'एपस्टीन फाईल्स'च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लाखो कागदपत्रांमधून समोर आल्या 'या' गोष्टी

फोटो स्रोत, Reuters/BBC/Getty
- Author, साक्षी व्यंकटरामन आणि क्वासी ग्याम्फी असिदू
- Role, बीबीसी प्रतिनिधी
लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमधील मृत गुन्हेगार जेफ्री एपस्टिन याच्याशी संबंधित लाखो नवीन फाईल्स प्रसिद्ध झाल्या आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागानं (यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस) त्या प्रसिद्ध केल्या आहेत.
गेल्या वर्षी एका कायद्याद्वारे एपस्टिनशी संबंधित कागदपत्रं प्रसिद्ध करण्याचं बंधनकारक करण्यात आलं. यानंतर अमेरिकेच्या सरकारनं या प्रकरणाबाबत प्रसिद्ध केलेली ही कागदपत्रांची सर्वात मोठी संख्या आहे.
शुक्रवारी (30 जानेवारी) 'एपस्टिन फाईल्स'शी संबंधित 30 लाख पानं, 1 लाख 80 हजार फोटो आणि 2 हजार व्हीडिओ सार्वजनिक करण्यात आले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कायद्यावर सही केल्यानंतर बंधनकारक मुदतीनंतर 6 आठवड्यांनी अमेरिकेच्या न्याय विभागानं ही कागदपत्रं प्रसिद्ध केली. या कायद्यानुसार एपस्टिनशी संबंधित सर्व कागदपत्रं सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करणं बंधनकारक करण्यात आलं होतं.
डेप्युटी ॲटर्नी जनरल टॉड ब्लांच म्हणाले, "प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांमुळे, अमेरिकेच्या जनतेसमोर पारदर्शकपणे माहिती आणण्याबाबत आणि कायद्याचं पालन करण्यासाठीची खातरजमा करण्यासाठी केलेल्या एका अत्यंत व्यापक प्रक्रियेचा हा शेवट आहे. ही प्रक्रिया कागदपत्रांची ओळख पटवण्यासाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी करण्यात आली होती."
या फाईल्समध्ये जेफ्री एपस्टिन तुरुंगात असतानाचे तपशील आहेत. यात एक मानसिक अहवालाचाही समावेश आहे. तसंच या फाईल्समध्ये एपस्टिनचा तुरुंगात असताना झालेल्या मृत्यूची माहिती आहे.
तसंच त्यात एपस्टिनची सहकारी घिसलेन मॅक्सवेलच्या चौकशीचीही कागदपत्रं आहेत. मॅक्सवेलला अल्पवयीन मुलींची तस्करी करण्यासाठी एपस्टिनला मदत करण्यासाठी दोषी ठरवण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
नव्यानं प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये एपस्टिन आणि अनेक हाय-प्रोफाईल व्यक्तींमध्ये झालेल्या ईमेलच्या माहितीचा समावेश आहे.
यापैकी अनेक ईमेल आणि कागदपत्रं एक दशकाहून अधिक जुनी आहेत. यातून एपस्टिनचे संबंध आणि कायदेशीर अडचणी दिसून येतात.
एपस्टिनला, सरकारी वकिलांबरोबर एक वादग्रस्त तडजोड (बचाव पक्ष आणि फिर्यादीमधील तडजोड) केल्यानंतर 2008 मध्ये फ्लोरिडामध्ये एका 14 वर्षांच्या मुलीकडून लैंगिक संबंधांची मागणी केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं.
एका व्यापक लैंगिक तस्करीच्या प्रकरणात एपस्टिन तुरुंगात असताना, ऑगस्ट 2019 मध्ये त्याचा मृत्यू झाला होता.
रशियन महिलेला भेटण्यासाठी एपस्टिनचं 'द ड्यूक'ला आमंत्रण
ब्रिटनमधील उच्चभ्रू वर्गातील लोकांशी या बदनाम फायनान्सरचे (एपस्टिन) जे जवळचे संबंध होते, त्यावर या कागदपत्रांमधून प्रकाश पडतो.
या एपस्टिन आणि 'द ड्यूक' नावाच्या व्यक्तीमधील ईमेल्सचाही समावेश आहे. द ड्यूक म्हणजे अँड्र्रूयू माउंटबॅटन-विंडसर असल्याचं मानलं जातं.
