'नवले पूल परिसरातील सततच्या अपघातांमागे मुख्य कारण रस्त्याचा तीव्र उतार'; बदल करणं हाच अपघात थांबवण्याचा उपाय?

फोटो कॅप्शन, 13 नोव्हेंबर 2025 रोजी पुण्यातील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात कोमलचे आई-वडील आणि बहीण मृत्यूमुखी पडले.
    • Author,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, पुणे

"आज माझे आई-वडील नाहीत, बहीण नाही, मी एकटी राहिलीय. 'बाळ, तू लवकर घरी ये' असं म्हणत फोन करणारं कुणीच उरलं नाही."

13 नोव्हेंबर 2025 रोजी पुण्यातील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातात पुण्यातील धायरी येथे राहणाऱ्या कोमलच्या आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू झाला.

आईबाबांच्या आठवणी सांगताना कोमलचे डोळे सतत पाणावलेले होते. घरातल्या नीरव शांततेत फक्त कोमलचे हुंदके ऐकू येत होते.

नवले पुलावर काही मिनिटांत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि कोमल अक्षरशः एकटी पडली.

घरात आजही तिच्या आईचा आवाज, वडिलांची हाक, बहिणीचं हसणं या सगळ्या गोष्टींचे भास होतात, असं ती सांगते.

हॉलमध्ये बसलेली कोमल सतत दाराकडे पाहून आईबाबा आणि बहिणीला हाक मारत होती.

"आज मी घरी जाते तेव्हा माझ्या घरी कुणीच नसतं. माझी आई नसते, वडील नसतात. मला कुणी बोलवायला येत नाही. आधी आई फोन करून म्हणायची, 'बाळा, लवकर ये, आम्ही वाट बघतोय तुझी.' आता माझी वाट बघणारं कुणीच उरलं नाही," कोमल जेव्हा हे सांगत होती तेव्हा तिच्या नातेवाईकांचाही उर भरून आला होता.

घरातले सगळेच लोक तिच्या दु:खाने भावूक झाले होते.

मात्र, नवले पुलावर घडलेला हा एकमेव अपघात नाही. या भागात सातत्याने अनेक अपघात होत आहेत.

या पार्श्वभूमीवर स्थानिक लोक काय सांगतात, या अपघातांमागील कारणांवर तज्ज्ञ काय म्हणत आहेत आणि प्रशासन-सरकारचं म्हणणं काय हे समजून घेऊयात.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

दाभाडे-नवलकर कुटुंबाबाबत काय घडलं?

नवले पुलापासून काहीच किलोमीटर अंतरावर दाभाडे आणि नवलकर कुटुंबीय राहतात.

दाभाडे कुटुंबातील वडील दत्तात्रय ��ाभाडे यांना काही महिन्यांपासून पॅरालिसिसचा त्रास होता. त्यामुळे गेल्या पाच गुरुवारपासून ते देवदर्शनासाठी जात होते.

त्यांच्यासोबत त्यांची मोठी मुलगी स्वाती नवलकर, पत्नी शांता दाभाडे, वाहन चालक धनंजय कोळी आणि एक चिमुकली; असे पाचही लोक एका कारमध्ये होते.

त्या दिवशीही ते नेहमीप्रमाणे दर्शन करून माघारी निघाले होते. कात्रज पूल ओलांडल्यानंतर कोमलला फोन करून आम्ही 10 मिनिटांत घरी पोहोचतोय म्हणून आईने सांगितलं.

पण मागून ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने त्यांच्या कारचा घात केला. त्यात लोखंड असल्याने तो सुसाट सुटला आणि अनेक वाहनांना धडक दिली.

शेवटी वेगाने धावणाऱ्या याच कंटेनरने त्यांच्या कारला चिरडलं. तोच कंटेनर पुढे युरिया घेऊन जाणाऱ्या दुसऱ्या कंटेनरला धडकला तेव्हा कारमध्ये असलेल्या सीएनजी टाकीचा स्फोट होऊन आग लागली आणि क्षणार्धात सगळंच संपलं.

या अपघातात सर्व 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.

आसपासच्या लोकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला पण आग इतकी भीषण होती की काहीच करता आलं नाही. दाभाडे कुटुंबाचा संपूर्ण संसार एका क्षणात राख झाला.

नवले पुल भागात वारंवार अपघात

प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असतानाच 13 नोव्हेंबरच्या घटनेनंतर याच परिसरात पुन्हा अपघात घडले आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते अपघातानंतर माध्यमं, अधिकारी आले, चर्चा झाली; पण रस्त्यावर मोठा बदल झालेला दिसत नाही.

