मुस्लीमविरोधी विधानं करणं हा महायुतीत सत्तेचा राजमार्ग झालाय का? विश्लेषक काय सांगतात?

फोटो स्रोत, Facebook
धार्मिक विद्वेष, सामाजिक सलोख्याला गालबोट, धार्मिक उन्माद, आणि चिथावणीखोर वक्तव्यांची सातत्यपूर्ण मालिका... हा गेल्या काही महिन्यांत काही ठरावीक नेत्यांकडून दिसणारा पॅटर्न.
कधी नितेश राणे, कधी गोपिचंद पडळकर, कधी संग्राम जगताप तर कधी महेश लांडगे...
विधिमंडळात आमदार पदावर असणारे आणि संवैधानिक मूल्यांची शपथ घेतलेले लोकप्रतिनिधीच अशी विधानं सातत्याने करताना दिसत आहेत.
याआधी 'सेक्यूलर' पक्षात असणारे नितेश राणे आता कट्टर हिंदूत्वाची शाल पांघरून वावरताना दिसतात, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असूनही संग्राम जगताप मुस्लीमविरोधी वक्तव्यं करताना दिसतात.
असं का घडतंय? प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी वक्तव्यं केली जात आहेत का? की महायुतीच्या सत्तेत महत्त्व मिळवण्यासाठी हा एक राजमार्ग झाला आहे?
महाराष्ट्रातील लोकांच्या जगण्या-मरण्याचे प्रश्न चर्चेतून बाजूला सारण्यासाठी सामाजिक सलोख्याचा बळी दिलाय जातोय का?
अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांचा घेतलेला हा धांडोळा.
'अशी विधानं प्रसिद्धीसाठी'
राज्यात अलीकडे ठिकठिकाणी सातत्याने हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत.
लव्ह जिहाद, लँड जिहाद, मुस्लिमांकडून खरेदी न करणे अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सातत्याने मुस्लीमद्वेषी विधानं करण्याचा सिलसिला सध्या सुरू आहे.
"हिंदू महिला आणि मुलींनी जिममध्ये जाऊ नये. तिथे ट्रेनर मुस्लीम आहेत का पाहा? कारण ते हिंदू मुलींवर अन्याय करतात," असं एक वादग्रस्त विधान गोपिचंद पडळकरांनी नुकतंच केलेलं आहे.
त्याआधी, अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांनी, "दिवाळीत धर्म बघून दुकानातून खरेदी करण्याचं" आवाहन केलं आणि ते एकाएकी चर्चेत आले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही असं 'मुस्लीमद्वेषी' विधान केल्यामुळे आता यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणारे उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार, अशा अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर चर्चा झडू लागल्या.
त्यांना तंबी दिली गेली आणि "कारणे दाखवा नोटीस पाठवली जाईल", असं विधानही अजित पवार यांच्याकडून आलं.
पण, दरम्यानच्या काळात या विधानामुळे आमदार जगताप यांना मिळाली ती प्रसिद्धी!
त्यामुळे, अशी विधानं प्रसिद्धीसाठी केली जातात, असा मुद्दा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना मांडला.

फोटो स्रोत, Facebook/Sangram Jagtap
चोरमारे म्हणाले की, "अशी मुस्लीमद्वेषी विधानं करणाऱ्या सगळ्या आमदारांमधला समान धागा एकच आहे. तो म्हणजे, राज्यात 288 आमदार आहेत. त्यातूनही आपल्याला लाईमलाईटमध्ये यायचं असेल तर फक्त आणि फक्त धार्मिक द्वेषाची भूमिका हीच आपल्याला सहाय्याची ठरू शकते, असा आत्मविश्वास त्यांना आला आहे."
ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठेदेखील हाच मुद्दा पुढे नेत म्हणाले की, "अधिकाधिक आक्रमकरित्या बोललं तर माध्यमांचं लक्ष आपल्याकडे जातं.
प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करून प्रसिद्धी मिळायला जेवढे कष्ट लागतील, त्यापेक्षा ही प्रसिद्धी अधिक स्वस्तातील आहे, असं त्यांना वाटतं. एखादं जरी असं वक्तव्य केलं तरी ही प्रसिद्धी मिळते, असा आत्मविश्वास त्यांना आला आहे," असं ते सांगतात.
विजय चोरमारे यांच्या मते, "मुस्लीमद्वेषी भू���िका घेतल्यामुळे आपण राज्याचे हिरो बनतो, असं त्यांना वाटतं. अन्यथा, एका मतदारसंघाबाहेर असं या आमदारांचं अस्तित्वच काय आहे? पात्रता आणि योग्यता तरी काय आहे? आमदार म्हणून असलेलं कर्तृत्व तरी काय आहे?"

