Kashmir Snowfall: यंदाचा काश्मीरचा हिवाळा बर्फाविनाच, नेमकं काय घडलं यावेळी?

काश्मीर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

हिवाळा सुरू झाला की अनेकांना काश्मीरला जाण्याचे वेध लागतात. गुलमर्गच्या बर्फात जाऊन खेळण्याची अनेकांची इच्छा असते, मात्र 2024 च्या जानेवारीचे तीन आठवडे उलटले तरी अजूनही काश्मीरच्या खोऱ्यात बर्फच पडलेला नाहीये.

पश्चिम हिमालयाच्या परिसरात आत्तापर्यंत 80 टक्के कमी पाऊस झालाय. काश्मीर खोऱ्यात अत्यल्प पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्यामुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर अत्यंत वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पश्चिमी चक्रवात म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्सेसची कमी संख्या, एल निनो आणि हवामान बदलामुळे हे घडत असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

नेमकं असं का घडलंय आणि याचा काश्मीरवर, आसपासच्या वातावरणावर आणि तुमच्या पर्यटनावर काय परिणाम होऊ शकतो?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

यासोबतच काश्मीरमध्ये बर्फ पडला नाही तर त्याचा तुमच्या आमच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? याचाच हा आढावा.

काश्मीर आणि लडाखमध्ये बर्फवृष्टी होणं का महत्वाचं आहे?

गुलमर्गचे कोरडे फोटो सगळीकडे व्हायरल होत असले तरी संपूर्ण काश्मीर खोऱ्यातच पाऊस किंवा बर्फ पडलेला नाहीये.

मुख्यतः पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या काश्मीरच्या अर्थव्यवस्थेसाठी ही एक चिंतेची गोष्ट आहे. हवामान तज्ज्ञांनी यासाठी एल निनो आणि हवामान बदलाला जबाबदार धरलं असलं तरी हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही.

याआधी 1998 आणि 2016 लादेखील गुलमर्ग आणि लडाखला बर्फवृष्टी झालेली नव्हती.

कोरडा काश्मीर

फोटो स्रोत, Getty Images

काश्मीरमध्ये पडणारा बर्फ हा पर्यटनासाठी तर महत्त्वाचा आहेच पण यासोबतच स्थानिक हवामान, हिवाळी शेती, काश्मिरी सफरचंद आणि इतर फळं यासाठीदेखील हा बर्फ महत्वाचा असतो.

एवढंच काय तर काश्मीर खोऱ्यात वाहणाऱ्या नद्यांवर देखील या बर्फाचा परिणाम होतो.

भारतीय हवामान विभागाने 11 जानेवारीला अशी माहिती दिलीय की सध्या उत्तर भारतात जी धुक्याची चादर पसरली आहे त्यामागे देखील वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि एल निनो ही कारणं आहेत.

गुलमर्ग

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, गुलमर्गच्या स्की रिसॉर्टचा डिसेंबरमधला फोटो

'चिलाई कलान' म्हणजे काय?

काश्मीरमध्ये जेव्हा अतितीव्र थंडी पडलेली असते त्या काळाला 'चिलाई कलान' असं म्हणतात. काश्मीरमध्ये प्रामुख्याने हिवाळा तीन प्रकारचा असतो.

चिलाई कलान, चिलाई खुर्द आणि चिलाई-बच्छा, थंडीच्या तीव्रतेवरून हे तीन प्रकार पडले आहेत.

चिलाई कलान हा सगळ्यात तीव्र थंडीचा काळ असतो. साधारणतः दरवर्षी 21 डिसेंबर ते 31 जानेवारीपर्यंतचे चाळीस दिवस काश्मीरमध्ये खूप थंडी पडते आणि याचकाळात होणाऱ्या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी भारतासह जगभरातून पर्यटक काश्मीर खोऱ्यात गर्दी करत असतात.