एपस्टिन आणि द ड्यूक यांनी या ईमेल्समध्ये बकिंगहॅम पॅलेसमधील रात्रीच्या जेवणाबद्दल चर्चा केली आहे. या ठिकाणी 'भरपूर प्रायव्हसी' होती.
एपस्टिनच्या आणखी एका संदेशात, 'द ड्यूक'ला एका 26 वर्षांच्या रशियन महिलेशी गाठ घालून देण्याची ऑफर देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, US Department of Justice
या ईमेल्सवर 'ए' (इंग्रजी वर्णाक्षर) अशी सही आहे. त्यावर 'एचआरएच ड्यूक ऑफ यॉर्क केजी' अशी सही वाचता येते. एपस्टिननं एका अल्पवयीन मुलीला लैंगिक संबंधांसाठी प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, ऑगस्ट 2010 मध्ये या ईमेल्सची देवाणघेवाण झाली होती.
या ईमेल्समध्ये कोणतंही गैरकृत्य केल्याचे संकेत मिळत नाहीत.
बीबीसीनं प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अँड्रूयू यांच्याशी संपर्क साधला. आधी त्यांना 'ड्यूक ऑफ यॉर्क' म्हणून ओळखलं जात होतं. माउंटबॅटन-विंडसर यांना एपस्टिनबरोबरच्या त्यांच्या पू्र्वीच्या मैत्रीबाबत अनेक वर्षे चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. मात्र त्यांनी कोणतंही गैरकृत्य केलं असल्याचा वारंवार नाकारलं आहे.
नव्यानं प्रसिद्ध झालेले काही ईमेल्स, एपस्टिन आणि अँड्र्यूच्या माजी पत्नी साराह फर्ग्युसन यांच्यातील असल्याचं दिसतं.
यात एक ईमेल 4 एप्रिल 2009 चा आहे. त्यात 'लव्ह, साराह, द रेड हेड' अशी सही करण्यात आली होती.
त्यात म्हटलं आहे की, त्या पाम बीचमध्ये येणार आहेत आणि त्यांना चहापान करायचं आहे. या ईमेलमध्ये फर्ग्युसनच्या 'मदर्स आर्मी' या कंपनीसाठीच्या कल्पनांबाबत चर्चा करण्यात आली आहे. यॉर्कच्या माजी डचेस यांनी एपस्टिनचा उल्लेख 'माझा प्रिय, विलक्षण आणि खास मित्र जेफ्री' असा केला आहे.
त्या एपस्टिनला 'थोर' म्हणतात. तसंच पुढे म्हणतात, "मला तुझा खूप अभिमान आहे".
ज्यावेळेस या ईमेलची देवाणघेवाण झाली, त्यावेळेस एपस्टिन 2008 मधील शिक्षेमुळे नजरकैदेत होता.
एपस्टिननं मँडेलसनच्या पतीला पाठवले पैसे
इतर ईमेल्समध्ये दिसतं की, एपस्टिननं 2009 मध्ये लॉर्ड पीटर मँडेलसनचे पती रेनाल्डो अविला दा सिल्व्हा यांना 13 हजार 692 डॉलर (आताच्या हिशोबानं अंदाजे 12 लाख 55 हजार 282 रुपये) पाठवले होते.
एपस्टिनला पाठवलेल्या ईमेलमध्ये दा सिल्व्हा यांनी ऑस्टिओपॅथी कोर्ससाठी येणाऱ्या खर्चाची माहिती सांगितली आहे. तसंच त्याच्या बँक खात्याचा तपशील दिला आहे. त्याचबरोबर या फायनान्सरचे म्हणजे एपस्टिनचे 'तुम्ही मला करू शकणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या मदती'साठी आभार मानले आहेत.
काही तासांनी एपस्टिननं त्याला उत्तर दिलं. त्यात त्यानं म्हटलं की, तो त्यांना कर्जाची रक्कम पाठवून देईल आणि दा सिल्व्हा यांनी दुसऱ्या दिवशी त्याला धन्यवाद देणारं उत्तर दिलं. दा सिल्व्हानं 2023 मध्ये मँडेलसनशी लग्न केलं.

फोटो स्रोत, US Department of Justice
ईमेल्सच्या दुसऱ्या एका गठ्ठ्यात लॉर्ड मँडेलसननं एपस्टिनच्या एका मालमत्तेत राहण्याविषयी विचारणा केली आहे.
हे ईमेल्स 16 जून 2009 चे आहेत. त्यावेळी एपस्टिन 18 वर्षांखालील मुलीला वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत होता.