फोटो स्रोत, Facebbok/Nitesh Rane
संग्राम जगताप किंवा संग्राम भंडारे या लोकांना महाराष्ट्रात याआधी कुठे ओळख होती, असा सवाल राजेंद्र साठे उपस्थित करतात.
ते सांगतात की, "अधिकाधिक भडक बोलणाऱ्यांना अधिकाधिक प्रसिद्धी, असं सध्या सुरू आहे. या अशा वादंगानंतर उलट अधिक लोकांपर्यंत पोहोचता येतं, असं त्यांना वाटतं.
मात्र, या सगळ्याचा किती वाईट परिणाम होतो आणि सामाजिक सलोखा किती प्रदुषित होतो, याचा विचार माध्यमांनी आणि विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी करायला हवा."
'लोकमत'चे माजी संपादक वसंत भोसलेही हाच मुद्दा अधोरेखित करताना म्हणाले की, "पूर्वी अशा विधानांना सभ्यतेच्या कारणावरून विरोध व्हायचा, तर तो आता होत नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमंही अशा विधानांना प्रसिद्धी देतात."
ते सांगतात की, "सभ्यता आणि नैतिकता आता ठरवून हद्दपार करण्यात आलेली आहे. सार्वजनिक जीवनात धार्मिक उन्मादानं वा नुसता उन्मादानं वागणं, हे आता सर्वमान्य झालेलं आहे.
त्यामुळे मग आता अशा भूमिका घेऊन काहीही बोलायचं आणि आपलं महत्त्व वाढवायचं, असा सिलसिला सध्या सुरू आहे."
विजय चोरमारे यांनी प्रसिद्धीच्या या मुद्द्यासोबतच माध्यमांच्या नैतिकतेचाही प्रश्न उपस्थित केला.
ते म्हणतात की, "पत्रकारितेत कुणाची पात्रता किती यावरून त्या व्यक्तीला किती जागा द्यायची, याचा विचार आधी केला जायचा. त्या व्यक्तीच्या 'लांबी-रुंदी-उंची'नुसारच वृत्तपत्रातही त्या व्यक्तीसंदर्भातील बातमीची लांबी-रुंदी-उंची ठरवली जायची.
इलेक्ट्रॉनिक मीडियाने ही नैतिकता कधीचीच सोडून दिल्याने समाजविघातक वक्तव्यांना सततची प्रसिद्धी मिळते आहे."
पूर्वीच्या सेक्यूलर पक्षातील नेते 'हिंदुत्ववादी' कसे झाले?
नितेश राणे सध्या भाजपचे आमदार असले तरी ते आधी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये असताना हिंदूत्ववादी राजकारणावर ते आक्रमकपणे टीका करायचे.
तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका करणारे नितेश राणे काही दिवसांपूर्वी संघाच्या स्थापना दिनाला स्वत:च संघाच्या गणवेशात दिसून आले.
ते सातत्याने मुस्लिमांविरोधात विधानं करताना दिसून येतात. बरेचदा त्यामुळं वादात अडकतात. नवनीत राणा सध्या खासदारकी गमावून बसलेल्या असल्या तरीही त्यांचा प्रवासदेखील असाच दिसून येतो.
सुरुवातीला धर्मनिरपेक्ष म्हणवल्या जाणाऱ्या पक्षांसोबत राजकारण सुरू केलं असलं, तरी नंतर त्यांनीही अचानकच आक्रमक हिंदूत्वाची भूमिका घेतली.

