रांचीमधली खेळी आणि न सुटलेला प्रश्न : 'किंग, तू कसोटी क्रिकेट का सोडलं?' कोहलीच्या यशाचं रहस्य काय?

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR / AFP VIA GETTY IMAGES
- Author, संजय किशोर
- Role, वरिष्ठ क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
रांचीमधल्या सोनेरी संध्याकाळी विराट कोहली केवळ धावा काढत नव्हता, तर जणू काळालाच मागे टाकत होता. दक्षिण आफ्रिकेविरोधात त्याने केलेली 135 धावांची खेळी ही उत्तम तांत्रिक कौशल्याचा नमुना होतीच, शिवाय त्या खेळीमध्ये एक विराट कथाही दडली होती.
त्याचा प्रत्येक शॉट, स्ट्राइक, प्रत्येक रन त्याच्या करिअरमधले अनुभव आणि संघर्षाची गोष्ट सांगत होत्या. जगातील सर्वांत गुणवान खेळाडूंमध्ये त्याची गणना का आणि कशी होऊ लागली, हे त्यातून समजत होतं.
रांचीमधल्या शतकी खेळीने विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं. या आधी त्याने क्रिकेटच्या एकाच प्रकारात सर्वाधिक शतक झळकवण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतक झळकवले आहेत.
न सुटलेला प्रश्न : 'किंग, तू कसोटी क्रिकेट का सोडलं?'
हा प्रश्न आजही प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनात येतो. विराट कोहली आता त्या लाल चेंडूपासून दूर गेला आहे. एक काळ होता, जेव्हा त्याला जगभरातील दिग्गज आजी-माजी क्रिकेटपटू कसोटी क्रिकेटचा ब्रँड अँम्बेसिडर म्हणत होते.
रांचीमधल्या त्याच्या खेळीने पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांच्या मनातल्या त्या प्रश्नाने डोकं वर काढलं- विराटच्या टेस्ट करिअरचा शेवट हा स्वाभाविक होता की त्याला तो करायला भाग पाडलं गेलं? विराट कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार का?
या खेळीत विराटचं फुटवर्क कमालीचं वेगवान, ठाम आणि लयीत असल्यासारखं होतं. कव्हर ड्राइव्हमध्ये पूर्वीचाच जोश होता, ऑन ड्राइव्हमध्ये तीच आक्रमकता आणि बचावात्मक शॉट्स खेळताना एखाद्या अभेद्य भिंतीप्रमाणे स्थिर होते.

फोटो स्रोत, Getty Images
विराट कोहलीच्या यशाचं रहस्य काय?
विराट कोहलीच्या यशाचं रहस्य कठोर मेहनत आणि स्वतःच्या कामगिरीवर कधीच संतुष्ट न होण्याच्या सवयीत आहे.
17 वर्षांच्या करिअरमध्ये त्याने 123 कसोटी, 306 वनडे आणि 125 टी-20 सामने खेळले आहेत. 27 हजारहून अधिक धावा त्याने केल्या आहेत. तरीही खेळाबद्दलची त्याची बांधिलकी कायम आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी तो लवकर रांचीला पोहोचला होता.
सामन्यानंतर विराट कोहलीने म्हटलं की, "परिस्थिती नीट समजून घेण्यासाठी मी लवकर पोहोचलो होतो. सकाळी दोन वेळा आणि संध्याकाळी एकदा बॅटिंगचा सराव करता येईल, माझी तयारी पूर्ण होईल. मॅचच्या आधी एक दिवस मी आराम केला. कारण आता मी 37 वर्षांचा आहे आणि मला माझ्या रिकव्हरीकडेही लक्ष द्यायला हवं."
टीकाकारांना उत्तर
क्लासिक कव्हर ड्राइव्ह- 11 व्या ओव्हरमध्ये कॉर्बिन बॉशचा बॅक ऑफ लेंथ चेंडू स्टंपच्या बाहेर पडला. विराटने अगदी सहजगत्या स्ट्राइड पुढे करत, डोकं स्थिर ठेवून कव्हर ड्राइव्ह मारला. चेंडू इतक्या सफाईने टोलावला गेला की कव्हरमध्ये उभ्या असलेल्या फिल्डरला केवळ बघत राहण्यावाचून पर्याय उरला नाही.
