तेबद्दल काय बोलावे?"

फोटो स्रोत, ANI
सभागृहात झालेल्या गोंधळादरम्यान, राहुल गांधींनी अनेक वेळा या मुद्द्यावर बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यावर आक्षेप घेतला.
"पंतप्रधान तुमचं बोलणं ऐकण्यासाठी बसले आहेत आणि उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर निर्णय आधीच देण्यात आला आहे. यानंतरही, जर तुम्ही पुन्हा पुन्हा ते वाचत असाल, तर सभागृह असं कसं चालेल? जर नियमांचं पालन केलं नाही, तर चर्चा कशी होईल? विरोधी पक्ष असा वाद निर्माण करत आहे, ज्यामुळं ते स्वतः बोलू इच्छित नाहीत आणि इतरांनाही बोलू देऊ इच्छित नाहीत."
भाजप खासदार कंगना रणौत यांनी सभागृहाबाहेर सांगितलं की , "सर्व नियमांचं उल्लंघन केलं जात आहे आणि अराजकता निर्माण केली जात आहे. ते पुस्तक प्रकाशित झालेले नाही कारण त्याच्या सत्यतेबाबत शंका आहे. ते संसद आणि खासदारांचा आदर करत नाहीत."
जनरल एम.एम. नरवणे पुस्तकाबद्दल काय म्हणाले होते?
द प्रिंटमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, हिमाचल प्रदेशातील कसौली साहित्य संमेलनात बोलताना, जनरल एम.एम. नरवणे यांनी हसत-हसत टिप्पणी केली होती की, "त्यांचं प्रकाशित न झालेलं आत्मचरित्र हे एखाद्या जुन्या वाइनप्रमाणे परिपक्व होत आहे. ते जितकं जुनं होईल तेवढंच अधिक मौल्यवान आणि किंमतीचं होईल."
त्यांनी हेही स्पष्ट केलं की, "पुस्तक लिहिणं हे माझं काम होतं, आता संरक्षण मंत्रालयाचा हिरव�� कंदील आणि इतर परवानगी मिळवून प्रकाशकांना ते प्रकाशित करायचं आहे. मंजुरीची प्रतीक्षा असल्यामुळेच या पुस्तकाचं प्रकाशन थांबलं आहे."

फोटो स्रोत, ANI
जनरल नरवणे यांचं 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' नावाचं आत्मचरित्र एप्रिल 2024 मध्ये प्रकाशित होणार होतं. या पुस्तकाची लिंक अजूनही ऑनलाईन उपलब्ध आहे, परंतु तिथे 'सध्या हे पुस्तक अनुपलब्ध आहे. कधी उपलब्ध होईल किंवा नाही, हे आम्हाला माहीत नाही," असा संदेश दिसत आहे.
राहुल गांधींनाही पाठिंबा
भाजप खासदार संसदेच्या नियम 349 चा हवाला देत असताना, विरोधी पक्षाच्या खासदारांनी मात्र राहुल गांधींना पाठिंबा दिला.
शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितलं की , "नरवणे हे काही सामान्य व्यक्ती नव्हते. ते लष्करप्रमुख होते. त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं नाही, ते प्रकाशित होऊ दिलं गेलं नाही."

फोटो स्रोत, ANI
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, "भैय्या (राहुल गांधी) कधीही लष्कराची बदनामी करणार नाही. ते लष्करप्रमुखांच्या पुस्तकातील एक उतारा वाचत होते. यात बदनामी करण्यासारखं काय आहे? जेव्हा एखादी गोष्ट बाहेर येते आणि ती त्यांना लपवायची असते तेव्हा ते (सरकार) असंच म्हणतात."
काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, राहुल गांधींनी डोकलाम, चीन, लडाखचा मुद्दा उपस्थित केला होता पण त्याशी संबंधित एकही प्रश्न उपस्थित करू दिला जात नाही.
"आधी तांत्रिक प्रश्न उपस्थित करून, अप्रकाशित पुस्तकातील मजकूर वाचता येत नाही असं म्हणतात. सार्वजनिक हिताचा मुद्दा मांडता येऊ नये, म्हणून प्रश्न विचारण्याची परवानगी दिली जात नाही," असंही ते म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











