ग्रिम्से: 20 लोक आणि 10 लाख पक्ष्यांचं वास्तव्य असलेलं जगाच्या कोपऱ्यातलं शेवटचं बेट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मिशेल ग्रॉस
- Role, बीबीसी
आईसलँडच्या उत्तरेकडच्या समुद्रकिनाऱ्यावरून एक 40 किमी प्रवास केला की, आपण एका स्वप्नावत जागी येऊन पोहोचतो. जगात कुठेच दिसत नाहीत असे सुंदर पक्षी, जोरदार वारे आणि युरोपातली सगळ्यात दुर्गम वस्ती असलेलं हे बेट.

फोटो स्रोत, Alamy
ऑगस्टच्या तळपत्या दिवसांतही या ग्रिम्से बेटावरचा वारा पाण्यापासून बचाव करणाऱ्या आमच्या कपड्यातूनही इतक्या जोरानं आत शिरला की, पुढची झुळूक आली तेव्हा आता आम्ही उडूनच जाऊ असं वाटलं.
अशा घोंगावणाऱ्या वाऱ्यात मी आणि माझे पती चालायला मदत करणाऱ्या काठ्या घेऊन ग्रिम्सच्या सुंदर बेटावर उतरलो.
चालताना तोल सांभाळण्यापेक्षा जास्त 'आर्क्टिक टर्न' या पक्षांपासून बचाव करण्यासाठीच या काठ्यांचा जास्त उपयोग होणार होता.
खडकाळलेल्या समुद्रकिनाऱ्यावरून चालणाऱ्या, पक्ष्यांच्या घरट्यांच्या जवळून जाणाऱ्या प्रवाशांवर हल्ला करण्यासाठी हे पक्षी कुप्रसिद��ध आहेत याची आम्हाला कल्पना होतीच.
बेटावरच्या बेसाल्ट खडकांवरून चालत असताना काही पफिन्स पक्षीही दिसले. ऑगस्टमध्ये समुद्राच्या पलिकडे स्थलांतर करून एप्रिल महिन्यात ते ग्रिम्सेवर परतात. त्यातले काही मागे रेंगाळलेले पफिन्स पाहण्याचा योग आला.


6.5 चौरस किलोमीटर आकाराचं, आईसलँडच्या उत्तरेकडे असणारं हे छोटंसं ग्रिम्से बेट मानवी वस्ती असणारं उत्तर ध्रुवावरची सगळ्यात शेवटची आणि एकमेव जागा आहे.
एका थंडगार, दुर्गम देशाचा हा आणखी थंडगार दुर्गम भाग. इथं पोहोचणंही तितकंच कठिण. फारसा मानवी संपर्क नसलेल्या जागांची आवड असणाऱ्यांनीच इथं यायचं धाडस करावं.

फोटो स्रोत, Alamy
एक छोटीशी नाव हा 1931 पर्यंत ग्रिम्सेपर्यंत पोहोचायचा एकमेव मार्ग होता. वर्षातून दोनच वेळा या बोटीतून इथून पत्रव्यवहार करता यायचा. पण आता आकुरेरी या आईसलँडमधल्या शहरातून 20 मिनिटं विमान प्रवास आणि पुढे डाल्विक गावातून तीन तासाचा नावेने प्रवास केला की साहसी प्रवाशांना या खडकाळ, दुर्गम बेटावर येता येतं.
इथं येणारे बरेच जण आमच्यासारखे युरोपमधली सगळ्यात दुर्लक्षित राहिलेली वस्ती आणि रंगीबेरंगी पक्षी बघायची उत्सुकता असलेले असतात.
या कॅमिकेझ आर्क्टिक टर्न आणि पफिन पक्षांशिवाय, काळ्या पायांचे किट्टीवाक, रेझरबिल्स आणि गिलेमोट असे अनेक पक्षी इथं मुक्तपणे फिरत असतात. हे शांत, प्रसन्न बेट घोड्यांचं आणि शेळ्या मेंढ्यांचंही घर आहे. समुद्र पक्ष्यांची संख्या तर इतकी की मोजले तर प्रत्येक एका रहिवाशामागे 50,000 पक्षी भरतील.
“तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आम्ही फक्त 20 लोक इथं राहतो,” हला इन्गोल्फ्सडॉटीर सांगतात. त्या आमच्या सहल मार्गदर्शक आणि आर्टिक ट्रीप कंपनीच्या मालक आहेत.
