कॉमेडियनवर पाळत प्रकरणी सौदी सरकार दोषी? नेमकं प्रकरण काय?

पेगासस वापरून कॉमेडियनचा फोन हॅक, मग पाळत ठेवत थेट हल्ला; न्यायालयानं ठरवलं सौदी सरकारला दोषी

फोटो स्रोत, BBC/Getty Images

    • Author, जॉय टायडी
    • Role, सायबर करस्पाँडंट, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

घनेम अल-मसरिर या युट्युबरला लाखो व्ह्यूज मिळत होते. त्यांना मोठं यश मिळत होतं आणि त्यांची प्रचंड लोकप्रियता होती.

वेम्बली (इंग्लंडमधील ठिकाण) इथं असणाऱ्या त्यांच्या फ्लॅटमधून मोठ्यानं, खूप बोलणारा आणि कधीकधी आक्षेपार्ह किंवा आक्रमक बोलणारा हा कॉमेडियन सौदी अरेबियाच्या राजघराण्यावर टीका करत होता. त्यामुळे ते चर्चेतदेखील होते. त्यांनी चाहते तर मिळवले, मात्र त्याचबरोबर त्यांचे काही अतिशय शक्तिशाली शत्रूही झाले.

अल-मसरिर यांच्या लक्षात आलेली पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या फोनमध्ये विचित्र गोष्टी आढळून येत होत्या. त्यांचे फोन खूपच संथ किंवा हळू झाले होते. त्यांची बॅटरी लवकर संपत होती.

मग त्यांच्या लक्षात आलं की, तेच तेच चेहरे लंडनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांना दिसत होते. सौदी अरेबियातील राजवटीचे समर्थक दिसणारे लोक त्यांना रस्त्यात अडवत होते. त्यांना त्रास देत होते आणि त्यांचं चित्रण करत होते. मात्र ते कुठे आहेत, हे त्यांना सर्ववेळ कसं कळायचं?

फोन हॅक करून अल-मसरिर यांच्यावर पाळत

अल-मसरिर यांना भीती वाटत होती की, त्यांच्या फोनचा वापर करून त्यांच्यावर हेरगिरी केली जात आहे. सायबर तज्ज्ञांनी नंतर पुष्टी केली की, पेगासस या कुप्रसिद्ध हॅकिंग टूलचे ते बळी ठरले होते आणि ते सर्वात अलीकडचे पीडित होते.

"ही गोष्ट पूर्णपणे माझ्या आकलनापलीकडची होती. त्यांना तुमचं लोकेशन दिसतं. ते कॅमेरा चालू करू शकतात. ते तुमचा मायक्रोफोन सुरू करू शकतात. ते तुमचं बोलणं ऐकू शकतात," असं अल-मसरिर यांनी बीबीसीला सांगितलं.

"त्यांनी तुमचा डेटा, सर्व फोटो, सर्वकाही घेतलं. तुम्हाला असं वाटतं की, तुमची प्रायव्हसी भंग करण्यात आली आहे, तुमचं शोषण करण्यात आलं आहे."

सोमवारी (26 जानेवारी), 6 वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर, लंडनमधील उच्च न्यायालयानं या सर्व प्रकारासाठी सौदी अरेबियाला जबाबदार धरलं. तसंच त्यांनी सौदीच्या राजवटीला, नुकसान भरपाई म्हणून अल-मसरिर यांना 30 लाख पौंडांपेक्षा अधिक रक्कम (अंदाजे 37 कोटी 65 लाख रुपये) देण्याचा आदेश दिला.

अल-मसरिर यांचा आयफोन 2018 मध्ये हॅक झाला होता. वृत्तसंस्थांकडून विशेष सदस्यत्वाची ऑफर म्हणून पाठवण्यात आलेल्या 3 टेक्स्ट मेसेजेवरील लिंकवर क्लिक केल्यानंतर हे घडलं होतं.