त्या घटनेनंतर नवले पुलावर आणखी अपघात झाले आहेत. 23 नोव्हेंबरला रात्री पुण्याहून बेंगळुरूच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी कारने डिव्हायडरला धडक दिली. या प्रकरणात कारचा चालक दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जात आहे.

बीबीसी मराठीने अपघातस्थळापासून काही अंतरावर फर्निचर दुकान चालवणारे सौरभ भड यांच्याशी बातचित केली.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, 23 नोव्हेंबर रोजी रात्री पुण्याहून बेंगळुरूच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी कारने डिव्हायडरला धडक दिली. या प्रकरणात कारचा चालक दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जात आहे.

ते म्हणाले, "13 नोव्हेंबरच्या अपघातानंतरही अपघात झालेत. यात एका टू-व्हीलर अपघाताचा आणि एका पिकअप अपघाताचा समावेश आहे. 6 गाड्या एकमेकांना धडकल्या. रोज काही ना काही घडतंय. हा रस्ता धोकादायक झालाय. इथे बसायला आम्हाला भीती वाटते."

याच रस्त्याजवळील आणखी काही व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाड्यांचे ब्रेक फेल होणे, वेग कमी न करणे, चुकीची ओव्हरटेक, अचानक समोर येणाऱ्या बसेस, या सगळ्यांमुळे इथे अपघात होतात आणि उपाययोजना कागदावरच राहतात.

नवले पुलाचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?

नवले पूल परिसरात अपघात होण्यामागे अनेक कारणं आहेत. रस्त्यांच्या संपूर्ण व्यवस्थेत (इको सिस्टम) गडबड असेल, तर अपघातांचं प्रमाण वाढतं. पण यामागे मुख्य कारण म्हणजे कात्रजच्या बोगद्यापासून सुरू होणाऱ्या उतारामुळे नवले पुलाजवळ सतत अपघात होत असल्याचं त��्ज्ञ सांगत आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

याशिवाय, अनेकदा इंधन वाचवण्यासाठी जड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे ड्रायव्हर उतारावर गाडी न्यूट्रल करतात. त्यामुळे वाहन बंद असताना हायड्रॉलिक ब्रेक लागत नाहीत. परिणामी ब्रेक फेल होण्याच्या घटना घडतात. अचानक तीव्र उतार आणि तीव्र चढ असलेल्या रस्त्यांवरून गाड्या घसरतात आणि प्रसंगी पलटी देखील होतात, असं याआधी बीबीसीशी बोलताना आयआयटी दिल्लीमधील स्थापत्य अभियांत्रिकीचे प्राध्यापक गीतम तिवारी यांनी सांगितलं.

दुसरीकडे, भारतातील रस्त्यांची रचना कागदावर कितीही नीट आखलेली असली, तरी प्रत्यक्षातील बांधकाम आणि त्या मार्गावरच्या वाहतुकीचे वास्तव चित्र पूर्णपणे वेगळे असते, असं पुणे परिसर संस्थेचे प्रोग्राम डायरेक्टर आणि रस्ते सुरक्षा अभ्यासक रणजीत गाडगीळ सांगतात.

ते पुढे म्हणाले, "जुना रस्ता एका पद्धतीने तयार केला असला तरी त्यात पुढे भरपूर बदल होतात. नवीन रस्ते बांधल्यावर महामार्गावर कुठेही ओपनिंग केले जातात. काही दिवसांनंतर महामार्गाजवळील जमिनीचा वापर बदलतो. रस्त्यावर अतिक्रमण वाढते."

फोटो कॅप्शन, कात्रज बोगदा संपला की अनेक ठिकाणी अशा सूचना पाट्या लावलेल्या दिसतात.

"वाहन चालवण्यासाठी लायसन्स देताना पुरेशी काळजी घेतली जात नाही. रस्ते सुरक्ष���च्या बेसिक गोष्टी माहिती नसतानाही लोकांना लायसन्स दिले जाते. दुसरीकडे लोक रस्ते नियम पाळत नाहीत आणि प्रशासनही त्यावर कठोर कारवाई करत नाही", असं निरीक्षण गाडगीळ नोंदवतात.

फोटो कॅप्शन, गेल्या पाच वर्षांत कात्रज बोगदा ते चांदणी चौक दरम्यान अडीचशेपेक्षा जास्त अपघात झाले आहेत आणि शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय.