नमाज पठण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काश्मीरमध्ये 12 जानेवारीला बर्फवृष्टीसाठी नमाज पठण केलं गेलं

चिलाई कलान नंतर 20 दिवसांसाचा चिलाई खुर्दचा कला येतो जेंव्हा थंडी कमी होती.

31 जानेवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान सामान्यतः चिलाई खुर्दचा काळ असतो आणि त्यानंतर 20 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत 10 दिवसांचा 'चिलाई-बच्छा' (बाळांची थंडी) काळ असतो.

एल निनो म्हणजे काय?

पृथ्वीचं वाढलेलं तापमान आणि वेस्टर्न डिस्टर्बन्सची संख्या कमी झाल्याने बर्फवृष्टीसुद्धा कमी झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. पूर्व प्रशांत महासागरातल्या एल निनोचा देखील यावर प्रभाव पडला आहे.

भूमध्य समुद्रात तयार होणाऱ्या वादळाला पश्चिमी चक्रवात किंवा वेस्टर्न डिस्टर्बन्स असं म्हणतात. या समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं, या दाबामुळे समुद्रातल्या आर्द्रतेसोबत हवा फिरू लागते.

वाऱ्याची दिशा ज्या बाजूला वाहील, त्या दिशेला आर्द्रतायुक्त हवा जाते. पश्चिमी चक्रवात हे पुन्हा पुन्हा येऊ शकतात किंवा दोन चक्रवातांमधील अंतर कधी जास्त तर कधी कमी असते.

भूमध्य समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर हा दाब वाऱ्यासह इराण, इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे देश ओलांडून हिमालयात येतो आणि मग काश्मीरमध्ये बर्फ पडतो.

थोडक्यात काय तर वेस्टर्न डिस्टर्बन्स कमी झाल्यामुळे 2023 मध्ये महाराष्ट्रात पाऊसही कमी झाला आणि 2024 च्या सुरुवातीला काश्मीरमध्ये बर्फही पडला नाही.

पर्यटक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुलमर्गच्या स्की रिसॉर्टकडे घोड्यावरून निघालेले पर्यटक

एल निनोच्या प्रभावाबाबत श्रीनगरच्या हवामान केंद्राचे प्रमुख मुख्तार अहमद यांनी इंडियन एक्सप्रेसला अशी माहिती दिली की, “गेल्या काही महिन्यांपासून एल निनोचा प्रभाव जाणवत आहे. येत्या काही महिन्यांतही तो कायम राहील. यामुळे कदाचित या प्रदेशातील पर्जन्यवृष्टी आणखीन कमी होऊ शकते.”

कमी बर्फवृष्टीचा बाकी देशावर काय परिणाम होईल?

कमी बर्फ पडल्यामुळे गुलमर्ग आणि काश्मीरमधलं पर्यटन कमी झालं आहे. यासोबतच काश्मीर खोरे आणि लडाखमधली पाण्याची उपलब्धतासुद्धा कमी होईल.

वितळणाऱ्या हिमनद्या आणि बर्फवृष्टी हे भारतातील गंगेच्या खोऱ्यात प्रमुख पाण्याचे स्रोत बनतात. हिमालयात वितळलेला बर्फ पुढे अनेक नदी-नाल्यांमधून वाहत जातो.

काश्मीरमध्ये कमी बर्फ पडल्याने जम्मू काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशातल्या शेतीवरही परिणाम होतो.

देशभर प्रसिद्ध असणारी काश्मिरी सफरचंद आणि केशर यांचा दर्जा आणि उत्पन्न यासाठीदेखील बर्फ खूप महत्वाचा असतो.

काश्मिरी सफरचंदाचं झाड

फोटो स्रोत, Getty Images

हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या अहवालानुसार 29 डिसेंबरपासून उत्तरेकडील मैदानी भागात सामान्य तापमानाच्या 5-8 अंश सेल्सिअस तापमान जास्त आहे.