अल-मसरिर यांच्यावर लंडनच्या मध्यवर्ती भागात हल्ला

फोन हॅक झाल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्यांना त्रास देण्यात आला. तसंच त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात लंडनच्या मध्यवर्ती भागात त्यांना मारहाण करण्यात आली.

न्यायालयात सांगण्यात आलं की, 2 अनोळखी व्यक्ती अल-मसरिर यांच्याजवळ गेले आणि त्यांच्यावर ओरडले. ते अल-मसरिर यांना म्हणाले की, सौदी अरेबियाच्या राजघराण्याबद्दल बोलणारे ते कोण आहेत. त्यानंतर त्या लोकांनी अल-मसरिर यांच्या चेहऱ्यावर ठोसा मारला आणि नंतर त्यांच्यावर हल्ला करणं सुरू ठेवलं.

अल-मसरिर यांचा आयफोन 2018 मध्ये हॅक झाला होता
फोटो कॅप्शन, अल-मसरिर यांचा आयफोन 2018 मध्ये हॅक झाला होता

त्यावेळेस आजूबाजूनं जाणाऱ्या लोकांनी त्यात हस्तक्षेप केला आणि मग ते दोघेजण मागे हटले. ते अल-मसरिर यांना 'कतारचा गुलाम' म्हणाले आणि म्हणाले की, ते 'त्यांना धडा शिकवणार आहेत'.

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी हा शारीरिक हल्ला पूर्वनियोजित असल्याचं म्हटलं. तसंच त्यांनी नमूद केलं की, हल्लेखोरांपैकी एकानं इअरपीस घातला होता.

न्यायालयानं सौदी अरेबियाच्या सरकारला ठरवलं दोषी

न्यायमूर्ती सैनी यांनी त्यांच्या लेखी निकालात म्हटलं, "हा हल्ला आणि फोनचं हॅकिंगसाठी सौदी अरेबियाच्या राजवटीनं किंवा त्यांच्या वतीनं काम करणाऱ्या एजंट्सनं निर्देश दिले होते, असं मानण्यास ठोस आधार आहे."

न्यायमूर्तींनी निकालात म्हटलं, "फिर्यादी सौदी अरेबियाच्या सरकारवर करत असलेली सार्वजनिक टीका थांबवण्यात सौदी अरेबियाच्या राजवटीला स्पष्ट रस होता आणि त्यांचा तसा उद्देश होता."

या हल्ल्यानंतरही अल-मसरिर यांचा छळ सुरूच राहिला. 2019 मध्ये, केन्सिंग्टन कॅफेमध्ये अल-मसरिर यांच्याकडे एक लहान मुलगा आला. त्यानं सौदी राजे सलमान यांची स्तुती करणारं गीत गायलं.

या 45 वर्षांच्या युट्युबरला सौदी अरेबियातील शासकांवर टीका करणाऱ्या त्यांच्या उपहासात्मक युट्युब व्हीडिओंमुळे अरब भाषिक जगात प्रसिद्धी मिळाली.

फोटो स्रोत, The Ghanem Show

फोटो कॅप्शन, या 45 वर्षांच्या युट्युबरला सौदी अरेबियातील शासकांवर टीका करणाऱ्या त्यांच्या उपहासात्मक युट्युब व्हीडिओंमुळे अरब भाषिक जगात प्रसिद्धी मिळाली.

या घटनेचं चित्रीकरण करण्यात आलं आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं. ते स्वत:च्याच हॅशटॅगसह ट्रेंडिंगमध्येही आलं. इतकंच काय, सौदी अरेबियातील सरकारी टीव्हीवरही त्याचं प्रसारण झालं.

त्याच दिवशी, अल-मसरिर पश्चिम लंडनमधील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना एक माणूस त्यांच्याकडे आला. तो अल-मसरिर यांना म्हणाला, "तुझे दिवस भरले आहेत." त्यानंतर तो तिथून निघून गेला.

