न्युरेंबर्ग खटला : पकडलेले नाझी अधिकारी मनोरुग्ण आहेत की नाही, हे तपासणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञाची शोकांतिका

फोटो स्रोत, Alamy
(सूचना : या लेखातील काही मजकूर तुम्हाला विचलित करू शकतो.)
दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला, तेव्हा संपूर्ण जग दुसऱ्या महायुद्धाच्या या शोकांतिकेची तीव्रता, त्याची व्याप्तीचं आकलन करून घेण्याचं प्रयत्न करत होतं.
नाझींनी उभारलेल्या छळछावण्यांमधील मरण यातना, भयानक छळाबद्दलची माहिती जगासमोर आली होती.
ज्यू, समलिंगी आणि राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी नाझींनी या छळछावण्यात उभारल्या होत्या. या छळछावण्यांमधील वर्णनांनी सगळं जग स्तिमित झालं होतं, प्रचंड हादरलं होतं.
लोक इतक्या क्रूरपणे कसं काय वागू शकतात? नाझींच्या या क्रौर्यासाठी आणि त्यांनी युद्ध लादून केलेल्या नरसंहाराबाबत न्याय करण्यासाठी या युद्धात विजयी झालेल्या मित्रराष्ट्रांनी जर्मनीच्या न्युरेंबर्ग शहरात एक आंतरराष्ट्रीय लष्करी लवाद (इंटरनॅशनल मिलिटरी ट्रिब्युनल) स्थापन केलं होतं.
तिथे नाझी अधिकाऱ्यांवर खटले चालवण्यात आले. हे खटले इतिहासात 'न्युरेंबर्ग ट्रायल्स' नावानं प्रसिद्ध आहेत.
या आंतरराष्ट्रीय लष्करी लवादाकडून मानवतेला अनेक प्रश्नांची उत्तरं अपेक्षित होती.
20 नोव्हेंबर 1945 पासून या खटल्यांची सुरूवात झाली. पकडण्यात आलेल्या 24 नाझी (थर्ड राईश) नेत्यांवर, अधिकाऱ्यांवर हे खटले चालवण्यात आले.
मात्र, हे खटले चालवताना अनेक कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी सोडवायच्या होत्या.
आरोपींवर नेमके कोणते गुन्हे दाखल करायचे, त्यांचे खटले कोणापुढे चालवायचे म्हणजे न्यायदान कोण करणार? आणि आरोपींवर निष्पक्षपणे खटले चालवले जातील याची खातरजमा करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाणार? अशा अनेक समस्या समोर होत्या.
मात्र, या सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक होतं. तो म्हणजे, ज्या लोकांवर खटला चालवला जाणार होता, ते खटल्याला सामोरं जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या निरोगी होते का? हे ठरवण्याची किंवा पाहण्याची जबाबदारी देण्यात आली ती, डॉ. डग्लस एम केली या अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञाला.
न्युरेंबर्ग खटले सुरू होण्यापूर्वी, हे खटले कसे चालवण्यात यावे आणि आरोपी या खटल्यांना सामोरं जाण्याइतपत मानसिकदृष्ट्या निरोगी आहेत का यावर बरेच वादविवाद झाले.

फोटो स्रोत, PublicAffairs
मानसिक आरोग्याचं महत्त्व आणि तपासणी
"जर कोणी स्वेच्छेनं वागलं नाही, मानसिक आजार किंवा विकारामुळे तसं वागलं, तर लोकशाही गुन्हेगारी कायदा त्यांना त्या जबाबदारीतून मुक्त करतो किंवा किमान ती जबाबदारी कमी करतो," असं कार्लोस अयाला कोराव यांनी स्पष्ट केलं. ते आंतरराष्ट्रीय न्यायिक आयोगाचे ( इंटरनॅशनल कमिशन ऑफ ज्युरिस्ट्स) अध्यक्ष आहेत.
डॉ. डग्लस एम केली हे अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील मानसोपचारतज्ज्ञ होते.

