सोशल -‘आपल्या देशाचं अहित पाहणाऱ्याला भारतात राहण्याचा हक्क नाही’

फोटो स्रोत, VINAY KATIYAR FACEBOOK
भारतात राहणाऱ्या मुस्लिमांचा उल्लेख कोणी पाकिस्तानी असा करत असेल तर त्याविरोधात कायदा आणावा अशी मागणी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली. ज्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे खासदार विनय कटियार यांनी मुस्लिमांनी भारतात राहूच नये, पाकिस्तान किंवा बांगलादेशात निघून जावं अशी आक्रमक भूमिका घेतली.
या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं आपल्या वाचकांना विचारलं होतं की, विनय कटियार यांच्या या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता?' त्यावर शंभराहून अधिक लोकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.
'जे लोक वंदे मातरमचा सन्मान ठेवत नाहीत, पाकिस्तानचे झेंडे भारतात फडकवतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा केला पाहिजे', असं वक्तव्य विनय कटियार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
काही जणांनी कटियार यांचं म्हणणं अगदी बरोबर असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी भाजप आमदार, खासदार आणि सर्वच मंत्री भरकटलेत असं म्हटलं आहे.
"मोदींचा विकास वेडा झाला आहे. त्यामुळे आता त्यांचं पारंपरिक असं मुस्लीमविरोधात बोलणं सुरू झाले आहे. त्यांनी मुसलमानांविरुद्ध जरूर बोलावं. कारण त्यांची ती सवय सुटणार नाही. मात्र हे सारखं - जा पाकिस्तानात, जा पाकिस्तान हे खूप खटकणारं आहे," असं मत इरफान शेख यांनी मांडलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
तर "पाकिस्तानातील हिंदूंची संख्या वेगाने कमी होत आहे. तर भारतातील मुसलमानांची संख्या वेगाने वाढते आहे, हे अजून एक सत्य आहे," असं रवी कडी यांनी म्हटलं आहे.
"सगळ्या मुस्लिमांनी पाकिस्तानात जावं, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. परंतु ज्या कोणाला भारतापेक्षाही जास्त पाकिस्तान प्रिय आहे, त्यांच्यासाठी रस्ता मोकळा आहे," असं मत स्वप्नील सोनावणे यांनी व्यक्त केलं आहे.
"विनय कटीयार यांचं बोलणे चुकीचे आहे. आपण धर्मावरून कोणी चांगलं किंवा वाईट असा निर्णय घेऊ शकत नाही. जो आपल्या देशाचं अहित पाहात असेल, मग तो मुस्लिम असो की दुसरा कोणी त्याला भारतात राहण्याचा हक्क नाहीच", असंही स्वप्नील सोनावणे यांनी लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
"नाकातून दम काढून ओरडणाऱ्या आणि भाषण ठोकणाऱ्या पंतप्रधानांमध्ये हिंमत आहे का, या फाटक्या तोंडाच्या खासदारांचं तोंड बंद करण्याची," असं मत झमीर मखझाणकर यांनी म्हटलं आहे.
"हे असं बडबडलं म्हणजे निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. धार्मिक उन्माद भडकवून सत्तेत यायचं, केवळ हेच त्यांचं राजकीय सूत्र आहे," असं मत सुमीत दांडगे यांनी व्यक्त केलं आहे, तर "विकासावर चर्चा करता येत नाही म्हणून भाजपचे नेते असली वक्तव्यं करून मूळ विकासाची चर्चा करण्यापासून पळ काढत आहेत," असं तुषार व्हणकते यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








