आग लागल्यावर भाजण्यापेक्षा धुरात गुदमरून अधिक मृत्यू का होतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
गोव्यातल्या नाईट क्लबमधली आग, इंडोनेशियातली आग किंवा मग हाँगकाँगच्या उंच इमारतींच्या कॉम्प्लेक्समध्ये लागलेली आग.
आगीच्या दुर्घटनांमधला मृत्यूंचा आकडा मोठा असण्याची भीती जास्त असते. आणि यामध्ये आगीत होरपळल्याने होणाऱ्या मृत्यूंपेक्षा अनेकदा धुरामुळे गुदमरून होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण जास्त असतं.
असं का होतं? धुराचा आपल्या शरीरावर असा काय परिणाम होतो जो जीवघेणा ठरू शकतो? आणि या धुरापासून काही प्रमाणात तरी स्वतःचा बचाव करणं शक्य आहे का?
आगीचा शोध, ठिणगी पाडता येणं हा मानवी उत्क्रांतीमधला एक महत्त्वाचा टप्पा होता. एकप्रकारे आग ही माणसाने शोधलेली सर्वात जुनी टेक्नॉलॉजी आहे. पण या आगीपासून असणारा धोकाही तितकाच प्राचीन आहे.
इतिहासात रोमला लागलेल्या आगीची, लंडनला लागलेल्या आगीची नोंद आहे.
1803 मध्ये मुंबईत लागलेल्या आगीला द ग्रेट फायर ऑफ बॉम्बे म्हटलं जातं. यानंतर मुंबई बदलली. नवीन आराखडे झाले, रस्ते मोठे झाले, शहरी बांधकामं झाली.
पण आगीची दुर्घटना होते तेव्हा मालमत्तेसोबतच जीवीतहानी मोठी असते.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटने 2020 साली प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात आगीच्या दुर्घटनांना डेडलीयस्ट हजार्ड म्हणजे सर्वात घातक धोका म्हटलंय.
कारण यामध्ये जळणं, होरपळणं यासोबतच इतर साईड इफेक्ट्सही तितकेच गंभीर असतात.
आग लागल्यावर नेमकं काय होतं?
आग लागण्यासाठी इंधन किंवा ज्वलनशील पदार्थ, ठिणगी पडण्यासाठीची उष्णता, ऑक्सिडायजर म्हणजे ती आग जळत राहण्यासाठी ऑक्सिजन या सगळ्याची गरज असते.
शिवाय आग लागल्यानंतर केमिकल चेन रिअॅक्शन घडते. म्हणजे सुरुवातीच्या एका गोष्टीमुळे एकामागोमाग एक गोष्टी घडत जातात.
कागद, तेल, लाकूड, गॅसेस, कापड, काही द्रवपदार्थ, प्लास्टिक, रबर हे ज्वलनशील पदार्थ आहेत.
एखाद्या ठिकाणी किती आर्द्रता आहे, ज्वलनशील घटक किती प्रमाणात, किती मोठे आहेत यावर आग किती वेगाने पसरेल, तापमान किती वाढेल हे अवलंबून असतं.
उष्णतेचा एकीकडे शरीरावरच्या त्वचेला दाह होतोच, पण दुसरीकडे धुरामुळे आजुबाजूचं दिसणंही कठीण होतं.

फोटो स्रोत, Screengrab/UGC
या ज्वालाग्राही पदार्थांच्या जळण्यातून तयार होणाऱ्या वाफाही ज्वलनशील असतात.
उष्णतेमुळे आग पसरते, वातावरणातलं बाष्प कमी होतं आणि गोष्टी एकप्रकारे प्री हिट होतात. परिणामी आग अधिक वेगाने पसरते.
आग लागल्याने तापमान वाढलं की द्रवपदार्थ, गॅसेस आणि काही धातू प्रसरण पावतात आणि यातून अनेकदा स्फोट होतात.
आपल्या आजूबाजूच्या हवेमध्ये साधारणपणे 21% ऑक्सिजन असतो. पण बहुतेक सगळ्या आगी लागण्यासाठी 16% ऑक्सिजनही पुरेसा असतो.
त्यामुळे ज्यावेळी ज्वलनशील पदार्थ जळतात तेव्हा ऑक्सिजनसोबत त्यांची प्रतिक्रिया घडते आणि त्यातून उष्णता निर्माण होते.
यामुळे काय होतं, तर जिथे आग लागलीय तिथला ऑक्सिजन कमी होतो आणि तिथे अडकलेल्या लोकांवर याचा परिणाम होतो.
आग आणि धुराचा शरीरावर परिणाम
धूर आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. शरीराला पुरेसा ऑक्सिजन न मिळणं याला Asphyxiation म्हणजे श्वास रोखणं म्हणतात. हे जसं आगीत अडकल्याने होऊ शकतं तसंच पाण्यात बुडल्याने, श्वसननलिकेत काही अडकल्यानेही होऊ शकतं.
याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं, "ज्यावेळेला हा धूर शरीरात जातो, तो नाकातून घशात, घशातून श्वासनलिकेत, श्वास नलिकेतून श्वास वाहिन्यांत आणि मग फुप्फुसांत आणि वायुकोषांत जातो. या प्रक्रियेमध्ये संपूर्ण श्वसनमार्गाला प्रचंड सूज येते. आणि सूज आल्याने त्यामध्ये एक प्रकारचा द्रवपदार्थ तयार होतो आणि सर्व वायुकोश त्यामध्ये भरून जातात.