आईललँडची राजधानी रेकजाविकमध्ये त्यांचा जन्म झाला. आईसलँडच्या दक्षिणपूर्व भागात त्या वाढल्या आणि आपल्या बहिणीला भेटण्यासाठी ग्रिम्सेमध्ये अनेकदा आल्यानंतर इथंच स्थायिक झाल्या.
त्यांची बहिण एका स्थानिक मच्छीमाराशी लग्न झाल्यानंतर ग्रिम्सेला वास्तव्यास आली. जवळपास 20 वर्ष ग्रिम्सेमध्ये येणं-जाणं केल्यानंतर 2019 मध्ये त्यांनी इथे कायमचं स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या कधी परत गेल्याच नाहीत.
“मी प्रेमासाठी इथं आले असं लोक म्हणतात. पण खरंतर, मी या जागेच्याच प्रेमात पडले,” त्या सांगतात. या जागेत काहीतरी जादू त्यांना जाणवते. लोक इथे कसे राहतात याचं त्यांना आकर्षण वाटलं.
इथल्या माणसांविषयी, निसर्गाविषयी प्रेम वाटलं.
“इथल्या निसर्गाची ताकद अफाट आहे. थंडीच्या दिवसांत तर विलक्षण अनुभव येतात. काळ्याभोर आकाशात दिसणारा ध्रुवीय प्रकाश, ते चांदणं आणि वादळं. वसंत ऋतुत सूर्याची किरणं येतात. पक्षी गाऊ लागतात. प्रत्येक ऋतू खास असतो,” इन्गोल्फ्सडॉटीर सांगत होत्या.

फोटो स्रोत, Alamy
टूर कंपनी चालवण्यासोबतच इन्गोल्फ्सडॉटीर यांनी त्यांच्या घरी प्रवाशांची रहायची सोय करायला 9 खोल्या बांधल्या आहेत.
सहल नसेल आणि पाहुणे नसतील तेव्हा इन्गोल्फ्सडॉटीर दिवसातून एकदा वीजनिर्मिती केंद्राला भेट देऊन सगळं सुरळीत सुरू असल्याची खात्री करून घेतात.
आईसलँडमध्ये वीजेसाठी भूऔष्णिक आणि अक्षय उर्जेचा वापर केला असला, तरी ग्रिम्से बेट इतकं लांब आहे की ते राष्ट्रीय उर्जेचं जाळं तिथंपर्यंत पोहोचवता येत नाही. त्यामुळे हे बेट एका डिझेल जनरेटरवर चालतं.
“इथं सहलीला येणारे लोक मला कंटाळा येत नाही का असं नेहमी विचारतात. पण माझ्यासमोर चिक्कार कामं असतात. मुख्य भुभागावरचे लोक करतात तेच सगळं आम्ही इथे करतो. काम करतो, व्यायाम करतो. पण इथला निसर्ग मला इथंच धरून ठेवतो,” इन्गोल्फ्सडॉटीर सांगतात.
ग्रिम्सेला भेट देताना…
ग्रिम्सलाे भेट द्यायचा सुयोग्य काळ म्हणजे एप्रिल 10 ते ऑगस्ट 10. पफिन्स पक्षी ग्रिम्सेत आलेले असतात. आर्क्टिक ट्रीप या संस्थेकडून पक्षी निरिक्षणाचे सत्रही घेतलं जातं.
प्रवाशांना चालवत वेगवेगळे पक्षी दाखवले जातात, तर इतर टूर कंपन्या बोटीतून पक्षी दाखवायला नेतात.
ग्रिम्सेवर हॉस्पिटल, डॉक्टर किंवा पोलिस स्टेशन नाही. काही आपतकालिन परिस्थिती ओढावलीच तर स्थानिकांना प्रशिक्षण दिलेलं आहे.
“इथं रहायचं असेल तर लवचिकता आणि वेगवेगळ्या परिस्थितीत राहण्याची तयारी तुमच्या अंगी पाहिजे. काहीही होऊ शकतं याबद्दल आम्ही मनाची तयारी केली आहे. आम्हाला आपतकालिन परिस्थितीत काय करायचं याचंही प्रशिक्षण दिलं आहे. शिवाय तीन आठवड्यातून एकदा विमानाने डॉक्टर येतात,” इन्गोल्फ्सडॉटीर पुढे म्हणाल्या.
