ती दिसत होती, किंचाळत होती, तरीही ज्वालामुखीजवळ पडलेल्या तरुणीला का वाचवता आलं नाही?

फोटो स्रोत, FAMILY HANDOUT
- Author, फ्लोरा ड्रुरी आणि रेचेल हॅगन
- Role, बीबीसी न्यूज
इंडोनेशियातील 'माउंट रिंजनी' नावाच्या ज्वालामुखीत पडून ब्राझीलच्या एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. ती पर्यटनासाठी तिथे गेली होती. इंडोनेशियातील बचाव पथकांमार्फत सध्या तिचा शोध सुरू आहे.
ब्राझीलच्या वेळेनुसार शनिवारी (21 जून) सकाळी 6:30 वाजता या भागात फिरायला आलेली ज्युलियाना मरिन्स बेपत्ता झाली होती. रिंजनी पर्वतावर फिरायला आलेली ज्युलियाना पहिल्यांदा पडली तेव्हा वाचली होती; मात्र बचावपथकांना तिला वाचवण्यात अपयश आलं.
ज्युलियाना मदतीसाठी देत असलेल्या आर्त हाका ऐकू आल्याची माहिती माउंट रिंजनी अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. ती ज्यावेळी पडली त्यावेळी तिला धक्का बसला होता, पण ती सुरक्षित होती, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं.
ती ज्या भागात कड्यावरून पडली तिथे दाट धुकं आणि प्रतिकूल हवामान असल्याने तिला वाचवता आलं नसल्याचं इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
'पडूनही ती जिवंत होती'
तिच्यासोबत फिरायला गेलेल्या लोकांनी काढलेले व्हीडिओ ब्राझीलच्या माध्यमांमध्ये प्रकाशित केले जात आहेत. एका ड्रोन फुटेजमध्ये ती जिवंत होती, असं स्पष्ट दिसत आहे.
या फुटेजमध्ये तर ती गिर्यारोहण क्षेत्राच्या तळाशी असलेल्या राखाडी रंगाच्या जमिनीवर बसलेली आणि तिथे चालत असल्याचंही दिसत आहे.
दुसऱ्या दिवशी बचाव पथकातील लोक 300 मीटर खोल दरीत उतरले, जिथे ज्युलियाना आहे असं त्यांना वाटत होतं. त्यांनी तिला आवाज दिला, पण कसलाही प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांना तिला शोधता आलं नाही.
रिंजनी अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रविवारी (22 जून) सकाळी ती त्या जागेवर नव्हती. तिथे दाटलेल्या धुक्यामुळे त्यांनी थर्मल ड्रोनचा वापर केला आणि शोधकार्यात अनेक अडथळे आल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं होतं की, सोमवारी (23 जून) बचाव पथकांना पुन्हा एकदा मरिन्सचा शोध घेण्यात यश आलं होतं आणि ती आधीपेक्षा खोल दरीत पडल्याचं त्यांना दिसलं होतं. खराब हवामानामुळे त्यांना तिच्या बचावाचे प्रयत्न थांबवावे लागले होते.

फोटो स्रोत, ULET IFANSASTI/GETTY IMAGES
कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर असा आरोप केला होता की, बचाव पथक फक्त 250 मीटर खोलीपर्यंत उतरलं होतं आणि ज्युलियानापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अजूनही 350 मीटर खोल उतरणं अपेक्षित होतं पण ते मागे फिरले.
कुटुंबाने असाही दावा केला होता की, अभयारण्य अजूनही पर्यटकांसाठी खुलं आहे आणि लोक त्याच रस्त्याचा वापर करत आहेत.
ज्युलियानाच्या कुटुंबातील सदस्याने सांगितलं होतं, "जुलियानाला मदतीची गरज आहे. तिची तब्येत कशी आहे ते माहिती नाही. ती तीन दिवसांपासून पाणी आणि अन्नाशिवाय आहे. थंडी सहन करण्यासाठी तिच्याकडे कपडे नाहीत."
पुन्हा परिस्थिती 'जैसे थे'
मरिन्सच्या कुटुंबीयांनी मंगळवारी (24जून) सोशल मीडियाद्वारे खुलासा केला होता की, तिच्यासाठी बचाव कार्य पुन्हा सुरू झालं आहे.
ज्युलियाना ज्या टीमसोबत गेली होती त्या टीमच्या दोन सदस्यांनी ब्राझिलच्या नेटवर्क ग्लोबोला दिलेल्या मुलाखतींमध्ये बोलताना सांगितलं की, ही चढाई अत्यंत कठीण होती.
दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं की, अपघात झाला तेव्हा मरीन त्यांच्या मार्गदर्शकासह खाली उतरणाऱ्या एका गटाच्या शेवटी होती. "पहाटेच्या अंधारात फक्त कंदील घेऊन त्या भागात राहणे खूप कठीण होते, तिथे तुमचे पाय घसरू शकतात," असं तो म्हणाला.
ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ते इंडोनेशियन सरकारच्या संपर्कात आहे आणि मदत कार्यांवर लक्ष ठेवण्यासाठी दूतावासाचे दोन कर्मचारी त्यांनी पाठवले आहेत.
एका गुंतागुंतीच्या बचाव मोहिमेनंतर, अखेर मंगळवारी (24 जून) बचाव पथक तिच्या मृतदेहाजवळ पोहोचल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
मरिन्सच्या कुटुंबीयांनी म्हटलंय, "तिचा मृत्यू झाला आहे हे सांगताना आम्हाला अतीव दुःख होतंय. तिला वाचवण्यात यावं म्हणून तिच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाचे आभार."
इंडोनेशियातील लोम्बोक बेटावर येण्यापूर्वी मारिन्स थायलंड आणि व्हिएतनाममध्ये बॅकपॅकिंग करत फिरली होती.
शोध आणि बचाव प्रमुख मोहम्मद स्याफी यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, एकूण 50 लोक बचाव कार्यात सहभागी झाले.
2022 मध्ये माउंट रिंजनीच्या शिखरावरून पडून एका पोर्तुगीज व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या वर्षी मे महिन्यात, ज्वालामुखी जवळच्या पर्वतावर चढण्याचा प्रयत्न करताना एका मलेशियन गिर्यारोहकाचा मृत्यू झाला होता.
माउंट रिंजनी हा इंडोनेशियातील दुसरा सर्वात उंच ज्वालामुखी आहे, जो 3 हजार 700 मीटरपेक्षा जास्त उंचीवर आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