त्याच्या शिक्षेच्या बहुतांश कालावधीत त्याला दिवसा त्याच्या कार्यालयातून काम करण्यास परवानगी होती. त्यानंतर तो दररोज रात्री तुरुंगात परत यायचा.
डिसेंबर 2024 मध्ये लॉर्ड मँडेलसनची नियुक्ती यूकेच्या अमेरिकेतील राजदूत म्हणून झाली. मात्र एक वर्षापेक्षा कमी काळातच त्यांना पदावरून हटवण्यात आलं. कारण एपस्टिनला दोषी ठरवण्यात आल्यानंतर मँडेलसननं त्याला पाठिंबा असल्याचे संदेश पाठवल्याचं समोर आलं होतं.
लॉर्ड मँडेलसननं वारंवार म्हटलं की, त्यांना एपस्टिनबरोबरच्या त्यांच्या पूर्वीच्या मैत्रीबद्दल खेद वाटतो. त्यांची मैत्री दीर्घ काळापासून सार्वजनिकरित्या ज्ञात आहे. त्यांनी सांगितलं की, एपस्टिनबरोबर असताना त्यांनी कधीही कोणतंही चुकीचं कृत्य पाहिलेलं नाही. ते "एपस्टिनच्या खोटारडेपणाला बळी पडले".
ट्रम्प यांचा शेकडो वेळा उल्लेख
एपस्टिन फाईल्सशी निगडीत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचा उल्लेख शेकडो वेळा आहे.
ट्रम्प यांची एपस्टिनबरोबर मैत्री होती. मात्र ते म्हणतात की, त्यांची मैत्री अनेक वर्षांपूर्वीच संपुष्टात आली होती. तसंच त्यांनी एपस्टिनच्या लैंगिक गुन्ह्यांविषयी त्यांना कोणतीही माहिती असल्याचं नाकारलं आहे.
एपस्टिन फाईल्सच्या नव्या कागदपत्रांमध्ये एफबीआयनं गेल्या वर्षी संकलित केलेली एक यादी आहे. यात नॅशनल थ्री��� ऑपरेशन सेंटरच्या टिप लाईनवर फोन करणाऱ्यांनी ट्रम्प यांच्यावर केलेले आरोप नमूद केलेले आहेत.
यातील बरेचसे आरोप एजन्सीला खातरजमा न करता मिळालेल्या माहितीवर आधारित असल्याचं दिसतं. तसंच हे आरोप कोणत्याही पुराव्यांशिवाय करण्यात आले आहेत.
या यादीमध्ये ट्रम्प, एपस्टिन आणि इतर हाय-प्रोफाईल व्यक्तींच्या विरोधात करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांचा समावेश आहे.
ट्रम्प यांनी एपस्टिनच्या संदर्भात कोणतंही चुकीचं कृत्य केल्याचा सातत्यानं इन्कार केला आहे. तसंच एपस्टिनच्या गुन्ह्यांच्या पीडितांनी त्यांच्यावर कोणत्याही गुन्ह्याचा आरोप केलेला नाही.
या ताज्या आरोपांबद्दल विचारलं असता, व्हाईट हाऊस आणि न्याय विभाग या दोघांनीही नवीन कागदपत्रांबरोबरच्या प्रसिद्धीपत्रकातील एका ओळीचा संदर्भ दिला.
"काही कागदपत्रांमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधातील खोटे आणि सनसनाटी दावे करण्यात आले आहेत. ते 2020 च्या निवडणुकीच्या अगदी आधी एफबीआयकडे सादर करण्यात आले होते," असं अमेरिकेच्या न्याय विभागानं म्हटलं आहे.
त्यांनी पुढे म्हटलं, "स्पष्टपणे सांगायचं तर, हे आरोप निराधार आणि खोटे आहेत. जर या आरोपांमध्ये थोडं जरी सत्य असतं, तर त्यांचा वापर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात शस्त्र म्हणून आधीच झाला असता."
'बेटावर 'सर्वात जबरदस्त पार्टी' कधी आहे?'
कागदपत्रांमध्ये एपस्टिन आणि इलॉन मस्क यांच्यामधील ईमेलचा देखील समावेश आहे.
मस्क यांच्यावर या प्रकरणात कोणतंही चुकीचं कृत्य केल्याचा आरोप नाही. त्यांनी पूर्वी सांगितलं आहे की, एपस्टिननं त्यांना त्याच्या बेटावर येण्याचं आमंत्रण दिलं होतं. मात्र त्यांनी ते नाकारलं होतं.
