'माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नसून तिची हत्या झालीय'; दिशा सालियनच्या वडिलांची याचिका

- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुलीच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली. ही याचिका बुधवारी दाखल केली आहे.
सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. आमदार आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. यासह सीबीआय चौकशीची देखील मागणी करण्यात आल्याने हे प्रकरण राज्यात पुन्हा चर्चेत आहे.
दरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले, "गेली पाच वर्षं माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जातो आहे. हे प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे आम्ही कोर्टात बोलू."
या प्रकरणाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही उमटताना पहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार या प्रकरणी टीका टिपण्णी करत आहेत.


कोण आहे दिशा सालियन?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी व्यवस्थापक म्हणून दिशा सालियन मुंबईत काम करत होत्या.
8 जून 2020 रोजी मुंबईत दिशा सालियनचा बाल्कनीमधून पडून मृत्यू झाला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची नोंद केली.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून 2020 रोजी दिशाला लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीचा फोन आला. फोनवर बोलत ती आतमध्ये गेली.
दिशाच्या लंडनमधील मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दिशाने लॉकडाऊन अजूनही सुरू असून काम बाकी असल्याचं सांगितलं. ती थोडी चिंतेत वाटत होती. त्यानंतर तिचे मित्र आणि होणारा नवरा रोहन यांनी खोलीचा बंद असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
दिशा खोलीत नव्हती. खिडकीतून खाली पाहिलं तर दिशा पडलेली दिसली.
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केलेल्या याचिकेत काय म्हटलं आहे?
दिशा तिच्या करिअरप्रती खूप गंभीर होती, ती अशी आत्महत्या करणंच शक्य नाही.
माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासवण्यात आलं. मात्र तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आली आहे.
माजी महापौर किशोरी पेडणेकर, मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी ते सांगत असलेली गोष्ट खरी असल्याचं सतत रेटत होते. याच लोकांनी माझ्या कुटुंबाला सतत दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवलं होतं, आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर होती.
मुंबई पोलिसांनी दिशाचा सामुहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी सारे साक्षी पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, शवविच्छेदन अहवाल या साऱ्या गोष्टी बनावट तयार केल्या.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार 8 जून 2020 च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती. मात्र अचानक तिथं आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक, सूरज पांचोली, दिनो मोरिया ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला.
या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणारं होतं म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं. तसेच या घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरीष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले.
या घटनेनंतर आदित्य ठाकरे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्कात होते. याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोन कॉल्स केले.
दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांससिंह राजपूत याचाही मृत्यू झाला. याच कालावधीत रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंनी 44 वेळा फोनवर बोलणं केल्याचाही आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
दिशाचा मृतदेह बंद दाराआडून हलवून तो बाहेर फेकण्यात आला. तिन 14 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केलाचा दावा केली गेला. मात्र दिशाच्या मृतदेहावर घटनेशी साधर्म्य दाखवणाऱ्या कुठल्याही खुणा नव्हत्या असही याचिकेत म्हटलं आहे.
गँगरेपच्या खुणा मिटवण्यासाठीच मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात 50 तासांचा उशिर केला. दिशाचा मृतदेहदेखील आम्हाला फारकाळ ठेवू दिला नाही, घाईघाईत त्याचे अंतिमसंस्कार करण्यास भाग पाडण्यात आलं असा आरोप याचिकेत करण्यात आलाय.
घटनेच्या दिवशीचं त्या इमारतीचं आणि आसपासच्या परिसराचं सीसीटिव्ही फुटेज रहस्यमयरित्या गायब करण्यात आलं. तिथ असलेल्या अनेकांचं मोबाईल लोकेशन, सीडीआर यांची नोंदच घेतली गेली नाही असही याचिकेत म्हटलं आहे.
हे सर्व माहिती असुनही राज्याचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट घडलेली घटना, संबंधित व्यक्त आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं. त्यामुळे त्यांचीही याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे ही मागणी करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टर्स यांना ताब्यात घेऊन, त्यांची चौकशी झाली पाहिजे. या सर्वांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चौकशी होणं गरजेचं आहे असं याचिकेत सतीश सालियन यांनी मागणी केली आहे.
या प्रकरणी विशेष सरकारी वकील नेमून त्यांच्या देखरेखीखाली भक्कम केस तयार करावी. तसेच एनआयए किंवा सीबीआय मार्फत कोर्टाच्या देखरेखीखाली हा सर्व तपास करावा अशी याचिकेतून मागणी करण्यात आली आहे.
पूर्वी सांगण्यात आलेल्या गोष्टी खोट्या होत्या म्हणून...
निलेश ओझा, सतीश सालियन यांचे वकील बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "12 जानेवारी 2024 रोजी वकील रशीद पठाण खान यांनी एक तक्रार दिली होती. ज्यात दिशा सालियन याच्यावर गँगरेप करून तिची हत्या करण्यात आली होती.
याच मूळ तक्रारीच्या अनुषंगाने एफ आय आर घेऊन तपास करावा ही आमची मागणी आहे. यात आदित्य ठाकरे आणि इतरांची नार्कोटेस्ट आणि इतर चाचण्या कराव्या अशी आमची मुख्य मागणी आहे."
पुढे ओझा म्हणाले, मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत खोट्या सह्या घेऊन सालियन कुटुंबियांना मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडले.
230 पानांमध्ये आम्ही आमचं म्हणणं मांडलेले आहे. काही वृत्तसंस्थेने बातम्या देऊन आरोपींना मदत केल्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी आम्ही केली असून त्यांना देखील सह आरोपी बनवावे अशी मागणी केली आहे.
याचिका आत्ताच का करण्यात आली यासंदर्भात बोलताना सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा म्हणाले की, आम्ही ऑक्टोबर 2023 लाच यापूर्वी एक याचिका केलेली आहे. यानंतर एसआयटी देखील गठीत करण्यात आली.
या एसआयटीकडे देखील आम्ही एका वर्षापूर्वी हीच तक्रार दिली आहे. सतीश सालियन यांना यापूर्वी सांगण्यात आलेल्या गोष्टी खोट्या होत्या. हे त्यांच्या लक्षात आले व काही पुरावे त्यांच्याकडे देखील आहेत. त्यामुळे ते आता पुढे आले आणि आम्ही याचिका केली आहे.
अनेक प्रकरणे जी कोर्टात पूर्ण झाली आणि त्यानंतर पुनर्विचार करण्यात आले आहेत. हा पॉलिटिकल विषय आहे म्हणत, बलात्कार आणि खुनाच्या आरोपीला तुम्ही सोडू तर शकत नाही ना. त्यामुळे आम्ही आमचं म्हणणं या याचिकेत मांडलेले आहे, एका आठवड्यात हे प्रकरण कोर्टात सुनावणीसाठी येईल अस अपेक्षित आहे.
विधानसभेत या प्रकरणी पडसाद
विधानसभेत भाजप आमदार अमित साटम यांनी हे प्रकरण सभागृहात मांडले. दिशाचा मृत्यूपूर्वी पार्टी झाली होती का? विविध मतप्रवाह समोर येतायत. एसआयटी नेमूनही कुठलाही निष्कर्ष समोर आलेला नाही. सतिश सालियान यांनी आरोप केलेत की दिशावर सामुहिक बलात्क���र करून खून केला गेला. मविआ सरकारने हे प्रकरण दाबल्याचे म्हटलंय. त्यांची खात्री आहे की,बलात्कार करून खून केला गेलाय. तेव्हाच्या सरकारमधील मंत्री याला त्यांनी जबाबदार धरलंय. संबंधित सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आले म्हणून हे प्रकरण दाबले गेले आहे का? एसआयटीने काय चौकशी केली हे कधी समोर येणार? असा सवाल सभागृहात साटम यांनी उपस्थित केला.
यावर आमदार अर्जून खोतकर यांनी एकदा या विषयाचा निकाल लागायला हवा, पूर्ण चौकशी व्हावी असे म्हटले. तर मंत्री नितेश राणे यांनी ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांना अटक करायची असते अशी मागणी केली, यावर मंत्री शंभूराजे देसाई यांनी देखील राणे यांच्या मताशी संमती दर्शवली.

