डोनाल्ड ट्रम्प तांदळाच्या बहाण्याने भारतावर पुन्हा नवीन टॅरिफ लादतील का?

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, ANDREW CABALLERO-REYNOLDS / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख केला.

सोमवारी (8 डिसेंबर) रात्री व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थ मंत्री स्कॉट बेसंट यांना विचारलं की, "भारत सतत अमेरिकेत तांदूळ डम्प करत आहे. त्यांना असं का करू दिलं जातंय? यासाठी त्यांना कर भरावा लागेल. त्यांना तांदळावरील टॅरिफवरुन सूट दिली आहे का?"

ज्यावर स्कॉट बेसंट यांनी उत्तर दिलं की, "नाही सर. आम्ही अजूनही त्यांच्याशी व्यापारासंदर्भातीला करारावर चर्चा सुरू आहे."

यावर ट्रम्प यांनी म्हटलं की, "हो, पण ते त्यांचे तांदूळ अशा प्रकारे इथे पाठवू शकत नाहीत. त्यांना तसं करण्याची परवानगी देता येणार नाही."

या बैठकीत अमेरिकन शेतकऱ्यांचं हित कसं जपता येईल यावर चर्चा चालू होती. डोनाल्ड ट्रम्प आणि स्कॉट बेसंट यांच्यात ही चर्चा झाली.

दरम्यान, ट्रम्प यांनी घोषणा केली की इतर देशांवर लादलेल्या टॅरिफमधून अमेरिकेला मिळणाऱ्या पैशांपैकी अमेरिकन शेतकऱ्यांना 12 अब्ज डॉलर्स आर्थिक मदत म्हणून दिले जातील.

या घडामोडींनंतर, ट्रम्प तांदळाच्या मुद्द्याचा आधार घेऊन पुन्हा भारतावर नवीन टॅरिफ लादतील का, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

सध्या अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. यामध्ये रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून लादण्यात येणारा 25 टक्के टॅरिफ समाविष्ट आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

ट्रम्प यांनी भारताकडून अमेरिकेला होणाऱ्या तांदळाच्या निर्यातीचं वर्णन करण्यासाठी 'डंपिंग' हा शब्द वापरला आणि म्हटलं की "भारत आपला तांदूळ अशा प्रकारे अमेरिकेत टाकू शकत नाही आणि तो याची काळजी घेईल."

भारत, व्हिएतनाम आणि थायलंडसारखे देश अमेरिकेला कमी किंमतीत तांदूळ आणि इतर कृषी उत्पादनं निर्यात करतात, ज्यामुळे 'त्यांचं हित धोक्यात आलं आहे', असा आरोप अमेरिकेच्या मोठ्या भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत, एका शेतकरी प्रतिनिधीनं त्याचं मत मांडलं आणि म्हटलं की, "मागील सरकारच्या धोरणांमुळे आणि वाढत्या महागाईमुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत."

अमेरिकेत शेतकरी समुदायाला ट्रम्प समर्थक मानलं जातं, परंतु अलीकडच्या काळात तिथले शेतकरी वाढता खर्च आणि अस्थिर किमतींमुळे त्रस्त आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प , वित्त मंत्री स्कॉट बेसंट

फोटो स्रोत, ANDREW CABALLERO-REYNOLDS / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वित्त मंत्री स्कॉट बेसंट यांना विचारलं की, भारत सतत अमेरिकेत तांदूळ टाकत आहे?

भारतातील अमेरिकन कृषी उत्पादनांवर सरासरी 37.7% टॅरिफ आकारला जातो, तर अमेरिकेत भारतीय कृषी उत्पादनांवर 5.3% टॅरिफ आकारला जात होता. मात्र, ट्रम्प यांच्या भारतावरील नवीन टॅरिफमुळे, हा टॅरिफ आता 25% पर्यंत वाढला आहे.

भारतासाठी ट्रम्प यांचा हा इशारा नाजूक वेळी आला आहे. रशियाकडून तेल खरेदी करून भारतानं "युक्रेन युद्धात पुतीन यांना मदत केली आहे." भारतावर अशी टीका अमेरिका वारंवार करत आला आहे.

भारताचं आयात धोरण हे, "ऊर्जा बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय ग्राहकांच्या हिताच्या आधारावर काम करतं," असं म्हणत भारतानं अमेरिकेच्या या युक्तिवादाला सातत्यानं विरोध केला आहे.

अलिकडेच, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते, त्यांचं खूप उत्साहात स्वागतही झालं होतं.

रशियन माध्यमांमधील वृत्तानुसार, पुतिन आणि मोदी यांच्यातील या उत्साहपूर्ण भेटीमुळे ट्रम्प अस्वस्थ झाले आहेत.

शेतकरी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणात तांदूळ निर्यात करतो.

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहेत, परंतु अजून त्यात कोणतीही लक्षणीय प्रगती झालेली नाही.

ट्रम्प भारताला "सर्वात जास्त टॅरिफ लादणारा देश" म्हणत आहेत आणि भारतासोबतच्या व्यापारातील अडथळ्यांचा आणि रशियाकडून भारताच्या तेल खरेदीचा हवाला देत त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे.

या आठवड्यात अमेरिकेचं एक शिष्टमंडळ भारताला भेट देणार आहे, मात्र, टॅरिफ कमी करण्यासाठी कोणताही करार होण्याची आशा कमीच आहे.

तांदूळ निर्यातीत भारत पहिल्या क्रमांकावर

भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे आणि त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाचा निर्यातदारही आहे.

भारतीय तांदूळ निर्यातदार संघटनेच्या मते, भारत दरवर्षी 15 कोटी मेट्रिक टन तांदळाचं उत्पादन करतो, जे जगातील तांदूळ उत्पादनाच्या 28 टक्के आहे.

2024-25 मध्ये भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार होता. म्हणजे जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा 30.3 टक्के होता.

चीन तांदळाच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचं वार्षिक उत्पादन अंदाजे 14 कोटी मेट्रिक टन आहे.

बांगलादेश, इंडोनेशिया, व्हिएतनाम, थायलंड आणि पाकिस्तान हे देशही या यादीत आहेत.

बासमती ही भारतातील सर्वाधिक निर्यात होणाऱ्या तांदळाच्या जातींपैकी एक आहे.

2024-25 मध्ये 59.44 लाख मेट्रिक टन तांदूळ निर्यात करण्यात आला.

33.23 लाख मेट्रिक टन बिगर-बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली.

तर सर्वाधिक निर्यात म्हणजे 90.44 लाख मेट्रिक टन ही परबॉइल्ड राइसची (अंशतः शिजवलेला तांदूळ) होती.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.