नव्या ईमेल्समध्ये दिसतं की, मस्क यांनी तिथे जाण्याबद्दल एकापेक्षा अधिक वेळा चर्चा केली होती. यात 2012 च्या एका प्रस्तावित ट्रिपचाही समावेश आहे.
या चर्चांमध्ये मस्क यांनी एपस्टिनला विचारलं होतं, "तुमच्या बेटावर सर्वात जबरदस्त पार्टी कोणत्या दिवशी/रात्री असेल?"
नोव्हेंबर 2012 च्या ईमेल्समध्ये दिसतं की, एपस्टिननं मस्क यांना विचारलं होतं की, त्यांना हेलिकॉप्टरनं बेटावर किती जणांना घेऊन जायचं आहे. त्यावर मस्क यांनी उत्तर दिलं होतं की, ते स्वत: आणि त्यांची तत्कालीन पत्नी तलूलाह रिले, एवढेच असतील.
मस्क यांनी 2012 च्या ख्रिसमसमध्ये एपस्टिनला पाठवलेल्या एका ईमेलमध्ये विचारलं आहे की, त्यानं (एपस्टिन) काही पार्ट्यांचं आयोजन केलं आहे का? कारण त्यांना निवांत होत "पूर्ण धमाल करायची आहे".
मस्क यांनी लिहिलं, "मी या वर्षी प्रचंड, वेड्यासारखं काम केलं आहे. त्यामुळे ख्रिसमसनंतर माझी मुलं घरी गेल्यावर, मला सेंट बार्ट्स किंवा इतरत्र पार्टीच्या ठिकाणी जाऊन भरपूर मजा करायची आहे."

फोटो स्रोत, Getty Images
मस्क पुढे म्हणतात की, 'बेटावरील शांततेचा अनुभव'ही त्यांना हव्या असलेल्या गोष्टीच्या अगदी विरुद्ध आहे.
ईमेल्सच्या आणखी एका सेटमध्ये, जो 2013 च्या अखेरीचा आहे, त्यात मस्क आणि एपस्टिन, त्याच्या (एपस्टिन) बेटावर जाण्याविषयी चर्चा करत आहेत. तसंच ते लॉजिस्टिक आणि तारखा ठरवत आहेत.
मस्क एपस्टिनच्या बेटांवर कधी गेले होते की नाही याबद्दलचा कोणताही पुरावा नाही.
मस्क यांनी एक्स या सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं, "मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की, एपस्टिनबरोबरच्या माझ्या काही ईमेल्सचा विपर्यास केला जाऊ शकतो आणि माझ्या विरोधकांकडून माझी बदनामी करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो."
ते पुढे म्हणाले, "मला त्याची पर्वा नाही. मात्र मला चिंता या गोष्टीची आहे की, ज्या लोकांनी एपस्टिनबरोबर हे गंभीर गुन्हे केले, विशेषकरून अल्पवयीन मुलांचं घृणास्पद शोषण केलं, त्यांच्यावर आपण किमान खटला चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे."
एपस्टिनचे सनसनाटी दावे 'हास्यास्पद आणि खोटे' - बिल गेट्स
एपस्टिनचे सनसनाटी दावे 'हास्यास्पद आणि खोटे' असल्याचं म्हणत बिल गेट्स यांनी आरोप फेटाळले आहेत.
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असलेल्या बिल गेट्स यांच्या प्रवक्त्यानं एपस्टिन फाईल्सच्या ताज्या कागदपत्रांमधील धक्कादायक आरोपांना उत्तर दिलं आहे.
यात बिल गेट्स यांना लैंगिक कृतीनं संक्रमित होणारा आजार झाल्याचा आरोप 'पूर्णपणे हास्यास्पद आणि पूर्णपणे खोटा' असल्याचं म्हटलं आहे.
दोन ईमेल, जे 18 जुलै 2013 चे आहेत, ते एपस्टिननंच तयार केले असावेत असं दिसतं. मात्र ते बिल गेट्स यांना पाठवले होते की नाही, हे स्पष्ट नाही.
हे दोन्ही ईमेल एपस्टिनच्या ईमेल आयडीवरून त्याच आयडीवर पाठवण्यात आले होते. मात्र यात बिल गेट्सशी संबंधित कोणताही ईमेल आयडी दिसत नाही. दोन्ही ईमेल्सवर सही नाही.
