नोकरी सोडून, घर विकून मुलींबरोबर जगभर भ्रमंती करणारं जगावेगळं जोडपं

फोटो स्रोत, The Hutchinsons
- Author, चार्ली जोन्स
- Role, बीबीसी न्यूज, नॉर्दम्पटनशायर
एका जोडप्यानं त्यांच्या नोकऱ्या सोडल्या, घर विकलं. त्यांचं सर्वकाही पणाला लावण्याचा धोका पत्करला. का? तर त्यांच्या तीन मुलींबरोबर जगभर भ्रमंती करण्यासाठी. सर्व कुटुंबानं एकत्र आनंदात जगावं यासाठी त्यांनी हे केलं.
या पर्यटन आणि प्रवासामुळं त्यांचं कुटुंब आणखी जवळ आलं आहे आणि त्यांचं नातं घट्ट झालं आह��� असं ते म्हणतात.
क्रीस आणि तामिरा हचिनसन हे जोडपं आहे. इतरांप्रमाणेच ते देखील दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराशी खर्चाचा कसाबसा मेळ घालत आयुष्य जगत होते. ते युकेच्या नॉर्दम्पटनशायरमधील कॉर्बीचे आहेत. क्रीस आणि तामिरा यांना कित्येक तास काम करावं लागायचं. त्यामुळे त्यांना सर्वांना एकत्र क्वचितच वेळ घालवता येत असे.
त्यांच्या मालकीचं तीन बेडरुमचं घर होतं. जवळपास दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:चं घर विकलं आणि त्यांचं नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी त्यांनी सरळ विमानतळाचा रस्ता धरला. त्यांच्यासोबत होत्या त्यांच्या तीन मुली. 10 वर्षांची ऑलिव्हिया, 8 वर्षांची स्कार्लेट आणि 4 वर्षांची बेला.
"एक कुटुंब म्हणून आम्ही जवळपास मोडकळीला आलो होतो. मात्र आता आम्ही आमच्या स्वप्नातील आयुष्य जगत आहोत," असं क्रीस म्हणतात.

फोटो स्रोत, The Hutchinsons
क्रीस हे एक पर्सनल ट्रेनर होते, तर तामिरा या पोहायला शिकवायच्या. महिनाभर अथक परिश्रम करून देखील युकेमधील राहणीमानाच्या खर्चाशी जुळवणी करणं त्यांना शक्य होत नव्हतं.
"आम्ही एकच कार ठेवली होती. स्काय टीव्ही बंद केला होता. आम्ही कुठे सुट्टी घालवायला देखील जात नव्हतो. मात्र तरीदेखील दर महिन्याचा खर्च मात्र वाढतच चालला होता," असं तामिरा म्हणतात.
त्या पुढे म्हणतात, "कुटुंबातील आम्ही सर्वजण महिन्यातूनच एकदाच एकत्र जेवत असू. कारण आम्हाला एकमेकांसाठी वेळच मिळत नव्हता. आमच्या कष्टानं मिळणाऱ्या पैशांतून आमच्या फक्त गरजाच जेमतेम पूर्ण होत होत्या."


कोरोना काळात मनात आला विचार
कोरोनाच्या संकटकाळात क्रीस आणि तामिरा पहिल्यांदा घर विकून जगभर भ्रमंती करण्यासंदर्भात एकमेकांशी बोलले.
"नोकरी सोडून, घर विकून जगभर प्रवासास निघाल्यामुळं आम्हाला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. त्यावेळी आम्हाला जाणवलं की, आपण आधी जगत होतो, त्या आयुष्यात आपल्याला पुन्हा परतायचं नाही," असं क्रीस यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, The Hutchinsons
मग 2022 मध्ये या जोडप्यानं त्यांचं घर विकायला काढलं. मात्र त्यासाठी त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला. त्यामुळे तेव्हा त्यांनी त्यांची योजना जवळपास रद्द केली होती. शेवटी मे 2023 मध्ये त्यांचं घर विकलं गेलं आणि त्यांनी थेट लंडनच्या हिथ्रो विमानतळाचा रस्ता धरला.
"आमच्या घरातील शेवटच्या रात्री, आम्ही सर्वजण जमिनीवर झोपलो होतो. कारण आमच्या घरातील सर्व फर्निचर आम्ही विकलं होतं," असं क्रीस म्हणाले.
"जोपर्यंत घर विकून त्याचे पैसे मिळाले नव्हते, तोपर्यंत विमानाचं तिकीट बूक करण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे घर विकल्यावर आम्ही हिथ्रो विमानतळाजवळच्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथून आम्ही मलेशियातील कौला लुंपूरसाठी तिकिटं बूक केली," असं क्रीस सांगतात.
"आम्ही जो निर्णय घेतला, त्यात प्रचंड जोखीम होती. आम्हाला वाटलं की कदाचित हे यशस्वी ठरणार नाही आणि आपल्याला पुन्हा एकदा घरी परतावं लागेल. मात्र आम्हाला मागे वळून पाह��्याची वेळ आली नाही," असं ते पुढे नमूद करतात.
'अपघातानंच आम्ही चीनमध्ये प्रसिद्ध झालो'
या भ्रमंतीस निघण्याआधी क्रीस व्हीडिओग्राफी शिकले. त्यांच्या प्रवासाचे, पर्यटनाचे व्हीडिओ सोशल मीडियावर टाकता यावेत, त्यांच्या प्रवासाची एकप्रकारे नोंद करता यावी यासाठी ते व्हीडिओग्राफी शिकले होते. पुढे हे व्हीडिओ हेच त्यांचं उत्पन्नाचं सर्वात मोठं साधन बनलं.
"आम्ही आमच्या कौटुंबिक जीवनाविषयी आधी व्हीडिओ बनवत होतो. मात्र त्यावेळी आमचे फार मोठे फॉलोअर्स नव्हते. त्यावेळी युट्यूबवर आमचे 7,000 सबस्क्राईबर होते. मात्र आता ती संख्या 1,00,000 वर पोहोचली आहे. तर टिकटॉकवर आमचे जवळपास 12,000 फॉलोअर्स होते ते आता 2,50,000 झाले आहेत," असं 36 वर्षांचे क्रीस सांगतात.