बचावात्मक शॉट्स- प्रेनेलन सुब्रेयनच्या स्पिनसमोर विराटने बचावात्मक पवित्रा घेतला. चेंडू पायात पडत होता, तेव्हा त्याची बॅट बरोबर त्याला स्पर्श करत होती. याचा अर्थ तो चेंडूची नीट वाट पाहात होता, कोणतीही घाई नव्हती.
52 वा शतक- मार्को जॅनसनच्या चेंडूवर चौकार मारत कोहलीने वन डे इंटरनॅशनल करिअरमधलं 52 वं शतक पूर्ण केलं. हे शतक त्याने बॅक ऑफ लेंग्थ चेंडूला बॅकवर्ड पॉइंटच्या डावीकडे स्लाइस करत पूर्ण केलं. हा फटका त्याच्या जबरदस्त टायमिंगचाच पुरावा होता.
हे त्याच्या करिअरमधलं फेब्रुवारी 2025 नंतरचं पहिलं आणि या मैदानावरचं तिसरं शतक होतं.
शतक पूर्ण केल्यानंतर त्याने सुब्रेयनच्या ओव्हरमधल्या शेवटच्या तीन चेंडूंवर त्याने 6, 6, 4 रन्स काढत आपली आक्रमकता धीम्या गतीच्या पिचवरपण कायम असल्याचं दाखवून दिलं. 11 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश असलेल्या या खेळीत शॉट-निर्णय, शॉट-रेंज आणि मानसिक संतुलनाचा ताळमेळ दिसून आला.
रांचीच्या पिचवरची त्याची बॅटिंग उत्तम मास्टरक्लास मानायला हवी. 37 व्या वर्षीही तो असा खेळत होता, की पंचविशीतलाच वाटावा.

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR / AFP VIA GETTY IMAGES
मानसिकदृष्ट्या सक्षम
विराट मैदानाच्या आधी आपल्या मनातही अनेकवेळा सामना खेळून घेतो.
कोहली सांगतो की, "मी कधीच जास्त तयारीवर विश्वास ठेवत नाही. माझा खेळ हा नेमही मानसित असतो. मी शारीरिक तयारी भरपूर करतो आणि जोपर्यंत माझा फिटनेस उत्तम असतो, तोपर्यंत मी बॅटिंगबद्दल स्पष्टपणे विचार करू शकतो आणि मला खूप छान वाटतं."
विराट कोहली म्हणतो की, खेळाच्या बाबतीत मी खूप कल्पक आहे. मी जेव्हा-जेव्हा खेळतो तेव्हा एकाग्र होऊन जातो. मला माहीत असतं की, मी आता मैदानावर जाऊन पूर्ण सहजतेने आपला खेळ खेळू शकतो."
विराटची विकेट एका बॅक ऑफ लेंथ चेंडूवर गेली. हा चेंडू पाचव्या स्टंप लाइनवर पडला होता.
कोहली सुरूवातीलाच वेगाने पुढे आला आणि चेंडूला एक्स्ट्रा कव्हरवरून फ्लॅट बॅट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅटच्या बाहेरच्या कडेला लागून चेंडू उंच उडाला.
रिकल्टनने कमालीच्या चपळाईने झेप घेत कॅच पकडला. चेंडू जवळपास ताशी 115 किलोमीटरच्या वेगाने आला होता. पण रिकल्टनने घेतलेला कॅच हा पूर्णपणे नियंत्रित होता.
ही खेळी महत्त्वपूर्ण का?
रांचीमध्ये विराट कोहलीने जी खेळी खेळली, ती त्यांच्या करिअरच्या आताच्या टप्प्यात महत्त्वाची आहे.
गेल्या नऊ महिन्यांपासून विराट आपल्या 52 व्या शतकाची वाट पाहात होते. त्याच्यावर एक प्रकारचा दबाव होता. प्रत्येक सामन्यानंतर एकच प्रश्न विचारला जायचा- विराट 2027 च्या वर्ल्ड कपपर्यंत खेळू शकणार का?