फोटो स्रोत, Facebook/Mahesh Landge
गोपिचंद पडळकरही वंचित बहुजन आघाडीतून आता भाजपच्या सावलीला आले आहेत.
"हिंदू महिला आणि मुलींनी जिममध्ये जाऊ नये. तिथे ट्रेनर मुस्लीम आहेत का पाहा, कारण ते हिंदू मुलींवर अन्याय करतात," असं एक वादग्रस्त विधान गोपिचंद पडळकरांनी नुकतंच केलेलं आहे.
भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे मूळचे काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या NSUI चे कार्यकर्ते होते. नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले.
तिथं त्यांनी महानगरपालिकेच्या तीन निवडणुका जिंकल्या. त्यानंतर ते अपक्ष आमदार झाले. तिथून ते भाजपमध्ये आल्यावर अशी भूमिका घेताना दिसून येतात.
अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. अगदी 2024 च्या विधानसभा निवडणुकीआधीपर्यंत ते आपण शाहू-फुले-आंबेडकर यांचाच विचार सांगत असल्याचा दावा करायचे.
मात्र, अचानकच त्यांनी कट्टर हिंदूत्वाचा नारा दिला आहे.
त्यामुळे, कधीकाळी सेक्यूलर पक्षात असणारे किंवा आजही असलेले नेते एकाएकी हिंदुत्ववादी कसे झाले? हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो.
विजय चोरमारे सांगतात की, यांचा पॅटर्न एकच असला तरी प्रत्येकानं अशी भूमिका घेण्यामागची कारणं थोडीफार वेगवेगळी आहेत.

फोटो स्रोत, facebook/NiteshRane23
ते सांगतात की, "नितेश राणे ज्या पक्षात जातील, त्या पक्षाची जी भूमिका असेल तिच्याशी समरसून काम करतात.
भाजपमध्ये आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, या पक्षाची जी भूमिका आहे ती आक्रमकपणे मांडल्याशिवाय इथे आपल्याला ओळख निर्माणच करता येणार नाही."
संग्राम जगताप यांच्याबद्दल ते म्हणाले की, "गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये मतदान कमी झालेलं आहे. त्यामुळे, त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे.
खरं तर आधीच्या निवडणुकांमध्ये त्याच मोहल्ल्यांमध्ये जाऊन त्यांनी जातीयवाद्यांना मतदान करू नका, असं सांगितलेलं आहे. पण आता शरद पवारांच्या उमेदवाराला जास्त मते मिळाल्याने ते बिथरले असून त्यांची भूमिका बदलली आहे.
त्यामुळे, त्यांनी एकदम मुस्लीमविरोधी भूमिका घेतली आहे. त्याचा दुसरा हेतू असा आहे की, अजित पवारांची कोंडी करायची. कारण, तिसऱ्यांदा निवडून येऊन सुद्धा आपल्याला मंत्रिमंडळात घेतलेलं नाहीये. त्यामुळे, आपलं उपद्रवमूल्य दाखवण्याचं काम ते सध्या करत आहेत."
राजेंद्र साठे सांगतात की, "संग्राम जगताप काही भाजपमध्ये नाहीत पण ते भाजपमध्ये जाऊ इच्छितात, असं दिसतंय. त्यामुळे, नगर जिल्ह्याचं बदलतं राजकारण पाहता, ते अशी भूमिका घेत असावेत.
कारण, विखे भाजपकडे गेलेले आहेत. थोरातांच्या गटातले तांबे तिकडेच गेलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर आपल्याला अधिकाधिक कडवी भूमिका घ्यायला पाहिजे, असा भाग त्यामध्ये असू शकतो. "
'पक्षाच्या वरदहस्ताशिवाय अशी विधानं शक्य नाहीत'
अशा विधानांमागची कारणं स्पष्ट करताना वसंत भोसले सांगतात की, "वैयक्तिक पातळीवर प्रसिद्धी मिळणं, पक्षात महत्त्व मिळणं आणि मूळ भाजपचे हे लोक नसल्यामुळे 'भाजपची ही भूमिका नाही', असा मेसेज जाण्याची सोय, ही या पाठीमागची कारणं आहेत. तसेच, हिंदू-मुस्लीम हा द्वेषाचा अजेंडाही यातून भाजपला कायम ठेवता येतो."
तो कायम ठेवणं हे त्यांच्यादृष्टीने फार महत्त्वाचं आहे, असंही ते सांगतात.
विजय चोरमारे यासाठी गोपिचंद पडळकर यांचं उदाहरण देतात.

