घनदाट जंगलात विमान कोसळलं, ती एकटीच बचावली; 8 दिवस तिने मृत्यूशी कशी झुंज दिली?

ॲनेट हर्फकेन्स स्ट्रेचरवर निर्विचार चेहऱ्याने झोपलेल्या होत्या आणि त्यांच्या उजव्या दंडाला बँडेज बांधलेलं होतं. त्यांच्या हातात एक काळ्या रंगाची वस्तू होती.

फोटो स्रोत, Annette Herfkens

फोटो कॅप्शन, ॲनेट हर्फकेन्स व्हिएतनाममध्ये 1992 मध्ये झालेल्या एका विमान अपघातातून बचावल्या होत्या.
    • Author, अस्या फोक्स
    • Role, बीबीसी लाईव्ह्ज लेस ऑर्डिनरी
    • Author, एडगर मॅडिकॉट
    • Role, बीबीसी लाईव्ह्ज लेस ऑर्डिनरी

डच फायनान्सर ॲनेट हर्फकेन्स त्यांच्या होणाऱ्या पतीबरोबर व्हिएतनाममध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्यांचं विमान घनदाट जंगलात कोसळलं आणि त्या सोडून विमानातील सर्वजणांचा मृत्यू झाला.

ते 1992 साल होतं. ॲनेट हर्फकेन्स आणि त्यांचा ज्यांच्याबरोबर साखरपुडा झाला होते ते विलेम वॅन डेर पास उर्फ पासजे हे दोघेजण व्हिएतनाममधील एका रोमँटिक बीच रिसॉर्टला जात होते.

ॲनेट स्पेनची राजधानी असलेल्या माद्रिदमध्ये वित्तीय क्षेत्रात काम करत होत्या. त्या पासजे यांच्याबरोबर 1979 पासून लाँग-डिस्टंट रिलेशनशिपमध्ये होत्या. पासजे त्यांचे विद्यापीठातील वर्गमित्र होते.

ॲनेट आणि पासजे हे दोघेही व्हिएतनाममधील होच चि मिन्ह सिटीमधून न्हा त्रांगमधील एका किनाऱ्यावरच्या रिसॉर्टला जात असताना त्यांच्या विमानाला खराब हवामानाला तोंड द्यावं लागलं आणि ते व्हिएतनाममधील घनदाट जंगलातील एका दुर्गम, धुक्यानं वेढलेल्या डोंगरकड्यावर आदळलं.

विमान इतक्या भयानकरितीनं कोसळलं होतं की त्यात 30 प्रवासी आणि विमानातील सर्व कर्मचारी मारले गेले. त्यात ॲनेट यांच्या प्रिय पासजे यांचाही मृत्यू झाला.

ॲनेट त्या जंगलात जखमी अवस्थेत आठ दिवस पडून होत्या. त्यांना अनेक फ्रॅक्चर झाले होते, त्यामुळे प्रचंड वेदना होत होत्या. त्यांना चालताही येत नव्हतं. पाणी न प्यायल्यानं शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली होती. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत प्रिय अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा त्या शोक करत होत्या.

ॲनेट यांनी त्या क्षणांबद्दल बीबीसीला सांगितलं. त्या क्षणांनी त्यांना आयुष्यातील सर्वात अंधाऱ्या क्षणांमध्ये सौंदर्य शोधण्यास शिकवलं, असं त्या म्हणतात.

एका धाडसातून प्रेमाची सुरूवात

"मी पासजे यांच्याबरोबर डेटिंग सुरू केलं कारण त्यानं मला चॅलेंज केलं होतं," असं ॲनेट म्हणाल्या.

"तो म्हणाला, 'तू असं काहीतरी कर जे करण्याची तुला हिंमत होणार नाही.' ती हिंमत करणं म्हणजे त्याचं चुंबन घेणं," असं ॲनेट म्हणाल्या.

ते दोघेही जवळचे मित्र होते, ते एकाच विद्यार्थी निवासस्थानी राहत होते. लवकरच त्या दोघांनी डेटिंग करण्यास सुरुवात केली. त्यांना जाणीव झाली की त्या दोघांनाही त्यांचं खरं प्रेम सापडलं आहे.

"असं वाटलं की जणूकाही आम्हाला लॉटरी लागली आहे," असं ॲनेट म्हणाल्या.