बेटाच्या दक्षिण पश्चिम भागात स्थानिकांच्या घरांची रांग आहे. तिथंच प्रवाशांसाठीही घरं आहेत. या वस्तीला सँडविक म्हणतात. त्यात एक शाळाही आहे. पण आता ती जागा समुह केंद्र म्हणून वापरली जाते.
याशिवाय, एक हस्तकला प्रदर्शनाची खोली आणि घरी बनवलेले बर्फात गरजेचे असणारे कपडे, विणलेल्या गोष्टी आणि घर सजावटीचं सामान विकणारं एक कॅफेही आहे. बेटावर छोटंसं वाण सामानाचं दुकान आहे. दिवसातून एकच तास ते सुरू असतं.
एवढंच नाही तर एक रेस्ट्रॉरंट, बार, स्विमिंग पूल, लायब्ररी, चर्च आणि हवाई मार्गही आहे. हा मार्ग म्हणजे पक्षाचं बसायचं आवडतं ठिकाण.

फोटो स्रोत, Michelle Gross
आईसलँडमधल्या इतर अनेक छोट्या गावांप्रमाणेच ग्रिम्सेचा इतिहासही मौखिक आहे. लोककथेतल्या या गोष्टीप्रमाणे या बेटाचं नाव गिरमूर या नॉर्वेमधल्या एका प्रवाशाच्या नावावरून पडलंय. पश्चिम नॉर्वेमधल्या सोगन जिल्ह्यातून तो समुद्रमार्गे बेटावर आला होता.
ग्रिम्सेचा सगळ्यात पहिला उल्लेख 1024 च्या आईसलँडच्या हायमस्क्रिंगला या गाथेत सापडतो. नॉर्वेच्या राजा ओलाफूरने मैत्रीचं प्रतिक म्हणून या बेटाची मागणी केली होती.
पण इथं मासे आणि पक्ष्यांचं तेव्हाही एवढं वैविध्य होतं की, बेटाचा त्याग करायला स्थानिक नेत्यांनी नकार दिला.
न्यूमोनिया आणि मासेमारीत झालेले अपघात यामुळे ग्रिम्सेची लोकसंख्या एकदम कमी झाली. छोट्या नावा, खराब वातावरण आणि नैसर्गिक बंदरांची कमतरता यामुळे इथं उतरणं फार धोक्याचं होतं.
तरीही मुख्य भुभागावरून येणारे मच्छीमार आणि आसपासच्या बेटांवर व्यापारासाठी येणाऱ्यांमुळे इथं मानव वस्ती टिकून राहिली.
2009 मध्ये ग्रिम्से आकुरेरी नगरपालिकेचा भाग झालं. पण बेटावरच्या काही स्थानिकांना अजूनही आपण वेगळे आहोत असं वाटतं.
“ग्रिम्सेची मालकी इथल्या रहिवाशांची, आकुरेरी नगराची आणि आईसलँड सरकारची आहे. या बेटाचा वारसा जपून ठेवण्यासोबतच इथला नैसर्गिक ठेवा आणि समुदाय टिकवून ठेवण्याचं कामंही ते करतात,” मारिया टी ट्रायग्वाडोटीर म्हणतात. त्या ग्रिम्सेच्या पर्यटन प्रकल्प व्यवस्थापक आहेत.
इथं येणाऱ्या इतर लोकांप्रमाणेच ट्रायग्वाडोटीर यांचंही या मोहक बेटासोबत खास नातं आहे.
“बेटाचं दुर्गम असणं, त्याचा खास ध्रुवीय प्रकाश आणि अभुतपूर्व पक्षी मला सगळ्यात जास्त मोहात पाडतात,” त्या सांगतात.
या गवतांवरून, उंच कड्यांवरून चालण्यात, प्रदेशातल्या खोल गंभीर शांततेचा अनुभव घेण्यात आणि हजारो समुद्रपक्षी पाहण्यात काहीतरी विलक्षण आहे असं त्यांना वाटतं.
“इथल्या लोकांचं वागणं, त्यांचं आदरातिथ्य फार उबदार वातावरण तयार करतं. एकमेकांना घट्ट धरून असणारे हे लोक ग्रिम्सेला आणखी खास बनवतात,” त्या म्हणतात.

फोटो स्रोत, Michelle Gross
पक्षांसोबतच, बेटाची भौगोलिक जागाही इथलं प्रमुख आकर्षण आहे. 66°N अक्षांशावर असलेलं बेट हा आईसलँडचा उत्तर ध्रुवावर असणारा एकमेव भाग आहे. त्यावर एक नाही तर दोन शिल्प बसवण्यात आली आहेत.