"नवले पूल आता कुप्रसिद्ध ठिकाण झालंय, कारण तिथे सतत अपघात होताना दिसतात. मुख्य कारण म्हणजे तिथला उतार (Gradient). हा उतार अचानक वेग वाढवतो. त्यातच जड वाहनं, कंटेनर, डंपर, स्कूटर्स, कार अशी मिश्र वाहतूक होते. कुणाचाही वेग, वजन, ब्रेकिंग डिस्टन्स सारखं नसतं. यामुळे छोटीशी चूक देखील मोठा अपघात बनते," असं गाडगीळ नमूद करतात.

ते पुढे म्हणाले, "अनेकदा लांब पल्ल्याच्या बसेसही तिथे थांबतात. प्रवाशांना उतरवतात किंवा घेतात. या वेळी मागून वेगाने आलेलं वाहन अचानक थांबू शकत नाही. तसंच दोन वाहनांमधील सुरक्षित अंतर ठेवलं जात नाही."

प्राध्यापक गीतम तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "रस्ते बांधताना सुरक्षेचे सगळे नियम पाळण्यात आलेले आहेत का? आणि चालकांसाठी पुरेशी काळजी घेण्यात आलेली आहे का? हे पाहिलंच जात नाही. यासंबंधी प्रशासनाकडून रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदारांना जाबही विचारला जात नाही. फक्त किती किलोमीटरचा रस्ता बांधला हे पाहून रस्त्याच्या लांबीनुसार कंत्राटदाराला पैसे देऊ केले जातात."

"चुकीच्या पद्धतीने रस्ता बांधण्याची कुठली शिक्षा कंत्राटदाराला दिली जात नाही. त्यामुळे अवैज्ञानिक पद्धतीने सुरक्षेचा फारसा विचार न करता कंत्राटदार सगळे नियम बासनात गुंडाळून रस्ते बांधत सुटतात," अशा शब्दात प्राध्यापक तिवारी यांनी समस्येवर बोट ठेवलं.

सरकारची तातडीची उपाययोजना

अपघातानंतर 15 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

त्यानंतर नवले पुल परिसरातील अपघात थांबवण्यासाठी तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

भारतीय रस्ते काँग्रेसच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यावर भर देत मोहोळ यांनी जांभूळवाडी ते वारजे रिंगरोडच्या डीपीआरला गती देण्याची, उन्नत कॅरिडॉरचा डीपीआर मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी लवकरात लवकर सादर करण्याची आणि जांभूळवाडी–रावेत मार्गावरील सर्व्हिस रोड आणि अंडरपासची कामे वेगाने पूर्ण करण्याची सूचना केली.

या परिसरातील महामार्गावरील स्पीड गन 3 वरून 6 करण्यास, वेगमर्यादा 60 वरून 30 किमी प्रतितास करण्यास, तसेच अवजड वाहनांची कठोर तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले.

फोटो कॅप्शन, नवले पुलाजवळ अपघात झालेल्या कंटेनरची नंबर प्लेट.

रस्त्यावर रिफ्लेक्टर वाढवणे, पीएमपीएलने अधिकृत बसथांबे निश्चित करणे, अतिक्रमण तातडीने हटवणे आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच पीएमआरडीएने समन्वयाने काम करण्याचे निर्देशही देण्यात आले.

दिलेल्या सूचना आणि त्यानुसार झालेल्या कामांचा आढावा डिसेंबरमध्ये घेतला जाणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे.

याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, 13 नोव्हेंबरची ही एकच घटना नाहीये, पुणे शहर ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 5 वर्षांत कात्रज बोगदा ते चांदणी चौक दरम्यान 250 पेक्षा जास्त अपघात झाले आहेत आणि 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय.

दुसरीकडे एखाद्या ठिकाणी सातत्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत राहणं ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही; ती व्यवस्था, नियोजन, आणि जबाबदारी या तिन्हींच्या अपयशाची मालिका ठरतेय.

अनेक राष्ट्रीय महामार्ग चुकीच्या पद्धतीने बांधले - गडकरी

मार्च 2025 मध्ये दिल्लीत रस्ता सुरक्षेविषयीच्या एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, "लोकांना कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे लोक वाहतुकीचे नियम सर्रास धुडकावून लावत बेजबाबदारपणे वाहन चालवतात. लोकांचा हा हलगर्जीपणाच भारतातील रस्ते अपघाताचं प्रमुख कारण आहे."

याशिवाय भारतातील रस्ते बनवताना स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये देखील अनेक मूलभूत चुका झालेल्या असल्याचं खुद्द गडकरींनीच मान्य केलं होतं.