पासजे यांनी व्हिएतनाममध्ये एका रोमँटिक सुट्टीचं नियोजन केलं, तेव्हा त्यांना सोबत 13 वर्षे झाली होती. सहा महिन्यांपासून ते दोघेही वेगवेगळ्या देशांमध्ये काम करत होते. पासजे व्हिएतनाममध्ये बँकर होते. तर ॲनेट स्पेनमध्ये ट्रेडरचं काम करत होत्या.

त्यांचं विमान हो चि मिन्ह सिटीमधून व्हिएतनामच्या किनारपट्टीच्या भागात जाण्यासाठी सकाळी 7 वाजता निघणार होतं.

ॲनेट आणि पासजे एका बेंचवर सोबत बसलेले आहेत. पासजे वृत्तपत्र वाचतायेत आणि ॲनेट यांनी त्यांचं डोक पासजे यांच्या मांडीवर ठेवलं आहे आणि त्यांचे डोळे मिटलेले आहेत.

फोटो स्रोत, Annette Herfkens

फोटो कॅप्शन, ॲनेट आणि पासजे यांची भेट विद्यापीठात शिकत असताना झाली
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"मी सकाळी चिडचिड करतच उठले. कारण मला आणखी झोपायचं होतं. मी जेव्हा विमान पाहिलं, तेव्हा मी त्याला सांगितलं की मी त्या विमानात जाणार नाही," असं ॲनेट म्हणाल्या.

ते सोव्हिएत बनावटीचं याकोव्हलेव्ह याक-40 मॉडेलचं, एक छोटसं विमान होतं. ॲनेट यांना क्लॉस्ट्रोफोबिया होता. म्हणजेच अरुंद किंवा अतिशय बंदिस्त जागेत भीती वाटणं.

मात्र, व्हिएतनामच्या त्या किनाऱ्यावरील रिसॉर्टपर्यंत कारनं जाण्याचा पर्याय नव्हता. कारण मध्ये खूपच घनदाट जंगल होतं. त्यामुळे पासजे ॲनेट यांना सांगत राहिले की "प्लीज, आमच्यासाठी विमानात बैस."

अखेर ते विमानात चढले. ते दुसऱ्या रांगेत बसले. तर ॲनेट सीटांच्या रांगाच्या मधल्या पॅसेजमध्ये बसल्या.

तो 55 मिनिटांचा छोटासा प्रवास होता. मात्र, तरीदेखील ॲनेट यांना खूपच अस्वस्थ वाटत होतं.

"मी पासजेच्या घड्याळाकडे पाहत होते," असं ॲनेट म्हणतात.

"घड्याळातील प्रत्येक मिनिटाच्या टिकटिकडे पाहताना मी शाळेत असताना वेळ घालवण्यासाठी शिकलेली एक जर्मन कविता म्हणत होते," असं ॲनेट पुढे म्हणाल्या.

विमान खाली उतरण्यास फक्त पाच मिनिटं राहिलेली असताना विमान एकदम खाली जाऊ लागलं. विमानातील लोक ओरडले. पासजे म्हणाले, "मला हे आवडत नाही."

विमानाचे इंजिन पुन्हा काम करू लागले आणि विमान कोसळू लागलं. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. पासजे यांनी ॲनेट यांचा हात धरला आणि मग काळोख पसरला.

त्यांचं विमान व्हिएतनामच्या घनदाट जंगलातील एका दुर्गम ठिकाण�� कोसळलं होतं.

विमान अपघातात बचावलेल्या एकमेव व्यक्ती

जंगलातील किडे आणि माकडांच्या आवाजानं ॲनेट यांना जाग आली.

"माझ्यावर असलेली काहीतरी जड वस्तू मी बाजूला ढकलली. ती एक सीट होती आणि त्यावर एक मृत व्यक्ती होती. मी धक्का दिल्यानं तो मृतदेह सीटवरून खाली पडला," असं त्या पुढे म्हणाल्या.

त्यांच्या डावीकडे पासजे होते. ते अजूनही त्यांच्या सीटवर सीटबेल्ट बांधलेल्या स्थितीत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित होतं, मात्र ते मृत पावलेले होते.

"मला आठवणारी पुढची बाब म्हणजे मी जंगलातील जमिनीवर होते आणि माझ्या अवतीभोवती झाडं होती. मला त्यामुळे नक्कीच धक्का बसला असेल," असं ॲनेट म्हणाल्या.

त्यांच्या पायांची हाडं मोडलेली होती. त्यांच्या पार्श्वभागात बारा फ्रॅक्चर झाले होते. त्यांचं फुफ्फुस कोलमडलेलं होतं आणि जबडाही तुटला होता.