सौदी अरेबियाच्या राजवटीवर टीका केल्यानं मिळाली प्रसिद्धी

अल-मसरिर यांचा जन्म सौदी अरेबियात झाला. मात्र ते 20 वर्षांहून अधिक काळापासून ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहेत. सुरुवातीला ते पोर्ट्समाऊथमध्ये शिक्षण घेण्यासाठी आले होते.

ते आता ब्रिटिश नागरिक आहेत आणि वेम्बलीमध्ये राहतात. मात्र त्यांच्यावर हल्ला झाल्यापासून ते घरापासून फार दूर जात नाहीत. लंडनच्या मध्यवर्ती भागात जाणं आजही त्यांना भीतीदायक वाटतं.

या 45 वर्षांच्या युट्युबरला सौदी अरेबियातील शासकांवर टीका करणाऱ्या त्यांच्या उपहासात्मक युट्युब व्हीडिओंमुळे अरब भाषिक जगात प्रसिद्धी मिळाली.

विशेषकरून, सौदी अरेबियाचे युवराज आणि सध्या सौदी अरेबियाचे राज्यकर्ते असलेल्या मोहम्मद बिन सलमान यांच्यावरील टीकेमुळे.

मोहम्मद बिन सलमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोहम्मद बिन सलमान

अल-मसरिर यांचे विनोदी व्हीडिओ आणि सौदी अरेबियाच्या सरकारवरील वैयक्तिक टीका करणारे व्हीडिओ व्हायरल झाले. त्यातून त्यांना 34.5 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले.

त्यांच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हीडिओला 1.6 कोटी व्ह्यूज मिळाले. यात त्यांनी सौदी अरेबियात नाचणाऱ्या मुलींच्या व्हायरल झालेल्या व्हीडिओवर अधिकारी रागावल्याबद्दल टीका केली होती. गूढ बाब म्हणजे युटु्यूबवरून या व्हीडिओचा आवाज काढून टाकण्यात आला. हा व्हीडिओ कधी आणि कसा संपादित करण्यात आला याबद्दल अल-मसरिर यांना काहीच माहिती नाही.

'माझं नुकसान कोणत्याही रकमेनं भरून निघणार नाही'

अल-मसरिर यांचा फोन हॅक झाल्यापासून आणि त्यांच्यावर हल्ला झाल्यापासून त्यांनी आत्मविश्वास गमावला. त्यांना नैराश्य आलं आहे आणि ते घाबरलेले आहेत.

कधीकाळी विनोदी आणि स्पष्टपणे बोलणारी ही व्यक्ती बीबीसीशी बोलण्यास तयार झाली होती. मात्र ते खूपच हातचं राखून कमी बोलत होते. त्यांना त्यांचा चेहरादेखील पूर्ण दाखवायचा नव्हता.

गेल्या 3 वर्षांपासून त्यांनी कोणताही व्हीडिओ पोस्ट केलेला नाही. ते म्हणतात की, त्यांना जरी कायदेशीर लढ्यात विजय मिळालेला असला, तरीदेखील त्यांना गप्प करण्यात सौदी अरेबियाच्या सरकारला यश आलं आहे.

"यामुळे माझं जे नुकसान झालं आहे, ते कितीही रक्कम दिली, तरी भरून निघू शकत नाही. त्या हॅकिंगमुळे माझं आयुष्य बदलून गेलं. मी आता पूर्वीचा घनेम राहिलेलो नाही," असं ते म्हणतात.

सिटिझन लॅबनं शोधून काढलं पेगासस स्पायवेअर

टोरंटो विद्यापीठातील सिटिझन लॅबमधील सायबर तज्ज्ञांनींच अल-मसरिर यांचा फोन पेगासस स्पायवेअरद्वारे हॅक झाल्याची पुष्टी केली होती. त्यांनी लंडनला एक विश्लेषक पाठवला होता. त्यांनी म्हटलं होतं की, हे हॅकिंग सौदी अरेबियानंच घडवून आणलं असल्याची मोठी शक्यता आहे.

