व्हिसा नाही? टेन्शन नाही; भारतीयांना फक्त पासपोर्टवर 'या' देशांमध्ये मिळणार खुला प्रवेश

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शारदा मियापुरम
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आपल्यापैकी अनेकांना एकदा तरी परदेशी फिरायला जावंसं वाटत असतं. परंतु, पासपोर्ट असला तरी व्हिसा मिळवण्यासाठीची ती प्रक्रिया अनेकांना त्रासदायक वाटत असते.
पण, तुम्हाला जर असं सांगितलं की, जगात असे काही देश आहेत जिथं तुम्हाला केवळ तुमच्या भारतीय पासपोर्टवर प्रवेश मिळतो, तर तुम्हाला खरं वाटणार नाही.
परंतु, असे एक-दोन नव्हे तर तब्बल 59 देश आहेत जिथे तुम्हाला व्हिसाशिवाय केवळ भारतीय पासपोर्टवर प्रवास करता येतो.
या देशांमध्ये व्हिसाशिवाय किंवा अगदी सोपी प्रक्रिया करून प्रवास करता येतो, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल!
दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या 'हेन्ली पासपोर्ट इंडेक्स'मध्ये भारताची स्थिती सुधारली आहे आणि आता 59 देशांमध्ये भारतीय नागरिक सहज प्रवास करू शकतात.
काही ठिकाणी थेट व्हिसा लागत नाही, काही ठिकाणी विमानतळावरच तो मिळतो, तर काही ठिकाणी फक्त ऑनलाईन अर्जही पुरेसा असतो.
अलीकडे जाहीर झालेल्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारतीय पासपोर्टच्या क्रमवारीमध्ये मागील वेळेपेक्षा थोडीशी सुधारणा झाली आहे.
गेल्या वर्षी या क्रमवारीत भारत 80व्या स्थानावर होता, तर 2025 मध्ये तो 77व्या स्थानावर पोहोचला आहे.
व्हिसाशिवाय पासपोर्ट वापरून किती देशांमध्ये प्रवास करता येतो, या आधारावर हेन्ली ही क्रमवारी जाहीर करतं.
या अहवालानुसार, भारतीय पासपोर्टवर व्हिसाशिवाय 59 देशांमध्ये प्रवास करता येतो.
हेन्ली हा इंडेक्स इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (आयएटीए) डेटावर आधारित तयार करतात.

हेन्लीच्या वेबसाईटनुसार, 'हेन्ली पासपोर्ट इंडेक्स' हा जगभरातल्या 199 वेगवेगळ्या पासपोर्ट्ससाठी 227 प्रवास स्थळांवर व्हिसा मुक्त प्रवेश किती आहे, याची तुलना करून क्रमवारी ठरवतात.
व्हिसाशिवाय म्हणजे व्हिसा मुक्त प्रवास करू देणाऱ्या देशांची संख्या किती आहे, याच्या आधारावर ही क्रमवारी ठरवली जाते.
व्हिसा ऑन अरायव्हल (व्हिओए) किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरिटी (इटीए) अशा सोयींनाही या रँकिंग किंवा क्रमवारीमध्ये समाविष्ट केलं जातं.
या यादीत सिंगापूरचा पासपोर्ट पहिल्या क्रमांकावर आहे, कारण तो 193 देशांमध्ये व्हिसाशिवाय (व्हिओए आणि इटीएसह) प्रवास करण्याची मुभा देतो.

फोटो स्रोत, henleyglobal.com
जपान आणि दक्षिण कोरियाचे पासपोर्ट 190 देशांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देतात आणि त्यामुळे हे दोन्ही देश पुढच्या क्रमांकांवर आहेत.
या यादीत 77व्या स्थानावर असलेल्या भारतीय पासपोर्टवर 59 देशांमध्ये व्हिसा नसतानाही, किंवा व्हिसा ऑन अरायव्हल (व्हिओए) किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरिटी (इटीए) अशा पद्धतींने सहज प्रवास करता येतो.
म्हणजे भारतीय पासपोर्ट असलेल्या व्यक्तींना या देशांमध्ये जाण्यासाठी आधीच व्हिसा काढण्याची गरज भासत नाही.
जर तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल, तर तुम्ही 28 देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकता, आणखी 28 देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल मिळतो, आणि 3 देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरिटी घेतल्यावर प्रवास करता येतो.

भारतीय पासपोर्टवर तुम्ही व्हिसा नसतानाही अंगोला, बार्बाडोस, भूतान, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, कूक आयलंड, डोमिनिका, फिजी, ग्रेनेडा, हैती, इराण, जमैका आणि किरिबाती या देशांमध्ये प्रवास करू शकता.
याशिवाय, मकाऊ, मादागास्कर, मलेशिया, मॉरिशस, मायक्रोनेशिया, मोंटसेराट, नेपाळ, नियू, फिलीपिन्स, रवांडा, सेनेगल, सेंट व्हिन्सेंट अॅन्ड द ग्रेनेडिन्स, थायलंड, त्रिनिदाद अँड टोबॅगो, कझाकस्तान आणि वानुआतु हे देशही भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय त्यांच्या देशात प्रवेश देतात.

भारतीय पासपोर्ट असल्यानं तुम्ही व्हिसा ऑन अरायव्हल (म्हणजे विमानतळावर पोहोचल्यावर व्हिसा मिळणं) या अंतर्गत या देशांमध्ये जाऊ शकता - बोलिव्हिया, बुरुंडी, कंबोडिया, कॅमेरून बेटे, केप व्हर्डे आयलंड्स, जिबुती, इथिओपिया, गिनी बिसाऊ, इंडोनेशिया, जॉर्डन, लाओस आणि मालदीव येथे प्रवास करता येऊ शकतो.
याशिवाय मार्शल आयलंड, मंगोलिया, मोझांबिक, म्यानमार, नामिबिया, पॅलाऊ आयलंड, कतार, सामोआ, सिएरा लिओन, सोमालिया, श्रीलंका, सेंट लुसिया, टांझानिया, तिमोर-लेस्ते, तुवालू आणि झिम्बाब्वे हे देशही भारतातून गेलेल्या नागरिकांना त्यांच्या देशात पोहोचल्यानंतर व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा देतात.

फोटो स्रोत, Getty Images

केनिया, सेशल्स आणि सेंट किट्स अॅण्ड नेव्हिस हे देश इटीएची (इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरिटी) सुविधा देतात. म्हणजे तुम्ही या देशांमध्ये जाण्यापूर्वी ऑनलाइन परवानगी घेऊन सहज प्रवास करू शकता.
म्हणजेच या देशांमध्ये जाण्यासाठी तुम्हाला पारंपरिक व्हिसाची आवश्यकता नाही.
परंतु, या देशांमध्ये जाण्याआधी तुम्हाला डिजिटल इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरिटीसाठी (इटीए) आधीच ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











