आता व्हिसाविना दुबई प्रवास, भारतीय प्रवाशांसाठी खास सुविधा, जाणून घ्या प्रक्रिया

आता व्हिसाविना करता येईल दुबई प्रवास, भारतीयांसाठी नवीन सवलत - UAE ची घोषणा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, तनिषा चौहान
    • Role, बीबीसी

दुबईसह UAE मधील देशांमध्ये भारतीय पासपोर्ट धारकांसाठी 'व्हिसा ऑन अरायव्हल' या सुविधेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय नागरिक यूएई विमानतळावर व्हिसा मिळवू शकतात.

खरंतर अनेक देशांमध्ये भारतीयांसाठी 'व्हिसा ऑन अरायव्हल' सुविधा उपबल्ध आहे. म्हणजेच तुम्ही त्या देशांमध्ये गेल्यानंतर तिथे त्या देशांचा व्हिसा तुम्हाला मिळू शकतो.

पण व्हिसा ऑन अरायव्हल म्हणजे नक्की काय आहे? नियमित व्हिसा प्रक्रियेपेक्षा ती कशी वेगळी आहे? तसेच, व्हिसा ऑन अरायव्हल देशांमध्ये प्रवास करताना कोणत्या अटीशर्थी लक्षात घ्यायला हव्यात? या प्रश्नांसंदर्भातील संपूर्ण माहिती आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.

व्हिसा ऑन अरायव्हल म्हणजे काय?

व्हिसा ऑन अरायव्हल ही सुविधा असलेल्या देशांना भेट देण्यासाठी तुम्हाला आधीच व्हिसा घेण्याची गरज नसते. त्या देशांमध्ये पोहोचल्यानंतर, विमानतळावर किंवा बंदरावर लगेचच तुम्हाला त्या देशाचा व्हिसा मिळू शकतो.

आपत्कालीन परिस्थितीत किंवा अचानक प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठी ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरू शकते.

यासाठी त्या देशात उतरल्यानंतर तेथील विमानतळावर तुम्हाला 'व्हिसा ऑन अरायव्हल'साठी असलेल्या काउंटरवर जाऊन व्हिसासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर तुम्हाला त्या देशाचा व्हिसा दिला जातो.

अनेक देशांकडून भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा देण्यात आली आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनेक देशांकडून भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा देण्यात आली आहे

परंतु तुमच्या कागदपत्रांमध्ये काही समस्या उद्भवल्यास तुमचा व्हिसा नाकारलाही जाऊ शकतो. व्हिसा ऑन अरायव्हलसाठी असलेली प्रक्रिया सोपी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. या सुविधेमुळे ठराविक दिवसांसाठी तुम्हाला त्या देशात राहण्याची परवानगी मिळते.

UAE द्वारा प्रदान केलेली 'व्हिसा ऑन अरायव्हल' सुविधा काय आहे

UAE ने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-ऑन-अरायव्हलची सुविधा देण्याचे जाहीर केले आहे. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे वैध पासपोर्ट असेल तर तुम्ही UAE मध्ये कोणत्याही एंट्री पॉईंटवर पोहोचल्यानंतर व्हिसा मिळवू शकता.

UAE सरकारने प्रसारित केलेल्या माहितीनुसार, भारतीय प्रवाशांना या सुविधेअंतर्गत दोन प्रकारच्या सुविधा असतील. 14 दिवसांसाठी जारी केलेला व्हिसा, या अंतर्गत व्हिसा आणखी 14 दिवसांसाठी वाढवला जाऊ शकतो. परंतु 60 दिवसांसाठी दिल्या जाणाऱ्या व्हिसाची मुदत वाढवली जाणार नाही.

व्हिसा-ऑन-अरायव्हल

फोटो स्रोत, Getty Images

ही सुविधा फक्त युएस, युके किंवा कोणत्याही युरोपियन देशांमधील PR कार्ड, ग्रीन कार्ड किंवा व्हिसा असलेल्या भारतीय नागरिकांसाठीच वैध आहे. दुसरी महत्त्वाची अट म्हणजे UAE मध्ये प्रवेश केलेल्या तारखेपासून कमीतकमी पुढच्या 6 महिन्यांसाठी तुमचा पासपोर्ट वैध असणे आवश्यक आहे.

व्हिसा-मुक्त देश

काही देशांमध्ये भारतीयांना व्हिसा-मुक्त प्रवेश दिला जातो. व्हिसा मुक्त देश म्हणजे त्या देशाला भेट देण्यासाठी तुमच्याकडे व्हिसा असण्याची आवश्यक नसते. तुम्हाला फक्त वैध पासपोर्ट आणि आवश्यक कागदपत्रांची गरज असते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

व्हिसा-मुक्त प्रवासाला परवानगी देणाऱ्या देशांमध्ये मर्यादित कालावधीसाठी व्हिसाशिवाय राहण्याची परवानगी असते, यासाठी वेगळे शुल्क द्यावे लागत नाही.