एक ईमेल, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनमधून राजीनामा पत्राच्या स्वरुपात लिहिण्यात आला आहे. त्यात गेट्स यांच्या "रशियन मुलींबरोबरच्या लैंगिक संबंधाच्या परिणामांना सामोरं जाण्यासाठी" ओषधं मिळवावी लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
तर दुसरा ईमेल, ज्याची सुरुवात 'प्रिय बिल' अशी होते, त्यात बिल गेट्स यांनी मैत्री संपवल्याबद्दल तक्रार केली आहे. तसंच त्यात गेट्स यांनी त्यांच्या तत्कालीन पत्नी मेलिंडासह इतरांपासून लैंगिकदृष्ट्या संक्रमित आजार लपवण्याचा प्रयत्न केल्याचे आणखी दावे केले आहेत.
बिल गेट्स यांच्या प्रवक्त्यानं बीबीसीला सांगितलं, "एका सिद्ध झालेल्या, असंतुष्ट खोटारड्या व्यक्तीनं केलेले हे दावे पूर्णपणे हास्यापद आणि पूर्णपणे खोटारडे आहेत."
त्यांनी पुढे सांगितलं, "या कागदपत्रांमधून फक्त एवढीच गोष्ट दिसून येते की, एपस्टिनचे गेट्स यांच्याबरोबर सातत्यानं संबंध नसल्यानं तो निराश होता आणि त्यांना अडकवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी तो कोणत्या थराला जाऊ शकत होता."
पीडितांची ओळख उघड करण्यावरून टीका
ग्लोरिया ऑलरेड, महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या वकील आहेत. त्यांनी एपस्टिनच्या गुन्ह्यांच्या अनेक पीडितांचं प्रतिनिधित्व केलं आहे.
ग्लोरिया यांनी बीबीसीला सांगितलं की, ताज्या कागदपत्रांमध्ये अनेक पीडितांची नावं उघड करण्यात आली आहेत. यात काही अशा व्यक्तींचाही समावेश आहे, ज्यांची ओळख यापूर्वी उघड करण्यात आली नव्हती.
शुक्रवारी (30 जानेवारी) प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनेक कागदपत्रांमधील माहिती मोठ्या प्रमाणात वगळण्यात आली आहे. कायद्यानुसार फक्त पीडितांचं रक्षण करण्यासाठी किंवा सध्या तपासात असलेल्या माहितीचं रक्षण करण्यासाठीच कागदपत्रांमधून माहिती वगळता येते.
कायद्यानुसार वगळण्यात आलेल्या माहितीचा सारांश देणं आणि त्यामागील कायदेशीर आधार देणं देखील बंधनकारक आहे.
डेप्युटी ॲटर्नी जनरल ब्लांच यांनी सांगितलं की, कागदपत्रांमधून जी माहिती वगळण्यात आली आहे, त्यामागचा उद्देश पीडितांचं रक्षण करण्याचा होता.
न्याय विभागानं ही कागदपत्रं लवकर प्रसिद्ध व्हावीत यासाठी शेकडो कर्मचाऱ्यांद्वारे, दोन महिन्यांहून अधिक काळ त्यांची बारकाईनं तपासणी करून घेतली होती.
मात्र ऑलरेड म्हणाल्या की, ही कागदपत्रं प्रसिद्ध केल्यामुळे पीडितांना 'मानसिक समाधान' मिळेल अशी ब्लांच यांनी व्यक्त केलेली आशा 'हास्यास्पद आहे'.
"त्यांनी अनेक पीडितांची नावं उघड करून त्यांना उदध्वस्त केलं आहे," असं ऑलरेड म्हणाल्या.
"काही प्रकरणांमध्ये त्यांनी पीडितांच्या नावावर रेषा मारल्या आहेत. मात्र तरीदेखील तुम्हाला ती नावं वाचता येतात."
तर इतर प्रकरणांमध्ये, त्यांनी पीडितांचे फोटो दाखवले आहेत. हे असे पीडित आहेत, ज्यांनी कधीही सार्वजनिक मुलाखती दिल्या नाहीत किंवा त्यांनी त्यांची नाव सार्वजनिकरित्या उघड केली नाहीत."
त्या म्हणाल्या की, पीडितांची ओळख लपवण्यासाठी या कागदपत्रांमधील आणखी माहिती वगळण्याची गरज आहे का, हे न्याय विभागाला कळवण्यासाठी त्यांची कायदेशीर टीम काम करत असतानाच, "अनेक लोकांनी ही कागदपत्रं आधीच डाउनलोड केली आहेत."