फोटो स्रोत, UPI/Bettmann Archive/Getty Images
त्यामुळे डॉ. डग्लस यांनी या आरोपींच्या मानसिक स्थितीविषयी काढलेल्या निष्कर्षाचा परिणाम या आरोपींच्या भवितव्यावर होणार हे निश्चित होतं.
डॉ. डग्लस अमेरिकेच्या सैन्यात दाखल झाले होते. तिथे ते लेफ्टनंट कर्नलच्या पदापर्यंत पोहोचले होते.
मित्रराष्ट्रांच्या युरोपातील सैनिकांवर 'लढाईचा थकवा किंवा युद्धाचा धक्का' या समस्येसाठी उपचार केले होते. त्याला आज पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) म्हटलं जाईल.
नाझी नेत्यांची न्युरेमबर्गमध्ये 8 महिन्यांहून अधिक काळ तपासणी
डॉ. डग्लस केली यांनी मित्रराष्ट्रांच्या सैन्यानं पकडलेल्या नाझी नेत्यांची न्युरेंबर्गमध्ये आठ महिन्यांहून अधिक काळ मुलाखत घेतली आणि तपासणी केली.
"डॉ. केली नाझी नेत्यांसोबत आठ महिने होते. ज्या लक्झेंबर्ग हॉटेलमध्ये या नाझी नेत्यांना ठेवण्यात आलं होतं, प्रामुख्यानं तिथे डॉ. केली यांनी हा वेळ घालवला. त्यांनी मिश्र मानसोपचार तंत्रांचा वापर केला," असं अमेरिकन पत्रकार जॅक एल-हाय बीबीसीला म्हणाले.
एल-हाय यांनी केली यांच्या कामाचा अभ्यास त्यांच्या 'द नाझी अँड द सायकॅट्रिस्ट' या पुस्तकासाठी केला. न्युरेंबर्ग हा चित्रपट याच पुस्तकावरून प्रेरित होता.
डॉ. डग्लस केली यांनी लिहिलेल्या नोट्स, अहवाल आणि कागदपत्रांच्या 15 खोक्यांचं पुनरावलोकन एल-हाय यांनी केलं.
डॉ. डग्लस केली यांनी नाझींबद्दल जो अभ्यास केला होता, त्याची नोंद त्यांनी या सर्व कागदपत्रांमध्ये केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. डग्लस केली यांनी आरोपींच्या मुलाखती घेतल्या. त्याचबरोबर त्यांच्यावर अनेक मानसोपचार चाचण्यादेखील केल्या.
यात रॉर्शेक इंकब्लॉट टेस्ट या चाचणीचाही समावेश होता. यात त्यांना अमूर्त चित्र (ॲबस्ट्रॅक्ट इमेजेस) पाहिल्यावर त्यात काय दिसलं, याचं वर्णन करण्यास सांगण्यात आलं, असं एल-हाय म्हणाले.
डॉ. डग्लस केली यांनी त्यांच्यावर थेमॅटिक परसेप्शन टेस्टदेखील केली. ती रॉर्शेक इंकब्लॉट टेस्टसारखीच होती. मात्र यात फोटो किंवा रेखाचित्रांचा वापर करण्यात आला होता. ते पाहून आरोपींना त्यावरून कथा तयार करण्यास सांगण्यात आलं.
त्याव्यतिरिक्त, डॉ. डग्लस केली यांनी आयक्यू टेस्ट म्हणजे बुद्ध्यांक चाचणीदेखील घेतली. यातून त्या सर्वांचा बुद्ध्यांक सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं, असं एल-हाय म्हणाले.
डॉ. डग्लस केली यांनी गोरिंगबरोबर जास्त वेळ घालवला आणि काही तज्ज्ञांच्या मते त्यांनी गोरिंगबरोबरच्या संबंधांमध्ये एक डॉक्टर आणि रुग्ण या नात्यामधील सीमा ओलांडली.
'आगीशी खेळ'
डॉ. डग्लस केली त्यांच्या चाचण्या आणि तपास करत असताना, त्यांनी एका आरोपीमध्ये विशेष रस दाखवला. तो आरोपी म्हणजे हर्मन गोरिंग.
गोरिंग हा काही सामान्य नाझी अधिकारी नव्हता. तो ॲडॉल्फ हिटलरचा भावी उत्तराधिकारी होता आणि लुफ्तवाफे या जर्मन हवाई दलाचा प्रमुखही.
"नाझींचे जे लोक पकडले गेले होते, त्यात गोरिंग हा सर्वोच्च पदावरचा व्यक्ती होता. डग्लस केली यांना गोरिंगबद्दल उत्सुकता होती. कारण त्या दोघांच्या व्यक्तिमत्वात समान वैशिष्ट्यं होती. ते दोघेही बुद्धिमान होते. दोघांमध्येही करिष्मा होता. दोघेही अहंकारी होते आणि काहीसे आत्मकेंद्रित होते," असं एल-हाय म्हणाले.
"डग्लस केली यांनी गोरिंगनं केलेला क्रूरपणा आणि थंडपणानं घेतलेले निर्णय याकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही. मात्र या दोघांमध्ये एक नातं तयार झालं होतं. ती मैत्री नसली, तरी त्या दोघांना एकमेकांबद्दल आदर होता," असं ते पुढे म्हणाले.
"गोरिंग जेव्हा ठरवायचा, तेव्हा तो त्याच्या वागण्यातून अतिशय आवडण्यासारखा वाटायचा. त्याच्यामध्ये उत्कुष्ट बुद्धिमत्ता, उत्तम कल्पनाशक्ती, प्रचंड ऊर्जा आणि विनोदबुद्धी होती," असं डॉ. केली यांनी लिहिलं आहे, असं युनायटेड स्टेट्स होलोकॉस्ट म्युझियममध्ये ठेवलेल्या हस्तलिखितात म्हटलं आहे.
डॉ. केली यांनी त्यांच्या एका कागदपत्रात म्हटलं आहे की, "दररोज, मी जेव्हा त्याच्या कोठडीत यायचो, तेव्हा तो त्याच्या खुर्चीतून उठायचा. तो मोठं स्मितहास्य करत आणि हात पुढे करत माझं स्वागत करायचा."
"तो मला त्याच्या पलंगाकडे घेऊन जायचा आणि मध्यभागी थोपटत म्हणायचा, 'गुड मॉर्निंग डॉक्टर. तुम्ही मला भेटायला आलात, त्याचा मला अतिशय आनंद आहे. कृपया, बसा' मग तो त्याचं अवाढव्य शरीर घेऊन माझ्या शेजारी बसायचा आणि माझ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तयार असायचा."
गोरिंगचा डॉ. केली यांच्यावर इतका विश्वास बसला होता की, जर तो आणि त्याची पत्नी जिवंत राहिले नाहीत, तर त्यांची मुलगी एड्डा हिला डग्लस केली यांनी दत्तक घ्यावं, अशी विचारणादेखील गोरिंगनं केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. डग्लस केली यांनी फक्त गोरिंगचं मानसिक आरोग्यच तपासलं नाही तर त्याचं शारीरिक आरोग्यदेखील तपासलं. त्यांनी गोरिंगच्या लठ्ठपणावर आणि कोडिनच्या व्यसनावर उपचार केले.
त्यासाठी त्यांनी गोरिंगला योग्य आहार घेण्याचं महत्त्व पटवून दिलं. गोरिंगला युद्धाच्या वेळेस झालेल्या जखमांमुळे वेदना होत असे. त्यातून मुक्त होण्यासाठी म्हणून तो औषधं घेत असे. डग्लस केली यांनी हळूहळू गोरिंगच्या त्या औषधांचा डोस कमी केला.
मात्र डॉ. केली यांचं त्यांच्या रुग्णाशी जे नातं तयार झालं, त्यामुळे त्यांनी 'मर्यादा ओलांडल्या.' त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला, असं एल-हाय म्हणाले.

