'मुलगा परत येणार नाही...', मराठी-हिंदी वादात बळी गेलेल्या अर्णव खैरेच्या वडिलांनी काय म्हटलं?
फोटो स्रोत, UGC
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
"अर्णव ट्रेनमध्ये गर्दीत, 'थोडा आगे हो जाओ' म्हणाला म्हणून मारहाण झाली. त्याने तो खूप घाबरला अन् घरी येऊन हे घडलं. भाषिक वाद नको, माझा मुलगा गेला आहे. तो परत काही येणार नाही. पुन्हा असे प्रकार घडू नये"
ही भावनिक प्रतिक्रिया आहे, मुंबई लोकलमध्ये वाद झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या 19 वर्षीय अर्णव खैरे याचे वडील रवींद्र खैरे यांची.
कल्याण पूर्व परिसरात राहणारा अर्णव खैरे 18 नोव्हेंबर रोजी कॉलेजला जात असताना ट्रेनमध्ये प्रवाशांची त्याचा वाद झाला.
या वादानंतर अर्णव घाबरला आणि त्याने घरी जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये वडील रवींद्र खैरे यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.
कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक निधनाची नोंद करत वडिलांच्या जबाबानुसार चौकशीला सुरू केली आहे अशी माहिती कल्याण पोलीस सहाय्यक आयुक्त यांनी दिली आहे.
नक्की काय घडलं?
18 नोव्हेंबर 2025 चा दिवस. सकाळची वेळ होती. अर्णव खैरे हा एसवाय बीएससीचा विद्यार्थी. कल्याण पूर्व परिसरातील आपल्या घरातून तो कॉलेजच्या दिशेने निघाला.
कल्याणहून सीएसटीच्या दिशेने जाणारी लोकल त्यानं पकडली. त्यावेळी ट्रेनमध्ये खूप गर्दी होती.
ट्रेन ठाकुर्ली परिसरात येत असताना खूप गर्दी असल्याने अर्णवला धक्का लागत होता. त्यामुळं समोर असलेल्या एका व्यक्तीला अर्णवने, 'थोडा आगे हो जाओ', असं म्हटलं.
अर्णववर गर्दीचा ताण येत होत असल्यामुळे, त्याने त्यांना अशाप्रकारे विनंती केली. पण त्याचवेळी गर्दीतील एका प्रवाशाने अर्णवच्या कानाखाली मारली.
"मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलायला लाज वाटते का?" अशी विचारणा अर्णव करण्यात आली. तर इतर सहकारी प्रवाशांनीही अर्णवला मारहाण केली आणि घाबरवलं.
फोटो स्रोत, UGC
कॉलेजमध्ये जाण्यासाठी अर्णवला मुलुंड येथे उतरायचं होतं, मात्र तो घाबरून ठाण्यातच उतरला. त्यानंतर लगेचच घाबरलेल्या अवस्थेत तो घरी आला. अर्णवने आई - वडिलांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
त्यानंतर पुन्हा ठाण्यावरून लोकल पकडून तो मुलुंडच्या दिशेने कॉलेजला गेला. कॉलेजमध्ये तब्येत बरी नसल्याने प्रॅक्टिकल अर्धवट सोडून तो घरी निघाला.
घरी येताना वडिलांनी त्याला दुपारी कॉल केला. बरं वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं, सकाळची घटना त्याने पुन्हा वडिलांना सांगितली. त्या घटनेने तो मानसिक तणावात होता. सर्व घटना सांगून त्याने पुढे फोन बंद केला आणि तो घरी आला.
यानंतर सायंकाळी वडील कामावरून परतल्यानंतर सातच्या सुमारास घराचा दरवाजा बंद येत असल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा त्यानं आत्महत्या केल्याचं लक्षात आलं.
"माझा मुलगा तर गेला पुन्हा परत येणार नाही"
या घटने संदर्भात माध्यमांशी बोलताना अर्णवचे वडील रवींद्र खैरे यांनी सांगितलं की, "अर्णव या घटनेनंतर खूप घाबरला होता. कारण आम्ही घरामध्ये कधीही शिव्या देत नाही.
चांगले संस्कार असल्यामुळे तो कोणाशी भांडतही नव्हता. समजा त्याला शिव्या देता आल्या असत्या, प्रतिकार करता आलं असतं. तर आणखी भांडण वाढलं असतं.
