बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2025 : 'या' आहेत नामांकन मिळालेल्या 5 खेळाडू

सहाव्या बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (ISWOTY) पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंची नावं जाहीर
फोटो कॅप्शन, सहाव्या बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (ISWOTY) पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंची नावं जाहीर

सहाव्या बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (ISWOTY) पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

या पुरस्कारासाठी क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना, बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, नेमबाज सुरुची सिंह आणि ॲथलीट ज्योती याराजी या 5 खेळाडू दावेदार आहेत.

या पुरस्काराद्वारे, भारतीय महिला खेळाडूंनी 2025 मध्ये क्रीडा क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा सन्मान केला जाणार आहे. देशातील क्रीडा विश्वाशी संबंधित सर्व महिलांच्या कामगिरीचा गौरव यातून केला जातो.

बीबीसीनं निवडलेल्या पॅनेलनं 5 भारतीय महिला खेळाडूंची अंतिम यादी तयारी केली आहे. यासाठीच्या ज्युरींमध्ये भारतातील काही सर्वात मान्यताप्राप्त आणि विश्वसनीय क्रीडा पत्रकार, तज्ज्ञ आणि लेखकांचा समावेश आहे.

बीबीसीनं पहिल्यांदाच, ग्रँड ज्युरीची नियुक्ती केली आहे. हे ग्रँड ज्युरी या पुरस्काराच्या विजेत्यांची निवड करतील.

ग्रँड ज्युरीमध्ये ख्यातनाम टेनिसपटू लिअँडर पेस, लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज आणि पॅरा-ॲथलीट दीपा मलिक यांचा समावेश आहे.

विजेत्यांना 16 फेब्रुवारीला होणाऱ्या पुरस्कार समारंभात हे पुरस्कार दिले जातील. त्याचबरोबर बीबीसी ज्युरीनं नामांकित केलेल्या इतर 3 महिला खेळाडूंचाही सन्मान करणार आहे. यासाठीच्या श्रेणी आणि हे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत.

  • पॅरा-खेळांमधील उत्कृष्ट कामगिरी अधोरेखित करण्यासाठी 'बीबीसी पॅरा स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्कार
  • तरुण ॲथलीटच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी 'बीबीसी इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर' पुरस्कार
  • क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल एका दिग्गज खेळाडूचा गौरव करण्यासाठी 'बीबीसी लाईफटाइम अचिव्हमेंट' पुरस्कार.
गेल्या वर्षी नेमबाज मनू भाकरला बीबीसी स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवताना बॉक्सर मेरी कोम आणि बीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेवी.
फोटो कॅप्शन, गेल्या वर्षी नेमबाज मनू भाकरला बीबीसी स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवताना बॉक्सर मेरी कोम आणि बीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेवी.

फिओना क्रॅक बीबीसी न्यूजच्या हंगामी जागतिक संचालक आहेत. त्या म्हणतात, "इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर हा पुरस्कार संपूर्ण भारतातील क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या उत्कृष्ट कामगिरीचं एक वर्ष अधोरेखित करतो. इतर कोणतीही प्रसारमाध्यम संस्था करत नाही अशा प्रकारे हे प्रयत्न प्रदर्शित करण्यात आणि त्यांचा गौरव करण्यात बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते."

"या महिलांना त्यांनी परिश्रमातून साध्य केलेली कामगिरी, भारत आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे."

या कार्यक्रमाचं व्यवस्थापन आणि निर्मिती कलेक्टिव्ह न्यूजरूमनं केली आहे.

रूपा झा कलेक्टिव्ह न्यूज रूमच्या मुख्य संपादक आणि सह-संस्थापक आहेत. त्या म्हणतात, "लग्न, वय, शारीरिक मानकं किंवा अपंगत्व यामुळे महिलांना अनेकदा खेळापासून परावृत्त केलं जातं. 'एव्हरीबडी कॅन प्ले' म्हणजे 'प्रत्येकजण खेळू शकतो' ही या वर्षाची संपादकीय संकल्पना आहे."

"खेळ प्रत्येकासाठी असतो या साध्या कल्पनेला ही संकल्पना बळकट करते. त्याचा खरा प्रभाव फक्त निकालांमधूच नाही, तर समावेशकता आणि संधींमधून मोजला जातो. 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2026' (ISWOTY-2026) पुरस्कार अशा प्रत्येक महिलेचा सन्मान करतो, जिनं मैदानात उतरण्याचं आणि तिचं स्थान निर्माण करण्याचं धाडस दाखवलं."