फोटो स्रोत, The Hutchinsons
मलेशियात भटकंती केल्यानंतर हे कुटुंब थायलंड, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, चीन, तैवान, दक्षिण कोरिया, जपान, सिंगापूर, इंडोनेशिया आणि कतारला गेलं.
ते चीनमध्ये असताना त्यांच्या सोशल मीडियावरील व्हीडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे कुटुंब "चीनमध्ये अपघातानंच प्रसिद्ध झालं."
ड्रोनद्वारे त्यांचे ड्रिंक्स आल्याचा त्यांचा एक व्हीडिओ टिकटॉकवर तब्बल 80 लाख वेळा बघितला गेला.
चीनी सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. तिथे त्यांचे व्हीडिओ मोठ्या संख्येनं पाहिले जाऊ लागले. या सोशल मीडियावर त्यांचे 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आणि त्यांच्या व्हीडिओंना लाखो व्ह्यूज मिळू लागले.
'हे सर्व काही सहजसोपं अजिबात नव्हतं'
या जोडप्यानं सांगितलं की, त्यांचा हा प्रवास 'अद्भूत, अविश्वसनीय' होता. परंतु त्याचबरोबर त्यांना अतिशय कठीण परिस्थितीलाही तोंड द्यावं लागलं.
तामिरा यांना थायलंडमध्ये डेंग्यू झाला होता. व्हिएतनाममध्ये त्यांच्या कुटुंबाचं क्रेडिट कार्ड मशीनमध्येच आत अडकलं. तर फिलीपाईन्समधील एका होस्टेलमध्ये राहताना कुटुंबातील सर्व पाचही जण विषाणूच्या संसर्गामुळे पोटात सूज येऊन आजारी पडले. त्यांना हगवण, पोटदुखीचा त्रास झाला.
"आणखी कठीण वेळ म्हणजे जेव्हा आम्ही चीनमध्ये हरवलो होतो. एका पहाटे आमचं सर्व सामान घेऊन आम्ही पायी चालत होतो. त्यावेळेस आमच्या फोनवरील मॅप्स काम करत नव्हते. अखेर आम्हाला आमचं हॉटेल सापडलं. अर्थात त्याबद्दल आपल्याला आता हसू येऊ शकतं," असं तामिरा म्हणाल्या.

फोटो स्रोत, The Hutchinsons
गेल्या काही महिन्यांपासून ते मलेशियातील पेनांग बेटावर स्थायिक झाले आहेत. तिथे तामिरा त्यांच्या मुलींना घरीच शिकवत आहेत. तिथे मुलींची प्रगती होते आहे.
"मुली वेगवेगळ्या संस्कृती, चलनं, भाषांबद्दल आणि कसं फिरायचं याबद्दल शिकत आहेत," असं क्रीस म्हणाले.
"आम्ही जेव्हा घर विकून जगभर भ्रमंती करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिन्ही मुली त्या कल्पनेशी 110 टक्के सहमत होत्या. मात्र जर त्यांनी कधी त्यांचा विचार बदलला आणि घरी परतायचं ठरवलं, तर आम्ही त्यांचं ऐकू," असं क्रीस म्हणतात.
"या सर्व प्रवासात, पर्यटनात त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. त्या जिथे जातात तिथे मित्र बनवतात. जगभरात अनेक डिजिटल भटकी कुटुंब आहेत. ती वर्क फ्रॉम होमद्वारे कुठूनही काम करतात," असं ते पुढे सांगतात.
'आम्ही कधीतरी घरी परत जाऊ असं मला वाटत नाही'
हचिनसन कुटुंबाचं म्हणणं आहे की पुढील पाच वर्षांची त्यांची योजना तयार आहे. ते यावर्षी दुबई, ऑस्ट्रेलिया, भारत, श्रीलंका आणि कंबोडियामध्ये फिरायला जाणार आहेत.
ते कदाचित थोड्या कालावधीसाठी युकेला देखील परत जातील. मात्र कायम स्वरूपी युकेमध्ये परतण्याचं याक्षणी त्यांची कोणतीही योजना नाही. कारण ते युकेमध्ये राहत असताना त्यांचं जे राहणीमान होतं त्यातुलनेत "सध्याच्या त्यांच्या राहणीमानाचा दर्जा खूपच चांगला आहे."

फोटो स्रोत, The Hutchinsons
या जोडप्याला सल्ला विचारणारे अनेक मेसेज येत असतात. ते म्हणतात की, इतर पालकांना यातून प्रेरणा मिळेल अशी त्यांना आशा आहे.
"सर्वकाळ परिस्थिती अनुकूल आणि चांगलीच असते असं नाही. मात्र जर तुम्हाला आव्हानं आवडत असतील आणि तुमच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला आवडत असेल. तर तुम्ही याप्रकारचं आयुष्यं जगण्यासाठी प्रयत्न करू शकता. तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याबद्दल कधीच कळणार नाही," असं तामिरा म्हणाल्या.
"असं आयुष्य जगण्याचं आमचं स्वप्नं होतं आणि आम्ही ते प्रत्यक्षात आणलं आहे. एक कुटुंब म्हणून आम्ही प्रत्येक क्षण भरभरून जगलो आहोत. आम्ही आव्हानांना तोंड दिलं आहे," असं तामिरा म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