फोटो स्रोत, Alamy
"डग्लस केली, गोरिंगनं त्यांच्या पत्नीला एम्मीला लिहिलेली पत्रं पोहोचवण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी तयार झाले. आंतरराष्ट्रीय लवादानं किंवा मित्रराष्ट्रांच्या कोणत्याही सरकारनं य���ची परवानगी दिलेली नव्हती. मात्र डग्लस केली असं करण्यास तयार झाले," असं एल-हाय यांनी लिहिलं आहे.
मात्र, गोरिंगचा डॉ. केली यांच्यावर त्याहूनही अधिक विश्वास होता.
"गोरिंगनं जर तो आणि त्याची पत्नी जिवंत राहिली नाहीतर, त्यांच्या मुलीला दत्तक घेण्यास आणि तिचं संगोपन अमेरिकेत करण्यास केली यांना सांगितलं. केली यांनी याबद्दल त्यांच्या स्वत:च्या पत्नीशी चर्चा केली. मात्र त्यांच्या पत्नीनं याला विरोध केला," असं एल-हाय म्हणाले.
जेव्हा डॉ. केली यांच्या लक्षात आलं की नाझी नेते, अधिकारी मानसिकदृष्ट्या आजारी नाहीत, तेव्हा ते घाबरले. कारण यावरून असं दिसून आलं की फॅसिझम अमेरिकेतदेखील पोहोचू शकतो.
जे समोर आलं होतं त्यानं हादरले डॉ. केली
तपासणीच्या सुरूवातीला डॉ. केली यांचा सिद्धांत होता की नाझी नेत्यांना अशा आजाराची लागण झाली होती की त्यामुळे त्यांनी अत्याचार आणि छळाची योजना आखली आणि त्याचे आदेश दिले. ज्यासाठी त्यांच्यावर खटला चालवला जात होता, असं एल-हाय बीबीसीला म्हणाले.
"मात्र तपासणी आणि चाचण्यांनंतर डॉ. केली यांच्या जेव्हा लक्षात आलं की हे नाझी नेते मानसिकदृष्ट्या आजारी नव्हते आणि त्यांच वर्तन सामान्य स्वरूपाचंच होतं आणि त्यांना मानसिक विकार नव्हता, तेव्हा ते अतिशय घाबरले. या निष्कर्षावरून असं दिसून आलं की नाझी नेत्यांसारखे आपल्यामध्ये, कोणत्याही देशात आणि कोणत्याही वेळी अनेकजण होते," असं ते पुढे म्हणाले.
"मुळात, ते सर्वजण सामान्य होते, मनोरुग्ण नव्हते, त्यांच्यावर कपट आणि नोकरशाहीचा म्हणजे व्यवस्थेचा प्रभाव होता. ते ज्या वातावरणात होते, त्यातून त्यांची जडणघडण झाली होती आणि जगात कुठेही मोठ्या पदावर आढळू शकणाऱ्या व्यक्तीसारखे ते होते," असा निष्कर्ष, जोएल डिम्सडेल या अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञाच्या 'ॲनाटॉमी ऑफ मॅलिस: द एनिग्मा ऑफ द वॉर क्रिमिनल्स' या पुस्तकानुसार, डॉ. केली यांनी काढला होता.

