'घरचे म्हणाले, तू अशा मुलावर प्रेम केलंस, जो खालच्या जातीचा आहे', नांदेडमध्ये तरुणाच्या हत्या प्रकरणात काय घडलं? - ग्राऊंड रिपोर्ट

फोटो स्रोत, kiran sakale
"3-4 गोळ्या झाडल्या. त्यानंतरही त्याला काही झालं नाही. तो जिवंत होता, असं त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा मग फरशीने ठेचून त्याचा खून करण्यात आला."
19 वर्षांची आचल मामीडवार सांगत होती. आचल तिचा प्रियकर सक्षम ताटे याची हत्या किती क्रूरपणे करण्यात आली, याविषयी बोलत होती.
सक्षम ताटे नांदेड शहरातील संघसेन परिसरात राहायचा. बीबीसी मराठीची टीम सक्षमच्या घरी पोहचली, तेव्हा भींतीवर गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा दिसल्या. शेजारीच सक्षमचा फोटो लावण्यात आल्याचं आणि फोटोला हार घातल्याचं दिसलं.
एक डिसेंबर रोजी सक्षमचा जन्मदिन होता. दोन-तीन दिवस आधीच म्हणजे 27 नोव्हेंबर रोजी त्याची हत्या करण्यात आली.
'तो आपल्यापेक्षा खालच्या जातीचा'
सक्षम ताटे आणि आचल मामीडवार यांचं एकमेकांवर प्रेम होतं. सक्षम ताटे हा दलित होता, तर आचल ही पद्मशाली समाजातील आह��.
जात वेगळी असल्यामुळेच घरच्यांचा आमच्या प्रेमाला विरोध होता आणि त्यातून त्यांनी सक्षमची हत्या केल्याचं आचल सांगते.

फोटो स्रोत, kiran sakale
बीबीसी मराठीशी बोलताना आचल म्हणाली, "आमचं 3 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होतं. तो आमच्या गल्लीत आला होता. त्यानं मला पाहिलं. त्यानंतर त्यानं मला इन्स्टाग्रामवर मेसेज केला. मीही त्याचाशी बोलली. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आम्ही भेटायचो, बोलायचो. मग माझ्या घरी हे सर्व कळालं.
"घरचे म्हणाले, तू करुन करुन अशा मुलावर प्रेम केलं, जो आपल्यापेक्षा खालच्या जातीचा आहे. तो जयभीम वाला आहे, असं घरचे म्हणायचे. मी खूप रडायचे. एके दिवशी माझे वडील सक्षमला म्हणाले, तुला माझ्या मुलीसोबत लग्न करायचं असेल, तर तुला आमचा धर्म स्वीकारावा लागेल. म्हणजे हिंदू धर्म. तो या गोष्टीसाठी तयारही झाला होता. कारण तो माझ्या प्रेमासाठी काहीही करणार होता."
'आचलला आमच्या मुलासारखं ठेवू'
नांदेडच्या इतवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सक्षमची हत्या करण्यात आली. सक्षमच्या हत्येनंतर आचलनं त्याच्या मृतदेहासोबत लग्न केलं. सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर तिनं मृतदेहाला हळदी-कुंकू लावलं आणि स्वत:लाही हळदी-कुंकू लावून घेतलं.
आचल सांगते, "3 वर्षांपासून आम्ही सोबत होत���. आमचे खूप सारे स्वप्न होते. आम्ही लग्न करणार होतो. खूप काही स्वप्न होते, जे शब्दांत सांगता येत नाही. त्याचीही इच्छा होती लग्न करायची. त्यासाठी मी त्याच्यासोबत लग्न केलं. आता मी हमेशा इथंच राहील, त्याचीच बनून राहील शेवटपर्यंत अगदी."

फोटो स्रोत, mustan mirza
आचल सध्या सक्षमच्या घरी राहते.
"आचल जर आमच्यासोबत राहायला तयार असेल, तर तिला आम्ही आमच्या मुलासारखं ठेवूत," असं सक्षमची आई संगीता ताटे म्हणाल्या.
आचल सांगते, "माझ्या घरच्यांनी एकवेळेस तरी सक्षमला जाऊ द्यायला पाहिजे होतं. तो समजदार झाला असता. तो आणि मी पण त्याला बोलली नसती. असं एकदम त्याला मारणं चुकीचं झालं. ज्या पद्धतीनं त्याला तडपून मारलं तर तशीच मौत आरोपींना पण यायला पाहिजे."
पोलिसांनी काय सांगितलं?
ज्या ठिकाणी सक्षमचा खून झाला, तिथं अजूनही रक्ताचे डाग पडलेले दिसले. हे रक्ताचे डाग पाहा, असं म्हणत एक महिला घटनास्थळ दाखवू लागली. इथंच शेजारी फरश्याही पडलेल्या दिसल्या.
सक्षमला लागलेला मार इतका जबरदस्त होता, की त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
पोलिसांनी आपल्या भावाला भडकवल्यामुळे त्याने सक्षमचा खून केला, असा आरोप आचलने केलाय.
ती म्हणाली, "पोलीस स्टेशनमधील कर्मचारी माझ्या भावाला म्हणाले, तू याला-त्याला मारुन इथं येतोस. त्यापेक्षा तुझ्या बहिणीचं लफडं ज्याच्यासोबत आहे, मॅटर ज्याच्यासोबत आहे, त्याला मार. त्याला मारुन इथं आम्हाला तोंड दाखव."

फोटो स्रोत, kiran sakale
पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
नांदेडचे पोलीस उप-अधीक्षक प्रशांत शिंदे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "सक्षम ताटे हत्याप्रकरणात अॅट्रॉसिटी, हत्या, हत्येचा कट रचणे अशी वेगवेगळी कलमं आरोपींवर लावण्यात आली आहेत. या प्रकरणातील मयत आणि आरोपी या दोघांचाही गुन्हेगारी रेकॉर्ड असून त्यांच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीला भडकवलं हा आरोप चुकीचा आहे. तसं काही झालं नाही. ऑनर किलिंगपेक्षा गुन्हेगारी प्रकरणातून ही घटना घडल्याचं दिसतंय."
या प्रकरणी इतवारा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 103, 61(2), 189, 190, 191 (2), (3) आणि अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
'जातीवाद नसेल, तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे'
सक्षम ताटे हत्या प्रकरणातील सर्व 6 आरोपींना घटना घडल्या, त्याच रात्री ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या 6 पैकी 1 आरोपी महिला असून तिला न्यायालयीन कोठडी मिळालीय, तर 1 आरोपी अल्पवयीन असून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय. तर उर्वरित 4 आरोपींना 3 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
या प्रकरणातील आरोपींची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. पण त्यांचा फोन बंद आल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.
आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी सक्षमच्या कुटुंबीयांची मागणी आहे.

फोटो स्रोत, kiran sakale
"जातीमुळं त्यांनी माझ्या लेकराला मारलं ना, खरंच जातीवाद नसेल तर माझ्या लेकराला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे. आरोपींना कडक म्हणजे फाशीचीच सजा झाली पाहिजे, जन्मठेप झाली पाहिजे. त्याच्यातला एकही आरोपी बाहेर नाही आला पाहिजे. एवढीच आमची सरकारला मागणी आहे," सक्षमची आई संगीता ताटे म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