काही आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये विराट सलग दोनवेळा शून्यावर बाद झाला. पण त्यानंतर विराटने चोख उत्तर दिलं- आधी सिडनीमधल्या 74 धावा आणि नंतर रांचीमध्ये 135.
त्यामुळेच या शतकानंतरचा जल्लोष जणू काही दबावातून मोकळं झाल्याचा होता. स्वतःच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब झाल्याचा होता. हे शतक विराटसाठी आवश्यक होतं.
135 धावांच्या खेळीतून हेच दिसतं की, विराट आजही जगातील सर्वांत विश्वासार्ह, बुद्धिमान आणि फिट बॅट्समन आहे.
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली- हे त्याचं 52 वं शतक होतं. ते त्यानं चौकार मारून पूर्ण केलं. हे वाट पाहणं खूप जास्त होतं. या फॉर्मेटमध्येच तो सर्वांतत जास्त खेळतो आणि या खेळीने टीकाकारांना उत्तर दिलं. या मैदानावर हे त्याचं तिसरं शतक. ही खेळी शानदार होती. ज्या पद्धतीने शतक पूर्ण केलं, त्या शॉटचं टाइमिंग कमाल होतं."

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR / AFP VIA GETTY IMAGES
रोहीत शर्माची प्रतिक्रिया चर्चेचा विषय
ड्रेसिंग रुममधला रोहित शर्माचा एक अनफिल्टर्ड आणि अतिशय उत्साहात व्यक्त केलेली प्रतिक्रिया वेगाने व्हायरल होत आहे.
विराटने आपलं शतक पूर्ण केल्यानंतर रोहीत उत्साहाने उभा राहिला आणि जोरात टाळ्या वाजवल्या. या आनंदाच्या क्षणी त्याच्या तोंडून काही अपशब्दही निघाले. तेसुद्धा कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले.
या दृश्यातून कोहलीच्या शतकानंतर रोहितला मनापासून झालेला आनंद दिसतो. त्याचबरोबर या दोन दिग्गद खेळाडूंमध्ये असलेला समंजसपणा, एकमेकांबद्दलचा सन्मान आणि मैत्रीही दिसते.
ही क्लिप क्रिकेट रसिकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आणि मॅचचा सर्वांत अविस्मरणीय क्षण बनून गेली.
कसोटीतल्या निवृत्तीचं कटू सत्य
खेळीनंतर जेव्हा हर्षा भोगले यांनी निवृत्तीचा निर्णय परत घेण्याबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार देत सांगितलं की, आता रिटायरमेंटपर्यंत ते भारतासाठी 'एक-फॉरमॅटचा क्रिकेटर' आहेत.
त्याचा टेस्टमधील संन्यास हा क्रिकेटशी संबंधित कारणांपेक्षा राजकीय दबावाचा परिणाम अधिक वाटला.
जानेवारी 2022 मध्ये विराट कोहलीने टेस्ट कर्णधारपदाचा राजीनामा दिला. या वादाची सुरुवात त्यांच्या टी-20 नेतृत्वातून स्वेच्छेने बाजूला होण्यापासून झाली होती.
सप्टेंबर 2021 मध्ये त्यांनी टी-20 कर्णधारपद सोडलं, पण वनडे आणि टेस्ट कर्णधारपद चालू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तरीदेखील, डिसेंबर 2021 मध्ये बीसीसीआयने त्यांना अचानक वनडे कर्णधारपदावरून हटवलं आणि कोहलींच्या म्हणण्यानुसार हा निर्णय त्यांना फक्त 90 मिनिटे आधी सांगितला गेला.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पराभवानंतर, वाढते मतभेद आणि संपूर्ण प्रकरणातून निर्माण झालेली असहज परिस्थिती यामुळे त्यांनी 15 जानेवारी 2022 रोजी टेस्ट कर्णधारपदही सोडले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