या वर्षी नामांकन मिळालेल्या खेळाडू कोण आहेत?

1. दिव्या देशमुख (बुद्धिबळ)

जुलै महिन्यात या 20 वर्षांच्या बुद्धिबळपटूने इतिहास घडवला. दिव्या देशमुख फिडे महिला विश्वचषकाची आतापर्यंतची सर्वात तरुण विजेती ठरली. तसंच, हा चषक पटकावणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे.

या विजेतेपदामुळे तिला ग्रँडमास्टरचा दर्जा मिळाला. अंतिम फेरीत, एकप्रकारे या खेळातील बॅटन एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूकडे दिलं जाण्याचा क्षण होता. कारण दिव्या देशमुखनं कोनेरू हम्पीचा पराभव केला. कोनेरू हम्पी ही भारताची पहिली ग्रँडमास्टर आहे.

दिव्या देशमुख
फोटो कॅप्शन, दिव्या देशमुख

दिव्या देशमुखचा जन्म 2005 मध्ये नागपूरमध्ये झाला होता. दिव्यानं वयाच्या 5 व्या वर्षी बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. दोनच वर्षांमध्ये ती अंडर-7 वयोगटातील राष्ट्रीय विजेती बनली. तर 2017 मध्ये तिनं अंडर-12 श्रेणीतील मुलींच्या गटात जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेचं (वर्ल्ड यूथ चेस चॅम्पियनशिप) विजेतेपद पटकावलं.

दिव्यानं 2022 मध्ये चेन्नईमध्ये झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला कांस्य पदक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोन वर्षांनी दिव्यानं आणखी मोठं यश संपादन केलं. तिनं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलं. तसंच, अव्वल स्थान पटकावणाऱ्या संघाचाही ती एक भाग होती.

2. हरमनप्रीत कौर (क्रिकेट)

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौरनं नोव्हेंबरमध्ये देशाला पहिला आयसीसी महिला विश्वचषक जिंकून दिला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघासमोर 339 धावा करण्याचं मोठं लक्ष्य होतं. मायदेशात खेळताना तिनं या लक्ष्याचा पाठलाग करताना, 88 चेंडूंमध्ये 89 धावांची खेळी केली.

तर 2017 मध्ये विश्वचषकाच्या आणखी एका उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच खेळताना तिनं 171 धावांची नाबाद खेळी केली होती. तिची ही खेळी आजही महिला क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक मानली जाते.

हरमनप्रीत कौर
फोटो कॅप्शन, हरमनप्रीत कौर

हरमनप्रीतचा जन्म 1989 मध्ये पंजाबमधील क्रीडाप्रेमी पालकांच्या पोटी झाला. त्याच दिवशी तिच्या वडिलांनी तिच्यासाठी एक टी-शर्ट विकत आणला. त्यावर लिहिलं होतं, 'गुड बॅटींग'. हरमनप्रीतनं 2009 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून भारतीय संघाचा फलंदाजीतील आधारस्तंभ बनून हे भाकित खरं करून दाखवलं.

तिचा समावेश, टाइम मासिकाच्या 2023 च्या टॉप 100 उदयोन्मुख नेतृत्वांच्या आणि बीबीसीच्या 100 सर्वात प्रेरणादायी महिलांच्या यादीत झालेला आहे. हरमनप्रीतला 2017 मध्ये अर्जुन पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं. हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील दुसरा सर्वोच्च सन्मान आहे.

महिला एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाची कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौरला 2026 च्या क्रीडा क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे.

3. स्मृती मंधाना (क्रिकेट)

स्मृती भारताच्या महिला क्रिकेट संघाची उप-कर्णधार आहे. स्मृती आधीच महिला क्रिकेटमधील सार्वकालिक महान खेळाडूमध्ये स्थान मिळवण्यासाठी दावेदार आहे. या 29 वर्षांच्या डावखुऱ्या फलंदाजानं महिला एक दिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक शतकं झळकावली आहेत. तर सध्याच्या खेळाडूंमध्ये ती धावांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

स्मृती मंधाना
फोटो कॅप्शन, स्मृती मंधाना

स्मृतीचा जन्म महाराष्ट्रातील सांगली शहरात झाला आहे. तिला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा वडील आणि भावाकडून मिळाली. हे दोघेही जिल्हा स्तरावर क्रिकेट खेळलेले आहेत. विभागीय अंडर-19 स्पर्धेत खेळताना, 2013 मध्ये देशांतर्गत एकदिवसीय सामन्यामध्ये दुहेरी शतक झळकावणारी स्मृती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली होती.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, तिनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं. कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूनं 50 षटकांच्या सामन्यात केलेलं हे सर्वात वेगवान शतक होतं. ही खेळी करताना स्मृतीनं विराट कोहलीचा विक्रम मोडला होता.