फोटो कॅप्शन, 13 नोव्हेंबर रोजी अपघात झालेल्या एक कंटेनरची अवस्था

"भारतातील तब्बल 59 राष्ट्रीय महामार्ग चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले आहेत. या महामार्गांवरती एकूण 13,795 अपघात प्रवण क्षेत्र आहेत. त्यापैकी फक्त 5,036 क्षेत्रांची डागडुजी करण्यात आलेली आहे. भारतातील रस्ते सुरक्षित नसण्यामागचे सर्वात मोठे गुन्हेगार हे आपले सिव्हील इंजिनिअर्स आहेत," असं वक्तव्य केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी संसदेतील आपल्या भाषणात केलं होतं.

ट्रान्सपोर्टेशन रिसर्च ॲन्ड इन्जुरी प्रिव्हेंशन सेंटरनं दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भारतातील रस्ते वाहतुकीच्या सुरक्षेचं परिक्षण करणारा एक अहवाल बनवला होता. या अहवालातून भारतातील रस्ते बांधणीत अनेक अक्षम्य आणि मूलभूत चुका झालेल्या असल्याचं समोर आलं.

अपघात रोखण्यासाठी काय काय करावं लागेल?

अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर बोलताना गाडगीळ म्हणाले, "महामार्गाजवळ स्पष्ट सुरक्षा चिन्हांच्या पाट्या आणि अपघातप्रवण ठिकाणी पुरेशी लाईट असणे अत्यावश्यक आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहनांचा वेग कमी करणे. त्यामुळे भीषण अपघातांची तीव्रता कमी होऊ शकते."

"अपघात झाला तरी कमी वेगामुळे जखमा होतील, पण मृत्यूची शक्यता मोठ्या प्रमाणात घटते. रंबल स्ट्रिप्स, स्पीड गन्स आणि स्पीड ब्रेकर्स यांसारख्या उपाययोजना तातडीने करणं गरजेचं आहे. त्यामुळे ट्रॅफिक थोडं वाढू शकतं, पण ते अपघातांपेक्षा नक्कीच परवडणारे आहे."

"ज्या देशांत अपघात कमी होतात, त्यामागे तिथले लोक फक्त शिस्त पाळतात एवढंच कारण नाही. तर तिथे ट्रॅफिकचे नियम कडक असतात आणि त्यांची अंमलबजावणीही काटेकोरपणे केली जाते," असंही गाडगीळ म्हणाले.

चूक नसताना जीव गमावलेल्यांना कोण न्याय देणार?

5 वर्षांत 100 हून अधिक अपघातांच्या मालिकेनंतर नवले पुलाबाबत एक प्रश्न अजूनही उत्तराविना आहे, एकाच ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांची जबाबदारी कोण घेणार? लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार? चुक नसताना जीव गमावणाऱ्या लोकांच्या कुटुंबाला न्याय कोण देणार?

फोटो कॅप्शन, मयत स्वाती नवलकर यांच्या घरातील शोकाकुल नातेवाईक आणि शेजारी.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कोमलसारख्या अनेकांची कहाणी सांत्वनाच्या पलीकडे जाते.

तिच्या कुटुंबासारखे शेकडो कुटुंब या रस्त्याने उद्ध्वस्त झाले आहेत. व्यवस्था चुकली की त्याची शिक्षा सामान्य लोकांना सहन करावी लागते.

आजही नवले पुलावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाच्या मनात एकच भीती असते, पुढे काय होईल?

रस्ते सुरक्षित करण्याच्या घोषणा, योजना आणि बैठका होत राहतील. पण तोपर्यंत कोमलसारख्या लोकांचं आयुष्य तसंच थांबून राहील. रिकाम्या घरात, न भरून निघणाऱ्या पोकळीत, उत्तरांच्या शोधात.

नवले पुलाप्रमाणेच रस्ते अपघात ही भारतातील सर्वात मोठी शोकांतिका बनत चालली आहे‌.

पण या अपघातांना आपण आता इतके सरावलो आहोत की, त्यांची तीव्रता अथवा गांभीर्य आपल्याला लक्षात येत नाही. पण रस्ते अपघात या भारतातील लोकांच्या अवेळी मृत्यूचं सर्वांत मोठं कारण बनत चालले आहे, या वास्तवाकडे कानाडोळा करणं आपल्याला खचितच परवडणारं नाही.

त्यामुळे भारतातील रस्ते सुरक्षित नसण्यामागचे सर्वात मोठे गुन्हेगार हे आपले सिव्हील इंजिनिअर्स आहेत, असं म्हणणारे मंत्री आणि सरकार या कारणांवर काय उपाययोजना करते आणि हे अपघात थांबतात का हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)