त्यामुळे हे वायुकोश बंद होतात आणि श्वास पूर्ण बंद पडतो. आणि त्याचबरोबर ऑक्सिजन नव्याने घेणं किंवा ऑक्सिजन रक्तात जा��ं ही क्रिया बंद होते. याला रेस्परेटरी फेल्युअर (Respiratory Failure) म्हणतात. आणि त्यामध्ये ही व्यक्ती मृत्यू पावते."
"आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला ऑक्सिजन कमी होतो, त्यावेळेला शरीरातला ऑक्सिजन कमी झाल्यानंतर रक्ताची आम्लता वाढते. अॅसिडोसिस नावाची क्रिया घडते आणि ती व्यक्ती शॉकमध्ये जाते. त्याचा रक्तदाब पूर्ण कमी होतो.
"त्याचबरोबर या उष्णतेमुळे हृदयाला जी इजा झालेली असते त्यामुळे हृदयही बंद पडतं. आणि या सगळ्यामुळे धुरात गुदमरणारा माणूस मृत्युमुखी पडत असतो," डॉ. भोंडवे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
शिवाय आगीत गोष्टी जळतात तेव्हा त्यातून विषारी वायू बाहेर पडतात ज्यांचा फुप्फुसांवर परिणाम होतो.
वातावरणातल्या ऑक्सिजनचं प्रमाण जसजसं कमी होत जातं तसे मानवी शरीरावर त्याचे परिणाम होतात. गोंधळल्यासारखं होतं, डोकं दुखतं, गरगरतं त्यातून पुढे शुद्ध हरपते.
डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, " सर्वात महत्त्वाचं म्हणजे धूर श्वासामार्गे फुप्फुसांत जातो. या धुरामध्ये जो कार्बन मोनॉक्साईड असतो तो रक्तामध्ये जातो. आणि तो रक्तातल्या हिमोग्लोबिनमध्ये प्रवेश करतो. त्याच्यामुळे शरीरातल्या मेंदूला, हृदयाला ऑक्सिजन मिळत नाही. आणि ऑक्सिजनचा पुरवठा खूप कमी झाल्यामुळे मृत्यू होऊ शकतो."
पुढे ते म्हणतात, "दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जिथे आग लागलेली असते तिथे प्लास्टिक किंवा फोमच्या गाद्या किंवा फोम, सिंथेटिक मटेरियल अशा काही गोष्टी असतील तर त्या ज्यावेळी जळतात त्यामधून हायड्रोजन सायनाईड या नावाचा एक अतिशय विषारी वायू तयार होतो. आणि तो रक्तामधून शरीरातल्या पेशींमध्ये जातो.
"पेशींची जी ऑक्सिजन घेण्याची क्रिया असते, ती रोखतो. आणि त्यामुळे पेशी गुदमरतात आणि ऑक्सिजन रक्तात जरी असला तरी तो पेशींना घेता येत नाही आणि साहजिकच व्यक्ती मृत्यू पावू शकते," डॉ. भोंडवे सांगतात.
आगीत अडकल्यास धुरापासून संरक्षण कसं करायचं?
मग आगीत अडकलोच, तर धुरापासून संरक्षण करणं शक्य आहे का? तर काही गोष्टी करता येतील.
सगळ्यात आधी तुम्ही जिथे कुठे जाताय ती नवीन इमारत, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, सभागृह तर त्या फायर एक्झिट कुठे आहे, ते पाहून ठेवा.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सुचनांमध्ये म्हटलंय की घोळक्याने बाहेर पडायचा प्रयत्न न करता जिन्याने, एकामागोमाग एक - एका बाजूने उतरा. म्हणजे दुसऱ्या बाजूने अग्निशमन दलाला जायला जागा राहील.
गोंधळून गेलात तर चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते.
आग लागली, धूर व्हायला लागला तर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. धूर जास्त असेल तर ओलं कापड, ओला रुमाल नाका, तोंडावर धरा.
धूर जास्त असेल, तर जमिनीवर आडवे व्हा, सरपटत पुढे जाण्याचा प्रयत्न करा. धूर नेहमी वर जातो.
जमिनीलगतची हवा तुलनेने थोडी बरी असते. धूर जिथे जास्त आहे, त्याच्या उलट दिशेने जा.

फोटो स्रोत, Getty Images
खोलीत असाल, आग बाहेर असेल, तर दरवाज्याच्या खालच्या फटी ओल्या टॉवेल, चादरींनी बंद करा.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आग लागलीय हे लक्षात आल्यावर ती विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच अग्निशमन दलाला फोन करा.
आग तुमच्या हाताबाहेर गेल्यावर फायर ब्रिगेडला कळवू नका. कारण त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा काळ लागणार आहे आणि त्याकाळात आग आणखीन वाढेल.
या सगळ्यासोबत एक अगदी साधी पण महत्त्वाची गोष्ट. आपल्याला लिफ्टने जायची सवय असते. पण असं असलं तरी अधून मधून जिन्याचा वापर करत रहा, पायऱ्या उतरण्याचा सराव ठेवा.
शरीराला अशा शारीरिक हालचालीची सवय असणं, पायऱ्यांचा अंदाज असणं गरजेचं आहे. कारण उंच इमारतीला आग लागली, तर ही गोष्ट तुमचा जीव वाचवणारी ठरू शकते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