स्मृतीला 2018 आणि 2021 मध्ये दोनदा आयसीसी वीमेन्स क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आलं आहे. तसंच तिला 2019 मध्ये भारत सरकारकडून प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

4. सुरुची सिंह (नेमबाजी)

सुरुची सिंह, नेमबाज तयार करण्याचा समृद्ध इतिहास असलेल्या हरियाणातील आहे. सुरुची सिंहनं 2024 मध्ये राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 7 सुवर्णपदकं जिंकून प्रसिद्धी मिळवली.

त्यानंतर एक वर्षांपेक्षा कमी कालावधीत या 19 वर्षांच्या नेमबाजानं वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलं. तिनं जागतिक स्तरावर लवकरच स्वत:चं स्थान निर्माण केलं.

सुरुची सिंह
फोटो कॅप्शन, सुरुची सिंह

सुरुचीनं 2025 मध्ये ब्युनोस आयर्स, लिमा आणि म्युनिक इथं झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं जिंकून एक दुर्मिळ सुवर्ण त्रिकूट पूर्ण केलं. लिमामध्ये तिनं मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.

कझाकस्तानमध्ये 2025 मध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत, सुरुचीनं मनू भाकर आणि पलक गुलिया यांच्यासोबत महिलांच्या सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं.

सप्टेंबरमध्ये, सुरुचीनं आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन) 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात महिला नेमबाजांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला.

5. ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भारतात वरच्या स्तरावरील ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांमधील यश खूपच दुर्मिळ असताना ज्योती याराजीनं घवघवीत यश मिळवून दाखवलं आहे. ज्योती याराजी, 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी 100 मीटर हर्डल्स (अडथळा) शर्यतीत पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

अडथळ्यांवर मात करणं ही याराजीसाठी कधीच समस्या नव्हती. कारण ही 26 वर्षांची खेळाडू बेताचीच आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील आहे. ज्योती याराजीचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते तर आई घरकाम करत असे.

ज्योती याराजीनं 2022 मध्ये 100 मीटर हर्डल्स (अडथळा) शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मोडला. त्यावेळेस तिनं 13.23 सेकंदांची वेळ नोंदवली होती. तेव्हापासून तिनं अनेक वेळा स्वत:चाच विक्रम मोडला आहे.

तिनं 2022 च्या राष्ट्रीय खेळांमध्येदेखील उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यावेळेस तिनं स्प्रिंट आणि हर्डल्स प्रकारांमध्ये अनेक सुवर्णपदकं जिंकली होती. तसंच जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. तर 2022 च्या आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं.

ज्योतीनं 2013 मध्ये, एशियन इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 60 मीटर हर्डल्स प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. तर एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं. ही कामगिरी करून तिनं आशियातील अव्वल हर्डल्स म्हणजे अडथळा धावपटू म्हणून स्वत:चं स्थान निर्माण केलं. तिनं गुमी इथं झालेल्या एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये 100 मीटर हर्डल्स प्रकारात देखील सुवर्णपदक पटकावलं होतं.

ज्योतीला, 2024 मध्ये प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

ज्योती याराजी
फोटो कॅप्शन, ज्योती याराजी

'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. भारतातील महिला खेळाडूंच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी आणि दखल घेण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू या पुरस्काराची पहिली विजेती ठरली होती.

तर 2020 मध्ये जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन कोनेरू हम्पीला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तर 2021 आणि 2022 मध्ये वेटलिफ्टर मिराबाई चानूनं हा पुरस्कार जिंकला होता. नेमबाज मनू भाकर 2024 च्या पुरस्काराची विजेती ठरली होती.

ॲथलीट पी. टी. उषा आणि अंजू बॉबी जॉर्ज, वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी, हॉकीपटू प्रितम सिवाच आणि क्रिकेटपटू मिताली राज यांना यापूर्वी 'जीवनगौरव' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

टेबल टेनिसपटू भाविना पटेल आणि नेमबाज अवनी लेखरा यांना 'बीबीसी इंडियन पॅरा-स्पोर्ट्सवुमन' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

तसंच क्रिकेटपटू शेफाली वर्मा, नेमबाज मनू भाकर आणि तिरंदाज शीतल देवी यांना यापूर्वी 'बीबीसी इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)