व्हिसा ऑन अरायव्हलसाठीच्या अटी

व्हिसा ऑन अरायव्हल या सुविधेसाठी प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम आहेत. यापैकी खाली दिलेल्या काही गोष्टी व्हिसा ऑन अरायव्ह सुविधेचा वापर करताना लक्षात ठेवायला हव्यात.

  • आवश्यक माहिती - तुम्हाला ज्या देशात प्रवास करायचा आहे त्या देशाचे नियम, आवश्यक कागदपत्रे आणि नियम आदिबाबातची आवश्यक माहिती आधीच जाणून घ्यायला हवी. जेणेकरून वेळेवर कोणतीही गडबड किंवा अडचण येऊ नये. सदर देशाचे नियम, आवश्यक असलेली सर्व माहिती त्या-त्या देशाच्या दूतावासाच्या वेबसाइटवरूनही मिळू शकते.
  • व्हिसा ऑन अरायव्हल - त्या देशाच्या विमानतळावर किंवा बंदरावर ���ोहचल्यानंतर पुढच्या प्रक्रियेसाठी इमिग्रेशन विभागातील 'व्हिसा ऑन अरायव्हल'या काऊंटरवर जावं लागेल.
कागदपत्रं

फोटो स्रोत, Getty Images

  • कागदपत्रे – सर्व आवश्यक कागदपत्रे प्रवासाआधीच तयार करून ठेवायला हवीत. अनेकदा पासपोर्ट, पासपोर्ट आकाराचे फोटो, अरायव्हल आणि डिपार्चर फॉर्म, प्रवासाचे कारण, हॉटेल बुकिंगची माहिती, गरजेपुरते पैसे आणि परतीचे तिकीट या गोष्टींची आवश्यकता असते. त्याची एक यादी तयार करून ठेवल्यास वेळेवर गोंधळ उडणार नाही.
  • अर्जाची फी – सर्व कागदपत्रे इमिग्रेशन अधिकाऱ्याकडे जमा करणे आवश्यक आहे. इतर कोणताही फॉर्म आवश्यक असल्यास तो देखील मिळवावा आणि आवश्यक माहिती भरावी. व्हिसा फी स्थानिक चलनात किंवा त्या देशात वैध असलेल्या चलनात भरावी. तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असल्यास इमिग्रेशन अधिकारी व्हिसा मंजूर करून तुमच्या पासपोर्टवर शिक्का मारून देतात.

व्हिसा ऑन अरायव्हल मिळवणं सोपं आहे का ?

‘सी वे कन्सल्टंट्स’चे व्यवस्थापकीय संचालक गुरप्रित सिंह यांच्या मतानुसार व्हिसा ऑन अरायव्हल ही एक उत्तम सुविधा आहे. परंतु व्हिसा लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा, असं ते म्हणतात.

यामागचं कारण म्हणजे, तुमच्या कागदपत्रांमध्ये काही समस्या उद्भवल्यास तुमचा व्हिसा नाकारला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला परत पाठवले जाऊ शकते. त्यामुळे अशाप्रकारची अनिश्चितता टाळण्यासाठी प्रवासापूर्वी व्हिसासाठी अर्ज करणे कधीही चांगले असते, असं गुरप्रित सिंह म्हणतात.

प्रत्येक देशाचे 'व्हिसा ऑन अरायव्हल'साठीचे वेगवेगळे नियम आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रत्येक देशाचे 'व्हिसा ऑन अरायव्हल'साठीचे वेगवेगळे नियम आहेत

सिंह पुढे म्हणतात, “परिस्थितीनुसार काही देश नियम, अटी-शर्थी आणि दरातही बदल करू शकतात.” त्यामुळे अटी आणि नियमावलींबाबत नीट माहिती घ्यायला हवी. व्हिसा विस्ताराची हमी निश्चित नसते, त्यामुळे प्रवास करताना योग्य नियोजन करायला हवे.

कोणते पासपोर्ट जास्त महत्त्वाचे आहेत ?

'हेन्ली अँड पार्टनर्स' ही लंडनमधील कंपनी दरवर्षी जगातील सर्वात महत्त्वाच्या पासपोर्ट्सची यादी प्रसिद्ध करत असते.

या यादीत नमूद केलेल्या देशांचे पासपोर्ट अतिशय महत्त्वाचे मानले जातात. सर्वात महत्त्वाचा पासपोर्ट तो आहे जो तुम्हाला व्हिसाशिवाय सर्वात जास्त देशांमधे जाण्याची परवानगी देतो.

हे रँकिंग आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण प्राधिकरणाद्वारे सादर केलेल्या माहितीवर आणि हेन्ली अँड पार्टनर्सने केलेल्या संशोधनावर तसेच फ्री उपलब्ध असलेल्या ऑनलाइन माहितीवर आधारित आहे.

UAE ने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा जाहीर केली आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, UAE ने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा जाहीर केली आहे

2024 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या यादीत टॉप सहामध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, स्पेन या देशांनी स्थान पटकावलंय. या देशांचे पासपोर्ट असलेल्या व्यक्ती 194 देशांत व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.

या यादीमध्ये भारत 83 व्या स्थानी आहे. त्यामुळे भारतीय पासपोर्ट असलेले नागरिक 58 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.