ऑलरेड म्हणाल्या की, ही 'पूर्णपणे गोंधळा'ची परिस्थिती आहे. त्या म्हणाल्या की, या विभागानं "सर्वात खालची पातळी गाठली आहे" आणि "त्यांना स्वत:ची लाज वाटली पाहिजे."
बीबीसीनं प्रतिक्रियेसाठी न्याय विभागाशी संपर्क साधला होता.
आता एपस्टिन फाईल्सची सर्व कागदपत्रं प्रसिद्ध झाली आहेत का?
एपस्टिन फाईल्स प्रसिद्ध करण्याच्या मालिकेचा हा शेवट आहे की नाही हे अनिश्चित आहे.
ब्लांच यांनी सांगितलं की, शुक्रवारी (30 जानेवारी) प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांमुळे, "दस्ताऐवजांची अत्यंत सर्वसमावेशक ओळख पटवण्याचा आणि त्यांचा आढावा घेण्याच्या प्रक्रियेचा शेवट होतो".
त्यांनी यातून संदेश दिला की, अमेरिकेच्या न्याय विभागाच्या दृष्टीकोनातून, यासंदर्भातील त्यांचं काम पूर्ण झालं आहे.

फोटो स्रोत, US justice department
मात्र डेमोक्रॅट्सचा अजूनही असा युक्तिवाद आहे की, न्याय विभागानं कोणत्याही योग्य कारणाशिवाय खूप जास्त कागदपत्रं रोखून ठेवली आहेत. ती कदाचित जवळपास 25 लाख कागदपत्रं आहेत.
रिपब्लिकन पक्षाचे काँग्रेसमधील सदस्य थॉमस मॅसी यांच्यासह, एपस्टिन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्टचं नेतृत्व करणारे, डेमोक्रॅटिक पक्षाचे काँग्रेसमधील सदस्य रो खन्ना म्हणाले की, ते सावध आहेत.
ते म्हणाले, "न्याय विभागानं सांगितलं आहे की, त्यांना 60 लाखांहून अधिक संभाव्य संबंधित पानं सापडली आहेत. मात्र आढावा घेतल्यानंतर आणि माहिती वगळल्यानंतर ते फक्त 35 लाख पानंच प्रसिद्ध करत आहेत."
"यातून प्रश्न निर्माण होतात की उर्वरित माहिती का रोखून ठेवण्यात येत आहे. मी ज्या गोष्टींसाठी आग्रही आहे, ती कागदपत्रं प्रसिद्ध होतात की नाही, हे पाहण्यासाठी मी यावर बारकाईनं लक्ष ठेवणार आहे."
एपस्टिन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्टमध्ये बंधनकारक केल्यानुसार या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रं प्रसिद्ध करण्याची अंतिम मुदत 19 डिसेंबर होती.
ही मुदत चुकल्याबद्दल न्याय विभागावर तीव्र टीका झाली. हा कायदा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये मंजूर झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये त्यावर सही होऊन त्याचं रुपांतर कायद्यात झालं होतं.
मात्र कागदपत्रं प्रसिद्ध करण्याचा हा अध्याय खरोखरंच संपला की नाही हे पाहणं बाकी आहे.
अनेकजणांना - ट्रम्प यांच्या समर्थकांसह - बऱ्याच काळापासून वाटत आलं की, एपस्टिनशी संबंधित श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांना वाचवण्यासाठी एक कट आखण्यात आला होता.
ब्लांच यांनी कबूल केलं की, ही कागदपत्रं प्रसिद्ध केल्यामुळे अधिक माहितीची गरज पूर्ण होणार नाही. ते म्हणाले की, या कागदपत्रांमध्ये महिलांचं शोषण करणाऱ्या, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या विशिष्ट पुरुषांची नावं नाहीत. न्याय विभागाकडे जर ती नावं असती, तर त्या पुरुषांवर खटला चालवला गेला असता.
ते म्हणाले, "दुर्दैवानं मला वाटत नाही क���, जनता किंवा तुम्ही सर्वजण, एपस्टिन फाईल्समधून महिलांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषांना शोधून काढू शकाल."
(जॅक फेनविक, ची ची इझुंडू आणि ॲमी वॉकर यांचं अतिरिक्त वार्तांकन)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