पण त्याने प्रतिकार केला नाही. मला वाद वाढवायचा नव्हता, त्यामुळे मी काही बोललो नाही असं अर्णवनं आईला सांगितलं."
पुढे रवींद्र खैरे म्हणाले की, "कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात आम्ही तक्रार केली आहे. मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही.
आम्हाला पक्षीय वाद नको. भाषिक वाद नको. अशा प्रकारचे कोणतेही वाद आणि घटना होऊ नये, माझा मुलगा तर गेला. पुन्हा परत येणार नाही, आम्हाला पोलिसांवर विश्वास आहे योग्य तपास करून योग्य कार्यवाही होईल."
'एडीआर दाखल'
कल्याण सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी गेटे यांनी या घटने संदर्भात माध्यमांशी बोलताना म्हणाले की, कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी आकस्मिक निधनाची नोंद दाखल आहे.
वडिलांच्या जबाबानुसार ट्रेनमध्ये 19 वर्षीय मुलाचा वाद झालाय, त्या मानसिक तणावाखाली घरी आत्महत्या केली आहे. त्यामुळे आम्ही एडीआर दाखल करून या प्रकरणी विविध बाजूने तपास सुरू केला आहे."
पुढे गेटे म्हणाले की, "याप्रकरणी सीसीटीव्ही तपासून आणि प्रवासी यांची चौकशी करून तपास झाल्यानंतर याप्रकरणी अधिक बोलता येईल.
पण प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार वाद झालाय आणि त्यातून हे प्रकार घडला आहे यानुसार आम्ही तपास करतोय."
राजकीय आरोप-प्रत्यारोप
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या घटनेचा सखोल तपास करून कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे. याप्रकरणी मनसेचे विभाग प्रमुख योगेश गव्हाणे यांनी म्हटलं आहे की, "या प्रकरणात मारहाण करणारे लोक मराठी आहेत की परप्रांतीय हे पोलीस निश्चितच तपासून काढतील.
चुकीच्या व्यक्तींसोबत मनसे उभी राहणार नाही. भाषिक वाद नको. मनसे मराठी माणसाच्या पाठीशी कायम उभी आहे. या मुलाला देखील न्याय मिळावा यासाठी आमची कायम मागणी असणार आहे. राजकारण कोणी करू नये."
फोटो स्रोत, @AmeetSatam
भाजपाने या प्रकरणामुळं प्रार्थनेचं आयोजन केलं. भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, "स्व. अर्णव खैरे या तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्राला हळहळला आहे.
मारहाणीच्या घटनेनंतर आत्महत्या करण्यास अर्णवला भाग पाडणारी परिस्थिती ही अत्यंत वेदनादायी आहे. काही राजकीय पक्ष आणि नेते समाजात तेढ निर्माण करणारी प्रक्षोभक विधाने करत आहेत.
लोकांच्या भावना भडकवणाऱ्या अशा वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या विषारी वातावरणाचाच परिणाम अर्णव खैरे यांच्या या दुःखद घटनेत दिसून येतो."
"अशा राजकीय प्रवृत्ती आणि व्यक्तींना सद्बुद्धी प्राप्त व्हावी, यासाठी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी, मुंबई भारतीय जनता पार्टीतर्फे 'सद्बुद्धी द्या' ही प्रार्थना आयोजित करण्यात आली."
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "काही पक्ष आणि नेते भाषेवरुन राजकीय तेढ निर्माण करत आहेत. स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी प्रक्षोभक विधानं करत आहेत.
लोकांची माथी भडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. याचाच परिणाम होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. उद्धव आणि राज ठाकरे समाजात तेढ पसरवत आहेत. समाजात विष पसरवत आहेत.
भाषा हे संपर्काचं माध्यम आहे, ते संघर्षाचं माध्यम नाही. पण या त्यांच्या राजकारणामुळे एका मराठी मुलाला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतला मराठी माणूस त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अर्णव खैरेच्या मृत्यूवर शिवसेना उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे आणि अमित साटम यांच्यावर प्रत्यारोपही केला आहे.