उत्तर ध्रुववृत्त आणि ग्रिम्सी एकत्र येतात त्या काल्पनिक रेषेचं प्रतिक म्हणून 2017 मध्ये 3,447 किलोचं एक काँक्रिटचं गोलाकार ओर्बिस एट ग्लोबस हे शिल्प बेटाच्या उत्तरेकडे असलेल्या सगळ्यात उंच भागावर बसवण्यात आलंय.
“पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीचं ते चांगलं माध्यम आहे. शिवाय, ते शिल्प हलवणं अशक्य गोष्ट आहे. त्यासाठी मुख्य भुभागावरून काही खास उपकरणं मागवावी लागतात,” इन्गोल्फ्सडॉटीर सांगत होत्या. दुसरं शिल्पही उत्तर ध्रुववृत्ताचंच प्रतिक आहे. ते 1970 साली स्थापित करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Alamy
पृथ्वीचा अक्ष 23.5 अंश कललेला असल्याने उत्तर ध्रुववृत्ताच्या जागेत दरवर्षी थोडा बदल होत असतो. त्यासोबत सरकणाऱ्या अक्षांश रेषांशी समांतर ठेवता यावं यासाठी उत्तर ध्रुववृत्ताचं प्रतिक म्हणून ठेवलेलं हे शिल्पही दरवर्षी 14 मीटर अंतराने सरकवावं लागतं. काही वर्षांनी हे शिल्प दक्षिणेकडे 130 मीटरपर्यंत सरकलेलं असेल. 2047 सालापर्यंत ग्रिम्से बेट उत्तर ध्रुववृत्ताच्या बाहेर जाईल. त्यानंतर हे शिप्लही कड्यावरून समुद्रात फेकून दिलं जाईल.
ग्रिम्से सध्या तरी उत्तर ध्रुववृत्तांत येत असल्याने इथल्या स्थानिकांना ध्रुवीय रात्र अनुभवता येते. याचा अर्ध, डिसेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत बेट सुर्यप्रकाशाविना संपूर्ण अंधारात असतं. “अनेकांना या अंधाराचा त्रास व्हायला लागतो. मला कधीही तो झालेला नाही. पुन्हा प्रकाश येणार आहे याची खात्री आम्हाला असते,” इन्गोल्फ्सडॉटीर म्हणतात.
या अंधाराशी जुळवून घ्यायचा एक मार्ग म्हणजे स्वतःचा प्रकाश तयार करणं. “ख्रिसमससाठीची सजावट आम्ही फार लवकरच सुरू करतात. त्यात भरपूर दिवे लावले जातात आणि फेब्रुवारीत सूर्यप्रकाश येत नाही तोपर्यंत ही सजावट तशीच ठेवली जाते,” इन्गोल्फ्सडॉटीर सांगत होत्या.
नजीकच्या भविष्यात ग्रिम्सेमध्ये अनेक बदल होणार असल्याचं त्या पुढे म्हणतात. पुढच्या उन्हाळ्यात विकासाची कामं सुरू होतील. त्यात लेखक आणि इतर कलाकारांना जास्त काळ इथं राहत�� येईल अशीही सोय करायचे प्रयत्न केले जातील.
सुदैवाने आमच्या ग्रिम्से सहलीदरम्यान टर्न पक्षांनी एकदाही हल्ला केला नाही, पण ग्रिम्सेला दिलेल्या भेटीनं माझ्या मनात समुदायाचं महत्त्व फार खोलवर अधोरेखित झालं. इथं पुन्हा मोठ्या सुट्टीसाठी यायची इच्छाही पुढं आली.
“बेटावर पर्यटकांची गर्दी आम्हाला नको आहे,” इन्गोल्फ्सडॉटीर सांगत होत्या. “या बेटावर मिळणारी शांतता आणि खासगीपणाचा अनुभव मला फार महत्त्वाचा वाटतो. इथं किती लोक येणार यावर आम्ही मर्यादा घातल्या आहेत. खूप सुरुवातीपासून बेटावरचं जीवन अगदी व्यवस्थित सुरू आहे. फार उशीर होण्याआधीच उरलेल्या आईसलँडने त्याची दखल घ्यायला हवी,” त्या पुढे म्हणाल्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