फोटो स्रोत, Facebook/Gopichand Padalkar
ते म्हणतात की, "गोपिचंद पडळकर तोंडाला येईल ते कुणालाही काहीही वाह्यात बोलू शकतात, ही त्यांची क्षमता लक्षात आल्यानंतर भाजपकडून त्यांना वापरलं जातंय.
त्यांनी इतकी वाह्यात विधानं करूनही ते चुकीचं वागत आहेत, असं फडणवीस थेट म्हणत नाहीत. त्यांना उलट पाठीशी घालताना दिसतात."
वसंत भोसले याचसंदर्भात वेगळा मुद्दा मांडतात. ते सांगतात की, मूळचे भाजपचे हे लोक नसल्यामुळे आडवाणी-वाजपेयींचा हा भाजप पक्ष आहे का? अशा नैतिक पेचप्रसंगातूनही सोयीस्कर सुटका करून घ्यायला वाव मिळतो.
शिवाय, हे काम करण्यासाठीही पुन्हा वेगवेगळ्या समाजातील लोकांना निवडलं गेलंय, असंही आकलन ते मांडतात.
ते म्हणतात की, "अशा आमदारांना कुठं जायचं, कशी भाषणं करायची, कुठले वादग्रस्त मुद्दे उपस्थित करायचे, हे वरूनच सांगितलं जातं."
विजय चोरमारे सांगतात की, "भगवी टोपी आणि भगवा गमछा घालून, मुसलमानांच्या विरोधात बोलून जर राज्यभर प्रसिद्धी मिळत असेल. टिव्हीवर सतत बातम्या आणि बाईट्स चालणार असतील तर त्यांना ते हवंच आहे.
यातूनही काही झालंच तर आपल्याला सांभाळून घ्यायला वरिष्ठ आहेतच, असा आत्मविश्वास त्यांना आहे."
'नितेश राणेंचं मंत्रिपद म्हणजे 'सक्सेस स्टोरी'चं उदाहरण'
महायुतीच्या सत्तेत महत्त्व मिळवण्यासाठी हा एक राजमार्ग झाला आहे, असं वसंत भोसले सांगतात.
ते सांगतात की, "मूळ प्रश्नांवरून सतत दुर्लक्ष घडवण्यासाठी ही माणसं उभी करण्यात आली आहेत. कधी पडळकर, कधी संग्राम जगताप, कधी नितेश राणे असं करत राहिल्याने बऱ्याच मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवता येते.
लोकांच्या समस्यांवर सरकारचं उत्तरदायित्व उरू नये, यासाठी हे नॉन इश्यूज चर्चेत आणले जातात. आणि अशा लोकप्रतिनिधींसाठी महायुतीच्या सत्तेत महत्त्व मिळवण्यासाठी हा एक राजमार्ग झाला आहे."
नितेश राणे यांच्या मंत्रिपदाच्या रुपाने असं उदाहरण भाजपने घालून दिल्याचं विजय चोरमारे सांगतात. बाकीच्यांना ते एकप्रकारे गाजर आहे, असंही ते सांगतात.

फोटो स्रोत, Facebook/Nitesh Rane
ते म्हणतात की, "पक्षाच्या वरिष्ठांनी हे काम त्यांच्यावर सोपवल्याशिवाय अशी विधानं ते करणार नाहीत. हे कामच त्यांच्यावर सोपवण्यात आलं आहे आणि ते पूर्ण केल्यावरच सत्तेतला वाटा दिला जातो."
��संत भोसलेदेखील 'त्यांना पक्षाचा वरदहस्त आहे,' असं विधान करतात.
ते सांगतात की, "एखाद्या समाजाकडून खरेदी करू नका, त्यांच्यावर बहिष्कार घाला असं म्हणणं वा तत्सम धार्मिक विद्वेषी विधानं करणं हा खरं तर गुन्हाच आहे.
संविधानातील मूल्यतत्त्वे पाळण्याची, सामाजिक सलोखा वाढवण्याची शपथ घेऊनही त्यांनाच छेद दिला जातोय. याला कुणी आव्हानही देत नाही, त्यामुळे यांचं फावत चाललेलं आहे."
राजेंद्र साठे म्हणतात की, "आपल्याला काहीतरी मंत्रिपद मिळेल वा तत्सम फायदे मिळतील, या आशेपोटी ही भूमिका या लोकांनी घेतलेली दिसतेय किंवा पक्षांनी त्यांना आदेश दिला असावा, की तुम्ही ही भूमिका घ्या."
पुढे ते सांगतात की, "या पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत, त्यांना काही चाड असेल तर त्यांनी यांना रोखलं पाहिजे. पण ते रोखत नाहीत, हेच सध्याचं वास्तव आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











