'वावरात असतानाच घरवालीला वाघानं उचलून नेलं', चंद्रपुरात 9 दिवसांत 4 जणांचा मृत्यू

- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
"माझ्या घरवालीवर माझी भिस्त होती. आम्ही दोघं मिळून घर चालवत होतो. आता मला वनवासात टाकून गेली. माझ्यासोबत खूप वाईट झालं. घरच बुडालं माझं. मी वावरात असतानाच माझ्या घरवालीला वाघानं उचलून नेलं. पण, मला समजलंच नाही."
वाघाच्या हल्ल्यात पत्नी गमावलेले पांडुरंग पेंदोर रडत रडत दुःख सांगत होते. त्यांच्या पत्नी अल्का पेंदोर यांचा अवघ्या 45 व्या वर्षात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
त्या चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरीच्या रहिवासी होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर आता संसाराचं कसं होईल याची चिंता त्यांचे पती पांडुरंग पेंदोर यांना आहे.
पांडुरंग आणि त्यांच्या पत्नी शेतात काम करत असताना 26 ऑक्टोबरला ही घटना घडली. पांडुरंग बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले की, "मी फवारणी करत होतो आणि माझी घरवाली गवत कापत होती. मी दोनवेळा बघितलं तर ती मला दिसली. पण, तिसऱ्यांदा बघितलं तेव्हा ती तिथं नव्हती. मला वाटलं पाणी प्यायला गेली असेल. पुन्हा 10 मिनिटांनी जाऊन पाहिलं तर दिसलीच नाही.
तिला हाक मारली पण उत्तर मिळालं नाही. मला वाटलं आता सायंकाळची वेळ आहे तर घरी गेली असेल. पण, ती घरीही परतली नव्हती. त्यामुळे काहीतरी वाईट झाल्याची शंका आली."
पांडुरंग गावातल्या लोकांना घेऊन पुन्हा शेतात गेले. लोकांनी आरडाओरड करताच कापसाच्या शेतातून वाघ पळाला. त्यानंतर कापसाच्या शेताच्या बाजूला अल्का यांचा मृतदेह पडलेला त्यांना दिसला. एक हात, मान पूर्णपणे वाघानं खाल्लेली होती.
पत्नीचा असा अचानक मृतदेह बघून मला तिथंच चक्कर येत होती, असं पांडुरंग सांगतात.
पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांचा एक 24 वर्षांचा मुलगा आणि ते असे दोघंच जण कुटुंबात उरलेत. त्यांच्याकडं स्वतःची शेती सुद्धा नाही. ते दुसऱ्यांची शेती करून पोट भरत होते.
या शेतात त्यांनी आजपर्यंत कधीही वाघ बघितला नव्हता. पण, गेल्या काही दिवसांपासून गावाच्या आजूबाजूला वाघाची दहशत होती.
लोकांना रस्त्यावर वाघ पण दिसायचा. पण, पांडुरंग आणि त्यांच्या पत्नीनं कधीच वाघाला बघितलं नव्हतं. आता याच वाघानं असा अचानक हल्ला करून त्यांचं कुटुंब उद्धवस्त केलंय.
9 दिवसांत चार जणांचा वाघाच्या हल्ल्यात बळी
फक्त अल्का पेंदोरच नव्हे तर गेल्या 9 दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात चार जणांचा बळी गेला. यामध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
वाघांच्या हल्ल्यात मृत्यू -
1. वाघाच्या हल्ल्याची पहिली घटना घडली ती पांडुरंग पेंदोर यांच्या गणेशपिपरी गाववरून एक किलोमीटरवर असलेल्या चेकपिपरी गावात.
18 ऑक्टोबरला भाऊजी पाल हे शेतकरी बैलांना चराईसाठी घेऊन गेले आणि घरी परतले. त्यानंतर सायंकाळी बैलांना आणायला पुन्हा शेतात गेले. पण, घरी परतले नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला. पण, ते कुठेच सापडले नाही.
त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीनं 19 ऑक्टोबरला शोधमोहीम राबवली असता त्यांच्या मृतदेहाचे तुकडे शेतात विखुरलेल्या अवस्थेत दिसले. वाघानं या शेतकळऱ्याचा बळी घेतला होता.