त्यांचं विमान एका डोंगरावर कोसळलं होतं. विमानाचा एका पंख तुटला होता आणि दुसरा डोंगरावर आदळला होता आणि उलटा झाला होता.

1992 मध्ये कोसळलेल्या विमान एअरलाईन्सच्या 474 या विमानाचे अवशेष

फोटो स्रोत, Annette Herfkens

फोटो कॅप्शन, 1992 मध्ये कोसळलेल्या विमान एअरलाईन्सच्या 474 या विमानाचे अवशेष

ॲनेट यांनी सीटबेल्ट बांधलेला नव्हता. त्या "ड्रायरमधील कपड्याप्रमाणे फेकल्या गेल्या होत्या. सीटच्या रांगेमधील पॅसेजच्या पलीकडे असलेल्या व्यक्तीच्या सीटखाली त्या सापडल्या होत्या."

त्यांचा स्कर्ट गेला होता आणि त्यांच्या एका पायावर अतिशय खोल आणि उघडी जखम होती. "मला तिथलं हाड दिसत होतं आणि माशा, किटक त्याभोवती आधीच घोंघावत होते," असं ॲनेट म्हणाल्या.

मग त्यांना त्यांच्या उजव्या बाजूला एका व्हिएतनामी व्यक्ती दिसला. तो अजूनही जिवंत होता आणि बोलत होता.

ॲनेट यांनी त्याला विचारलं की त्याला वाटतं का की, बचाव पथक इथे त्यांना वाचवायला येईल? त्यावर त्यानं "हो", असं उत्तर दिलं. कारण तो एक "अती महत्त्वाचा माणूस होता."

त्यांच्या उघड्या पायांमुळे त्यांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन त्यानं एका छोट्या कॅरी-ऑन बॅगेतून एक दोन पँट काढल्या आणि त्या ॲनेट यांना दिल्या.

"मी अतिशय वेदना सहन करत ती पँट घातली. आपण एखाद्या अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतदेखील दिसण्याबद्दल कसा प्रयत्न करतो, याबद्दल त्यातून काहीतरी दिसून येतं," असं ॲनेट म्हणाल्या.

पँट घातल्यामुळे त्यांच्या पायाला झालेल्या जखमेमध्ये किडे जाण्यापासून रोखता आलं.

ॲनेट म्हणाल्या, "दिवसाअखेरीस, तो माणूस अशक्त होत गेल्याचं मला दिसलं. त्याच्या शरीरातून हळूहळू जीव जात होता. शेवटी मी त्यालं डोकं खाली झाल्याचं आणि त्याच्या मृत्यू झाल्याचं पाहिलं."

"सुरुवातीला मी काही लोकांचा वेदननं विव्हळण्याचा आवाज ऐकला. मात्र, त्या डोंगरावर जसजशी रात्र पसरत गेली, तसा तिथं दुसरा कोणताही आवाज ऐकू येत नव्हता. मी तिथे पूर्णपणे एकटी होते," असं ॲनेट सांगतात.

शहरातील तरुणी जंगलात एकटी

जेव्हा तो व्हिएतनामी व्यक्ती मरण पावला, तेव्हा ॲनेट अतिशय हादरल्या, घाबरल्या. मात्र, जे काही घडलं होतं, ते हळूहळू त्यांनी स्वीकारलं. त्यांनी इतर गोष्टींचा विचार करणं सोडून वर्तमान परिस्थितीवर लक्ष केंद्रित केलं. जंगलातील वाघाची भीती वाटण्यासारखे भयानक विचार त्यांनी बाजूला सारले.

ॲनेट म्हणतात, "मला माझ्या श्वासांवर लक्ष केंद्रित करावं लागलं. मी कधीही श्वासांचं नियमन किंवा मन स्थिर ठेवण्यासारखे क्लास केले नव्हते. ते पूर्णपणे त्याक्षणी मला आंतरिक प्रेरणेतून वाटलं आणि मी तसं केलं. त्यामुळे मला प्रचंड मदत झाली."

पहिले दोन दिवस ॲनेट त्या व्हिएतनामी माणसाच्या मृतदेहाजवळच राहिल्या. त्या घनदाट जंगलात एकटेपणा जाणवू म्हणून त्यांनी तसं केलं. "एखादं छोटं बाळ त्याच्या आईसोबत जसं राहतं, तसंच ते होतं."