काश्मीर आणि लडाखमध्येही जेवढी थंडी असते तेवढी थंडी पडलेली नाही त्यामुळे लवकर पिकांना बहर आलेला आहे ज्याचा थेट परिणाम उत्पादनावर होऊ शकतो.

काश्मीरच्या पर्यटनावर काय परिणाम होईल?

सरकारी आकडेवारीनुसार 2023च्या जानेवारीमध्ये एकूण 95 हजार 989 पर्यटकांनी गुलमर्गला भेट दिली होती आणि 2024 ची आकडेवारी अजूनही आलेली नसली तरी पर्यटकांची संख्या 60 टक्के कमी असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

काश्मीरमध्ये बर्फवृष्टी न झाल्याने अनेक हॉटेल बुकिंगही रद्द करण्यात आली आहेत.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी गुलमर्गला येणाऱ्या पर्यटकांची संख्या 70 टक्क्यांनी कमी झाली आहे.

काश्मीर

फोटो स्रोत, Getty Images

हिवाळ्यात आयोजित केलेल्या विंटर स्पोर्ट्सवर देखील त्याचा विपरीत परिणाम झालाय. गुलमर्गला दरवर्षी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात पण बर्फवृष्टी झाली नसल्यामुळे त्या स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत.

काश्मीरमध्ये 12 जानेवारीला बर्फवृष्टीसाठी सामुदायिक नमाज पठण आयोजित करण्यात आलं होतं. शुक्रवार(12 जानेवारी)च्या नमाजानंतर श्रीनगरच्या जामिया मशिदीतील अंजुमन औकाफ जामा मशिदीत स्थानिक पातळीवर 'इस्तिस्का' म्हणून ओळखल्या जाणार्‍या विशेष नमाजाचं आयोजन करण्यात आलं होतं.

गुलमर्ग हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष आकिब छाया बीबीसी न्यूजला म्हणाले की, "40% हून अधिक हॉटेलची आरक्षणं रद्द करण्यात आली आहेत आणि नवीन बुकिंग सध्या होत नाहीयेत."

हाउस बोट

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सुमारे 5000 सदस्य असलेल्या गुलमर्गमधील पोनी रायडर्स असोसिएशनचे प्रमुख तारिक अहमद लोन सांगतात की, 'त्यांना गेल्या तीन महिन्यांत फारशी कमाई करता आली नाही.'

काश्मीरच्या हाऊस बोट मालक संघटनेचे अध्यक्ष मंझूर पख्तुन यांनी द वीकला अशी माहिती दिलीय की, "काश्मीरमध्ये दरवर्षी होणाऱ्या साहसी खेळांच्या पर्यटनासाठी बर्फ खूप गरजेचा आहे.

"मागच्या वर्षी काश्मीरला हिवाळ्यात सुमारे 55,000 पर्यटकांनी भेट दिली. यावर्षीच्या कोरड्या हिवाळ्यामुळे पर्यटकांची संख्या कमी झालीय," पख्तुन यांनी द वीकला सांगितलं.

फेब्रुवारी महिन्यातदेखील जर पाऊस किंवा बर्फ पडला नाही तर सुप्रसिद्ध दल लेकमध्ये पाणी कमी होऊ शकतं असंही त्यांनी सांगितलं. काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी न झाल्यामुळे या भागातील पर्यटकांची व्यवस्था करणाऱ्या व्यवसायिकांचं मनोबल खचलं आहे.

काश्मीरला येणाऱ्या पर्यटकांवर केवळ हॉटेलवाले, हाऊसबोट मालक आणि वाहतूकदार एवढेच लोक अवलंबून नाहीत तर हस्तकला, सुकामेवा विक्रेते आणि मसाल्याच्या व्यापाऱ्यांना, विशेषत: केशरचा व्यवसाय करणाऱ्यांनाही पर्यटकांमुळे मोठा व्यवसाय मिळतो.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)