2. दुसरी घटना घडली ती चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात. 25 ऑक्टोबरला आकापूर इथले शेतकरी वासुदेव वेटे आपल्या जंगलाच्या शेजारी असलेल्या शेतात काम करत होते. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर अचानक हल्ला करून जागीच ठार केलं.
3. तिसरी घटना गणेशपिपरी गावात घडली जिथं पांडुरंग पेंदोर यांच्या पत्नीला वाघानं हल्ला करुन ठार केलं.
4. 26 ऑक्टोबरला रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात चौथा बळी गेला. शिवरा गावचे माजी सरपंच निलकंठ भुरे यांच्यावर हल्ला करून वाघानं त्यांना ठार केलं. ते शेतात काम करत असताना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
वाघांच्या हल्ल्यातील मृत्यू चिंताजनक
जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात मानव-वन्यजीव संघर्षात किती मृत्यू झाले याची अधिकृत माहिती वनविभागाकडून मिळाली नसली, तरी ही आकडेवारी 37 च्या वर असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
यामध्ये वाघांच्या हल्ल्यात सर्वाधिक बळी गेले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 18 ऑगस्ट 2025 ला लोकसभेत चंद्रपुरात झालेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
यावेळी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयानं उत्तर सादर केलं होतं.
त्यानुसार जानेवारी ते जुलै या सात महिन्यात एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षात एकूण 25 जणांचा मृत्यू झाला होता.
यामध्ये सर्वाधिक संख्या ही वाघांच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूंची आहे. वाघांच्या हल्ल्यात होणाऱ्या या मृत्यूंमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
चंद्रपुरात सर्वाधिक मानव-वन्यजीव संघर्ष
देशातही वाघांच्या ह��्ल्यात मृत्यू झालेल्यांचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. 2022 मध्ये एकट्या महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यांत 82 जणांचे मृत्यू झाले होते.
केंद्र सरकारने मार्च 2025 मध्ये 2020 ते 2024 या पाच वर्षांतील आकडेवारी जाहीर केली होती.
त्यानुसार देशात वाघाच्या हल्ल्यात एकूण 378 जणांचे मृत्यू झाले. यापैकी जवळपास 58 टक्के म्हणजे 218 मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. यामध्येही चंद्रपूर जिल्हा मानव-वन्यजीव संघर्षात अव्वल आहे.

एनटीसीएने 2022 मध्ये जाहीर केलेल्या टायगर स्टेटस रिपोर्टमध्ये देशात चंद्रपुरात मानव-वन्यजीव संघर्ष सर्वाधित असल्याचं म्हटलं आहे. तसेच यामागील कारणं सुद्धा त्यात दिलेली आहेत.
खाणकाम आणि अतिक्रमणाच्या वाढत्या हालचालींमुळे या विभागांवर मोठा परिणाम होत आहे. यामुळे जंगलातील कॉरिडॉर (जंगलमार्ग) नष्ट होऊ लागले आहेत.
अशा प्रकारे झालेली वनक्षेत्रांची हानी आणि पशुधनाची वाढलेली उपलब्धता हे घटक या भागात मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत.
चंद्रपूर जगात सर्वाधिक वाघ असणारा जिल्हा
मानव-वन्यजीव संघर्षात महाराष्ट्र अव्वल असला तरी वाघांच्या संख्येत मात्र महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो.
2022 च्या व्याघ्रगणनेनुसार देशात वाघांची सरासरी संख्या 3682 आहे. तसेच सर्वाधिक वाघ चार राज्यांमध्ये आहेत.
यामध्ये मध्य प्रदेशात 785, कर्नाटकात 563, उत्तराखंडमध्ये 560 आणि महाराष्ट्रात 444 वाघ आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
पण, जिल्हानिहाय विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यात जगातील सर्वाधिक वाघांची संख्या असल्याचं टायगर स्टेटस रिपोर्ट 2022 मध्ये म्हटलं आहे.
आता पुढील वर्षी होणाऱ्या व्याघ्रगणनेमध्ये वाघांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञ बोलून दाखवतात.
चंद्रपुरात मानव-वन्यजीव संघर्ष इतका तीव्र का आहे? त्यावर सरकार काय उपाययोजना करतंय? याबद्दल आम्ही वनमंत्र्यांकडून प्रतिक्रिया मागवली आहे. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर ती याठिकाणी अपडेट केली जाईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