फोटो स्रोत, FACEBOOK/NITESHRANE23
विधानसभेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याप्रकरणी माहिती देताना म्हटलं की, सदर प्रकरणात कुठलीही राजकीय व्यक्ती असू देत. कायदा सर्वांसाठी सारखा आहे. सरकारला सुद्धा याचिकेत पार्टी केलेलं आहे. आपल्याकडे आल्यानंतर योग्य ती कारवाई करू.
याप्रकरणी सभागृहात चर्चा करण्यात आली मात्र कुठेही रेकाॅर्डवर आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख कोणीही केलेला नाही , माजी मंत्री म्हटलेलं आहे.
शिळ्या कढीला ऊत आणण्याचा भाजपचा प्रयत्न
आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर याप्रकरणी आरोप होत असल्याने याबद्दल विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, 'दिशा सालीयन प्रकरण हे न्याय प्रविष्ट आहे.न्यायालय यावर योग्य तो निर्णय देईल. शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. न्यायालय या याचिकेत काय निर्णय घेतेय हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. हे प्रकरण पाच वर्षापूर्वीच आहे, या सरकारला तीन वर्ष झालीत मग तेव्हा का काही केलं नाही ?हे प्रकरण न्यायालयाच्या निर्णयानंतर बोलले पाहिजे. भाजपा ठरवून बोलत आहे असं मला वाटते. सध्या बदलापूर स्वारगेट महिला अत्याचार यावर सरकार बोलू शकत नाही. त्यामुळे ही प्रकरण उकरून भाजप काढत आहे.'
यापूर्वी राशिद पठाण यांनी ही याचिका केली होती
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत राशिद खान पठाण यांनी एक याचिका 20 ऑक्टोबर 2023 रोजी दाखल केली आहे.
8 जून 2020 रोजीच दिशा सॅलियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचं मोबाईल लोकेशन तपासलं जावं, कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते.
तसेच 13 व 14 जून 2020 रोजीचं सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत.
तसेच या प्रकरणी याचिकेत या दोन्ही दिवसांचं आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सारं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जावं. सुशांतचा मृत्यू झाला त्या दरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणं झालं? याची चौकशी व्हायला हवी.
सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी याचिकेतून केली होती.

फोटो स्रोत, ANI
पूर्वी आदित्य ठाकरे यांच्याकडून कॅव्हेट दाखल ; मात्र नव्यानं प्रतिक्रिया नाही
दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात ऑक्टोंबर 2023 ला कॅव्हेट दाखल केलं आहे. या प्रकरणात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली होती.
मात्र याप्रकरणी नव्याने याचिका दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही. आदित्य ठाकरे यांच्याशी बीबीसी मराठीच्या टीमने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही, प्रतिक्रिया आल्यास अपडेट करण्यात येईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