"मात्र, जसजसा वेळ गेला तसतसं ते अधिकाधिक त्रासदायक, घृणास्पद होत गेलं. त्यामुळे मला तिथून बाजूला जावं लागलं. त्या मृतदेहाकडे पाहण्याऐवजी मी जंगलाकडे पाहत होते. माझ्यासमोर असलेल्या झाडांवरील हजारो छोट्या पानांकडे मी पाहत राहिले," असं ॲनेट म्हणाल्या.

ॲनेट यांच्या अवतीभोवती गर्द झाडी होती. त्यांच्याकडे एक बॅकपॅक म्हणजे पाठीवर अडकवायची सॅक होती आणि गिर्यारोहणासाठी वापरतात ती एक काठी होती.

फोटो स्रोत, Annette Herfkens

फोटो कॅप्शन, ॲनेट म्हणतात की त्या विमान अपघातानंतर, ते जंगल हेच त्यांच्यासाठीचं सुरक्षित ठिकाण झालं.

त्या एक शहरी तरुणी होत्या. त्या वित्तीय क्षेत्रात काम करत होत्या आणि न्यूयॉर्क ते लंडन दरम्यान सतत प्रवास करत होत्या.

"मला अचानक जाणीव झाली की ते जंगल किती सुंदर होतं. मी झाडांच्या पानांवर, त्यावर असलेल्या थेंबावर आणि त्या थेंबांमधून परावर्तित होणाऱ्या प्रकाशावर मी जितकं अधिक लक्ष केंद्रित करत गेले, तितकं ते आजूबाजूचं वातावरण अधिक सुंदर वाटू लागलं," असं त्या पुढे म्हणाल्या.

जंगलातील त्या सौंदर्यात ॲनेट रमल्या होत्या, मात्र त्यांना जगायचंही होतं. त्या बिकट परिस्थितीतून मार्गदेखील काढायचा होता.

जेव्हा थोडासा पाऊस पडला, तेव्हा त्यांनी पावसाचे थेंब पकडण्यासाठी त्यांची जीभ बाहेर काढली. मात्र पाणी पिण्यासाठी तेवढं पुरेसं नव्हतं. मग त्यांना एक वेगळी शक्कल लढवावी लागली.

त्या त्यांच्या कोपरांवर रांगत त्यांचं फ��रॅक्चर झालेला पार्श्वभाग आणि पाय ओढत पुढे सरकत होत्या. त्यांनी विमानाच्या इन्सुलेशनचा फोम पकडला. त्यांना होणारी वेदना इतकी प्रचंड होती की त्या बेशुद्धच पडल्या.

मात्र, अखेरीस त्यांनी त्या फोमचा वापर करून सात छोट्या वाट्या बनवल्या. पुन्हा पाऊस पडू लागल्यानंतर त्या फोमच्या वाट्यांमध्ये पाणी भरलं. मग त्या ते पाणी प्यायल्या.

"त्या पाण्याची चव सर्वोत्तम शॅम्पेनसारखी होती. मला माझा प्रचंड अभिमान वाटला. मी विचार केला, बघ, तू जंगलात मार्ग काढते आहेस! आणि मला जाणीव झाली की त्या परिस्थितीत तिथे जिवंत राहणं आणि त्या परिस्थितीवर मात करणं किती कठीण होतं," असं ॲनेट सांगतात.

'पासजेचा विचार करू नकोस'

"पासजेच्या मृत्यूच्या विचारांपासून स्वत:ला वेगळं करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता," असं ॲनेट म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, "जेव्हा जेव्हा माझ्या मनात त्याचा विचार यायचा, तेव्हा मी त्या 10 युरोच्या छोट्या अंगठीकडे पाहत असे. ती अंगठी त्यानं नेदरलँड्समधील लिडेनमधून माझ्यासाठी आणली होती. ती अजूनही माझ्या हातात होती. किड्यांच्या चाव्यामुळे माझा हात सुजला होता."

"मला पूर्ण विश्वास होता की आमचं संसार अतिशय परिपूर्ण झाला असता. आम्ही एकमेकांचे सर्वात चांगले मित्र होतो, सोलमेट होतो. तो खूपच मोहक, रुबाबदार आणि देखणा होता. मात्र, ते त्याला माहित असल्यासारखा तो कधीही वागला नाही."

ॲनेट आणि पासजे हातात बिअर घेऊन एकाच दिशेकडे पाहताना

फोटो स्रोत, Annette Herfkens

फोटो कॅप्शन, ॲनेट आणि पासजे यांचं लग्न ठरलं होतं.