त्या म्हणाल्या, "कल्याणमधील अर्णव खैरे यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मात्र जात आणि धर्माच्या राजकारणात प्रत्येकाला ओढण्याचा DNA असलेल्या भाजपाकडून या मृत्यूचे राजकारण केले जात आहे.
अर्णव खैरे मृत्यू प्रकरणाचं राजकारण करणाऱ्या अमित साटमांनी लक्षात घ्यावं, महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी किंवा हिंदू विरुद्ध मुस्लीम या जातीय आणि धार्मिक दंगली उसळवून त्यात जे बळी गेले त्याला कारण असलेल्या भाजपावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवण्याची हिंमत आधी ठेवा... एखाद्याच्या मृत्यूचे राजकारण करण्यापेक्षा लोकाभिमुख प्रश्नांवर बोलायला शिका.. आपल्याला मुंबई प्रदेशचे अध्यक्ष पद दिले त्याला साजेस काम करा."
फोटो स्रोत, X/@tehseenp
समाजमाध्यमात या घटनेवर प्रतिक्रिया उमटत आहेत. एक्स या प्लॅटफॉर्मवर तेहसिन पुनावाला लिहितात, फक्त 19 वर्षांचा तरुण... विज्ञान शाखेचा विद्यार्थी अर्णव खैरे... हिंदीत बोलल्यामुळे लोकल ट्रेनमध्ये जमावाने मारहाण केली, अपमान केला आणि शेवटी त्याने आत्महत्या केली! किती भयानक आहे हे!
काही दिवसांपूर्वी मी विचारलं होतं, उद्धवजींच्या आणि लोकांनी नाकरलेल्या ठाकरेजींची नेपो मुलं क्लब, डिस्कोमध्ये पार्टी करताना मराठीत बोलतात का? त्यांच्या मुलांचा वावर आलिशान हॉटेल्स, लाउंजेस आणि डिस्कोमध्ये समजातल्या अत्यंत उच्चभ्रू वर्तुळातील लोकांबरोबर सोबत असतो... पण गरीब, असहाय्य, दुर्बल लोकांना अपमानित करून मारहाण केली जाते! महाराष्ट्रा जागा हो! टीप : ठाकरे कुटुंबही बिहारहून महाराष्ट्रात स्थलांतरित झालं आहे!
भूमिपुत्रांना शिवसेनाच सांभाळू शकेल- उद्धव ठाकरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज मातोश्रीवर अर्णव प्रकरणावर भाष्य करताना म्हणाले की, "आता भाजप व संघ भाषिक प्रांतवाद पेटवत आहेत. काल-परवा एक दुर्दैवी घटना घडली. ती घडायला नको होती. भाषेवरून कुणाचे खून करा, कुणाला मारा अशी आपली मागणी नाही. पण कुणी कोणत्याही भाषेने कोणत्याही भाषेवर अत्याचार करू नये.
हा भाषिक प्रांतवाद सुरू झाला कुठून? मागाठाणे येथील एकाने (शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे) मराठी माझी आई आहे आणि माझी आई मेली तरी चालेल असे विधान केले होते. हे लोक अशा पद्धतीने जनतेत राग पसरवत आहेत. त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करायची?"
पुढे ठाकरे म्हणाले की, "संघाचे एक पदाधिकारी भय्याजी जोशी यांनी घाटकोपरमध्ये येऊन बोलून गेले होते की, तेथील मातृभाषा गुजराती आहे. मग हे विष जे आहे ते भाजप व संघ पसरवत असून, त्याचे खापर आपल्यावर फोडले जात आहे.
तोडा, फोडा व राज्य करा हे त्यांचे धोरण आहे. त्यापासून आपल्याला सावध राहायचे आहे. आपल्याला आपल्या भूमिपुत्रांना सांभाळायचे आहे. हे काम केवळ आपली शिवसेनाच करू शकते याचे मला समाधान वाटते."
"कल्याणमधील मराठी मुलाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्न करणार आहे. जे कुणी दोषी आहेत, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहीजे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. सदर घटनेचे समर्थन होऊच शकत नाही, आम्ही पूर्णपणे अर्णव खैरेच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत", असे देशपांडे यांनी सांगितले.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.
तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
मोठ्या बातम्या
बीबीसी मराठी स्पेशल
लोकप्रिय
मजकूर उपलब्ध नाही