पेगासस हे एक अतिशय शक्तिशाली आणि वादग्रस्त हॅकिंग टूल आहे. ते एनएसओ ग्रुप या इस्रायलमधील कंपनीनं तयार केलेलं आहे. एनएसओ ग्रुप भर देऊन म्हणतो की, ते त्यांचं स्पायवेअर, दहशतवादी आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी फक्त सरकारांनाच विकतात.

मात्र, हे स्पायवेअर राजकारणी, पत्रकार आणि विरोधकांच्या फोनमध्ये असल्याचं सिटिझन लॅबनं शोधून काढलं आहे. यात अल-मसरिर यांचाही समावेश आहे.

मोहम्मद बिन सलमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोहम्मद बिन सलमान
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अल-मसरिर यांनी जेव्हा पहिल्यांदा सौदी अरेबियाच्या सरकारविरोधात दावा दाखल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सौदी अरेबियाच्या राजवटीनं युक्तिवाद केला की, स्टेट इम्युनिटी ॲक्ट 1978 अंतर्गत त्यांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळालेलं आहे.

मात्र 2022 मध्ये न्यायालयानं निकाल दिला की, सौदी अरेबियाला असं कोणतंही कायदेशीर संरक्षण नाही. तेव्हापासून सौदी अरेबियानं न्यायालयाच्या पुढील कोणत्याही सुनावणीत भाग घेतलेला नाही.

"सौदी अरेबियाच्या राजवटीनं या याचिकेच्या विरोधात बचाव केलेला नाही किंवा या याचिकेला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. तसंच त्यांनी पुढील अनेक आदेशांचं उल्लंघन केलं आहे. ते या सुनावणीत सहभागी होण्याची शक्यता दिसत नाही," असा निष्कर्ष उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी काढला.

अल-मसरिर यांना एकूण 30 लाख 25 हजार 662.83 पौंडची (अंदाजे 38 कोटी रुपये) नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. मात्र सौदी अरेबियाचं सरकार ही रक्कम देईल की नाही, हे स्पष्ट नाही.

बीबीसीनं सौदी अरेबियाच्या लंडनमधील दूतावासाला संपर्क केला होता. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

'सौदी अरेबियातील राजवटीचा ढोंगीपणा उघड'

अल-मसरिर म्हणतात की, हा निकाल लागू करण्याबाबत त्यांचा दृढनिश्चय आहे. तसंच आवश्यकता असल्यास आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचीही त्यांची तयारी आहे.

मात्र या हॅकिंगमुळे त्यांच्या आयुष्यात जी उलथा-पालथ झाली आहे, त्याची भरपाई कोणत्याही रकमेनं होऊ शकणार नाही, असं ते म्हणतात.

"लंडनमध्ये - ग्रेट ब्रिटनमध्ये - अशा प्रकारचं कृत्य करून ते यातून सुटले याबद्दल मला निराश वाटतं," असं अल-मसरिर म्हणाले.

अलीकडेच सौदी अरेबियात झालेल्या हाय-प्रोफाईल कॉमडी फेस्टिव्हलवरही अल-मसरिर यांनी प्रतिक्रिया दिली. या महोत्सवात जिमी कार, केविन हार्ट, ओमिद जलिलि आणि बिल बर यासारख्या कॉमेडियनने सादरीकरण केलं होतं.

या कार्यक्रमावर आणि त्यात सहभागी झालेल्या कॉमेडियनवर ह्युमन राईट्स वॉचनं टीका केली होती.

"हा मोठा कॉमेडी फेस्टिव्हल सादर करत असतानाच ते लंडनमध्ये एका कॉमेडियनचा फोन हॅक करत आहेत आणि त्याच्यावर दिवसाढवळ्या ह��्ला करत आहेत," असं अल-मसरिर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "सौदी अरेबियातील राजवट किती दांभिक, ढोंगी आहे, हे यातून दिसून येतं. त्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेलेल्या कॉमेडियनबद्दलचा माझा बराचसा आदर कमी झाला आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)