मग ॲनेट यांनी पासजेचा विचार मनात येऊ दिला नाही. त्यांना माहित होतं की पाझजेचा विचार करत राहिल्यास त्यांना रडू येईल, त्यामुळे त्या कमकुवत होतील आणि त्यांना खूप तहान लागेल. त्यामुळे त्यांचं या परिस्थितीतून बचावणं खूप कठीण होईल.

त्या म्हणतात, "मी विमानात त्याच्याकडे पुन्हा पाहण्याचं धाडसदेखील करू शकले नाही. पासजेबद्दल विचार करू नकोस" हा माझा मंत्र झाला.

"मी माझ्या कुटुंबाबद्दल विचार करत होते. घरातील त्यांच्या शॉवरमधून येणाऱ्या पाण्याबद्दल आणि ते कसं दिवसभर पाणी पिऊ शकतात, याचा मी विचार करत होते."

"ते खूप आनंदी, प्रेमळ विचार होते. त्यामुळे मला खूप बरं वाटलं. मला खात्री होती की ते कुठेतरी माझा शोध घेत असतील."

मात्र अन्नाचा अभाव आणि जखमांमुळे होणाऱ्या वेदनांचा त्यांच्यावर परिणाम होत होता.

"सहाव्या दिवसापर्यंत, मी मरणासन्न झाले होते. मात्र, ते सर्वात सुंदर आणि शांततामय मार्गानं होतं. मी जंगलाचं सौंदर्य आणि तिथे असलेले सर्व रंग पाहत राहिले. मला असं जाणवलं की प्रेमाची एक लहर माझ्या दिशेनं येते आहे. मी वर, आणखी वर जात असल्याचं मला वाटत होतं," असं ॲनेट म्हणाले.

मग अचानक त्यांना त्यांच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून नारिंगी रंगाचे कपडे घातलेला माणूस दिसला.

ते पाहून ॲनेट ओरडू लागल्या. त्यामुळे त्यांना लगेचच वास्तवाची जाणीव झाली. त्यांच्या प्रचंड वेदना होऊ लागल्या. मात्र, त्यांना त्यातून मार्गही सापडला होता.

आठ दिवसांपासून त्या जंगलात जिवंत राहण्यासाठी जो संघर्ष करत होत्या, तो आता संपला होता.

एक नवीन सुरुवात

ॲनेट हो चि मिन्ह सिटीमध्ये आल्यानंतर त्यांच्या आईला आणि पासजे यांच्या भावांना भेटल्या. तिथे त्यांचा सहकारी जैमीदेखील होता.

ॲनेट म्हणाल्या, "माझ्या कुटुंबातील प्रत्येकाला वाटत होतं की माझा मृत्यू झाला आहे."

लिडेनमधील पासजे यांच्या कुटुंबाबरोबर त्यांनी दोघांचे संयुक्त अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं होतं. तिथे पासजे आणि ॲनेट एकत्र शिकले होते.

वृत्तपत्रात या दोघांच्या मृत्यूबद्दल शोक संदेश, श्रद्धांजली आधीच प्रकाशित झाल��या होत्या. त्यामुळे ॲनेट जेव्हा घरी परतल्या, तेव्हा त्यांची सांत्वना करण्यासाठी आणि शोक व्यक्त करणाऱ्या पत्रांचा ढीग लागलेला होता.

"प्रत्येकानंच आशा सोडली होती. मात्र, माझा सहकारी जैमी यानं मात्र आशा सोडली नव्हती," असं ॲनेट म्हणतात.

"माझा मृत्यू झाला आहे, असं तो अजिबात मानत नव्हता. ज्यावेळेस कोणीही मी मरण पावली आहे, अशा पद्धतीनं बोलायचा, तेव्हा तो रागावयचा," असं ॲनेट पुढे म्हणाल्या.

ॲनेट हर्फकेन्स यांनी त्यांच्या या अनुभवाबद्दल, कहाणीवर एक पुस्तक लिहिलं आहे. 'टर्ब्युलन्स: अ ट्रू स्टोरी ऑफ सर्व्हायव्हल' असं त्याचं नाव आहे.

त्या नेदरलँड्सला परतल्या तोपर्यंत, स्क्रूच्या साहाय्यानं त्यांचा जबडा नीट करण्यात आला होता. त्यांचं फुफ्फुस पुन्हा फुगवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्श्वभागातील हाडांवरदेखील उपचार करण्यात आले होते. बरं होण्यासाठी त्यांना स्थिर राहावं लागणार होतं.

ॲनेट यांच्या पायाला खूप गंभीर स्वरुपाचा गँगरीन झाला होता. मात्र, व्हिएतनाममधील डॉक्टरांनी त्यावर बराच काळ उपचार केले.