फोटो स्रोत, MIKE THEILER/AFP via Getty Images
1946 मध्ये डॉ. केली अमेरिकेत परतले. त्यानंतर त्यांनी, फॅसिझममुळे देशाला कोणते धोके निर्माण होऊ शकतात यावर इशारा देणारी अनेक व्याख्यानं दिली, लेख लिहिले.
जर्मनी, इटली, स्पेन आणि युरोपातील इतर देशांनी ते धोके आधी अनुभवले होते.
"त्यावेळेस, अनेक राज्यांवर अशा राजकारण्यांचं सरकार होतं, ज्यांनी वांशिक भेदभावाला समर्थन दिलं होतं आणि त्यांच्या मतदारांची फसवणूक करण्यासाठी नाझींसारखंच तंत्र वापरलं होतं," असं एल-हाय यांनी नमूद केलं आहे.

फोटो स्रोत, Sepia Times/ Universal Images Group via Getty Images
आणि मग डॉ. केली यांच्या व्यावसायिक आयुष्यातील एक नवीन अध्यायदेखील सुरू झाला.
"डॉ. केली यांनी नाझी नेत्यांबरोबर जो वेळ घालवला होता, त्यामुळे मानसिक विकारांचं स्वरूप आणि या गुन्हेगारांसारख्या लोकांवर उपचार करण्यासाठी मानसोपचार हा व्यवहार्य मार्ग आहे का, याबद्दल विचार करण्याची त्यांची पद्धत बदलली होती. त्यांनी निष्कर्ष काढला होता की ती योग्य पद्धत नव्हती," असं एल-हाय म्हणाले.
"जर ते लोक सामान्य असते, तर सायकॅट्री (मानसिक विकारांवरचं शास्त्र) त्यांच्या या कृत्याबद्दल कसं काय स्पष्ट करणार होती? त्यामुळे केली यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात, क्रिमिनोलॉजीमध्ये स्वत:ला वाहून घेतलं. त्यांना वाटत होतं की कदाचित यातून त्यांना उत्तरं सापडतील," असं ते म्हणाले.
रुग्णाचंच केलं अनुकरण? केली आणि गोरिंग सारखाच शेवट
न्युरेंबर्ग चित्रपटात अभिनेते रसेल क्रो आणि रामी मालेक यांनी गोरिंग आणि डॉ. केली यांची भूमिका साकारली आहे.
काहीजणांचं म्हणणं आहे की 1 जानेवारी 1958 ला डॉ. केली यांच्यासोबत जे घडलं, ते या गोष्टीचा निश्चितच पुरावा होता की गोरिंगबरोबरच्या त्यांचे जे संबंध आले होते, भेटी झाल्या होत्या, त्याची त्यांच्यावर अमिट छाप पडली होती.
डॉ. केली यांचं न्युरेंबर्ग येथील काम झाल्यानंतर त्यांना मद्यपान आणि नैराश्याला तोंड द्यावं लागलं होतं. त्या दिवशी त्यांचा त्यांच्या पत्नीशी जोरदार वाद झाला होता.

फोटो स्रोत, PATRICK T. FALLON/AFP via Getty Images
अचानक, आवेगाच्या भरात, डॉ. केली यांनी सायनाईडची कॅप्सूल गिळली. त्यामुळे त्यांचा तात्काळ मृत्यू झाला.
बारा वर्षांनी, गोरिंगनंदेखील त्याचप्रकारे त्याचं आयुष्य संपवलं. त्याला मानवतेच्या विरोधातील आणि इतर गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा दिली जाणार होती, त्याच्या काही तास आधीच गोरिंगनं स्वत:चं आयुष्य संपवलं होतं.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