"नेदरलँड्समध्ये डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की, 'आम्ही इथे तुमचे पाय नक्कीच कापले असते. आम्ही इतका प्रदीर्घ काळ शस्त्रक्रिया करत नाही.' त्यामुळे मी डॉक्टरांची आभारी होते."

पासजे यांचा अंत्यसंस्कार भयानक होता.

ॲनेट म्हणाल्या, "त्यांनी मला चर्चमध्ये नेलं. ते एखाद्या विवाह समारंभासारखं होतं. मात्र, माझं लग्न एका शवपेटीशी होत होतं. वेदीवर (शवपेटी ठेवलेली टेबलसारखी उंच जागा) शवपेटी माझी आणि मला घेऊन जाणाऱ्या एका माणसाची वाट पाहत होती."

त्यांचा सर्व मित्रपरिवार तिथे होता. त्या दोघांच्या विवाहाला जे लोक एरवी जमले असते, तेच सर्वजण तिथे उपस्थित होते.

त्या पुढे म्हणाल्या, "तिथे सुंदर भाषणं झाली, छान संगीत होतं. त्यांनी पासजे यांचा मृतदेह कबरीपर्यंत नेला आणि मी त्यांच्यामागे हो���े."

आयुष्याची पुन्हा नव्यानं सुरुवात

जोडीदाराशिवाय आयुष्यं पुन्हा नव्यानं उभं करणं, ही सोपी गोष्ट नव्हती.

ॲनेट म्हणाल्या, "माझ्या जोडीदाराशिवाय, पासजेशिवाय परत येणं हा माझ्यासाठी एक मानसिक आघात होता."

"मी जसजशी मोठी होत गेले, तसतसं मला, त्यानं गमावलेलं आयुष्य, त्याला आयुष्यात ज्या गोष्टी कधीच करायला मिळाल्या नाहीत, त्या दिसत होत्या, त्यांची जाणीव होत होती. त्याला मुलांची खूप इच्छा होती. मात्र तो आनंद त्याच्या वाट्याला आलाच नाही."

त्या अपघातानंतरच्या काही महिन्यांनी ॲनेट यांच्या विद्यापीठातील अनेक मैत्रिणी-मित्र विवाहबद्ध होत होते. मात्र, त्यामुळे ॲनेट यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता.

ॲनेट आणि त्यांची मुलगी खिडकीतून बाहेर पाहत विमानात हात पकडून बसलेल्या होत्या

फोटो स्रोत, Annette Herfkens

फोटो कॅप्शन, ॲनेट आणि त्यांची मुलगी

एका क्षणी ॲनेट यांनी ठरवलं, "ठीक आहे, मी लग्न करणार नाही. बस्स झालं."

मात्र, मग त्यांच्या मैत्रिणीनं त्यांना सांगितलं की त्यांच्या आयुष्यात पासजे यांची जागा घेऊ शकेल अशी एकच व्यक्ती होती, ती म्हणजे जैमी. त्यांचा सहकारी जो त्यांना शोधण्यासाठी व्हिएतनामला आला होता. जेव्हा त्या जिवंत असल्याची कोणालाही आशा नव्हती, तेव्हा जैमीला खात्री होती त्या जिवंत आहेत.

अखेर ॲनेट आणि जैमी यांनी विवाह केला. त्यांना दोन अपत्यं आहेत. जेव्हा ॲनेट यांच्या मुलाला ऑटिझमचा आजार झाला असल्याचं निदान झालं, तेव्हा त्यांना त्या अपघाताच्या वेळेस जंगलात शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवणं उपयुक्त वाटलं.

ॲनेट म्हणतात, "जेव्हा तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते स्वीकारता आणि जे तुमच्याकडं नाही त्याची इच्छा बाळगणं थांबवता, तेव्हाच सौंदर्य प्रकट होतं."

त्यांनी त्या विमान अपघातानंतरची त्यांची परिस्थिती जशी स्वीकारली, त्याचप्रमाणे त्यांच्या मुलाचं आजारपणदेखील स्वीकारलं.

ॲनेट म्हणतात, "आणि मग मी तो जसा आहे तसं पाहिलं: बिनशर्त प्रेमाचा एक सुंदर स्त्रोत. त्याच्याकडून मला जे मिळतं आणि मला त्याच्याबद्दल जे वाटतं, ती गोष्ट म्हणजे निखळ, शुद्ध प्रेम आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)